यू नेव्हर नो विथ विमेन 

विजय तरवडे 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

जेम्स हॅडली चेस या लेखकाने उपरोक्त शीर्षकाची कादंबरी लिहिली आहे. त्याच्या बहुतांश कादंबऱ्यांचा आशय या एकाच वाक्यात मावण्याजोग्या आहेत. चेसने नव्वदच्या आसपास यशस्वी कादंबऱ्या लिहिल्या. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात अनेक मराठी लेखक-प्रकाशकांनी जेम्स हॅडली चेसवर आणि पेरी मेसन या वकिलाच्या चातुर्यकथा लिहिणाऱ्या अर्ल स्टॅन्ले गार्डनरवर घोर अन्याय केला आहे. दोघांच्या मिळून दोनेकशे कादंबऱ्या असतील. पण मराठीत त्यांचे किमान हजारभर वाईट अनुवाद-भाषांतरे-स्वैर रूपांतरे वाचनालयातील कपाटे अडवून आहेत. ते असो. या दोन्ही लेखकांनी आपापल्या शैलीला मिळालेले यश पुन्हा पुन्हा गिरवले आहे. चाहत्यांना त्यांची पुस्तके वाचताना पुढच्या पानांत किंवा कथेच्या शेवटी काय असेल याचा अंधुक अंदाज येत असतो आणि तरी ते आवडत्या लेखकावरच्या प्रेमापोटी मनापासून पुस्तके वाचत राहतात. 

चेसच्या सर्व यशस्वी कादंबऱ्यांमध्ये गिरवलेली गोष्ट म्हणजे त्यातले मुख्य पुरुष पात्र अनेकदा आर्थिक अडचणीत असते. हा ‘नायक’ काहीएक लबाडी किंवा गुन्हा करून रातोरात श्रीमंत होऊ बघतो. त्यासाठी अफलातून कारस्थान विणतो. पण शेवटी ते फसते. कोणताही गुन्हा यशस्वी होत नाही. या नायकाची ‘सहचरी’ अतिशय सुंदर असते. अनेकदा तिचे डोळे हिरवे असतात. ती जितकी सुंदर, तितकीच थंड आणि उलट्या काळजाची असते. तिचे ऐकून नायक चोरी किंवा खून करतो आणि ती त्याला फसवून निसटून जाते. चेसचा कोणताही नायक स्त्रीला पूर्णपणे ओळखू शकत नाही. माझा एक भलताच संवेदनशील मित्र चेसची पुस्तके वाचताना नायकात गुंतून पडायचा. नायक मेला तर खिन्न व्हायचा. मी त्याला सुचवले, की पुस्तक विकत घेताना पहिले पान तपासत जा. प्रथम पुरुषी निवेदन असेल तर नायक-निवेदक मरणार नाही याची खात्री. 

मात्र या चेसची एक कादंबरी मला नेहमीपेक्षा निराळी वाटली. ‘ईव्ह’ या कादंबरीतला गुन्हा पांढरपेशा स्वरूपातला आहे. मात्र संपूर्ण कथानक दोन स्त्रियांभोवती गुंफलेले आहे. दोघीतली मुख्य जी ईव्ह, ती चेसच्या नेहमीच्या स्त्रियांसारखी आहे आणि दुसरी कॅरोल कोणत्याही जुन्या मराठी-हिंदी सिनेमाची नायिका व्हावी अशी पतिव्रता आहे. 

‘ईव्ह’चा नायक क्लाइव्हच्या शेजारी राहणारा नाटककार मृत्यूशय्येवर आहे. नाटककार मरण पावल्यावर क्लाइव्ह त्याच्या खोलीतले हस्तलिखित (रेन चेक) चोरतो आणि एका एजंटला विकतो. नाटक यशस्वी होते आणि क्लाइव्हला नियमित स्वामित्वधन मिळू लागते. त्या पुण्याईवर इतर प्रकाशकांकडून प्रस्ताव येतात. तो लिहितो ते सुमार दर्जाचे असूनही ‘रेन चेक’च्या पुण्याईमुळे खपून जाते. त्याला कॅरोल नावाची सुसंस्कृत मैत्रीण भेटते. दोघे लग्नाच्या आणाभाका घेतात. दरम्यान एका अपघाताने त्याला ईव्ह नावाची वारांगना भेटते. ईव्हचा स्वभाव अनाकलनीय आहे. 

कॅरोलच्या रदबदलीमुळे क्लाइव्हला चित्रपटकथा लिहिण्याची संधी मिळते. तो कथेसाठी ‘ईव्ह’चा विषय निवडतो. एक स्त्री म्हणून तिला समजून घेण्याची प्रक्रिया हाच चित्रपटाचा विषय ठरवतो. ईव्हच्या बालपणातील घटना, पूर्वायुष्य यांचा आढावा घेतो. पण ईव्ह त्याला फक्त खेळवते. तिला समजून घेताना तो तिच्यापासून लेखक या नात्याने अलिप्त राहू शकत नाही. तिच्यात गुंतून पडतो. तिच्यापायी कॅरोलला गमावतो. मरेपर्यंत कॅरोल क्लाइव्हसाठी स्वतःला दुखावून घेते. पण त्याला दूर लोटत नाही. एका भांडणानंतर उद्वेगाने जोरात गाडी चालवताना ती अपघातात मरण पावते. शोकांतिका असली तरी चेसची शैली अशी गतिमान आणि रोचक, की वाचक खिन्न न होता शेवटपर्यंत क्लाइव्हच्या अधःपतनाचा प्रवास वाचत राहतो. क्लाइव्हविषयी तीळमात्र सहानुभूती असली तरी ‘ये तो होना ही था’ असेही वाटत राहते. कॅरोल आणि ईव्ह, चेसचे ‘यू नेव्हर नो विथ विमेन’ हे ब्रीद सार्थ करतात. 

आणखी एका कादंबरीत (देअर इज अ हिप्पी ऑन द हायवे) चेसने आपली नेहमीची पठडी सोडली आहे. तीन वर्षे व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला निवृत्त हॅरी मिचेल घरी परततो. नव्या नोकरीवर रुजू होण्यासाठी न्यूयॉर्कला जाताना थोड्या काळासाठी त्याला हिप्पी आणि गुन्हेगारी विश्वाचे दर्शन होते. त्यातून बाहेर पडून तो न्यूयॉर्कला जाणाऱ्या गाडीत बसतो. सैन्यातून बाहेर पडल्यावर बाहेरच्या जगातले गुन्हेगारी विश्व पाहून सैनिकाला काय वाटत असेल त्याची कल्पना वाचकांनीच करावी म्हणून लेखकाने फक्त काही छोटी वाक्ये लिहून कादंबरीचा शेवट केला आहे - 

- तो कारमध्ये रेलून बसला. खिडकीतून लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवणारे हिप्पी दिसत होते. हे हिप्पी पुढची पिढी असतील असे सॅम म्हणाला होता. त्याने खांदे उडवले. सिगारेट काढून शिलगावली, त्याची गाडी हायवेवरून रोरावत न्यूयॉर्क नावाच्या जंगलाकडे चालली होती. 

दोन्ही कादंबऱ्या तशा जुन्या आणि शिळ्या आहेत. त्यातले तपशील कालबाह्य झाले आहेत. गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पण (कदाचित) लेखकाच्या नकळत दोन्हीत उतरलेली व्यक्तिचित्रे भरीव आणि आशय कालातीत आहेत.

संबंधित बातम्या