सौरऊर्जा क्षेत्रातील संधी

पवन करपे 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कव्हर स्टोरी
 

“आदिदेव नमस्तुभ्यं 
प्रसीद मम भास्कर। 
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर 
नमोस्तु ते” 
भारतीय संस्कृतीत सूर्यनमस्कार करून सूर्य देवाची उपासना केली जाते. त्याचा उद्देश फक्त शक्ती मिळवणे हा नसतो, तर सूर्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे हा असतो. यावरून आपल्याला एक गोष्ट समजते, की प्राचीन काळीसुद्धा लोकांना सौरऊर्जेचे महत्त्व समजले होते. एका बाजूला औद्योगिक विकास व शहरीकरणामुळे वाढलेली ऊर्जेची मागणी, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, नैसर्गिक आपत्तींमुळे अपारंपरिक ऊर्जेची गरज भासू लागली आहे. अपारंपरिक ऊर्जेमध्ये सर्वांत योग्य आणि उपयोगी पर्याय म्हणजे सौरऊर्जा. 

सौरऊर्जेचा वापर व व्यवहार्यता 
 सौरऊर्जेचा वापर मुख्यतः दोन प्रकारे केला जातो. एक म्हणजे त्यापासून मिळालेल्या उष्णतेचा थेट वापर आणि दुसरे म्हणजे पी. व्ही. पॅनेलचा वापर करून वीजनिर्मिती करणे. ज्यामध्ये त्या उष्णतेचा वापर करून चालणारी उपकरणे म्हणजेच सोलर वॉटर हीटर, सोलर ड्रायर, सोलर हीटर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर इत्यादींचा समावेश आहे; याशिवाय वीजनिर्मिती करून ती छोट्या प्रमाणात बॅटरीमध्येदेखील साठवली जाऊ शकते. अथवा पॉवर ग्रिडला जोडून त्याचा वापर करता येतो. आज जगामध्ये प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. कोणती गोष्ट विकत घ्यायची असल्यास त्यासाठी आपल्याला किंमत मोजावीच लागते. उत्पादन कंपनीमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चा माल आणि तो विकत घ्यावा लागतो. सौरऊर्जा निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सूर्यकिरणे. निसर्गाच्या कृपेने ती आपल्याला पूर्णपणे मोफत मिळतात. सौरऊर्जा निर्मितीसाठी लागणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौर पॅनेल. याच गोष्टीची किंमत सर्वांत जास्त असते. सोलर उपकरणे निर्मितीमध्ये आजही भारत स्वयंपूर्ण नसल्यामुळे बहुतांश उपकरणे ही आयात करावी लागतात. त्यामुळे सोलर पॅनेलच्या किमती जास्त आहेत. उच्चमध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांना सौर उपकरणे वापरणे व्यवहार्य आहे. 

सौरऊर्जा क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यवसाय संधी 
सोलार रूफ टॉपमध्ये व्यवसाय 
 सामान्य व मध्यमवर्गीय लोकांनी सौरऊर्जेचा वापर करावा यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. भारत सरकारचे १०० गिगावॅटचे जे उद्दिष्ट आहे, त्यापैकी ४० गिगावॅट हे रूफ टॉप सोलर पॅनेल बसवून पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करायची व ही वीज नेट मीटरिंगद्वारे ग्रीडला जोडून घरात वापरायची. यातील सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे वीजनिर्मिती आपल्या छतावरती करायची, विजेचा वापरदेखील आपणच करायचा, वापरापेक्षा जास्त झालेली वीजनिर्मिती ही ग्रीडला जोडली असल्यामुळे त्याचे युनिटप्रमाणे पैसे आपल्याला मिळणार. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे यासाठी सरकार आपल्याला ३० टक्के सबसिडी देते. या अशा धोरणामुळे सोलर पॅनेल बसवण्यासाठी खूप मोठी चालना मिळत आहे. मोठी घरे, बँका, कॉलेजेस, हाउसिंग सोसायटी, हॉस्टेल, हॉटेल इत्यादी ठिकाणी छतावरती मुबलक जागा असते. त्यामुळे हेच आपले ग्राहक होऊ शकतात. सोलर यंत्रणा बसवण्यासाठी गुंतवणूक 
मोठी करावी लागते, पण ही गुंतवणूक कायमस्वरूपी असते. इथे सर्वांत मोठा प्रश्न असतो तो म्हणजे या व्यवसायाची सुरुवात कशी करायची? 

एजंट, डिलरपासून डिस्ट्रीब्युटरपर्यंत 
 सौरऊर्जा व्यवसायाची सुरुवात मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून आहे. ती म्हणजे आर्थिक क्षमता आणि तांत्रिक ज्ञान. सौरऊर्जा व्यवसायाची सुरुवात एजंट होण्यापासून ते डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युटर घेण्यापर्यंत होऊ शकते. सोलर एजंट होण्यासाठी फक्त आठ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मोठ्या सोलर कंपनीचे उत्पादन विकून कमिशन तत्त्वावर व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. दुसरा टप्पा म्हणजे अशाच कंपन्या आपल्याला फ्रेंचाईजी देतात. त्यामध्ये जर टियर एक सिटीमध्ये व्यवसाय करायचा असेल, तर ३२ हजार, टियर दोनमध्ये २८ हजार, टियर तीनमध्ये २५ हजार व टाऊनमध्ये दोन हजार रुपये गुंतवून सुरुवात करता येते. त्याचबरोबर आपले स्वतःचे २५० वर्गफिटमध्ये कार्यालय उभारावे लागेल. तिसरे म्हणजे सोलर सौरऊर्जा क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांचे बिझनेस असोसिएट होता येते. त्यासाठी फक्त १० ते १५ हजाराची गुंतवणूक करावी लागते. या सर्व प्रकारामध्ये व्यवसायासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण कंपनीतर्फे दिले जाते. चौथी पद्धत डिलरशीप घेण्याची. यामध्ये ५० हजार ते दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक करून डिलरशीप घेता येते. परंतु, त्यासाठी एक निकष आहे तो म्हणजे आपली सेल्स व टेक्निकल टीम असावी लागते. पाचव्या प्रकारामध्ये डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी ५-६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. अशा प्रकारच्या व्यवसाय संधी उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत. त्यांच्या वेबसाइटवर जाऊन त्याची सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकते. प्रत्येक कंपनीचे नियम व अटी वेगळ्या आहेत. त्यानुसार कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची हे आपण ठरवू शकतो. जेवढी मोठी गुंतवणूक तेवढ्या मोठ्या स्तरावर व्यवसाय करण्याची संधी आहे. व्यवसाय करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सशक्त मार्केटिंग. ग्राहकांना जर सौरऊर्जेचे महत्त्व पटवून देता आले, त्याचे फायदे समजावून सांगता आले, तर हा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी ''सोने की चिडिया'' आहे. 
 सोलर यंत्रणा उभी करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती त्याची तांत्रिक बाजू. सोलर पॅनेलचे डिझाईन करणे, त्याचे एस्टिमेशन करणे, त्याचे इंस्टॉलेशन करणे, उपलब्ध जागेनुसार यंत्रणा बसवून घेणे इत्यादींसाठी स्वतःची टेक्निकल टीम असावी लागते. अशी एक टीम तयार करूनसुद्धा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. 

सौरशेती... आधुनिक शेती... 
 उसाची शेती, कापसाची शेती, भाज्यांची शेती, सूर्यफुलाची शेती आपण ऐकली असेल, परंतु सौरऊर्जेची शेती आपण कधी ऐकली आहे का? पण होय सौरऊर्जेची शेती केली जाऊ शकते... आणि त्यासाठी लागते नापीक, ओसाड जमीन. जिथे कशाचीही शेती केली जाऊ शकत नाही, तिथे सौरऊर्जेची शेती करता येते. ऊर्जानिर्मिती करता येते. भारतासाठी ही संकल्पना जरी नवीन असली, तरी पाश्चिमात्य देशांमध्ये या संकल्पनेवर आधारित बरेच यशस्वी प्रयोग केले गेले आहेत. कमी लोकसंख्या व मुबलक प्रमाणात असलेली जमीन या जमेच्या बाजूमुळे अशा प्रकारचे यशस्वी प्रयोग तिथे झाले आहेत. ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारच्या व्यवसायाची खूप गरज आहे. जिथे पाण्याची कमतरता आहे, काही पिकत नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वाने छोट्या क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभे करायला हवेत. सहकारी तत्त्वावर उसाचे कारखाने चालतात, दूध डेअरी चालते, तर मग सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प का नाही उभा राहू शकत. ४-५ एकर जमिनीवर एक मेगावॅट क्षमता असलेला प्रकल्प उभा राहू शकतो. त्यातून निर्मित झालेली वीज सरकारला विकू शकतो अथवा ती खासगी कंपनीला प्रति युनिट दराने विकता येते. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँका कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. एवढ्या सर्व अनुकूल गोष्टी असताना उद्योग सहज उभा राहू शकतो. 

सौर उपकरणे उत्पादनाचा व्यवसाय 
 आज सौरऊर्जेची बरीच सामग्री म्हणजे सोलर पॅनेल, इन्व्हर्टर हे बाहेरून आयात केले जाते. आजही भारत ८९ टक्के सौर उपकरणे बाहेरच्या देशातून आयात करतो. २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार एकाच वर्षात भारताने दोनशे पन्नास अब्ज रुपयांची सौर उपकरणे चीनकडून आयात केली आहेत. जर का हीच उपकरणे भारतात तयार झाली, तर एवढे भारतीय चलन विदेशात जाण्यापासून रोखले जाईल. या देशातील लोकांना रोजगार मिळेल व भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होईल. 

 आज भारतामध्ये उत्पादन करणारे काही उत्पादक आहेत. परंतु, त्यांनी उत्पादित केलेली उपकरणांची किंमत चीनमधून आयात केलेल्या उपकरणांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नवीन उत्पादकांनी कमीतकमी किमतीत दर्जेदार उत्पादन करण्यावर भर दिल्यास भारताची सर्वांत मोठी बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली राहील. सोलर इन्व्हर्टर तयार करण्याच्या कंपनीसाठी १४ लाखांची संपूर्ण गुंतवणूक आहे. जर कालांतराने त्याची मागणी वाढली, तर ५० हजार ते एक लाख रुपयांचा नफा प्रति महिना मिळू शकतो. त्यामुळे कुठून तरी सुरुवात करून एका छोट्या कल्पतरूचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करता येऊ शकते.  

शासकीय उपक्रम व योजना 
 रूफ टॉप सोलार इंस्टॉलेशनमध्ये आपण पाहिले आहे, की कोणत्याही अशा प्रकल्पांमध्ये सरकारतर्फे ३० टक्के सबसिडी मिळते. आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवायचा असेल आणि त्याचा खर्च जाणून घ्यायचा असेल, तर भारत सरकारने नॅशनल सोलर मिशन अंतर्गत लॉंच केलेले 'अरुण' नावाचे ॲप उपयोगी पडेल. या ॲपमध्ये आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागेची माहिती दिली, तर ते ॲप प्रकल्पासाठी येणारा खर्च व त्यातून किती वीजनिर्मिती होऊ शकते याची माहिती आपल्याला देते. तसेच खर्चाचे बजेट त्यामध्ये दिले, तर लागणारी जागा व होणारी वीजनिर्मिती याचीही माहिती मिळते. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये म्हणजे तालुका किंवा जिल्ह्यामध्ये कोणती शासकीय नोंदणीकृत संस्था किंवा कंपनी सोलर पॅनेल इंस्टॉलेशन करून देईल, त्याचीदेखील सविस्तर माहिती यात आपल्याला मिळू शकते. 

 शेतीसाठी लागणारी वीज जर सौरऊर्जेवर तयार केली, तर हादेखील सोलर फार्मिंगचा भाग होईल. महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनीने संयुक्तपणे राबवलेला उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार सौर पंप आणि सोलर पॅनलसाठी ९०-९५ टक्के सबसिडी देते. ३ एचपी व ५ एचपीचे पंप शेतामध्ये बसवण्यास ३-४ लाख रुपये खर्च येतो. परंतु, या योजनेतून १५-२५ हजारांमध्ये एवढ्या मोठ्या क्षमतेचे सोलर पंप बसवता येतात. शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप लाभदायी आहे. 

 भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सूर्य मित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नावाची ९० दिवसांची प्रशिक्षण देणारी योजना राबवली आहे. या प्रशिक्षणासाठी आयटीआय व डिप्लोमा झालेले विद्यार्थी पात्र आहेत. हे प्रशिक्षण निवासी असून पूर्णपणे मोफत आहे. येणाऱ्या काळात सौरऊर्जेचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य असणारे कुशल कामगार निर्माण करण्यासाठीही मोठी योजना आहे. या व्यतिरिक्त मोठ्या प्रकल्पांसाठी असणाऱ्या शासकीय योजनेची माहिती भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या www.mnre.gov.in या वेबसाइटवर मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी हरित ऊर्जेचा वापर ही अपरिहार्यता आहे. भारताने जर आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले, तर जगासमोर आदर्श म्हणून भारताकडे पाहिले जाईल. एका गोष्टीची फक्त जाणीव ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे जरी हे क्षेत्र खूप पैसा मिळवून देत असले, तरी याचा मुख्य हेतू हा स्वच्छ व शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी चालना देणे हा आहे. त्यामुळे या व्यवसायातून निसर्ग संवर्धन व स्वच्छ ऊर्जा वापरण्यासाठी आपल्याकडून खारीचा वाटा उचलला जाणार आहे.  

संबंधित बातम्या