यहाँ मैं अजनबी हूँ... 

ऋता बावडेकर  
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

हिंदी चित्रसृष्टी आणि कपूर घराणे हे अगदी अतूट असे नाते आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आताच्या करिना, रणबीर कपूरपर्यंत ही परंपरा येते. शशी कपूर हे त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव ! धर्मपुत्र वगैरे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून भूमिका कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या या कलावंताने नंतर अनेक मसालापटांत भूमिका केल्या. चित्रसृष्टीत आपले असे विशेष स्थानही निर्माण केले. पण का माहिती नाही, हा कलावंत या दुनियेत फारसा रमलेला वाटत नाही. त्यापेक्षा जुनून, कलयुग, उत्सव यांसारख्या पठडीबाहेरच्या अर्थपूर्ण चित्रपटांत, रंगभूमीवर तो अधिक रमलेला दिसतो.

हिंदी चित्रसृष्टी आणि कपूर घराणे हे अगदी अतूट असे नाते आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आताच्या करिना, रणबीर कपूरपर्यंत ही परंपरा येते. शशी कपूर हे त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव ! धर्मपुत्र वगैरे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून भूमिका कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या या कलावंताने नंतर अनेक मसालापटांत भूमिका केल्या. चित्रसृष्टीत आपले असे विशेष स्थानही निर्माण केले. पण का माहिती नाही, हा कलावंत या दुनियेत फारसा रमलेला वाटत नाही. त्यापेक्षा जुनून, कलयुग, उत्सव यांसारख्या पठडीबाहेरच्या अर्थपूर्ण चित्रपटांत, रंगभूमीवर तो अधिक रमलेला दिसतो. टिपिकल हिंदी चित्रपट त्याने केले, पण इथे तो नेहमीच ‘अजनबी’ वाटला... 

पृथ्वीराज कपूर यांचा नाट्य-चित्रपटांचा संपन्न वारसा.. राज कपूर यांची तेवढीच मोठी चित्रकारकीर्द.. शम्मी कपूर यांनी निर्माण केलेली स्वतःची वेगळी ओळख... या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शशी कपूरने काय करायचे? आपले स्थान कसे निर्माण करायचे? काहीही करायला गेले की कोणाशी तरी तुलना होणे अपरिहार्यच! वडिलांबरोबर ‘पृथ्वी थिएटर्स’च्या नाटकांत बालकालाकार म्हणून त्यांनी सुरवात केली. पुढे राज कपूर यांच्या ‘आग’, ‘आवारा’मध्येही ते बालकलाकार म्हणून चमकले.. पुढे अभिनेता होण्याचा त्यांचा निर्णय तिथेच झाला. 

थोडे मोठे झाल्यावर ‘धर्मपुत्र’मध्ये त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर अनेक चित्रपटांत ते सहनायक किंवा दुय्यम भूमिका करत राहिले. दरम्यान (तेव्हाच्या) कलकत्त्यात ते पृथ्वी थिएटर्सबरोबर दौऱ्यावर होते. त्याचवेळी इंग्लंडच्या जेफ्री केंडाल यांचा शेक्‍सपिअरन ग्रुपही कलकत्त्यात आला होता. जेफ्री यांची मुलगी जेनिफरही त्याबरोबर होती. शशी कपूर आणि जेनिफर दोघेही आपापल्या ग्रुपसाठी काम करत होते. त्यांची ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे त्यांनी लग्न केले. 

चित्रपटांत लहान-मोठ्या भूमिका करत शशी कपूर यांची वाटचाल सुरू होती. त्याचवेळी ते रंगभूमीवरही काम करत होते. दरम्यान बेबी नंदा यांच्याबरोबर त्यांना काही चित्रपट मिळाले. ते सगळे चित्रपट चांगल्यापैकी चालले आणि शशी कपूर यांचे हिंदी चित्रसृष्टीतील स्थान निश्‍चित झाले. त्यानंतर त्यांनी केलेले अनेक चित्रपट तुफान यशस्वी ठरले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर यांच्याइतके नसले तरी शशी कपूर यांनी चांगले यश मिळवले. पण हे करताना त्यांनी स्वतःला केवळ हिंदी चित्रपटांपुरते मर्यादित ठेवले नाही. त्याचवेळी ते रंगभूमीसाठीही काम करत होते. आपल्या वडिलांचे ‘पृथ्वी थिएटर्स’च्या यशस्वितेचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले आणि तसे काम सुरू केले. त्यात त्यांची पत्नी जेनिफर यांचा वाटा खूप मोठा होता. हिंदी चित्रपटांतून मिळणारी पुंजी ते या ग्रुपसाठी खर्च करू लागले. बघता बघता ‘पृथ्वी थिएटर्स’ यशस्वी होऊ लागले. अनेक प्रयोग या व्यासपीठावर झाले.. अजूनही होत आहेत. 

शशी कपूर हिंदी चित्रसृष्टीचा अविभाज्य भाग असले, तरी त्यांनी स्वतःला त्यापुरते मर्यादित कधीच ठेवले नाही. आज हॉलिवूडमधील चित्रपटांत छोटीशी जरी भूमिका मिळाली तरी तिचा गाजावाजा करणारी अनेक नटमंडळी आहेत. पण इंग्रजी चित्रपटांत आपल्या कर्तृत्वावर भूमिका मिळवणारे शशी कपूर हे पहिले अभिनेता होते. इस्माईल मर्चंट यांच्या मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शनसाठी त्यांनी ‘द हाऊसहोल्डर’, ‘शेक्‍सपिअरवाला’, ‘बॉम्बे टॉकी’, ‘हीट अँड डस्ट’, ‘सिद्धार्थ’ अशा अनेक इंग्रजी चित्रपटांत त्यांनी कोणताही गाजावाजा न करता कामे केली आहेत. चित्रपटांत भूमिका करून केवळ ते थांबले नाहीत, तर ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘३६, चौरंगी लेन’, ‘विजेता’, ‘उत्सव’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. ‘अजूबा’ नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला. अनेक नाटकांची निर्मिती केली. अनेक कलावंतांना ‘पृथ्वी थिएटर्स’च्या माध्यमातून त्यांनी प्रोत्साहन दिले. 

हिंदी चित्रपटांत त्यांनी टिपिकल हिरोंच्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे इंटरेस्ट्‌सचे विषय वेगळेच होते. वास्तविक, एकेकाळी ते त्यावेळचे सुपरस्टार देव आनंद यांच्या तोडीचे यशस्वी नायक म्हणून मान्यता पावले होते. नंतरच्या काळातही राजेश खन्ना, संजीव कपूर, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हे चित्रपटही यशस्वी ठरले. पण त्यात त्यांनी स्वतःला अडकू दिले नाही. अलीकडच्या काळातही त्यांनी काही हिंदी, इंग्रजी चित्रपटांत काम केले, पण स्वतःला त्यातच बंदिस्त होऊ दिले नाही. कारण त्यांची मूळ आवडे होती - रंगभूमी. पृथ्वीराज कपूर यांच्या नाट्यकंपनीत राज कपूर, शम्मी कपूर यांनीही कामे केली; पण या क्षेत्रात खऱ्या अर्थाने रमले ते शशी कपूरच! त्यांना खूप महत्त्वाची साथ मिळाली ती, त्यांची पत्नी जेनिफर कपूर यांची.. आणि या दांपत्याने आपल्या आवडीच्या कामासाठी सर्वस्व पणाला लावले. अखेरपर्यंत रंगभूमीसाठी ते काम करत राहिले. 

म्हणूनच शशी कपूर यांची ‘जब जब फूल खिले’, ‘शर्मिली’, ‘कन्यादान’, ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘त्रिशूल’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘काला पत्थर’, ‘शान’ वगैरे.. अशी संपन्न चित्रकारकीर्द असली, या चित्रसृष्टीचा महत्त्वपूर्ण भाग असले, तरी ‘यहाँ ते अजनबीच’ होते, असे वाटते. कारण त्यांचे मन नेहमीच रंगभूमीवर घोटाळत होते. एकदा त्यांना काही क्षण भेटण्याची संधी मिळाली, तेव्हाही ते रमले रंगभूमीच्या गप्पांमध्येच! आपले काम चोख बजावून या अभिनेत्याने नुकतीच एक्‍झिट घेतली असली तरी त्याचा निरागस चेहरा कोण विसरू शकेल?

संबंधित बातम्या