शहाणा म्हातारा

विजय तरवडे 
सोमवार, 21 डिसेंबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

वयाच्या शहाण्णवव्या वर्षी खुशवंतसिंग यांनी ‘ॲबसोल्यूट खुशवंत’ नावाचे अफलातून पुस्तक लिहिले होते. हे स्वतःविषयी असले तरी आत्मचरित्र, आत्मसमर्थन नव्हते. खुशवंतसिंग यांच्या वरकरणी अवलिया वाटणाऱ्या बहुतांश कृती कशा विचारपूर्वक केलेल्या होत्या हे वाचून नवल आणि कौतुक वाटते. एके काळी माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या काही ठराविक प्रतिमा होत्या. स्तंभलेखक, फाळणीच्या पार्श्वभूमीवरील कादंबऱ्यांचा जनक, ‘विकली’चा संपादक, विनोदी किश्शांचा संकलनकार वगैरे. अनेकांना भुरळ घालणारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन पैलू - मद्यपान, स्त्रियांशी मैत्री आणि दीर्घायुष्य. या सगळ्या पलीकडचा एक शहाणा, विचारी म्हातारा या पुस्तकात आपल्याला भेटतो. 

पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी सुखाची व्याख्या केली आहे – बँकेत उत्तम शिल्लक, स्वतःचे घर, आरोग्य, समंजस सहचर-सहचरी लाभावेत. असूया, राग आणि कुचाळक्या टाळता यावेत, उतारवयातही जोपासता येईल असा छंद आणि रोज थोडा वेळ तरी आत्मचिंतन करण्याची सवय असावी. ‘मी माझा डाळभात आणि स्कॉचसाठी लेखन करतो, शिवाय लेखनामुळे माणसाचा अहं सुखावतो’ असं ते म्हणतात. आपलं लेखन वाचून काही शिखांना खालिस्तानच्या कल्पनेपासून परावृत्त व्हावंसं वाटलं याचा त्यांना आनंद आहे. गर्दीपेक्षा ते एकांतात अधिक रमतात. 

आत्मचरित्र नसले तरी हे आत्मकथन आहे. पहिल्यावहिल्या असफल प्रेमापासून पत्नीबरोबरच्या साठ वर्षे साहचर्यावर त्यांनी सारख्याच उत्कटतेने लिहिले आहे. त्याच जोडीने ‘सेक्स’ विषयावर स्वतंत्र प्रकरण आहे. 

पन्नासच्या दशकात ‘ट्रेन टू पाकिस्तान’ प्रकाशित झाली, १९६५ साली त्यांनी ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या पहिल्या पानावर ‘हिंदू-मुस्लिम संबंधांवर’ लेख लिहून पत्रकारितेत पदार्पण केले. 

त्यांचे काही तपशील नवोदित लेखकांसाठी प्रेरक ठरतील. वयाच्या शहाण्णवाव्या वर्षीही त्यांनी पहाटे चार वाजता उठून नियमित वृत्तपत्रवाचन, त्यातील कठीणतम शब्दकोडी सोडवणे, सदरलेखन, वाचन, कादंबरीलेखन, वाचकांच्या पत्रांना उत्तरे हा परिपाठ कायम ठेवला होता. लेखकाने सतत काही ना काही वाचत असावे किंवा लिहीत असावे. लेखकाने पहाटे नियमित उठावे, आज काय आणि किती लेखन करणार हे ठरवावे आणि ठरवलेले काम पूर्ण झाल्याखेरीज रात्री निजू नये असा ते सल्ला देतात. लेखनाने त्यांना अंतर्यामी चिरतरुण ठेवले असे त्यांना वाटते आणि वाचकांना देखील पटते – वयाची सत्तरी गाठली तेव्हा ते ‘हिंदुस्तान टाईम्स’चे संपादक होते, मालकांनी निवृत्त होण्याचा विचार आहे का असा प्रश्न विचारल्यावर ‘स्मशानात गेल्यावरच मी तो विचार करीन’ असे त्यांनी उत्तर दिले. 

महात्मा गांधी आणि मदर तेरेसा ही त्यांची आदराची स्थाने. दोघांचा त्यांना थोडाफार प्रत्यक्ष सहवासही लाभला. गांधीजींना भेटल्यावर प्रभावित होऊन त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली. त्यांची आई घरीच खादी विणत असे. हा परिपाठ उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाईतो टिकला. मात्र गांधीजींची अनेक मते त्यांना मान्य नाहीत. 

शिखांचा इंग्रजीतला पहिला इतिहास त्यांनीच लिहिला आहे. हा इतिहास दोन खंडांमध्ये उपलब्ध आहे. ‘विकली’च्या संपादकपदी असताना भारदस्त म्हणविणारे संपादक ज्या विषयावर लिहायला कचरतील अशा सर्व विषयांवर त्यांनी मनसोक्त लेखन केले. ‘विकली’चे संपादकपद सुटल्यावर एकही दिवस न दवडता त्यांनी नवीन कादंबरी लिहायला घेतली होती. 

आपण पहिल्या दर्जाचे ललित लेखक नसल्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. मध्यम वयात असताना धर्मा नावाच्या अभिजात साहित्यप्रेमी स्त्रीच्या ते प्रेमात पडले. तिने शून्य प्रतिसाद दिला. तिचे त्यांच्या लेखनाविषयी बरे मत नव्हते. तरी तिला आपली एक कादंबरी अर्पण केली.

पुस्तकाच्या उत्तरार्धात जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतील इंदिरा गांधी, राजीव आणि राहुल, लालकृष्ण अडवाणी वगैरेंवर टिपणे आहेत. यातला मजेदार विरोधाभास असा की ज्यांच्याशी वैचारिक अद्वैत आहे त्यांच्यावर – नेहरू आणि इंदिरा – टीका आहे आणि वैचारिक मतभेद असलेल्या अडवाणींबद्दल प्रेमाने लिहिले आहे. या टिपणांनंतर तत्कालीन राष्ट्रीय राजकारण-घडामोडी, पाकिस्तान वगैरेंवर टिपणे आहेत. संप्रदायवादावरचे त्यांचे मतप्रदर्शन आजच्या समाजमाध्यमांतील वातावरणाला आणि ट्रोलिंग नावाच्या गलिच्छ प्रथेला चपखल लागू पडते – 

We have no compassion or understanding for those who are different from us. The intolerance that people have shown - and the politicians have fanned these flames – is disgraceful. 

नव्वदीपारच्या माणसाच्या मनात मृत्यूबद्दल विचार येणार नाहीत हे शक्यच नाही. मृत्यूला सामोरे कसे जावे यावर त्यांनी दलाई लामांना सल्ला मागितला. दलाई लामांनी ध्यानधारणा सुचवली. मरण शांतपणे यावे, झटकन यावे आणि वेदनारहित असावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. आपलीही अपेक्षा तशीच असते. मरणोत्तर जीवनावर त्यांचा विश्वास नव्हता. सगळे मंथन केल्यावर मरणाला सामोरे कसे जावे याचे उत्तर देताना ते म्हणतात, कोणताही खेद किंवा खंत मनात न बाळगता स्मितहास्य करीत सामोरे जावे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर चार वर्षांनी – २०१४ साली - त्यांचे निधन झाले. मरणाला कृतार्थ भावनेनेच ते सामोरे गेले असतील यात शंका नाही.      

संबंधित बातम्या