चीनचा विस्तारवाद

विजय तरवडे 
सोमवार, 8 मार्च 2021

पुस्तक परिचय
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ या पुस्तकात चीनच्या विविध क्षेत्रातील धोरणांचा आणि गेल्या वर्षापर्यंतच्या अद्ययावत सामरिक व इतर हालचालींचा आढावा घेतला आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल. 

मध्ययुगीन काळापासून गेल्या शतकात तीसच्या दशकापर्यंत भारताशी विविध पातळ्यांवर जवळीक असलेला चीन साठच्या दशकारंभी स्वखुशीने भारतापासून दूर गेला. बासष्ट साली त्याने आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता. गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात पुन्हा त्याने तणाव आणि युद्धसदृश स्थिती निर्माण केली. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांमधून ‘आता बासष्ट सालचा भारत नाही’ अशा आशयाची विधाने प्रसूत झाली. पण भारत बासष्ट सालचा नसला तरी चीनदेखील बासष्ट सालचा नाही. किंबहुना भल्याबुऱ्या मार्गाने चीन आपल्या बराच पुढे गेला आहे. 

विजय नाईक यांना २००१ ते २०१९ या काळात चीनमध्ये सात वेळा जाण्याची आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, नेते वगैरेंशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळाली. त्या अनुभवातून आणि विविध संदर्भ साधने वापरून साकारलेल्या ‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ या पुस्तकात चीनच्या विविध क्षेत्रातील धोरणांचा आणि गेल्या वर्षापर्यंतच्या अद्ययावत सामरिक व इतर हालचालींचा आढावा घेतला आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल. 

भारत-चीनमधल्या दोन हजार वर्षांपासून असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचा आढावा घेणारे विस्तृत प्रकरण पुस्तकात आहे. मात्र यात आणखी काही तपशील असायला हवे होते, असे वाटते. उदाहरणार्थ, १८५७ साली आपल्याकडे आणि १८९०च्या दशकात चीनमध्ये सशस्त्र उठाव (बॉक्सर्स रिबेलियन) झाला. पाश्चात्यांनी चीनमधला उठाव अमानुषपणे मोडून काढला. १९३०च्या दशकाअखेरीस चीनमधल्या कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ गांधीजींकडे सल्ला मागण्यासाठी आले होते.

जीडीपीचा विचार केला तर १९८८ सालापर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्था एका पातळीवर होत्या. आज आपली अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात असताना चीनची अर्थव्यवस्था चौदा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोचली आहे. या वाटचालीत मोलाचा वाटा असलेल्या शी जिनपिंग यांच्या एकूण राजकीय करिअरचा तपशीलवार मागोवा लेखकाने घेतला आहे. शी जिनपिंग यांचे वडील पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आणि सुरुवातीला चीनचे उपपंतप्रधान होते. माओच्या काळात त्यांची गच्छंती झाली. खुद्द शी यांना गद्दार ठरवण्यात आले. पण चिकाटीने काम करून त्यांनी १९७४ साली पक्षात प्रवेश मिळवला आणि आज देशाचे सर्वेसर्वा झाले. त्यांच्या कारकिर्दीत हजारो व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचाराचे खटले दाखल झाले! यातून राजकीय विरोधकांचे काटे काढण्याचे कामही साधले असणार. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाची अंतर्रचना, पॉलिट ब्यूरो, पीबीएससी याखेरीज पक्ष आणि प्रशासन यांच्यातले दुवे या तपशिलात वाचायला मिळतात.  

विविध प्रकल्प आणि धोरणांची गतिमान अंमलबजावणी हे चीनचे एक वैशिष्ट्य. शांघाय शहराशेजारी त्यांनी जगातील ‘फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड’ कंपन्यांच्या कार्यालयांसाठी पुडोंग नावाचे अद्ययावत शहर अवघ्या दहा वर्षांत उभारले होते. 

चीनपुढचे दोन सांप्रदायिक प्रश्न म्हणजे तिबेट आणि शिंजियांग. तिबेटमध्ये आणि शिंजियांग या मुस्लिमबहुल प्रांतात चीनने काय काय केले हे प्रत्यक्ष पुस्तकातच वाचायला हवे. चीनची आक्रमक सामरिक नीती नमुनेदार आहे. चौदा देशांच्या सीमा चीनला भिडलेल्या आहेत आणि प्रत्येकाशी चीनने कुरबुर चालू ठेवली आहे.  वन बेल्ट वन रोड आणि मेरीटाईम सिल्क रुट हे चीनचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या सामरिक नीतीशी निगडित आहेत. चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुध्दावर स्वतंत्र प्रकरण आहे. चिनी समाजमन या नावाच्या प्रकरणात चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण ‘वाडा संस्कृती’, घरमालक-भाडेकरू संबंध, योगासनांविषयीचे आकर्षण, सामान्य माणसाची धार्मिकता यांचे वर्णन आहे. तरुणांना इंग्रजीचे आकर्षण आहे. त्यांना गुगल उपलब्ध नसले तरी सरकारने ‘वायबो’ व ‘टेन्सेंट’ हे पर्याय दिले आहेत. शेवटच्या भागात कोरोना आणि वुहानमधल्या घटनांचा विस्तृत आढावा आहे.  

एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आजतागायत विविध पंतप्रधान आणि मुत्सद्दी यांनी हाताळलेल्या चीनप्रश्नाचे वस्तुनिष्ठ तपशील, आपली आर्थिक नीती यावर पुस्तकात विस्तृत विवेचन आहे.    जाता जाता - अशा या सामर्थ्यशाली चीनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? १९८९ साली तियानमेन चौकात आंदोलन करणारे हजारो विद्यार्थी गोळीबारात ठार झाले. नेमका आकडा आजही ठाऊक नाही. आज इंटरनेटवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. २०१३ साली सायबर पोलीस दलाची संख्या वीस लाख होती आणि आज ती बरीच वाढली आहे.

‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ 
लेखक - विजय नाईक 
प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे
किंमत - २९५ रुपये
पाने - २२३

संबंधित बातम्या