भारदस्त पुणे 

विजय तरवडे 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

पुण्याची खासियत अशी, की प्रत्येक काळातल्या प्रत्येक लेखकाला त्याचे वेगळे दर्शन होते आणि सर्व लेखकांची वर्णने एकत्र केली तरी त्या वर्णनाबाहेर थोडे पुणे शिल्लक राहते. कदाचित हे सर्वच जुन्या गावांच्या-शहरांच्या बाबतीत खरे असेल. 

पुण्यावर लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकामुळे (पूना इन बायगॉन डेज) अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील लेखक दत्तात्रय बळवंत पारसनीस (१८७०-१९२६) ठाऊक झाले. पारसनीस यांनी इतिहासावर विपुल लेखन केले आहे. त्यात झाशीची राणी, ब्रह्मेंद्र स्वामी, अयोध्येचे नबाब, काँग्रेसचे एक संस्थापक ह्यूम यांची चरित्रे, पुणे, सातारा, महाबळेश्वर, सांगली वगैरे गावांचे इतिहास, सी. ए. विंकेड यांच्यासह तीन खंडात ‘अ हिस्ट्री ऑफ द मराठा पीपल’सारखे ग्रंथ आहेत. १९१३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादूर पदवी दिली. मुंबई सरकारकडून त्यांना तहहयात दोनशे रुपये पेंशन मिळत होती. 

‘पूना इन बायगॉन डेज’ १९२१ मध्ये प्रकाशित झाले. लेखकाने ते बाँबे इलाख्याच्या गव्हर्नरसाहेबांना अर्पण केले आहे. सी. ए. किंकेड साहेबाने प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेत पुण्यावर लिहिताना शहाजीराजे भोसले, मलिक अंबर, शिवाजी महाराज, पेशवे या सर्वांचे गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आले आहेत. प्रस्तावनेच्या आधीच्या पानावर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. 
पुस्तकात शनिवारवाडा - पेशवाईतील आठवणी, अठराशे सालचे पुणे, नाना फडणवीस, महादजी शिंदे, चार्ल्स मॅलट, सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्यावर केलेले लेखन आहे. एक प्रकरण पुण्याच्या सातव्या शतकापासूनच्या इतिहासावर आहे. पण पुस्तकाचा गाभा आहे - शनिवारवाडा आणि पेशवाई. 

बाजीराव पेशवे पुण्यात आले तेव्हा त्यांना एके ठिकाणी अजब दृश्य दिसले. एक ससा कुत्र्याच्या मागे लागला होता. त्यांनी त्याच जागेवर घर बांधायचे ठरवले. तिथे राहणाऱ्या मच्छीमारांना अष्टपुरा भागात (आजची मंगळवार पेठ) पर्यायी जागा देऊन शनिवारवाडा बांधायला घेतला. १७३२ मध्ये दुमजली वास्तू तयार झाली. इमारतीच्या बांधकामाला १६,११० रुपये खर्च आला. वास्तुशांती करणाऱ्या पुरोहिताला साडेपंधरा रुपये दक्षिणा दिली गेली. कालांतराने आणखी चार मजले बांधले गेले. शेवटच्या मजल्यावरून आळंदीचा कळस दिसत असे. वास्तूमध्ये चार मोठे दरबार, नृत्याचा दिवाणखाना, हस्तिदंती महाल, आरसे महाल, तसेच राघोबादादा, बाजीराव आणि नारायणराव यांचे स्वतंत्र दिवाणखाने होते. १७५५ पासून बाळाजी बाजीराव यांनी गणेशोत्सव चालू केला. रंगपंचमी, दसरा वगैरे सणदेखील थाटात साजरे होत. मस्तानी बागेत मुक्काम असताना काशीबाईंनी पायाचे दुखणे बरे व्हावे म्हणून पार्वतीला नवस केला आणि बरे झाल्यावर नवसपूर्ती म्हणून मुलाकडून टेकडीवर पार्वतीचे मंदिर बांधून घेतले. तीच पर्वती टेकडी. 

या काळातले पुण्याचे ऐश्वर्य डोळे दिपवते. १४०००० घरे आणि सहा लाख लोकसंख्या होती. दुकानांमध्ये युरोप आणि चीनवरून विविध वस्तू विकायला येत. भाज्या आणि फळांची रेलचेल होती. 

त्रिंबकराव दाभाडे यांचा पराभव केल्यावर बाजीराव पेशव्यांनी दर वर्षी श्रावण महिन्यात रमणा वाटायला सुरुवात केली. या वेळी कांजीवरम, शृंगेरी, कुंभकोणम तंजावर, रामेश्वर वगैरेहून ब्राह्मण येत. १७३६ मध्ये १६००० रुपये असलेली रक्कम वाढत वाढत १७८९ मध्ये सव्वा दोन लाख झाली. पानिपत युद्ध झाले त्या वर्षी मात्र फक्त ११००० रुपयांचा रमणा दिला. रमण्याबाबतचे त्रोटक तपशील - नाना फडणवीसांना रमण्याची संकल्पना पसंत नव्हती. काही काळ रमणा ब्रिटिश सरकारतर्फे दिला जात होता. १८१८ नंतर ब्रिटिशांनी रमण्यासाठीचे अनुदान थांबवले. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने रमण्यासाठी दिलेल्या निधीतून संस्कृत पाठशाळा, दक्षिणा शिष्यवृत्ती आणि दक्षिणा प्राईझ फंडाची स्थापना झाली. 

विविध उत्सव असोत की औपचारिक कार्यक्रम असोत, खर्च करताना हात आखडता घेण्याची पद्धत नव्हती. १७९४ मध्ये सीमोल्लंघनानंतरच्या कार्यक्रमाचा खर्च सव्वा दोन लाखांहून अधिक होता. १८०४ मध्ये ड्यूक ऑफ वेलिंग्टन जनरल वेलस्लीचे स्वागत करताना त्यांना व त्यांच्या बरोबर आलेल्या सर्वांना मानाचे पोषाख देण्यात आले. त्यांचीच किंमत काही हजार रुपये झाली.  
कोतवालीची रचना आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कामांचे व पगाराचे तपशील मुळातून वाचण्याजोगे मनोरंजक आहेत. कोतवालाकडे कायदा-सुव्यवस्थेखेरीज जकात, जमिनीचे व्यवहार, नियमित जनगणना आणि शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे अशी कामे असत. प्रशासनासाठी शहराचे कोतवाल चावडी, सोमवार पेठ, वेताळ (गुरुवार) पेठ, आदित्यवार पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ असे सहा विभाग केले होते. प्रत्येक विभागाकडून शासनाला दर वर्षी २५००० उत्पन्न मिळत असे. पुण्याचे खास पीनल कोड होते आणि त्यात २३४ गुन्ह्यांची यादी होती. यातील बहुतांश गुन्हे व्यभिचार आणि अनैतिक वर्तनाशी संबंधित होते. 

नारायणाच्या खुनाचे प्रकरण वाचताना आनंदीबाईंनी ‘ध चा मा केला’ हे इंग्रजीत कसे लिहिले असेल? अशी बालिश उत्सुकता मनात होती. पण तो उल्लेख इथे नाही! 

महादजी शिंदे (१७९४), सवाई माधवराव (१७९५) आणि नाना फडणवीस (१८००) यांच्या निधनानंतर पेशवाईला उतरती कळा लागली. ती सावरली नाही. १८१७ मध्ये  
पेशवाईचा अस्त झाला. 

अंधश्रद्धेचा मुद्दा बाजूला ठेवून मनात शंका येते. इंद्रप्रस्थच्या दाराप्रमाणे शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा बनवला होता. इंद्रप्रस्थप्रमाणेच शनिवारवाड्याचे प्राक्तन घडले का? मयसभेवर लिहिताना ‘युगांत’मध्ये इरावती कर्वे म्हणतात - ‘काही वास्तू मोठ्या थाटात सुरू होऊन अपशकुनी व दुर्दैवी ठरतात. शनिवारवाडा हे माझ्या डोळ्यांसमोरचे अर्वाचीन उदाहरण आहे.’ पण मयसभा काळाच्या गर्तेत गेली. तसे शनिवारवाड्याचे झाले नाही. त्याचे महत्त्व शिल्लक राहिले. त्याने राजकीय सभा आणि सामाजिक उत्सव पाहिले, इतकेच काय ते.

संबंधित बातम्या