मेळघाटच्या अंगणात

विजय तरवडे 
मंगळवार, 5 जानेवारी 2021

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

‘द  मेळघाट ट्रेल’चे लेखक प्रकाश ठोसरे हे दुसऱ्या पिढीतले वन अधिकारी. वडील जगन्नाथराव ठोसरे वन खात्यातून १९७६ साली निवृत्त झाल्यावर त्याच वर्षी प्रकाश केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याच खात्यात दाखल झाले. वनखात्यात त्यांनी किती मन लावून आणि जीव ओतून काम केले त्याची हे पुस्तक साक्ष देते. मेळघाट हे १७०० चौरस किमी क्षेत्रातले वाघांचे अभयारण्य. पुस्तक वाचताना आपण लेखकाचा हात धरून इथे मनसोक्त भटकंती करतो. तांत्रिक, क्लिष्ट माहितीचा भडिमार न करता लेखकाने इथे आलेले अनुभव कथास्वरूपात रसाळ भाषेत मांडले आहेत. 

शशकर्ण किंवा कॅराकल ही पूर्वी महाराष्ट्रात विपुल आढळणारी जंगली भाटी. दरबारी लोक हौसेने हिला पाळायचे. सशासारखे मोठे कान असलेली ही भाटी थोडी लांबोळकी आणि अतिशय चपळ होती. दाणे टिपणारा कबुतरांचा थवा दिसला एका झेपेत त्यातल्या आठदहा जणांची लीलया शिकार करीत असे. लेखकाने तिला मोरावर हल्ला करताना पाहिलेले आहे. आता महाराष्ट्रातून लुप्त झालेल्या या प्रजातींच्या काही थोड्या मांजरी गुजरात व राजस्थानमध्ये शिल्लक आहेत. लेखकाने ‘द मेळघाट ट्रेल’ या कॅराकलला अर्पण केले आहे. पुस्तकासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या प्रस्तावनेसह पुल्लैला गोपीचंद, चंदू बोर्डे, वंदना चव्हाण आणि अन्य क्षेत्रांतील बऱ्याच मान्यवरांनी प्रशस्तीपर अभिप्राय लिहिले आहेत.   
हाथकुवा भागात एका उथळ विहिरीवर हरणे पाणी प्यायला येतात म्हणून त्यांचे निरीक्षण करण्यासाठी जवळच्या झाडावर मचाण बांधून लेखकाने मुक्काम ठोकला, हरणे आली. पाणी पिताना वाऱ्याची दिशा बदलली आणि त्यांना लेखकाची चाहूल लागली. एक सांबर लेखकाकडे बघून धोक्याचा इशारा देणारे आवाज काढू लागले. बऱ्याच वेळाने लेखकाच्या लक्षात आले की सांबर लेखकाकडे बघून ओरडत नव्हते. मचाणाच्या खाली एक बिबट्या येऊन बसला होता! नंतर केलेली टिप्पणी मजेदार आहे. झाडावर चढता येत असूनही बिबट्याचे लक्ष हरणांवर होते. माणसापेक्षा त्याला हरिण प्रिय असावे. 

पक्षी असोत की सस्तन प्राणी, आईचे आपल्या पिल्लांवर अतिशय प्रेम असते. लेखक एकदा गवतात असलेल्या टिटवीच्या पिल्लांचा फोटो काढत असताना टिटवी आकाशातून अस्वस्थपणे ओरडत होती. आईच्या मायेचा दुसरा किस्सा हृदयस्पर्शी आहे. १९९३ साली चिखलदरा रस्त्यावर एका खेडुताला बिबट्याची दोन पिल्ले मिळाली होती. एक नेता दोघांना दूध पाजत असतानाचा फोटो वर्तमानपत्रात पाहून लेखकाने त्याचा पाठपुरावा केला. एक पिल्लू थोडे आजारी होते. लेखकाने ती पिल्ले घेतली आणि ज्या ठिकाणी सापडली होती तिथे त्यांना एका पिंजऱ्यात ठेवून पिंजऱ्याच्या दाराला दोरी लावून लेखकाचा सहकारी जाजू मचाणावर लपले. पिल्लांनी जोरजोरात आक्रोश केल्यावर त्यांची आई आली. तिने दोघांना ओळखले, चाटले आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी मात्र ती त्यातल्या निरोगी पिल्लाला घेऊन गेली. ते आजारी पिल्लू वनविभागाने परत आणले, ते नंतर मरण पावले. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत आहे. भेट दिल्यावर लक्ष्मण यांना अभिप्राय लिहिण्याची विनंती केली तेव्हा अभिप्राय न लिहिता लक्ष्मण यांनी व्यंगचित्र काढले. त्यात वाघाला भिऊन झाडावर चढणारा वन विभागाचा अधिकारी चितारला होता! 

चिखलदऱ्याजवळ बिबट्याची एक मादी आपल्या तीन बछड्यांना घेऊन राहत होती. माणसांच्या वाटेला जात नव्हती. पण एका रात्री दोन दारूड्यांनी त्या भागात अतिक्रमण केले. रात्री परत जाताना त्यांच्यातला एक जण मागेच थांबला. दारूच्या धुंदीत त्याने अंदाधुंद दगडफेक केली. बिबट्याच्या मादीने त्याची शिकार केली. यानंतर लवकरच तिथे मुख्यमंत्र्यांची भेट होणार होती. त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला पुढे वन विभागात नोकरी दिली गेली. मात्र नंतर एक वर्षभर त्या भागावर नजर ठेवूनदेखील त्या बिबट्याच्या त्या मादीने कधीही माणसांना त्रास दिल्याचे आढळले नाही. 

बिबट्याप्रमाणे गव्याच्याही काही आठवणी आहेत. गवा शाकाहारी असला तरी आक्रमक होऊ शकतो. आडव्या आलेल्या माणसावर केलेला प्राणघातक हल्ला किंवा लँड रोव्हर गाडीला धडक देऊन तिचा मोडका दरवाजा शिंगावर घेऊन गेलेला गवा यांच्या हकीकती रोचक आहेत. वाघाने ठार केलेल्या गव्याच्या देहाजवळ त्याचा मित्र गवा येतो आणि भावनावश होतो. थोड्या वेळाने मृत गव्याला खाण्यासाठी आलेल्या वाघ-वाघिणीच्या जोडीला पळवून लावतो. 

वन्यप्राणिजीवनाविषयी आकर्षण आपल्याला सर्वांना असते, बऱ्याचजणांची ही आवड ते घराच्या दिवाणखान्यात बसून डिस्कव्हरी वगैरे वाहिन्या बघण्यापुरतीच मर्यादित असते. मेळघाटची ही भटकंती मात्र वाचकाला वन्य प्राण्यांकडे अधिक डोळसपणे बघायला शिकवते. पुस्तकात जागोजागी छायाचित्रांचा आणि रेखाटनांचा वापर केला आहे. शेवटी वन विभागातील व अन्य सहकाऱ्यांची परिचयवजा छायाचित्रे आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे लेखनाच्या ओघात वापरलेल्या एकूण एक संज्ञांचे अर्थ दिले आहेत. 

The Melghat Trail
Prakash Thosre
Partridge Publications
Price Rs. 500
Pages . 263
 

संबंधित बातम्या