पश्चिमेच्या देवलोकात 

विजय तरवडे 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

आठवणीतील अक्षरे ः होमरची ‘इलियड’ आणि ‘ओदिसी’ ही दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. ‘हेलन ऑफ ट्रॉय’ सिनेमामुळे त्यातले एक उपकथानक लोकांना ठाऊक झाले. लहानपणी चांदोबा मासिकात ‘रूपधरच्या यात्रा’ नावाने त्यातला मराठीकरण केलेला काही भाग प्रकाशित झाला होता.  
१९८४ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ‘इलियड’ आणि ‘ओदिसी’चे मराठी भाषांतर प्रकाशित केले. भाषांतर करण्यासाठी त्यांनी शामराव नीलकंठ ओक या विनोदी लेखनासाठीच विशेष प्रसिद्ध असलेल्या लेखकाची निवड केली. शामराव ओक यांची ‘चोरबाजारातील चीजा’, ‘परिहास’, ‘शामराई’, ‘गड्या आपुला गाव बरा’, ‘विनोदबत्तीशी’, ‘बोकॅशिओच्या चावट गोष्टी’ वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यात काही भाषांतरे आहेत. 

हेरा, ॲथेना आणि ॲफ्रोडायटी या देवतांपैकी कोण अधिक सुंदर या प्रश्नावर ट्रॉयचा राजपुत्र पॅरीसने ॲफ्रोडायटीच्या बाजूने कौल दिला. म्हणून तिने त्याला जगातील सर्वात सुंदर स्त्री हेलन मिळवून दिली. पण हेलन विवाहित होती. पॅरीसने हेलनला ट्रॉयला नेले. हेलनचा नवरा मेनेलॉस आणि इतर राजांनी ट्रॉयवर हल्ला केला. दहा वर्षे युद्ध झाले. ट्रॉयचा पाडाव झाला. आधी पॅरीस मारला गेला. हेलनने त्याच्या भावाशी लग्न केले. नंतर भाऊदेखील मारला गेला. हेलन मेनेलॉसकडे परत गेली. मेनेलॉसला मदत करणारा एक राजा युलिसिस उर्फ ओदिसस मातृभूमीकडे निघाला. त्याचा प्रवास म्हणजे ओदिसी. 

युलिसिसला या प्रवासात युद्धदेवता ॲथेनाची सहानुभूती आहे. ती कधी मेंटॉर या मित्राचे रूप घेऊन त्याला सल्ला देते. कधी त्याच्या वतीने देवलोकात रदबदली करते. परतीच्या सागरप्रवासात समुद्रदेवता पॉसिडॉनच्या अवकृपेमुळे युलिसिसच्या जहाजाला अपघात होऊन तो ऑगिजिया बेटावर अडकून पडतो. तिथे राहणारी कॅलिप्सो ही तरुण व देखणी अप्सरा त्याच्या प्रेमात पडते. त्याला अमरत्वाचे आश्वासन देते. पण तो तिला प्रतिसाद देत नाही. शेवटी ॲथेनाच्या रदबदलीने देवलोकातून दूत येऊन कॅलिप्सोला ताकीद देतो. ती युलिसिसला लाकडे आणून देते आणि जहाज बांधायला सांगते. जहाज बांधून झाल्यावर बरोबर भरपूर शिधा देऊन त्याला निरोप देते. तरीही पॉसिडॉन पुन्हा त्याच्या जहाजाला अपघात घडवतो. या वेळी ॲथेना त्याला वाचवते. अनेक संकटे ओलांडून युलिसिस इथाका बेटावर पोचतो. 

इथाका बेटावर त्याची पत्नी पेनेलोपी आणि मुलगा तेलेमॅकस त्याची वाट बघत आहेत. त्यांच्यावर संकट आलेले आहे. युलिसिस परत येणे शक्य नाही असा कयास बांधून आसपासचे अनेक राजे जमले आहेत आणि सर्वजण पेनेलोपीला नव्या वराची निवड करण्यासाठी धमकावत आहेत. ॲथेनाचे प्रोत्साहन आणि अप्रत्यक्ष मदत, मेंटॉरचे रूप घेऊन दिलेला सल्ला या सहाय्याने युलिसिस सर्वांचा पाडाव करतो. त्याचे व राणीचे पुनर्मीलन होते. गोष्ट इतकी साधी सरळ असली तरी कॅलिप्सोची हकिकत, सागरी वादळे आणि शेवटची निर्णायक लढाई यांची वर्णने रोचक आहेत. 

इथला देवलोक (ऑलिंपस पर्वत) आपल्या स्वर्गलोकापेक्षा निराळा आहे. इथले देव अवतार वगैरे घेत नाहीत. थेट पृथ्वीवर राहायला येतात. फारसे चमत्कार करीत नाहीत. माणसांना वर, शक्ती वगैरे देणे टाळतात. त्यांच्या लाडक्या भक्तांनाही आपली लढाई आपणच लढावी लागते. आयते काही मिळत नाही. 

ॲफ्रोडायटी (व्हीनस) व्हल्कन उर्फ ग्रीकांच्या विश्वकर्म्याची पत्नी. तो अपंग असल्यामुळे ती त्याच्याशी प्रतारणा करते. काही देवांशी आणि एका मानवाशी विवाहबाह्य संबंध ठेवते. इथे अपोलो उर्फ सूर्य हा ज्युपिटर ऊर्फ गुरूचा मुलगा आहे. राजस देखणी ॲथेना मात्र युद्धदेवता आहे. ज्युपिटरची लाडकी कन्या आहे. तिला अखंड कुमारिका मानलेले आहे. देवलोकातले नियम आणि मर्यादा सांभाळून ती सतत युलिसिस, पेनेलोपी आणि त्यांच्या मुलाची पाठराखण करते. एकीकडे पॅरीस, हेलन आणि ॲफ्रोडायटी यांचे वागणे. दुसरीकडे युलिसिसचे एकपत्नीव्रत, कॅलिप्सोचे त्याच्यावरील एकतर्फी प्रेम आणि निष्ठेने पतीची वाट बघणारी पेनेलोपी अशी दोन टोके या महाकाव्यात वाचायला मिळतात. 

ही भाषांतरे वाचताना पुन्हा पुन्हा गौरी देशपांडे यांच्या शुद्ध मराठी भाषेतील अरेबियन नाईट्सची आठवण येतेच. इलियड आणि ओदिसीमध्ये कमालीची कृत्रिम, संस्कृतसदृश अशुद्ध भाषा वापरली आहे. त्यामुळे ग्रीक वातावरण निर्माण न होता निव्वळ रसभंग होत राहतो.. ‘इथे नायक नायिकेशी एकशय्या करतो’, ‘युलिसिस पेयनिषेक (?) करून मद्यप्राशन करतो’, ‘शत्रूकडे जुगुप्सेने (घृणेने) बघतो’, ‘अवघड काम सहजपणे पार न पाडता सौकर्याने पूर्णत्वाला नेतो,’ ‘अंधार पडल्यावर दालन तिमिरावृत्त होते (तिमिरावृत तरी हवे)’, ‘शहाण्या माणसांचे बोलणे सयुक्तिकऐवजी संयुक्तिक असते,’ ‘धनुष्याच्या लाकडाला लवचिकपणा येण्यासाठी चरबीऐवजी वसा लावतात,’ ‘अप्सरा म्हणजे पाण्यात (आप) निवास करणारी, पण तिला हट्टाने जलाप्सरा म्हटले जाते’, ‘अजपाल’ (मेंढपाळ), ‘छुरिका’ (सुरी), ‘विगतधैर्य’ (भयभीत), ‘सुचिन्हसूचक’ (शुभलक्षणी), ‘अश्वपुच्छ’ (घोड्याची शेपूट) या अशाच काही गमती. सबंध भाषांतरात ॲथेना आणि पेनेलोपी या दोघींच्या नावांचे उच्चार सतत बदलतात. उदाहरणार्थ ॲथिनी, ॲथनी, पेनेलपी, पेनेलॉपी, पिनेलॉपी वगैरे. हे असे असले तरी मूळ कथानकातील नाट्य इतके जोरकस, की वाचक शेवटपर्यंत वाचल्याखेरीज पुस्तक खाली ठेवत नाही. 
   
ओदिसी वाचल्यावर काही शंका मनात येतात. प्राचीन काळी समुद्र किंवा त्याचा देव  
दर्यावर्दी मानवाला शत्रुवत का वाटत होता? रामायणात सुरुवातीला समुद्र रामाची वाट अडवतो. महाभारतात कृष्णाची द्वारका बुडवतो आणि ओदिसीमध्ये युलिसिसच्या मार्गात सतत अडथळे आणतो, त्याच्या जिवावर उठतो. ट्रॉयचे युद्ध संपल्यानंतर मेनेलॉसला त्याची बायको परत मिळते. तो आणि बाकीचे सर्व राजे परत जातात. युलिसिसच्या परतीच्या प्रवासावर नवे महाकाव्य रचले जाते. राम-लक्ष्मण-सीता-हनुमान अयोध्येला गेल्यावर सुग्रीव आणि त्याची सेना सागर ओलांडून परत कसे आले? सुग्रीव, त्याची पत्नी तारा आणि सावत्र मुलगा अंगद परतीच्या प्रवासात एकमेकांशी कसे वागले-बोलले असतील? त्यांच्या सागरी प्रवासावर वेगळे महाकाव्य का रचले गेले नाही?

संबंधित बातम्या