मुलखावेगळा – मुलूख आणि माणूस

विजय तरवडे 
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

चार-पाच दशकांपूर्वी ‘सोविएत देश’, ‘स्पुटनिक’ वगैरे नियतकालिकांनी, भाषांतरित बालसाहित्याने, ललित साहित्याने लाल-पोलादी पडद्याआडच्या रशियाचे देखणे, आकर्षक चित्र रेखाटले होते. या चित्रात (भाषांतराचे) रंग भरणारे अनिल हवालदार यांनी रशियातला दोन दशकांचा मुक्काम मुक्काम आणि नोकरी पूर्ण करून पुण्यात आल्यावर लिहिलेले आत्मचरित्र – ‘मुलखावेगळा’. हे शीर्षक दोन्ही अर्थांनी उचित आहे. याचा नायक स्वभावाने मुलखावेगळा होता आणि पोटासाठी ‘मुलूख’ ऊर्फ मातृभूमी सोडून वीस वर्षे रशियात राहून आला होता. 

रशियात जाण्यापूर्वीचे नायकाचे आयुष्य चार मराठी मध्यमवर्गीयांपेक्षा फार वेगळे नाही. लेखक वडिलांच्या पोटी जन्म, तारुण्यातले कलंदर आणि कडकीचे दिवस, साहित्य, नाट्य, मराठी चित्रपटसृष्टीत दिशाहीन भटकंतीनंतर ‘सोविएत देश’मध्ये नोकरी लागल्यावर त्याच्या आयुष्याला नेमकी दिशा मिळते. तिथून काही दिवसांनी थेट रशियात पगारी भाषांतरकार म्हणून जायची संधी मिळते. तिथल्या दोन दशकांच्या वर्णनात आपल्याला रशियातले जे जे बघावेसे वाटते ते सगळे दिसत नाही. पण भरपूर मनोरंजन होते हे नक्की. 

मनाजोगे उत्पन्न लाभले की नायक रोजच्या गरजांवर सढळहस्ते खर्च करतो. “जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सत्तर एमएमचा आहे. शक्य असेल तर भरघोस जगावे,” असे सोपे सूत्र.

रशियाविषयीच्या पहिल्याच प्रकरणात पोलादी पडद्याला एक मोठ्ठे छिद्र पडते... तिथल्या समतेविषयीचा समज दूर होतो. “मॉस्कोमधील सर्वसामान्य माणसांसाठी दफनभूमी शहरापासून ४०-५० किलोमीटर अंतरावर आहे. नामवंत कलावंतांसाठी दफनभूमी शहराच्या मध्यभागी आहे. फार मोठ्या माणसांचे दफन वा रक्षाकलश क्रेमलिन भिंतीपाशी ठेवतात.” 

रशियातले तत्कालीन सामाजिक जीवन मुक्त आहे. स्त्री-पुरुषांच्या एकत्र येण्याविषयी समाजाचा दृष्टिकोन निकोप आहे असे लेखक नोंदवतो. स्त्रीला मागणी घालण्याची एक रीत म्हणजे तिला संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण देणे. ती जेवायला आली तर तिचा होकार समजतात. ती जेवायला येते तेव्हा मेजवानीचे साहित्य आणि नवी केरसुणी आणते. आधी त्याचे घर स्वच्छ झाडून घेते आणि स्वतः स्वयंपाक करते. अनिल आणि रशियन मैत्रीण तमारा तांत्रिक अडचणींमुळे लग्न करू शकत नाहीत, तोवर ‘लिव्ह-इन’ पद्धतीने उजळमाथ्याने राहू शकतात. बऱ्याच कालावधीनंतर लग्न करू शकतात. लग्नातले तांत्रिक विधी किचकट आहेत. लग्नानंतरच्या मेजवानीत आपल्याकडे वधूवरांना उखाणे घेण्याचा आग्रह होतो. तसा तिकडे चुंबनाचा आग्रह होतो. 

वीस वर्षांच्या मुक्कामात लेखक अवाढव्य रशियातील सर्व भाग बघण्याचा प्रयत्न करतो. उत्तर ध्रुवाच्या दिशेला असलेले लेनिनग्राड बघायला गेल्यावर तिथे युद्धात उध्वस्त झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्धार झाल्याचे दिसते. वाटाड्या मुलीला तो विचारतो, “तुम्हीच झारशाही नष्ट केली. मग त्या काळातील वास्तूंचा जीर्णोद्धार का?” त्यावर ती उत्तरते, “आमचं आमच्या इतिहासाशी वैर नाही. भावी काळात असे राजवाडे उभारणं शक्य नाही. गतवैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तूंना नव्या पिढ्यांनी पाहिलं पाहिजे असं आमच्या नेत्यांना वाटतं.” तिच्या उत्तराशी लेखक सहमत नसला तरी काही वाचकांना सहमत व्हावंसं नक्की वाटावं. 

लेनिनग्राडच्या प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतो, “लेनिनग्राडचे आकाश अगदी वेगळे दिसते. क्षितिज उत्तर ध्रुवाला टेकल्यासारखे वाटते.” 

सत्तर-ऐंशीच्या दशकात भरपूर भौतिक प्रगती केलेल्या रशियात कॉकेशसमधल्या एका छोट्या पर्यटनस्थळी सुट्टी घालवायला गेल्यावर लक्षात येते की तिथे प्रगती पोचलेली नाही, तिथे भारतातल्या खेड्यांप्रमाणेच स्वच्छतागृहे आहेत. रशियातल्या लाल फितीचा रंग आपल्यापेक्षा गडद आहे.

रशियातील मुक्कामात अनेक कलाकार, लेखक, उच्चभ्रू अधिकाऱ्यांशी लेखकाचा परिचय आणि घनिष्ठ स्नेह होतो. सुनीता देशपांडे यांचा भाऊ कॅप्टन सुभाष ठाकूर त्यातील एक. ठाकूर रत्नागिरीचे असल्याने त्यांचे ‘थीबाराजे’ असे नामकरण होते. रशियात फळे नेण्याची परवानगी नसताना थीबाराजे तमारासाठी आंबे आणतात. अनेकदा लेखकाच्या मदतीला धावून जातात. एका मोठ्या संकटातून शैलाताई डांगे आणि इतर स्नेही लेखकाला वाचवतात. ही सगळी वर्णने रोचक आहेत. मात्र हे आत्मचरित्र वैयक्तिक परिघापलीकडे डोकावत देखील नाही. रशियात १९९० साली जगाला धक्का देणाऱ्या स्थित्यंतराचा साक्षी असूनही लेखक त्याचा फक्त ओझरता उल्लेख करतो.  

रशियातील मुक्कामाच्या शेवटच्या काळात घरगुती घटना, वैयक्तिक दुःखे, कचेरीतले क्षुद्र राजकारण वगैरेंमुळे लेखकावर उदासीचे मळभ दाटून येते. “मी अनुवाद केलेल्या पुस्तकांवर ओझरती नजर टाकली. मामा वरेरकरांनी बंगाली साहित्य मराठीत आणले. तसेच अनिल हवालदारने रशियन साहित्य मराठीत आणले असे लोक म्हणतील? पुस्तकांची संख्या शंभरापलीकडे गेली होती...” 

यातली काही भाषांतरे हवालदारांना मनाविरुद्ध करावी लागली. तल्स्तोय, गॉर्की, दस्तयेवस्कीसारख्यांचे  साहित्य कमी प्रमाणात मिळाले असे वाटते. पण अभिजात साहित्याचे भाषांतर करतानाची उत्कटता, अस्वस्थता, मानसिक अनुभव इथे नोंदलेले नाहीत. की त्यांना भाषांतर करताना तसे काही झालेच नाही? तल्स्तोयच्या ‘ॲना कॅरनिना’ आणि दस्त्ययेवस्कीच्या ‘इडियट’ वर मराठी भाषांतरकारांनी घोर अन्याय केले आहेत. अनिल हवालदारांनी ही भाषांतरे निदान अचूक तरी नक्की केली असती. असो.    

प्रत्येक संस्कृतीच्या कपाळी केव्हातरी मोहेंजोदारो-हडप्पा होण्याचा योग येतोच. देश, कलाकृती, माणसं यांच्याही बाबतीत ते खरे असावे. आज तो सोविएत रशिया नाही, ती पुस्तके कुठेकुठे वाचनालयांच्या कपाटात किंवा मूठभर चाहत्यांच्या संग्रहात आणि अनिल हवालदार नावाचा कलंदर माणूस त्या पुस्तकांमध्ये जिवंत आहेत. त्यांना बाहेर कोण काढील.    

संबंधित बातम्या