अनाहत

विजय तरवडे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

विष्णू जनार्दन बोरकर यांची ‘अनाहत’ ही कथा मला आधी येरुशलेमला घेऊन गेली, आणि नकळत मी मला आवडणाऱ्या कितीएक विभूतींच्या जवळ पोचलो. `अनाहत’मध्ये आपल्याला ठाऊक असलेल्याच घटना आहेत. फक्त त्यांच्याकडे बघणारी माणसं आपल्या आसपास दिसू शकणारी आहेत. आपण त्या माणसांच्या नजरेतून सगळं बघत जातो. एकाच वेळी आपण त्या नायकात असतो आणि त्या माणसांमध्येही. 

मुक्काम पोस्ट येरुशलेम. सालाबादप्रमाणे पासोवारचा सण आला आहे. सर्वत्र जत्रेचे वातावरण आहे. रोमन मंदिराबाहेरच्या विस्तृत जागेवर जमलेल्या हौशा-गवशा-नवशा यात्रेकरूंनी पाले-राहुट्या-तंबू ठोकले आहेत. या गर्दीतच एक म्हातारा आपल्या विकलांग आणि पौरुषहीन पुत्राला आणि उफाड्याच्या तरुण सुनेला घेऊन आला आहे. पुत्राच्या देहात पौरुष उगवावे, त्याच्यापासून सुनेने आपल्याला नातवंडे द्यावीत आणि हे सगळे दैवी चमत्कारातून घडून यावे अशी म्हाताऱ्याची माफक अपेक्षा आहे. पण ही गोष्ट म्हाताऱ्याची नाही. म्हातारा-मुलगा-सून ज्या रांगड्या इब्राहिमला चिकटून यात्रेला आले त्या इब्राहिमच्या डोळ्यांची गोष्ट आहे. कथेनुसार इब्राहिम योसेफचा पणतू आहे. रोमन मंदिरावर श्रद्धा असलेला आणि मानवाच्या पुत्राला नाकारण्याचा प्रयत्न करताना गुरफटला गेलेला इब्राहिम खूप ओळखीचा वाटतो. कारण तो आपल्यासारखाच साधा, स्खलनशील आणि नंतर पश्चात्ताप होणारा आहे. 

‘अनाहत’ची गोष्ट इब्राहिमच्या डोळ्यांची आहे तशीच त्या डोळ्यांना विश्वरूप दर्शन घडवणाऱ्या ‘मानवाच्या पुत्राची’ आहे. पोरसवदा दिसणारा हा मानवाचा पुत्र एका गाढवीवर आरूढ होऊन येरुशलेममध्ये प्रकटतो. भराभरा त्याच्याभोवती आख्यायिकांची धूम्रवलये तयार होऊ लागतात. त्याने कोणा पांगळ्याला चालायला लावले, आंधळ्याला दृष्टी दिली, कुष्ठरोग्याला बरे केले. यात्रेकरूंमध्ये त्याच्याबद्दल कुजबूज सुरू होते. यात्रेकरू त्याला प्रेषित, मसीहा, स्वामी वगैरे नावांनी संबोधू लागतात. इब्राहिम स्वतःला समजावत राहतो की इथे दरवर्षी असे शेकडो प्रेषित म्हणवणारे येतात, जादूटोणा करतात, भोंदूगिरी करतात, लोकांच्या अंधश्रध्देचा गैरफायदा घेतात. पण या वेळी इब्राहिम का कोण जाणे, मंदिरात प्रवेश करीत नाही. बाहेरच रेंगाळतो. “एकाएकी इब्राहिमला झाडीत हरवलेल्या कोकराप्रमाणे झाले. दुपार कलंडली होती. मंदिराचे भव्य कळस उन्हात लखलखत होते. इब्राहिमला मात्र आता मंदिरात जावेसे वाटत नव्हते. त्याच्या लेखी ते मंदिर आता उजाड  होते. त्याला आता प्रथमच कळून चुकले की मंदिरात तो माणूस असल्याखेरीज मंदिराला अर्थ नव्हता.” 

‘मानवाचा पुत्र’ म्हणवणारा देखील मंदिरात जात नाही. त्याच्या नावाची कुजबूज ‘वरपर्यंत’ जाते. धर्मगुरू आणि पुरोहित त्याच्याशी जाहीर वाद घालायला अवतरतात – “तो असा अचानकपणे आला तेव्हा एकाएकी हवा अद्भुत शक्तीने भरून टाकल्यासारखे वाटले आणि जमावातील लोकांना मंदिराच्या गाभाऱ्यात असल्यासारखे वाटले... पण धर्मगुरू आणि पुरोहितांची कातडी अधिक जाड होती. त्यांना तसे वाटले नाही.” त्यांनी वाद घातला आणि हरल्यावर संतप्त होऊन निघून गेले. 

रोमन धर्मगुरूंचा पराभव झाल्यावर चक्रे फिरतात. पुढचा सर्वज्ञात घटनाक्रम इब्राहिमला मात्र वेगळा दिसतो. पासोवारची शेवटची रात्र. ‘लास्ट सपर’नंतर जुदासने सुवर्णनाण्यांच्या बदल्यात धर्मगुरूंना स्वामींची खबर पोचवली. स्वामींना धर्मगुरूंनी अटक करून निवाड्यासाठी राज्यपालाच्या प्रासादात नेले. पश्चात्ताप होऊन जुदासने नाणी परत द्यायचा प्रयत्न केला. पण स्वामींची सुटका झाली नाही. जुदासने ती नाणी फेकून दिली. राहुटीत निजलेल्या इब्राहिमला विचित्र स्वप्ने दिसतात. अवाढव्य क्रूस दिसतो. भिऊन तो जागा होतो आणि बाहेरच्या गर्दीबरोबर राज्यपालांच्या प्रासादाकडे जातो. काल मानवाच्या पुत्राचा जयजयकार करणारा जमाव आज त्याचा निषेध करतो आहे. हा तोच चंचल जमाव आहे, ज्याच्या बेभरवशीपणाबद्दल शेक्सपियरने ‘कोरिओलेनस’मध्ये लिहिलेले आपल्याला आठवावे.       

त्याच्या पाठीवर अवजड क्रूस देऊन त्याला सुळाकडे ढकलताना बघणाऱ्या इब्राहिमला वाटते की आपल्या पाठीवर देखील एक अदृश्य क्रूस आहे. मंदिरासमोरच्या पालापाशी परतल्यावर त्याला वाटते की इथे एक प्रचंड काळी क्रूसाची सावली पडली आहे. ती दिसेनाशी व्हावी म्हणून तो शेकोटी पेटवून उजेड करतो. “मग मिळेल ती वस्तू त्यात टाकून तो पेटवीत सुटला. तळावर केवढा तरी वणवा पेटला... आणि तरीही इब्राहिमला वाटले की चहू बाजूंनी वणवा जणू अंधाराने वेढला होता आणि त्या विलक्षण अंधारात खचत चालला होता... एकाएकी दूर चार कोकरे ओरडताना त्याने ऐकली आणि मग त्याची जाणीव पूर्णपणे नाहीशी झाली आणि तो जमिनीवर निश्चेष्ट पडला.”    

इब्राहिमच्या डोळ्यातून ही कथा वाचताना वाटले की आपणही आपल्याला वंदनीय असलेल्या विभूतींवर असे अन्याय करतो. त्यांच्या पाठीवर खोट्या आरोपांचे क्रूस लादतो आणि सारे पावित्र्य सुळावर चढवतो. कित्येक दशकांपूर्वी निधन झालेल्या नेत्यांच्या पाठीवर आपल्या अपयशाच्या जबाबदारीचे क्रूस लादतो. लाडक्या लेखकाच्या प्रतिमेवर ‘त्यांनी फक्त मध्यमवर्गीयांचा अनुनय केला’ अशा आरोपाचे खिळे ठोकतो. पण इब्राहिमप्रमाणेच आपल्याला देखील केव्हातरी या खोट्याची जाणीव होते आणि क्रूसाच्या सावल्या छळत राहतात. 

संबंधित बातम्या