कृष्णसर्पाच्या देशात...

स्वाती भागवत  
सोमवार, 18 मे 2020

विशेष
 

पुणे-बंगळूर-शिवमोगा-अगुंबे असा काहीसा उलटा प्रवास करत आम्ही अगुंबेला पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. कृष्णसर्प म्हणजेच नागराज म्हणजेच किंग कोब्रा (King Kobra)बद्दल अजिबात माहिती नसताना, चालून आलेली व्हॉलेंटिअरिंगची संधी दवडायची नाही, असे आम्ही ठरवले आणि अगुंबेत येऊन धडकलो. बंगळूर-शिवमोगा या बस प्रवासात चालकाने ‘नागमंडल’ चित्रपट लावला हा आणखी एक योगायोग. गिरीश कर्नाड लिखित ही फील्म नागांच्या लोककथेवर आधारित आहे. तिर्थल्ली तालुक्यातील अगुंबे हे गाव दक्षिणेकडील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. आम्ही मार्च महिन्यात आलो असलो, तरी सदाहरित जंगलामुळे उन्हाचा त्रास होणार नव्हता.

एआरआरएस (अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च सेंटर) हे आमचे पुढील १० दिवसांचे निवासाचे ठिकाण असणार होते. एआरआरएसची स्थापना रोम्युलस व्हिटेकर यांनी केली. किंग कोब्रा प्रजातीचा अभ्यास ही त्याच्यामागची प्रेरणा. सर्पतज्ज्ञांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आठ एकर जमिनीवर ही संस्था उभी आहे. 

जेवताना सर्वांशी ओळख करून झाल्यावर, लगेच उद्याच्या कामाचे स्वरूप सांगण्यात आले. जवळच्याच खेडेगावात ‘किंग’ दिसल्याची बातमी होती. उद्या आम्हाला संपूर्ण दिवस त्या ठिकाणावर लक्ष ठेवायचे होते. ते ठिकाण एका खासगी नारळी-पोफळीच्या बागेत होते. हे करताना नोंदीही घ्यायच्या होत्या; किंगच्या हालचालींचे जीपीएस, त्याने काही भक्ष खाल्ले का, तो सूर्यप्रकाशात किती वेळ थांबला (बास्किंग), त्यावेळी तापमान किती होते, इत्यादी व अनेक... ‘गेट रेडी बाय सेव्हन एएम शार्प,’ अशी धमकीवजा सूचना ऐकून आम्ही झोपायला निघालो. उद्याची स्वप्ने आणि कधी एकदा किंग दिसतो या विचारात डोळा उशिराच लागला. सकाळी जाग आली ती मालाबार व्हिसलिंग थ्रश अर्थात पर्वत कस्तुरच्या शीळेने... नंतरचे १० दिवस तोच आम्हाला उठवणार होता. साधारण ५.४५ - ६.०० च्या दरम्यान तो रोज गायचाच. 

सात वाजता तयार होऊन आम्ही एआरआरएसच्या वाहनाने ठरलेल्या ठिकाणी जायला निघालो. येताना बहुधा बसने यायचे होते. ती एक नारळी-पोफळीची बाग होती आणि काल संध्याकाळी याच बागेत एका झाडाखाली दोन ‘किंग्स’ दिसले होते. त्यातला एक टेकडीच्या दिशेने गेला होता आणि दुसरा बिळात असण्याची शक्यता होती. आमचा ग्रुप विभागून मला टेकडीच्या दिशेने धाडण्यात आले, तर प्रसादला बागेतील बिळासमोर! आमच्या बरोबर एक-एक सिनिअर देण्यात आला. लवकरच लक्षात आले, की एका ठिकाणी सावधपणे दोन-चार तास बसून राहणे सोपे नाही. टेकडीवर माकडांचाही उपद्रव होता. सिनिअरने बऱ्याच जागा शोधून पाहिल्या, पण किंग कुठेही दिसला नाही. बास्किंगसाठी आला असेल, तर आतापर्यंत दिसायला हवा होता. दुपारचा एक वाजत आल्यावर जेवणासाठी आम्ही टेकडी उतरून बागेकडे आलो. तिथेही उत्साहवर्धक चित्र नव्हते. जवळच एका घरात जेवायची सोय करण्यात आली होती. जेवण्यासाठी दोन-दोनच्या ग्रुपने गेलो. घराचे नूतनीकरण सुरू होते. घरमालकिणीने तत्परतेने जेवायला वाढले. भात, सांभार आणि बाळकैरीचे लोणचे. घरासमोरच्या आंब्याचेच लोणचे होते ते. त्यांचे आभार मानून परत बागेत आलो आणि सहकाऱ्यांना जेवायला पाठवले.

बागेत काहीही हालचाल नव्हती. बसून आता पेंग यायला लागली. इतक्यात परतलेला अजय म्हणाला, ‘तिकडे एक नाग आहे!’ म्हटले चला, किंग नाही तर साधा कोब्रा.. त्याला पाहून परत ‘बरो’कडे परतलो. तीन वाजत आले होते. चहा मिळाला तर.. या सगळ्यात कधीही मला भाषेची अडचण जाणवली नाही. एका घरात चहाची विनंती केली आणि समोरच्या टेकडीकडे लक्ष गेले. तिथे काही गुहा खुणावत होत्या. मी त्याबद्दल विचारत असतानाच, अचानक ‘हांव-हांव’ असा ओरडा आणि गोंधळ ऐकू आला. हातातल्या गोष्टी तिथेच टाकून, कॅमेरा, मोबाइल्स घेऊन आम्ही पळालो... ‘किंग’ घराच्या कुंपणाजवळ होता! संमोहित होऊन आम्ही त्याच्या मागून जाऊ लागलो.

आम्ही पाहत असलेला किंग आठ फूट लांब नक्कीच होता. सापांना ऐकू येत नाही. उपजत गंधशक्तीवर त्यांची मदार असते. सुरक्षित अंतर ठेवून त्याच्या मागून प्रत्येक ठिकाणी जाणे नक्कीच सोपे नव्हते. ५-१० मिनिटांत शेताच्या बांधावर जात त्याने आपला मोर्चा टेकडीच्या दिशेने वळवला. कधी-कधी तो नजरेआड व्हायचा, तेव्हा वाटायचे आता हा गवसणार नाही. मग आम्ही त्याच्या त्या विशिष्ट नादमय सळसळीचा कानोसा घायचो आणि तो परत दिसायचा. साधारण दोन तास त्याच्यामागे कसे गेले कळले नाही. या सगळ्यात, काही क्षण त्याला खूप जवळून न्याहाळता आले... ते केवळ अविस्मरणीय!

काळोख दाटू लागल्यामुळे त्याचा निरोप घेतला आणि परत त्या घराकडे परतलो. आम्हाला न्यायला जीप आलेली पाहून आश्‍चर्य वाटले! त्याचा उलगडा लगेच झाला. जवळच्या गावातून, किंगच्या सुटकेचा (rescue operation)चा कॉल आला होता आणि तिकडे जाताना आम्हालाही घेऊन जाण्यासाठी ते आले होते. गावातल्या एका घराच्या मोरीमध्ये किंग दडून बसला होता. अगुंबे आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांमध्ये व्हिटेकरबाबांच्या संस्थेचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. घरासमोर बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. त्या सगळ्या जमावाला कन्नडमध्ये सूचना देऊन आमच्या नेत्याने मोरीकडे मोर्चा वळवला आणि पाच मिनिटांच्या आत, सळसळता किंग बाहेर आला. त्याला लीलया हाताळत नेत्याने पिशवीच्या बिळाकडे त्याला ढकलले आणि किंग त्याला बॅरो समजून आत विराजमान झाला. अजिबात वेळ न दवडता पिशवीचे तोंड बांधण्यात आले आणि आम्ही जीपकडे निघालो. आता पुढचे काम होते त्याला जंगलात परत सोडण्याचे. किंग बांधलेली पिशवी माझ्याजवळ ठेवण्यात आली, तेव्हा आपण डिस्कव्हरी चॅनेलच्या रेस्क्यू टीममध्ये कार्यरत आहोत, असाच काहीसा आभास मला झाला! अर्थात किंग असलेली पिशवी जवळ असणे ही जाणीव फारशी आल्हाददायक नव्हती! तो वजनाने फारसा हलकाही नव्हता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर त्याला मुक्त केले आणि आम्ही एआरआरएसला पोचलो.

संबंध दिवसातल्या घडामोडींचा विचार करत डोळा परत उशिरानेच लागला. दुसऱ्या दिवशी आम्हाला किंगचे ट्रॅकिंग कसे करायचे हे समजावणार होते. २००८ मध्ये रोम्युलस व्हिटेकरांनी ‘किंग कोब्रा रेडिओ टेलीमेट्री प्रोजेक्ट’ सुरू केला. यामध्ये एक सूक्ष्म चिप किंगमध्ये घातली गेली आणि त्याला परत जंगलात सोडण्यात आले. आपल्या हातामध्ये अँटेनासारखा रिसिव्हर असतो. चिपच्या जवळपास रिसिव्हर आला, की त्यातून एक विशिष्ट ध्वनी येतो. अशा पद्धतीने तासनतास किंगच्या मागे फिरून माहिती गोळा करायची, असे या प्रोजेक्टचे स्वरूप. बहुधा तीन-चार सापांवर हा प्रयोग केला गेला आणि त्यांना एम १ - एम ४ अशी नावे दिली गेली होती. असा किंग, दिवसरात्र, सर्व ऋतूंमध्ये ट्रॅक करणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही.

खूप महिने ट्रॅक केल्यावर एक किंग नरसिंह पर्वतच्या नक्षलवादी भागात गेल्याने स्वयंसेवकांचा झालेला हिरमुसलेला चेहरा मला आजही आठवतोय. तर, दुसऱ्या दिवशी तयार होऊन आम्ही रेडिओ अँटेना रिसिव्हर घेऊन बाहेर पडलो. काल एका ओढ्याच्या काठाला किंग आढळला होता. आज सकाळची सुरुवात तिथेच होणार होती. साधारण अर्धा तास चालल्यावर आम्ही त्या प्रवाहाजवळ येऊन पोचलो आणि रिसिव्हरमधून बीप-बीप आवाज यायला लागला. याचा अर्थ ‘तो’ जवळच होता. नंतरचे काही तास आम्हाला तिथेच काढायचे होते. जैवविविधतेच्या दृष्टीने अगुंबेचे जंगल खूप श्रीमंत आहे. दुर्मीळ बेडूक, कीटक, पाली यांनीही मला दर्शन दिले.

त्या प्रवाहाजवळ पक्ष्यांच्या शीळा ऐकत, किंगच्या प्रतीक्षेत वेळ कसा गेला कळले नाही. पण त्या दुपारी किंगचे दर्शन झाले नाही. बीप बीप आवाज मात्र येत होता. संध्याकाळी आम्ही एआरआरएसला परतलो. जेवताना इतर स्वयंसेवकांबरोबर दिवसभरातल्या घडामोडींची चर्चा घडली. त्यातला एक चमू, draco वर संशोधन करत होता. draco म्हणजे उडणारे सरडे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या सरड्याबद्दल मी प्रथमच ऐकत होते. आणखी काही चमू मुंग्या, सीता नदीची परिसंस्था यावर संशोधन करत होते. ऐन विशीतली ही पोरे पाहून मला त्यांच्याबद्दल हेवाही वाटला!

त्यातील एक संशोधक मागच्या वर्षीच्या किंगच्या नेस्टचे वर्णन करत होता. होय! कृष्णसर्पाची मादी हा सर्पकुलातील एकमेव प्राणी आहे, जो अंडी घालण्याआधी पालापाचोळ्यांचे घरटे जमिनीवर तयार करतो. अंडी घातल्यावर मादी दोन-तीन महिने घरटे सोडत नाही. मात्र हे सगळे घडते ते एप्रिल-मेमध्ये. आत्ता मार्च असल्यामुळे आम्हाला ती संधी नव्हती.

नंतरचे काही दिवस आम्ही जवळच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या आणि काही दिवस पक्षीनिरीक्षणात घालवले. एक दिवस प्रसादला परत एकदा रेडिओ टेलीमेट्रीच्या प्रोजेक्टमध्ये मदतनीस म्हणून जायला मिळाले, तर मला डेटाबेस एन्ट्रीचे काम! तो चार वाजता आला, तेच प्रचंड उत्साहात. याला काहीतरी अद्‍भुत दिसले आहे हे मी ताडले. त्याला किंगने केलेली शिकार पाहायला मिळाली होती! प्रवाहाजवळील एम १ ने एक साप (rat snake) पकडला होता आणि ती संपूर्ण शिकार याला पाहायला मिळाली होती! अर्थात माझ्यासाठी रेकॉर्डिंग केले होते.. दुधाची तहान ताकावर. असो. वन्यजीव निरीक्षणात असे क्षण दुर्मीळ असतात आणि ते कायम स्मरणात राहतात.

या सगळ्यात आमचा दहा दिवसांचा कालावधी कधी संपला कळलेच नाही. सहकाऱ्यांचा निरोप घेऊन निघत असताना, देवखारीने दर्शन दिले. दिवस, महिने आणि वर्षे लोटली. नंतर एकदा सायलेंट व्हॅलीमध्ये ‘किंग’ने दर्शन दिले होते. परवा अनंत मनोहरांची याच विषयावरील कादंबरी ‘अरण्यकांड’ वाचली. अगुंबे आणि कृष्णासर्प तीव्रतेने आठवले. अद्याप तरी मी तिथे परत गेले नाही, पण अगुंबे आजही मनात ताजे आहे.. सदाहरित जंगलासारखे! 

संबंधित बातम्या