नवे वर्ष, नवे आयाम, नवे परिमाण...

डॉ. विजय पांढरीपांडे
सोमवार, 3 जानेवारी 2022

विशेष

पुढच्या काळात बदलते वारे नीट समजून घेणे गरजेचे आहे. हेच खरे शिक्षण. विद्यापीठात पदवी मिळते. पदवीदान होते! शिक्षण, ज्ञान कितपत मिळते हा वादाचा,चर्चेचा विषय! यापुढे स्वयंअध्ययन, स्वयंशासन, स्वयंपूर्णता यासाठी स्वतःला तयार करावे लागेल.

एकविसाव्या शतकाचे एकविसावे वर्ष संपते आहे. मार्च २०१९ साली सुरू झालेले कोरोना विषाणूचे जागतिक संकट संपलेले नाही. एक संपले की दुसरे अशी संकटाची मालिका सुरूच आहे. कोरोना हा फक्त माणसाच्या वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न राहिलेला नाही. उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात आजारपण आले आहे. इथे तक्रारीला, एकमेकांना दोष देण्यातही अर्थ नाही. प्रश्न आहे पुढे जाण्याचा. आहे त्या परिस्थतीत मार्ग शोधण्याचा. जग थांबलेले नाही. ते थांबणारही नाही. माणसाने यापूर्वीदेखील अनेक संकटांवर मात केली आहे. पूर्वीच्या तुलनेत नवे तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहे, ही केवढी जमेची बाजू! कल्पना करा; इंटरनेट कम्युनिकेशन, वाय फाय, स्मार्ट फोन नसते तर काय झाले असते? ऑनलाइन प्रक्रियेत पूर्णत्व नसेल, पण तरीही या गेल्या दोन वर्षात बरेचसे उद्योग, शिक्षण, दळणवळण, संवाद हे सारे या यंत्रणेच्या बळावरच सुरू आहे. आरोग्य क्षेत्रातही या काळात युद्ध पातळीवर चांगले काम झाले. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्फो-बायो-नॅनो तंत्रज्ञानाचे संलग्नीकरण, संगणकाची वाढती क्षमता असे नवनवे तंत्रज्ञान जोमाने पुढे येते आहे. त्यामुळे जगाचा चेहरामोहराच येत्या दोन तीन दशकात बदलणार आहे. मात्र, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या बाबतीत अंतिम शाश्वत असे काही नसते. कालची थिअरी आज चुकीची ठरते. प्रत्येक नवा दिवस वेगळा असतो. हे सातत्याने होणारे बदल आपण स्वीकारले पाहिजेत, आत्मसात केले पाहिजेत.

शिक्षणाच्या काही संकल्पना आता बदलाव्या लागतील. दहा ते पाच शाळा/ कॉलेज ही परंपरा बदलणार. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यायचे तर वेळेचे बंधन झुगारून सकाळी, रात्रीदेखील वर्ग घ्यावे लागतील. परदेशातील तज्ज्ञदेखील मदत करतील, त्यांच्या वेळा सांभाळल्या तर... मूल्यमापनाच्या नव्या पद्धती शोधाव्या, स्वीकाराव्या लागतील. तीन तासांचा शंभर मार्कांचा पेपर, एका तासाचे पन्नास गुणांचे प्रॅक्टिकल, अमुक गुणांना पासिंग, ग्रेस मार्कांचे अनुदान या साचेबद्ध चौकटीतून बाहेर यावे लागेल. मुख्य म्हणजे शिकविण्यापेक्षा, ‘शिकणे’ शिकवावे लागेल. स्वयं-अध्ययनासाठी विद्यार्थ्याची मनोवृत्ती घडवावी लागेल. त्यासाठी शिक्षकाची भूमिकाच बदलावी लागेल. पालकांनीदेखील आपली विचारसरणी बदलायला हवी. उद्योगांच्या, करिअरच्या, भविष्याच्या गरजा आता पार बदलल्या आहेत. येत्या दशकात लाइफ लाँग लर्निंग हाच शिक्षणाचा, प्रगतीचा मूलमंत्र ठरणार आहे. वारे आता त्या दिशेने वाहायला लागले आहेत.

हे बदल एकाएकी होणार नाही. पण ते मंद गतीनेही होता कामा नयेत. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे तर रांगूनही चालणार नाही. अक्षरशः धावावे लागेल. एकट्याने नव्हे, सर्वांनी मिळून, हातात हात घालून. आत्मसत्ता जास्त महत्त्वाची. स्वतःचे उन्नयन, स्वतःवर नियंत्रण स्वतःत बदल जास्त महत्त्वाचे. जगातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने बदलली की जग आपोआप बदलेल. ‘आय’मध्ये ‘इलनेस’ -आजारपण, विकृती आहे तर ‘वुई’मध्ये ‘वेलनेस’! आपल्या बरोबरच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त इतरांचा विचार आहे. शेवटी विकास – विकास म्हणजे तरी काय? सर्वांचे सुख, सर्वांचा आनंद.

यापैकी काही गोष्टी व्यक्तीवर अवलंबून असतात तर काही समूहावर अवलंबून असतात. काहींवर आपले नियंत्रण असते, तर काही गोष्टी आपल्या कक्षेबाहेर असतात. हे बदलते वारे नीट समजून घेणे गरजेचे आहे. हेच खरे शिक्षण. विद्यापीठात पदवी मिळते. पदवीदान होते! शिक्षण, ज्ञान कितपत मिळते हा वादाचा, चर्चेचा विषय! यापुढे स्वयंअध्ययन, स्वयंशासन, स्वयंपूर्णता यासाठी स्वतःला तयार करावे लागेल.

काही प्रश्नाचे एकमेव, युनिक उत्तर असते. काही प्रश्नांची अनेक उत्तरे असतात. पण गेल्या दोन वर्षांत आपण सारे आणखी एक गोष्ट नव्याने शिकलो, ती म्हणजे काही प्रश्नांना उत्तरे नसतात! आपल्याला परिस्थिती आहे तशी स्वीकारावी लागते. ही नवी शिकवण आता आपण अंगीकारली पाहिजे.

गेल्या दोन वर्षांचा परिणाम म्हणून, अन् येत्या दशकातील तांत्रिक बदलामुळे आपल्याला शारीरिक आरोग्यापेक्षाही जास्त लक्ष मानसिक आरोग्याकडे द्यावे लागेल. बऱ्याचदा आपले शारीरिक आजार हे खरे मानसिक आजारच असतात. शिक्षणव्यवस्थेतील मरगळ, परिणाम स्वरूप भविष्यातील करिअर विषयीची चिंता, सारखे घरात कोंडून राहिल्यामुळे आलेले नैराश्य, ज्याचे पोटपाणीच घराबाहेर निघण्यावर अवलंबून आहे अशा कामगारांची, कलाकारांची, अत्यावश्यक सेवार्थींची झालेली होरपळ याचा एकत्रित परिणाम आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’ या न्यायाने याचे उत्तर आपल्या जवळच आहे. कौटुंबिक नात्याला नवे आयाम, परिमाण देणे, सोशल डिस्टन्सिंग सांभाळून एकमेकाशी सुसंवाद साधणे, चर्चेतून समस्या जाणून त्यावर मिळून उपाय शोधणे, परस्परांना मदत करणे, एकमेकाची विचारपूस करणे हे सगळे आपल्या संस्कृतीचाच अविभाज्य भाग असलेले संस्कार नव्या रंगरूपात जपावे लागतील. योग, प्राणायाम, आसने, आवडीचे वाचन यांद्वारे आपण आपले मानसिक आरोग्य सांभाळू शकतो. त्यासाठी इतरांनाही मदत करू शकतो. इथे ज्येष्ठांची, शिक्षक/ प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची ठरते. नीट शब्दात सांगितले तर मुले मोठ्यांचे ऐकतात. शिक्षकांवर विश्वास ठेवतात. या बाबतीतले नीतिनियम कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नसतात. मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यांच्या आधारे आपणच आपल्या घरी, कुटुंबात प्रयोग करू शकतो; खचलेल्या मित्रांना, सहकाऱ्यांना मदत करू शकतो. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असू शकते. त्यामुळे एक प्रयोग दुसऱ्यावर यशस्वी ठरेलच असे नाही. चुका करत करतच आपण शिकू शकतो, किंबहुना धडपडत, खरचटत, झगडत, यशाचा टप्पा गाठण्यात जो आनंद असतो, तो अवर्णनीय असतो. आपण आनंदाने ‘युरेका... युरेका...’ असे ओरडू शकतो!

२०२० हे वर्ष माईल स्टोन म्हणून वापरले गेले होते. डॉ कलाम यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तींनी ‘मिशन २०२०’ अंतर्गत नवे संकल्प आखले होते. पण दुर्दैवाने कोरोना विषाणूमुळे सारे ताळतंत्र बिघडले. आता आपण अशा आपदांसाठी तयार राहायला पाहिजे. यापूर्वी  देशा- देशातील युद्ध फक्त सीमेवर, ठरावीक शस्त्रांनीच लढले जात होते. आता यापुढे ही युद्ध तंत्रज्ञानाने लढली जातील. त्यांचे दृश्य परिणाम कदाचित लगेच दिसणारदेखील नाहीत. सायरन वाजणार नाहीत. ‘पूर्व सूचना न देता येणाऱ्या संकटासाठी नेहमी सज्ज राहा’, हा नवा संदेश गेल्या वर्षाच्या अनुभवाने आपल्याला दिला आहे. या एकूणच परिस्थितीकडे संयमाने, शांत चित्ताने, सकारात्मक दृष्टीने बघितले तर यातूनही मार्ग निघू शकतील. नव्हे निघतीलच. आपल्याला जरा हिमतीने घ्यावे लागेल, एव्हढेच. त्यामुळे काळजीचे कारण नाही. आपण या  नव्या वर्षाचे, २०२२चे, आधीच्याच जोमाने स्वागत करूयात!

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

संबंधित बातम्या