मध्ययुगीन भारत

विजय तरवडे 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

शाळेत आणि पदवी परिक्षेसाठी शिकलेला शंभर मार्कांचा इतिहास वाचून राजेरजवाड्यांच्या वंशावळी, विविध देशांमधली धार्मिक-राजकीय-आर्थिक युद्धे, स्वातंत्र्याचे लढे इतकेच या विषयाचे आकलन झालेले होते. विविध ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून त्यात विशेष भर पडली नाही. लॉकडाउनच्या काळात ग्रंथालये बंद होती. ऑनलाइन खरेदी करताना वेगळे काही मागवावेसे-वाचावेसे वाटले. त्यातून ठाऊक झालेले गेल्या शतकातले इतिहासकार सतीश चंद्र. सतीश चंद्र जेएनयूमध्ये प्राध्यापक, यूजीसीचे काही काळ उपाध्यक्ष, केंब्रिज विद्यापीठाचे स्मट्स प्रोफेसर होते. त्यांनी अलीगड, अलाहाबाद, दिल्ली आणि राजस्थान विद्यापीठातही अध्ययन केले. इंडियन हिस्ट्री काँग्रेससह अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषविली. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा त्यांच्या विपुल लेखनाचा मुख्य गाभा दिसतो. ‘हिस्टोरियोग्राफी, रिलिजन अँड स्टेट इन मेडिव्हल इंडिया’ हे त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहास लेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम यात मांडलेला आहे. 

पाश्चात्त्य विज्ञानाचा उगम इजिप्त, मेसोपोटेमिया आणि इराण अशा पौर्वात्य देशात आढळतो, अशी मांडणी लेखक प्राध्यापक जे. नीडहम यांचा संदर्भ देऊन करतात. प्राचीन काळी भारत व चीन पश्चिमेशी घट्ट जोडलेले होते. अणुविषयक सिद्धांताचे भारतीय मूळ आणि गणित व वैद्यक क्षेत्रात भारतीयांनी योगदान दिले. कागद, बंदुकीची दारू, होकायंत्र, ढकलगाडी, घोडागाडी आणि (बहुधा) खाणकामासाठी उत्खननाचे तंत्रज्ञान, फौंड्री, झुलता पूल (सस्पेंशन ब्रिज) वगैरेच्या प्रक्रिया चीनमधून युरोपला पोचल्या. पाणचक्की, वस्त्रमाग (स्पिनिंग व्हील), पवनचक्की वगैरे शोध पूर्वेकडून युरोपपर्यंत पोचले. जुने जग - भूमध्य समुद्र ते भारत आणि मध्य आशिया ते चीन – अधिक एकसंध होते. पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्याच्या वरच्या पट्ट्यातील आणि आग्नेय आशियातील प्रदेश सागरी व्यापारवृद्धीमुळे एकमेकांशी जोडले गेले होते. पाचव्या ते बाराव्या शतकात दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये बौद्ध आणि हिंदू संकल्पनांची देवाणघेवाण झाली, सांस्कृतिक-आर्थिक संबंध जुळले. 

लेखक आपल्याला मध्ययुगात नेऊन नॉस्टॅल्जिक करीत नाही. परिचित घटनांकडे इतर माहितीच्या आधारे आणि स्वतःच्या भूमिकेतून बघायला लावतो. प्रत्येक वेळी ही भूमिका वाचकाला मान्य होईलच असे नाही. पण ती स्तिमित नक्की करते. हिस्टोरियोग्राफीवर लिहिताना नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिंप्सेस ऑफ ओल्ड वर्ल्ड’ आणि ‘ॲन ऑटोबायोग्राफी’ या ग्रंथांचे योगदान सांगणारे आणि त्रुटीही दाखवणारे संपूर्ण प्रकरण आहे. भारतीयांना केवळ पारलौकिकाचेच आकर्षण होते या अपसमजाचे नेहरूंनी सतत खंडन केले. 

या काळात अनेक नवे राग, पद्धती आणि वाद्ये उदयाला आली आणि रूढ झाली. वस्तुतः, अभिजात संगीत हे हिंदू आणि मुस्लिम परंपरांच्या संकराचे उत्तम उदाहरण आहे. पर्शियन आणि भारतीय शैलीचा संकर असलेल्या मुघल शैलीचा राजपूत आणि पहाडी शैलीवरील प्रभाव असल्याचे लेखकाने म्हटले आहे.

पुस्तकाच्या तीन खंडांपैकी एक खंड निव्वळ धर्म आणि राजकारण यांच्यातल्या नात्याची चिकित्सा करण्यासाठी दिला आहे. चौदाव्या शतकात मोहंमद तुघलक सत्तेवर होता. त्याने एकसंध सत्ताधारी वर्ग निर्माण करण्याच्या हेतूने प्रशासनात आणि मानकरी वर्गात हिंदूंच्या नेमणुका केल्या. त्यातून गुजरात, बंगाल व काश्मीर भागात हिंदू व मुसलमानांमध्ये संपर्कबिंदू वाढले. नंतरच्या काळात अकबराने ही भूमिका पुढे न्यायचा प्रयत्न केला. त्याच्या राजवटीत हिंदूंमधले अनेक समाजगट प्रशासनात वरच्या पायरीवर पोचले. बिरबल, तोडरमल आणि राय रतन पात्र दास ही काही उदाहरणे. याच कालखंडात पंचतंत्र, कामसूत्र, वेद आणि काही उपनिषदांची अरेबिक, फारशीत भाषांतरे झाली. शाहजहानचा मुलगा दारा शिकोहचा यात मोठा वाटा होता. मात्र नंतर औरंगजेब आला. त्याचा सत्तेवरचा कालखंड जवळजवळ एकोणपन्नास वर्षांचा. यातील पहिल्या बावीस वर्षांनंतर त्याने सुधारणेची चाके उलट फिरवली, चुका केल्या आणि साम्राज्याचे रथचक्र कायमचे मातीत रुतले. औरंगजेबानंतर त्याच्या वारसांनी चुका दुरुस्त करण्याचे क्षीण प्रयत्न केले. पण साम्राज्य पुन्हा कधीच उभे राहू शकले नाही.  

या कालखंडात उदयाला आलेल्या भक्ती आणि सूफी संप्रदायांवर भरपूर तपशील आणि मंथन इथे हाती लागेल. उत्तरेत याच संप्रदायातून उदयाला आलेले पुराणमतवादी आणि पुरोगामी प्रवाह; दक्षिणेकडे या संप्रदायाने घेतलेली निखळ समतावादी भूमिका, निर्गुण निराकार भक्तीचा मार्ग आणि मूर्तीपूजा हे दोन्ही प्रवाह या काळात वर आले. एकेश्वरवादी संतांपैकी सर्वात प्रभावी होते कबीर. नंतरच्या काळात गुरु नानक आणि त्यानंतरच्या काळात संत दादू. तत्कालीन समाजातील जातीय उतरंड, तुळशीदासाचा प्रभाव, नाथसंप्रदाय आणि विविध सूफी संतांच्या कामाची सखोल माहिती वाचकांना मिळते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा उगम, विकास आणि तत्कालीन समाजावर, राजकारणावर प्रभाव यांचे तपशील किंवा त्यावरील भाष्य मात्र इथे मिळत नाही.

दहाव्या ते चौदाव्या शतकापासून कृषीव्यवसायाच्या विकासाकडे, मूल्यमापनाकडे आणि करप्रणालीकडे विविध शासकांनी दिलेले लक्ष, याच काळात विकसित होत गेलेली युद्धतंत्रे आणि त्यांचे संक्षिप्त तपशील आहेत. (या तपशीलांसाठी लेखकाचे अन्य पुस्तक वाचावे लागेल.) सर्वात शेवटी दिलेले सरंजामशाहीचे भारतीय प्रारूप आणि त्याच्या उत्क्रांतीतून झालेल्या भांडवलशाहीच्या विकासाचे तपशील स्तिमित करणारे आहेत. कृषीव्यवसायाचे महत्त्व चंगेजखानापासून औरंगजेबापर्यंत सर्वांना ज्ञात होते. अनेक सरदारांनी जमिनी आणि शेतीत भांडवली गुंतवणुकी केल्या होत्या. ‘लागवडीखालची जमीन वाढवा’ असा औरंगजेबाचाही आग्रह असे. कवी तुळशीदास यांनीही ‘कवितावली’ मध्ये कसबी कारागीर आणि शेतकरी वर्गाला दुष्काळाच्या वेळी येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. 

* *

संबंधित बातम्या