अलविदा 

विजय तरवडे 
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

स्मरण
प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं नुकतंच निधन झालं. त्या लोकप्रिय लेखिका होत्याच, कवयित्रीही उत्तम होत्या. फेसबुक या समाज माध्यमाद्वारे त्यांनी खूप मोठा गोतावळा जमा केला होता. अशाच त्यांच्या एका सुहृदाने सांगितलेल्या काही आठवणी.

त्यांच्याबद्दल एव्हाना बऱ्याच जणांचं आणि तपशिलांनी ओतप्रोत लिहून झालंय. समाज माध्यमातून मीडियावर आणि मुद्रित माध्यमांमध्येदेखील! कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ यशस्वी असलेली माणसं आपल्या वाटचालीत असंख्य व्यक्तींना भेटलेली असतात. त्या व्यक्तींनी आपापल्या नजरेतून आणि मगदुरानुसार त्या कलावंतांना पाहिलेलं-अनुभवलेलं-जोखलेलं असतं, आठवणी आणि अनुभव मनात साठवून ठेवलेले असतात. या निमित्तानं त्यांचा बांध फुटतो. 

तर ते सगळं टाळून उरलेलं आणि माझ्यापाशी असलेलं काही वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत प्रसारित झालेल्या त्यांच्याबद्दलच्या आठवणींच्या या गर्दीत मला अंमळ बुजल्यासारखं होतं आहे. कारण त्यांचा आणि माझा लेखक-वाचक किंवा वाचक-लेखक म्हणून संबंध फार कमी आला. फेसबुकवर चव्हाटा नामे एका खास भांडखोर समूहात आमची ओळख झाली. त्या समूहात रोज गमतीगमतीत वादावादी चालत असे. मात्र प्रत्यक्ष भांडण होण्याइतपत वाद ताणले जात नसत. त्यांच्याशीदेखील या समूहात माझ्यासह अनेक सदस्यांनी वादावादी केली. चव्हाट्यावर त्या फार दिवस रमल्या नाहीत. चव्हाटा सोडून गेल्या. कालांतरानं चव्हाटा समूहदेखील बंद पडला. 

यानंतर काही दिवसांनी कोणा प्रकाशकानं माझं एक पुस्तक मला न विचारता दुसऱ्या प्रकाशकाला दिलं म्हणून मी फेसबुकवर तक्रार मांडली. तेव्हा त्यांनी माझ्या तक्रारीला अनुमोदन दिलं. त्यातून मला धीर आला. मी त्यांना मैत्रीसाठी विनंती पाठवली आणि त्यांनी ती स्वीकारली. 

त्या फेसबुकवर साहित्यविषयक किंवा अन्य गंभीर लेखन करीत, त्यावर मी प्रतिक्रिया देत नसे. प्रतिवाद करताना समोरच्याकडून लहानशी चूक - अगदी व्याकरणाची चूक - जरी झाली तरी त्या लगेच चिडत. एरवी गमतीगमतीत जेव्हा काही लिहीत तेव्हा मात्र त्यावर माझ्यासारखी साधीसुधी माणसं मोकळेपणानं व्यक्त होत. थट्टामस्करी करीत. एकदा त्यांनी लहानपणीचा एक ग्रुप फोटो टाकला होता. त्यातला त्यांचा चेहरा मी चटकन ओळखला होता. गमतीनं म्हटलं होतं, ‘ही खालच्या रांगेतली अमुक क्रमांकाची मुलगी सर्वांत सुंदर दिसते. तीच तुम्ही असणार.’ 

‘सुंदर?’ 
‘हो सुंदर. आम्ही काय रविवर्मा शाळेचे विद्यार्थी. आम्हाला दिसली सुंदर. पिकासो वगैरेच्या शाळेतल्यांना कशी दिसत असेल ते त्यांना विचारा.’ 

या उत्तरावर त्यांनी एक दिलखुलास स्माईली दिली होती. 
* * * 
त्यांची एक छोटी कविता वाचल्यावर इनबॉक्‍समध्ये केलेला संवाद - 
‘ग्रेसपेक्षा थेट अंगावर येणारे आणि खरे वाटणारे तुकडे आहेत.’ 
‘हं... ग्रेस शैलीआहारी गेला जास्त. मग शैलीच सर्व काही होऊन बसली. त्यामुळं वेदना जाणवते, पण दागिन्यांनी ओळखू येत नाही.’ 
‘हो. नंतर नंतर त्याच्या यमकांचीदेखील सवय होते. विवेक दहिफळे यांच्या वॉलवर एकदा लोकांनी ग्रेसच्या हुबेहूब निर्जीव नकला करून दाखवल्या होत्या. ते असो. पण एकदा तुमचे हे सगळे तुकडे एकत्र सेव्ह करून माझ्या मतानुसार क्रम लावून प्रिंट औट घेणार आहे. वीज नसताना पुस्तकासारखे वाचायला.’ 
‘असो.’ 
* * * 
माझ्या पत्नीवर २०१४ मध्ये एक जीवघेणे संकट आलेले. जिवावरचे आणि किचकट ऑपरेशन होते. आदल्या रात्री डॉक्‍टरांनी विविध निवेदनांवर माझ्या सह्या घेतल्या होत्या. तेव्हा परिचित डॉक्‍टर मित्रांखेरीज कविता महाजनांनीदेखील मला फोनवरून धीर दिला होता. त्याच वर्षी त्यांनी फेसबुकवर ‘तुझ्यासाठी अजून एक..’ कविता लिहिली. ती आवडली म्हणून त्यांच्या हस्ताक्षरात मागितली आणि त्यांनी ती दिली. त्या वेळचा संवाद - 
‘आत्ताच कविता मिळाली. फोन, एसेमेस आणि फेबुमेसेजची सवय झालेल्या दिवसांत किती तरी दिवसांनी हस्ताक्षरातला जिवंत मजकूर... त्यामुळं जास्त आनंद झाला. खूप खूप आभार.’ - विजय तरवडे. 
‘मजा असते हस्ताक्षराची... आणि पत्राचीही. मला तर खूप मोठाली पत्रं लिहायला आवडतात अजूनही. मस्त कोरून अक्षर काढायचं आणि लिहायचं निवांत.’ - कविता महाजन. 
ज्युनियर ब्रह्मे नावाचे एक खोडसाळ आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व घेऊन मी त्यांना भेटायला जायचं ठरवलं होतं.  
‘बाकी ठीक. ज्यु. ब्रह्मे आणि मी तुमच्याकडं येणार होतो. पण या महिन्यात अशी अडचण आहे. ‘ज्यु.ब्र.’ना रविवारीच सुटी असते. त्यामुळं बहुतेक २०१५ मध्येच जमेल. पण एकदा तुमच्याकडे येण्याची आणि प्रत्यक्ष गप्पा मारायची खूप इच्छा आहे. केव्हा योग येतो पाहू..’ 
‘जरूर. मीही आता काही दिवस हैदराबादला जातेय माझ्या काकांकडं. २४ ते ३० इथं नाहीचये. त्यामुळे आता नव्या वर्षातच भेट!’  
* * * 
असा फेसबुकच्या भिंतीवर नाही, पण मेसेज, एसएमएसमधूनच फक्त घरगुती संवाद चालत राहिला. मे २०१६ मध्ये केव्हातरी त्यांनी घरातल्या जागेअभावी घरातली हस्तलिखितं निकालात काढायचा विचार जाहीर केला. तेव्हा त्यातली एक वही मी भेट म्हणून मागितली आणि नंतरच्या पुणे भेटीत त्यांनी ती दिली. १९८४ ते १९९९ या काळात लिहिलेल्या कविता या वहीमध्ये आहेत. त्याच सुमारास त्यांचं ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ हे दीर्घकाव्य प्रकाशित झालं होतं. त्याबद्दल बोलताना मी माझी भाबडी प्रतिक्रिया दिली, ‘कविता खूपच चांगली असली तरी पुस्तकातली चित्रं कविता आणि वाचक यांच्यामध्ये येतात. खटकतात.’ 
‘ती चित्रं अतिशय दर्जेदार आणि पूरक आहेत.’ 
‘तरी पण. हे माझं माझ्यापुरतं मत झालं. कविता आणि वाचक यांच्यामध्ये कोणीच नको. आता तुम्ही दिलेल्या वहीत कसं - थेट तुमचं अक्षर आणि मी आहे.’ 
‘समुद्रचं हस्तलिखित नाहीये माझ्याकडं,’ त्या हसत म्हणाल्या. 
* * * 
या वर्षाच्या सुरुवातीला माझी मुलगी आजारी होती. आम्ही कुटुंबीय घाबरलेले होतो. एका सकाळी त्यांना फोन केला. सांगायला सुरुवात केली आणि मला शब्दच फुटेनात. कशीबशी त्यांना मी सगळी हकिगत सांगितली. 
‘नक्की बरी होईल. रडू नका. मेडिकल सायन्स अतिशय प्रगत झालेलं आहे. काळजी करू नका. कोणतीही अडचण आली, मदतीची गरज पडली तर मला तुमची धाकटी बहीण समजून मला हाक मारा. मी नक्की धावत येईन.’ 
* * * 
कलाकार आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी कलाकार नसतो. मधल्या विसाव्याच्या वेळी तो साधासुधा हाडामांसांचा माणूसदेखील असतो. त्यांच्यातल्या त्या साध्या माणसाची मैत्री मला लाभली होती. आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या व्यक्तीचा आधार वाटणं हे किती अद्‌भुत; पण ते घडलं खरं. 
एका बालकथेतला प्रसंग आठवतो. बिरबल लहान असताना रस्त्यावर उभा राहून बहुरुप्याचा खेळ पाहात होता. खेळ आवडला. पण बक्षीस देण्यासाठी बिरबलाकडं पैसे नव्हते. तेव्हा त्यानं डोक्‍यावरची फाटकी टोपी बहुरुप्याला दिली. 
त्यांच्याकडून मी घेतलं खूप. बदल्यात त्यांना माझ्या डोक्‍यावरची फाटकी टोपी देऊ केली. तर त्या म्हणाल्या, ‘तूर्तास नको. गरज लागली तर नक्की मागून घेईन.’ पण त्यांना काही देण्याचं भाग्य मला लाभलं नाही. 
काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीची ट्रीटमेंट संपली. मुलगी बरी झाली. त्या पुण्यात राहायला आल्या. माझ्या मुलाचं लग्न ठरलं. पण त्या वेळी त्यांची मुलगी आजारी होती. त्यामुळं येऊ शकल्या नाहीत. लग्नाची गडबड ओसरल्यावर पुन्हा फोन केला. आजारातून उठलेला त्यांचा आवाज ऐकवत नव्हता. आठ-दहा दिवसांनी आपण भेटू असा त्यांनी वायदा केला. पण तो खरा झाला नाही. 
न हाथ थाम सके, न पकड सके दामन। 
बडे करीब से उठकर चला गया कोई।। 
अलविदा, माझ्या धाकट्या बहिणी - कविता महाजन. 
 

संबंधित बातम्या