सौरऊर्जेवर आधारित शेती

अभिजित कबुले
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कव्हर स्टोरी
 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सुपीक जमीन, नद्या आणि वर्षभर मुबलक प्रमाणात असलेला सूर्यप्रकाश यांची बाह्य जगाशी तुलना करता ही आपली शक्तीस्थाने म्हणावी लागतील. सूर्यदेवतेने खासकरून भारतावर विशेष कृपा ठेवली आहे. वर्षातले पावसाचे साधारण २-३ महिने सोडले, तर उर्वरित ८-९ महिन्यांत आपल्याकडे सूर्याचा प्रखर प्रकाश आणि उष्णता दोन्ही उपलब्ध असतात. त्यामुळेच देशभराच्या विविध भागात कृषी संस्कृती रुजली आणि बहरत गेली. इथली शेती आणि इथली जीवनशैली एकमेकांत गुंफलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत यात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, उपलब्ध शेतजमिनीचे उत्तरोत्तर कमी होत जाणारे प्रमाण आणि एकंदरच 'शेती' या विषयाबाबत समाजात वाढलेली उदासीनता. यामुळे आता पूर्वी 'उत्तम' असणारी शेती आता नकोशी होऊ लागली आहे. 

निसर्गाचा लहरीपणा, शेतीची सातत्याने घटत जाणारी उत्पादकता, रासायनिक खते, बि-बियाणे यांचा वाढता वापर आणि इतके करूनही उत्पादनाला बाजारात योग्य किंमत मिळेल, की नाही याबाबतची अनिश्‍चितता. यामुळे शेती आता कठीण वाटू लागली आहे. बदलती समीकरणे लक्षात घेऊन आता गृहशेती, कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंग, शेतीबरोबरच शेतीपूरक उद्योगव्यवसाय अशा विविध प्रयोगांतून शेतकऱ्याला भरवशाचे उत्पन्न मिळवून देणारी काही व्यवस्था निर्माण होईल का याची चाचपणी अनेक ठिकाणी सुरू आहे. शेतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्या प्रत्येक घटकाकडे एकांगीपणे पाहून जमणार नाही, तर एकात्मिक पद्धतीने याचा विचार होणे ही काळाची गरज आहे. 

पाण्याची म्हणजेच सिंचनाची उपलब्धता हा खरे तर शेतीचा प्राण. पाणी असेल, तर शेती पिकेल. पाण्यासाठी सध्या विहीर, कूपनलिका, पाझर तलाव, शेततळी, कॅनॉल अशा विविध पर्यायांचा वापर दिसतो. या सर्वच ठिकाणी जमिनीत किंवा साठवणुकीच्या ठिकाणाहून प्रत्यक्ष पिकापर्यंत पाणी पोचवण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असतेच. सध्या बहुतांश ठिकाणी ही पारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून पुरवली जात असली, तरी तिच्या मर्यादा आपण सर्वजण जाणतोच. शेती संदर्भात ऊर्जेची गरज आपण जर सौरऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो, तर गणिते नक्कीच बदलतील. 

ऊर्जा निर्माण करता येत नाही, तशी ती नष्टही करता येत नाही. तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. हा सिद्धांत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. शेती व्यवस्थेमध्ये ऊर्जा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खासकरून शेतीची सिंचन व्यवस्था ही सध्या पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे आणि विजेचा बेभरवशी पुरवठा तसेच वीजबिलाच्या जोखडातून मुक्ततेसाठी खरे तर सौरऊर्जेसारखा उत्तम पर्याय नाही. 

सध्या शासनाकडून ३ एच.पी., ५ एच. पी.च्या पंपासाठी सोलर पॅनल यंत्रणेसंदर्भातील योजना सुरू आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्या सिंचन व्यवस्थेबाबत येणारे स्वावलंबित्व अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपल्याकडे विदर्भ, मराठवाड्यासारखा विस्तृत प्रदेश आहे, की जिथे जमीन आहे. काळीभोर, शेताचे लांबच लांब पट्टे आणि उपजाऊ जमीन. मात्र, एवढे असूनही पावसाची या भागाकडे असणारी वक्रदृष्टी इथली शेती फायद्याची ठरायला अजूनही अडसर ठरते. मग तोडगा काढावा कसा? 

इथे जमिनीला तोटा नाही. बहुतांश सपाट भूभाग. मग अशा ठिकाणी सोलर पॅनल बसवून त्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती झाल्यास एकंदरच त्या जागेची उत्पादकता वाढल्याशिवाय राहणार नाही. आजही शेतकऱ्यांचे सातबारा चाळले, तर त्यात लागवडीखालील जमीन आणि 'पोटखराबा' असे प्रकार/विभागणी केलेली दिसते. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे 'पोटखराबा' क्षेत्र त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार कमीअधिक असू शकते. मात्र, ते नेहमीच असते. शेतकऱ्यांच्या उपलब्ध जमिनीत काही ठिकाणी खडक, बांध, उतरणीची जागा, मूरमाड, रेताड, दलदलीची जमीन अशा अनेक जागा आहेत, ज्या शेतकऱ्याला उत्पादन देत नाहीत, देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांची घरे, त्याचे छप्पर, पोल्ट्री, गोठा, पॉलिहाऊस इत्यादीसारख्या शेती संबंधी आस्थापनांचा, त्यांच्या छपरांचा वापर जर सोलर पॅनेल उभारणीसाठी करता आला, तर त्या त्या ठिकाणी लागणारी ऊर्जेची गरज परस्पर भागवली जाईल. अतिरिक्त ऊर्जा नजीकच्या परिसरात मागणीनुसार वितरितही करता येईल. पारंपरिक वीज वितरणात होणारा विजेचा अपव्यय या पद्धतीच्या डिसेंट्रलाइज्ड सोलर सिस्टीममुळे निश्चितच वाचेल. 

अर्थात प्रारंभिक भांडवलाची आवश्‍यकता अशा प्रकारच्या सौर-संरचनांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. शासकीय व्यवस्था, कॉरर्पोरेट्‌स, CSR प्रकल्प अशा माध्यमातून अशा प्रकारच्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जावे, ही खरी काळाची गरज आहे. ऊर्जा स्वयंपूर्णतेबरोबर अतिरिक्त ऊर्जा निर्माण करून ती विकून शेतकऱ्याच्या आर्थिक उत्कर्षासाठी सौर ऊर्जा नक्कीच फायदेशीर ठरेल असे वाटते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्या दृष्टीने अनुत्पादक क्षेत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या ऊर्जेची संपूर्ण गरज भागून, जर तो अतिरिक्त ऊर्जेचा साठा/ऊर्जा विकू शकला, तर निश्‍चितच ती एक मोठी दिलासादायक बाब ठरेल. 

आव्हाने  
सोलर यंत्रणा उभारणीसाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल मोठे असते. सर्वसामान्य शेतकरी हा नेहमीच भांडवलाच्या आघाडीवर चाचपडताना दिसतो. त्या अनुषंगाने सरकार, खासगी कंपन्या, संस्था यांच्या माध्यमातून सदर गुंतवणूक केली गेली, तर बहुवर्षायू करारांच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नातील काही भाग शेतकरी दीर्घ मुदतीत टप्प्याटप्प्याने परत करू शकतील आणि त्याचबरोबर भविष्यात सातत्याने वाढत जाणारी विजेची गरज भागवण्यासाठी एक शाश्‍वत, भरवशाचा पर्याय संबंधित सरकारी/खासगी संस्थेला उपलब्ध होईल. थोडक्‍यात शेतकऱ्याला त्याची जमीन, देखभाल, सुरक्षा या बदल्यात अशा प्रकारचे सौरसंच उपलब्ध करून दिले जावेत. जेणेकरून भागीदारी पद्धतीत गुंवतणूकदार व शेतकरी या दोन्ही घटकांना संबंधित यंत्रणेचा लाभ घेता येईल. 

भविष्यात औष्णिक असो वा जलविद्युत या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा आपणास तिच्या दर्शनी मूल्याबरोबरच पर्यावरणीय मूल्याच्या अनुषंगाने कदापि परवडणारी नाही. त्यामुळे तुलनेने स्वच्छ, कमी देखभाल लागणारी सौरऊर्जा आश्‍वासक वाटते. आपला शेतकरी आजही शेतीसाठी मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगाम सोडला, तर बहुतेकदा सिंचनाच्या सोयी अभावी त्याच्या जमिनीत पीक उभे नसते. अशा वेळी शेतकऱ्याची जमीन, त्याची क्रयशक्ती आणि एकंदरच देशाची उत्पादनक्षमता पूर्ण अर्थाने वापरली जात नाही. सूर्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने केल्यास उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतात. 

सोलर ड्रायर तंत्रज्ञान वापरून बऱ्याच पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांना सुकवून त्यांचे मूल्यवर्धन करणे शक्‍य आहे. बऱ्याचदा वर्षात काही वेळा असे होते, की शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळते. मात्र, एकंदरच सगळीकडे साधारण तशीच अनुकूलता असल्यास हे सर्व अतिरिक्त उत्पादन एकाच वेळी बाजारात उपलब्ध झाल्यामुळे बाजारात त्या उत्पादनाचा दर कमालीचा पडतो आणि त्यामुळे नफा तर दूरच, पण शेतकऱ्याला उत्पादन खर्चदेखील मिळू शकत नाही. अशा वेळी सोलर ड्रायरच्या माध्यमातून अत्यंत स्वस्त असलेला शेतमाल सुकवून त्याची 'शेल्फ लाइफ' वाढवता येईल. त्याचबरोबर आपोआपच 'मूल्यवर्धन' साधले जाईल. शेतकऱ्याचे होणारे नुकसान नक्कीच टळू शकेल. छोट्या शेतकऱ्याला परवडू शकतील अशा प्रकारचे सोलर ड्रायर उपलब्ध होऊन त्याचा वापर करून शेतमालावर प्रक्रिया करणारी संयंत्रे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना ते मोठे वरदान ठरू शकेल. 

या व्यतिरिक्त वाहतूक, साठवणूक व इतर अनेक घटकांमुळे शेतमालाचे होणारे नुकसान भारतासारख्या देशाला परवडणार नाही. त्यासाठी जिथे उत्पादन होते, अशा ठिकाणी वैयक्तिक, सहकारी माध्यमातून सोलर ड्रायर सिस्टीमच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधीचा शोध घेणे गरजेचे आहे. 

कोकणातील हापूस आंबा पोळी, फणस पोळी ही सर्वांना सहज माहीत असलेली काही उत्पादने आहेत. याव्यतिरिक्त नजीकच्या काळात सोलर ड्रायर भाजीपाला सर्रास वापरात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

अन्न शिजवण्यासाठी सोलर उष्णतेचा वापर करण्यासंदर्भात सोलर कुकर आपल्याला ठाऊक आहेत. त्याच धर्तीवर गावांना, मोठमोठ्या वाड्यांना इंधन बचतीसाठी सोलर कुकिंग विकसित 
होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माध्यमातून यासारख्या यंत्रणा शेतकऱ्याला बळकटी देण्याचेच काम करणार आहेत. 

शब्दांकन : राहुल जगताप

संबंधित बातम्या