इयर्स ऑफ एंडेव्हर

विजय तरवडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

‘इयर्स ऑफ एंडेव्हर’ हे इंदिरा गांधी यांनी ऑगस्ट १९६९ ते ऑगस्ट १९७२ या काळात विविध प्रसंगी दिलेली व्याख्याने आणि मुलाखतींचे संकलन आहे. या पुस्तकातून इंदिराजींच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दिसून येतात, तसाच तत्कालीन भारताचा राजकीय इतिहासदेखील उलगडतो. एरव्ही वाचनात न आलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना या पुस्तकामुळे आपल्याला ठाऊक होतात. त्यातील काहींचा हा परामर्श. 

इंदिरा गांधींनी १९७१ साली फ्रेंच नॅशनल रेडिओला प्रदीर्घ मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावरील आधुनिक विचार व्यक्त केले. मुलाखतीच्या शेवटी वैयक्‍तिक स्वरूपाच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांतून दिसते की त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भारतात - काही काळ पुण्यात – झाले.  पुढील शिक्षण विदेशात झाले. भारतीय आणि विदेशी संस्कृतीच्या संस्कारांचा एकत्रित परिणाम त्यांच्या आवडीनिवडींवर झाला. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि युरोपियन संगीताचीही त्यांना गोडी लागली. त्यांनी बॅले नृत्य आणि नंतर मणिपुरी नृत्यदेखील शिकून घेतले.   
दिल्लीमध्ये लायब्ररी अॅन्ड म्युझियम ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टरी ऑफ मेडिसिन अॅन्ड मेडिकल रिसर्च या नावाची संस्था आहे. विविध देशातले प्राचीन वैद्यकविषयक ग्रंथ, तैलचित्रे याचा एक मौल्यवान संग्रह तिथे आहे. अशा प्रकारची संस्था जर्मनीमध्ये गेल्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन झाली होती. भारतात अशी संस्था आणि संग्रहालय असावे ही कल्पना १९४४च्या सुमारास हेन्री ई. सिगेरिस्ट यांनी मांडली. तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमली. तिचा पाठपुरावा चालू असतानाच भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं. नेहरूंनी १९६२मध्ये संस्थेची पायाभरणी केली. इंदिरा गांधी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी १९७० या दिवशी संस्थेचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी केलेल्या भाषणात त्या म्हणतात, ‘पारंपरिक औषधे आणि आधुनिक औषधे यात अंतर आहे असे सकृत्दर्शनी वाटते. पण अनेक पारंपरिक औषधे जगाच्या विविध कोपऱ्यातल्या ठराविक लोकसमूहांनाच ठाऊक होती. त्यावर संशोधन झाल्यावर आधुनिक वैद्यकातदेखील त्यांना मान्यता मिळाली. रक्तदाबावर गुणकारी ठरलेले रेझपिन आणि इतर कारणास्तव उपयुक्त ठरलेले एमेटिन ही सहज आठवलेली नावे. आयुर्वेद आणि तिबियासारख्या पारंपरिक उपचारपद्धतीत असे अनेक उपयुक्त उपचार नमूद केलेले असतील याबद्दल माझी खात्री आहे. आधुनिकीकरण ही बाहेरून लादली जाणारी गोष्ट नसावी तर ती आतून उगवायला हवी. तिची मुळे आपल्या मातीतली असावीत. आपल्या परसातल्या औषधी वनस्पतीची आपल्याला किंमत वाटत नाही. त्यासाठी परदेशाकडे बघण्याची लोकांची प्रवृत्ती असते.’

बांगलादेश निर्मितीच्या वेळी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे तपशील या पुस्तकात आहेत. बांगलादेशचा लढा खऱ्या अर्थाने मार्च १९७१ मध्ये सुरू झाला. स्वतंत्र बांगलादेशची घोषणा झाल्यावर शेख मुजिबूर रेहमान यांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक करून कराचीला नेले. अमेरिकन सरकारची सहानुभूती पाकिस्तानच्या बाजूने असूनही सिनेटर टेड केनेडींच्या प्रेरणेने पाकिस्तानी सरकारला कत्तली थांबवण्याचे आवाहन करताना ब्रिटिश-अमेरिकन-भारतीय कलाकारांनी न्यू यॉर्कमध्ये एक संगीत महोत्सवही आयोजित केला होता.

ऑक्टोबर १९७१च्या २९ तारखेला इंदिरा गांधींनी लंडनच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ या संस्थेत  ‘भारतातील लोकशाही’ या विषयावर व्याख्यान दिले. या वेळेपर्यंत पूर्व पाकिस्तानातून भारतात एक कोटीच्या आसपास निर्वासित आले होते. व्याख्यानाच्या दरम्यान त्याचा उल्लेख करून इंदिराजी म्हणाल्या, ‘जनतेची निष्ठा बंदुकीशिवाय अन्य मार्गांनी मिळवता येत नाही का?’

वॉशिंग्टन येथे इंदिरा गांधींनी ५ नोव्हेंबर १९७१ रोजी भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमात दुसरे व्याख्यान दिले. त्या वेळी भारतात आलेल्या निर्वासितांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, ‘मिशिगन स्टेटमधले सगळे नागरिक एकदम न्यू यॉर्कमध्ये आश्रयाला आले तर काय होईल याची कल्पना करा. भारत देश तशाच परिस्थितीला तोंड देतो आहे.’

“भारत हा विशाल आणि मजबूत देश आहे, आमच्यात एकजूट आहे आणि आम्ही आमचे प्रश्न स्वतः सोडवू. मी इथे मदत मागायला आलेली नाही. युरोप आणि आशियामध्ये मोठ्या उलथापालथी होत आहेत आणि विविध देशांच्या नेत्यांना त्यावर काय वाटते हे समजून घ्यायला हवे आणि माझ्या देशाबद्दलची माझी मते देखील त्यांना समजायला हवीत.’

भाषणाचा समारोप करताना त्यांनी केलेले सूचक विधान – ‘आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक निवडणुकीत जिंकले आणि सत्तेवर आले. मात्र पाकिस्तानात स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक तुरुंगात खितपत पडले आणि ब्रिटिशांशी हातमिळवणी करणारे नोकरशहा, लष्करशहा वगैरेंच्या हातात सरकारची सूत्रे गेली. इथेच त्यांच्या भविष्यकालीन दुबळेपणाची बीजे पेरली गेली. पाकिस्तानवर आलेले संकट मोठे आहे आणि भारताला दोष देऊन त्याचे स्पष्टीकरण करता येणार नाही.

या भाषणानंतर थोड्याच दिवसांत भारताने बांगलादेश प्रकरणी लष्करी हस्तक्षेप केला आणि १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानी सेना शरण आली. बांगलादेश स्वतंत्र झाला. मात्र आधीच्या काही दिवसांतल्या इंदिराजींच्या भाषणात किंवा अमेरिकी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत कुठेही या कारवाईची चाहूल किंवा बढाया आढळत नाहीत.   

संबंधित बातम्या