पथिक 

विजय तरवडे 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

अगदी जुनी आत्मचरित्रे वाचण्यात मौज असते. आपला हात धरून ती जुन्या काळात, प्रदेशात घेऊन जातात. तो काळ आणि प्रदेश कधी कधी आपल्याला पूर्णपणे अपरिचित असतात. ती भटकंती अतिशय मजेदार असते. पुस्तकाची पाच-दहा पाने वाचावीत. डोळे मिटून स्वस्थ बसावे. सूक्ष्म देहाने त्या जगात एकटेच जाऊन यावे. काकासाहेब गाडगीळ यांचे ‘पथिक’ हे आत्मचरित्र असाच आनंद देते. 

काकासाहेबांचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचा. त्यांनी ब्रिटिशांचा भारत पाहिला. स्वातंत्र्यलढ्यात भाग  घेतला. ‘पथिक’मध्ये त्यांनी स्वतःच्या जन्माआधी कुटुंबात व आसपास घडलेल्या घटनांसह जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचे सामाजिक जीवन, प्रथा, नव्या युगाची चाहुल यांच्या नोंदी केल्या आहेत. आलंकारिक भाषेचा सोस नसलेली पुस्तके वाचण्याचा आनंद वेगळाच असतो. सानेगुरुजी, विनोबा, ग. प्र. प्रधान वगैरे पूर्वसूरींनी अशी प्रवाही भाषा गिरवली. काकासाहेबांची भाषा त्याच परंपरेतली - मात्र तिच्यात थोडे वेगळेपण आहे. सनातनी घरातल्या छोट्या मुलीने गंमत म्हणून आधुनिक पोषाख करावा आणि लाजून पटकन तो बदलावा तशी ती सोपेपणाने भडाभडा सांगत राहते आणि म्हणूनच जीभ चावून संस्कृतप्रचुर होते किंवा संस्कृत सुभाषिते, वचने उद्‍धृत करते. वडिलांची नोकरी गेली तेव्हा ते म्हणतात, ‘माझ्या वडिलांना नोकरीतून मुक्त करण्यात आले. आनंदपर्यवसायी नाटक अशा रीतीने शोकांतिक झाले.’ पुढे एके ठिकाणी म्हणतात, ‘राजकारणात मी इच्छामरणी आहे.’ 

‘पथिक’मधले छोटे छोटे तपशील वाचकांना आवडतील. काकासाहेबांचे पूर्वज कोंडुनाना गाडगीळ हे नाना फडणवीसांचे श्वशुर होते. १८५८ मध्ये महाराष्ट्रात मॅट्रिकची पहिली परीक्षा झाली. त्यात चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. १८७० मध्ये गाडगीळ कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले. १८५७ चा उठाव झाला त्यावेळचे पुण्यातले वातावरण मुळातून वाचण्याजोगे आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे असे प्रयत्न झाले तिथे तिथे इंग्रजांनी ते अतिशय क्रूरपणे मोडून काढले. कालांतराने सरकारी नोकऱ्या वाढू लागल्या. सर्व जातीतल्या लोकांना त्या मिळू लागल्या. मात्र पुणे आजच्यासारखे कॉस्मोपॉलिटन झालेले नव्हते. पुणेकरांचे आज सर्वज्ञात असलेले वैशिष्ट्य तेव्हाही होते - ‘साऱ्या राजकीय प्रश्नांवर, सामाजिक समस्यांवर बोलण्याचा हक्क प्रत्येक पुण्यनगरीच्या नागरिकाला आहे हे लोकशाही तत्त्व त्याच्या अंगी बाणलेले असे. जी प्रगती टाळू शकत नाही ती आपल्यामुळे झाली, सरकारने थोडे विवेकाने घेतले हा आपल्या चातुर्याचा, मुत्सद्दीपणाचा जय आहे असे त्याही वेळी पुणेकर मानीत.’ 

अर्थातच त्या वेळी वधूवर सूचक मंडळे नव्हती. कथा-पुराण ऐकायला जमलेल्या स्त्रियांमधून लग्नास योग्य मुलींची माहिती मिळे. नवरदेवाला पत्रावळी लावता येतात की नाही हे तपासून बघत. लग्नानंतर वडील रेल्वेतल्या नोकरीमुळे मध्य प्रदेशात गेले. तिथे काही वर्षे काढली. तिथले तपशील आणि वि. द. घाटे यांच्या आत्मचरित्रातले तपशील एकत्र केले, की तेव्हाचा मध्य प्रदेश डोळ्यांसमोर उभा राहतो. गाडगीळ घराणे गणेशभक्त. आई नियमित चतुर्थीचा उपवास करीत असे. एका रेल्वे स्टेशनात पाण्याची सोय नव्हती. एक भिस्ती पाणी आणून देई. वडिलांनी त्याचे नाव हुसेनभट ठेवले होते. त्या पाण्याचा त्यांनी विटाळ मानला नाही. 

प्लेगच्या साथीबद्दल वेगळी माहिती ‘पथिक’मध्ये मिळते. १९०२ ते १९०४  या काळात गणेशोत्सव संपला की प्लेगची साथ येई. मग गाडगीळ कुटुंब सिद्धटेकला जाऊन राहात असे आणि मकर संक्रांतीनंतर पुण्याला येत असे. १९१६ मध्येदेखील प्लेगची साथ आल्याचा उल्लेख आहे. 

गोपाळ कृष्ण गोखले यांचा १९०५ मध्ये सत्कार समारंभ होता. त्यावेळी काही मित्र दंगा करीत असताना लोकमान्य आले व त्यांनी काही मुलांना व्यासपीठावर नेऊन बसवले - ‘सार्वजनिक जीवनाच्या व्यासपीठावर वयाच्या नवव्या वर्षी लोकमान्यांनी मला बसवले’ असे गाडगीळ म्हणतात. 

त्यांच्याकडून १९१६ ते १९३० या काळात अभ्यासाखेरीज सर्व शाहिरांची काव्ये, उपनिषदे, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, मुक्तेश्वर, मोरोपंत, रामदास याखेरीज निबंधमाला बाणभट्ट, उत्तररामचरित वाचून झाले होते. १९१७-१८ च्या सुमारास पुण्यात लष्कराच्या ब्राह्मिन कंपनी व युनिव्हर्सिटी कंपनी होत्या. गाडगीळ युनिव्हर्सिटी कंपनीमध्ये तीन महिने होते. या काळातल्या पगाराची रक्कम त्यांनी व सहकाऱ्यांनी रेडक्रॉसला देणगी दिली. या काळात प्रा. ना. सी. फडके आणि प्रा. घारपुरे, टिळक कॉलेजमध्ये नोकरी करीत होते. गटबाजीमुळे टिळक गटातील लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांना ‘मदमल्ली आणि शौकतबल्ली’ अशी टोपणनावे ठेवली होती. १९२० नंतर काही महिने टिळकांनी सुरू केलेल्या ‘मराठा’मध्ये गाडगीळांनी इंग्रजी स्तंभलेखन केले. एकाच वेळी वकिली, लेखन, सत्याग्रहात भाग, तुरुंगवासाचा अनुभव असे समृद्ध जीवन जगले. १९२१ मध्ये ज्ञानकोशकार केतकर त्यांना भेटायला आले. त्यांनी आपल्या कोशातला जातींचा, कुळांचा इतिहास सांगितला. केतकर, गाडगीळ व पेशवे सगोत्र असल्याचे सांगितले. परिणामी गाडगीळांनी कोश विकत घेतला व हप्त्याने त्याची रक्कम फेडली. १९२९ च्या सुमारास पर्वतीच्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून गाडगीळ, एस. एम. जोशी व ३०० मुलांनी आंदोलन केले. त्या वेळी ‘भाला’कार भोपटकरांनी त्यांचा ‘काका’ म्हणून उल्लेख केला. तेव्हापासून त्यांना ‘काका’, ‘काकासाहेब’ या उपाधी चिकटल्या. आत्मचरित्रात असे वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय आठवणींचे मजेदार कोलाज  
आहे. त्यामुळे ते एकसुरी होत नाही. 

काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातला मला विशेष आवडलेला एक प्रसंग - १९३२ मध्ये ते तुरुंगात होते. एस. एम. जोशींना कॉलेजच्या टर्म्स भरायच्या होत्या. काकासाहेबांच्या पत्नीने गोठ व बांगड्या विकून फीची रक्कम भागवली. नंतर पतीला कळवले. त्यांनी तुरुंगातून उत्तर पाठवले, ‘तू मदत केली नसतीस तर वाईट वाटले असते.’ मनाचा मोठेपणा असा, की कोणाला मदत केली हे त्यांनी आत्मचरित्रात लिहिलेले नाही. मात्र यानंतर काही दशकांनी एस. एम. जोशींनीच आत्मचरित्रात ते सांगितले आहे. 

* * * 

(‘पथिक’ नाव असले तरी या नावाने हे पुस्तक मला मिळू शकले नाही. ‘समग्र काका’ या संकलनात ‘संपूर्ण पथिक’ उपलब्ध आहे.)

संबंधित बातम्या