गुजरा वक्त लौटके नहीं आता

ऋता बावडेकर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

स्मरण
 

‘पीछे नही जाने का, पीछे जानेसे गुजरा हुआ वक्त लौटके नही आता..’ ‘अग्निपथ’ मधील हा डायलॉग कादर खान यांनी लिहिलेला आहे. किती यथार्थ आणि समर्पक आहे, हे सांगण्याची आवश्‍यकता नाही. चित्रपटातील सगळेच संवाद फेकून सोडून द्यायचे नसतात किंवा गंमत म्हणून त्याकडे बघायचे नसते. तद्दन व्यावसायिक चित्रपटांतील डायलॉग्जही असे अर्थपूर्ण असू शकतात. ही किमया अनेकांना साधली होती, कादर खान त्यापैकी एक होत. 

स्थापत्य अभियंत्याची पदवी घेतलेल्या कादर खान यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले. पण चित्रपटांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. ‘जवानी दिवानी’ (१९७२) चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथा लेखनास सुरुवात केली, तर ‘दाग’ (१९७३) या राजेश खन्नाच्या चित्रपटातून त्यांनी अभिनयास प्रारंभ केला. यात एका वकिलाची भूमिका त्यांनी केली होती. अनेक चांगल्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ‘हम जहाँ खडे होते है, लाइन वहाँसे शुरू होती है।’ असे त्यांचे खटकेबाज संवाद विशेष गाजले. १९८२ मध्ये सलीम जावेद वेगळे झाल्यानंतर कादर खान यांच्या लेखनाला विशेष मागणी वाढली. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द या लेखनामुळेही झळाळून उठली असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यासाठी लावारिस, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, नसीब, अग्निपथ.. ही काही उदाहरणेही पुरेशी आहेत. पटकथा, संवाद लिहितानाच त्यांनी विविध चित्रपटांत गंभीर, विनोदी भूमिकाही केल्या. अमिताभ बच्चनचा काळ थोडा मागे पडल्यावर त्यातच अडकून न पडता कादर खान यांनी बदलत्या काळाची पावलेही ओळखली. ‘अग्निपथ’मधील वर उल्लेख केलेला डायलॉग त्यांनी किती विचारपूर्वक लिहिला होता, हे यावरून लक्षात येईल. 

या काळात त्यांनी आपला मोहरा हलक्‍या फुलक्‍या चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीला शक्ती कपूर यांच्याबरोबर त्यांची जोडी जमली. या काळात काही द्‌व्यर्थी संवादही त्यांच्या नावावर जमा झाले. ‘शोला और शबनम’, ‘आँखे’ या गोविंदाच्या चित्रपटांत तर अशा संवांदांनी अश्‍लीलतेचा कळस गाठला होता. पण काही काळातच कादर खान सावरले आणि याच गोविंदाबरोबर त्यांनी ‘बोल राधा बोल’, ‘कुली नंबर १’, हिरो नंबर १’, ‘दुल्हे राजा’, ‘हसीना मान जाएगी’ अशा अनेक ‘क्‍लीन कॉमेडीज’ दिल्या. 

गोविंदाच्या चित्रकारकिर्दीत त्याच्या डान्सने प्रचंड वाहवा मिळवली. त्याच्याबरोबर कोणती हिरॉईन उत्तम डान्स करू शकते किंवा कोणत्या हिरॉईनबरोबर त्याची जोडी चांगली दिसते यावर रकानेच्या रकाने भरून लिहिले गेले आहे. पण गोविंदाची खरी जोडी कोणा हिरॉईनबरोबर नाही, तर कादर खान यांच्याबरोबर छान जमली असे माझे मत आहे. या दोघांबरोबर कधी शक्ती कपूर, कधी सतीश कौशिक, कधी जॉनी लिव्हर यांनी पडद्यावर धमाल केली.  

कोणतेही यश हे कधीच एकट्याने मिळवलेले नसते - एकट्याचे नसते. त्या यशाला ‘टीम’चा प्रचंड मोठा पाठिंबा आवश्‍यक असतो. अमिताभ यांच्या यशात त्यांचे दिग्दर्शक - प्रामुख्याने यश चोप्रा, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, लेखक - सलीम, जावेद आदींचा फार मोठा वाटा होता. तसाच तो पुढील काळात कादर खान यांचाही होता. अन्यथा सलीम जावेद वेगळे झाल्यानंतर बच्चन यांची कारकीर्द इतकी झळाळून उठली असती का, शंकाच आहे. गोविंदाची कारकीर्दही अशीच सैरभैर झाली होती. पण पहलाज निहलानी, राकेश रोशन, डेव्हिड धवन अशा दिग्दर्शकांबरोबरच कादर खान यांच्या लेखणीचाही त्यांच्या यशात मोठा वाटा आहे. 

केवळ चटपटीत लिहिणे, शिटीबाज डायलॉग मारणे, हे पटकथा-संवादलेखकाचे काम नाही, हे कादर खान यांनी ओळखले होते. त्यामुळेच प्रत्येक नाही, पण आपले शिटीबाज डायलॉगही अर्थपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. 

 मात्र, इतक्‍या झळाळत्या कारकिर्दीनंतर या लेखक-अभिनेत्याला काम मिळणे कमी होऊ लागले. कालांतराने तर ते जवळजवळ विस्मृतीतच गेले. ते नेहमी म्हणत ‘मी कधी निवृत्त झालो नाही’; ही सक्तीची निवृत्ती होती. अनेक कलावंतांच्या वाट्याला ती येते. राजेश खन्ना या सुपरस्टारलाही ती चुकली नाही. बच्चन यांनी वेगवेगळ्या भूमिका करणे सुरू ठेवले म्हणून, अन्यथा त्यांचीही तीच अवस्था झाली असती. पण कादर खान हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते लेखकही होते. मात्र ते आजारी पडले आणि मागेच पडले. वास्तविक त्यांना लेखक म्हणून पुन्हा यायचे होते. त्या वेळची भाषा त्यांना पुन्हा आणायची होती. ती लोकांना आवडेल, असे त्यांना वाटत होते. पण तसे काही झाले नाही. त्यांना कोणी परत बोलावले नाही, त्यांचे पुनरागमनाचे स्वप्न स्वप्नच राहिले.. 

प्रत्येकाचा एक काळ असतो. तुम्ही काहीही केले तरी त्या काळात फासे सुलट पडत असतात. पण प्रत्येक कारकिर्दीलाच एक मर्यादा असते. आपण कितीही नियोजन केले तरी, ही मर्यादा कधीपासून पडायला सुरुवात होईल सांगता येत नाही. केवळ वलयातील लोकच नाही, तर सामान्य माणसाच्या आयुष्यातही हे घडत असते. जीवनचक्र सुरूच असते. नवीन पिढी येत असते, काळ बदलत असतो; आपण स्वतःला बदलले तरी त्याला मर्यादा पडतात, हे जितके लवकर समजून घेतले जाईल तितके त्या व्यक्तीसाठी चांगले असते. कादर खान यांनी ते लवकर समजून घेतले. मुलाबरोबर ते कॅनडाला निघून गेले. तिथेच त्यांनी आपली जीवनयात्राही संपवली.. पण त्यामुळे त्यांची कारकीर्द, त्यांची प्रतिभा कशी विसरता येईल?  

संबंधित बातम्या