मुक्या बहिऱ्या विश्वाचे सुरेल ‘गाणे’

डॉ. केशव साठये
सोमवार, 16 मे 2022

विशेष

‘कोडा’ चित्रपट चर्चेत आला, तो सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर मिळाल्यानंतर. बोलता न येणाऱ्या, ऐकू न येणाऱ्यांच्या भावविश्वातही एक संगीत असते, 'सिंफनी' असते, याचा स्पष्ट ऐकू येणारा अतिशय हृदयस्पर्शी असा झंकार म्हणजे ‘कोडा’...

‘Child of Deaf Adults’ याचे CODA हे संक्षिप्त रूप. या नावाचा हा चित्रपट यंदाच्या (९४व्या) ऑस्कर स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रपट ठरला. शिवाय उत्कृष्ट रूपांतरित पटकथा आणि सहाय्यक अभिनेत्याचे पारितोषिकही लाभलेला ‘कोडा’ एक वेगळ्या विषयाची ओळख करून देणारा म्हणून कायम स्मरणात राहील. चर्चेतील चित्रपटांच्या प्रभावाखाली न येता परीक्षकांनी उत्तम चित्रपटाची मोहोर या चित्रपटावर उठवून एका चांगल्या कथानकाचा सन्मान करत, काही हटके देऊ इच्छिणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकाच्या सर्जनशील परिश्रमाला न्याय दिला आहे. एका फ्रेंच चित्रपटाचा हा रिमेक; कथासूत्र सरळ सध्या सोप्या शैलीत सांगत बाजी मारून गेला. 

ही कथा आहे एका मूकबधिर कुटुंबाची. पती, पत्नी, त्यांचा मोठा मुलगा तिघेही ऐकू, बोलू न शकणारे आहेत (या भूमिका करणारे कलाकारही प्रत्यक्षात तसेच आहेत). धाकटी  मुलगी (रुबी) मात्र सर्वसाधारण आहे. मासेमारी हा त्यांचा व्यवसाय आहे. खोल समुद्रात जाऊन मासे पकडणे आणि ते विकणे, हे करताना व्यापाऱ्यांशी घासाघीस करत, मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या अडचणी, समस्या याविषयी जागरूकता दाखवत आपली जीवन नौका पार करण्यात हे कुटुंब रममाण झालेले आहे. बोलू-ऐकू न शकणाऱ्या मंडळींचे विश्व हे कायम दुर्मुखलेले; निराशेच्या गर्तेत सापडलेले असते, या गृहीतकावर या चित्रपटाने सपशेल काट मारली आहे. अपंगत्वाच्या दुःखाचा, त्याच्या गहिऱ्या रंगाचा स्पर्श कथानकाला होणार नाही याची दक्षता घेत हा चित्रपट आकार घेतो. त्यांच्या जगाची खिडकी आहे, त्यांची बोलू, ऐकू शकणारी मुलगी रुबी. तिचाही दिवसातला बराचसा वेळा दुभाषाचे काम करण्यातच जात असतो. काम करता करता गाणे हा तिचा एक विरंगुळा असतो. पण मूकबधीर आईवडिलांचे आयुष्य सुसह्य करताना तिची रोज तारांबळ उडत असते. भल्या पहाटे उठून समुद्रात जाऊन मासेमारी करून तो माल व्यापाऱ्याकडे पोहोचवून शाळेत जाणारी ही चुणचुणीत मुलगी या चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. 

हे असे छान आयुष्य सुरू असताना शाळेमध्ये या मुलीची स्नेहसंमेलनातील एका कार्यक्रमत समूह गीतासाठी गायिका म्हणून निवड होते. गाण्याचे मास्तर; मुलांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांना तयार करण्यासाठी जिवापाड मेहनत घेणारे; वागायला अतिशय कडक असतात. या मुलीचा गाता गळा गाणे उत्तम पेलू शकतो, हे लक्षात आल्याने तिला प्रोत्साहन देतात. गाणे पोटातून आले पाहिजे ओठातून नाही, हा आयुष्यभर लक्षात ठेवावा असा उपदेश देऊन ते या मुलीच्या भावविश्वात गाणे रुजवतात. आता गरज असते ती सतत सराव करण्याची. सरांनी दिलेली वेळ पाळून गाणे आत्मसात करण्याची. पण घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आता गाणे की कौटुंबिक व्यवसाय, अशा द्विधा मनःस्थितीत रुबी सापडते. 

दरम्यान त्यांनी बसवलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होतो. रुबीचे कौतुक ‘पाहण्यासाठी’ हे कुटुंब कार्यक्रमाला येते. कारण ‘गाण्याचा आनंद’ हा त्यांच्या विश्‍वाचा भागच नाहीये. पण इतर प्रेक्षकांच्या चेहेऱ्यावर फुलणारा आनंद आणि त्यांच्या देहबोलीतून जाणवणारी, गाण्याला मिळणारी, दाद पाहून ही मुलगी गुणी आहे, हे ते मनोमन समजून जातात. आपल्या स्वार्थासाठी मुलीच्या स्वप्नांचा बळी द्यायचा नाही, या निर्णयाला येऊन तिचे आई वडील रुबीला थेट संगीत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी चाचणी परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जातात. तिची ऑडिशन  होते. ती त्यात पास होते आणि एके दिवशी आईबाबांचा आशीर्वाद घेऊन ती शहराकडे प्रस्थान ठेवते  आणि हा चित्रपट संपतो.

 या चित्रपटातील दोन-तीन प्रसंग या कलाकृतीचे वेगळेपण दाखवून देतात. बहुसंख्यात कोणी एखादा वेगळा असला की त्याची होणारी कुचंबणा रुबीच्या भाळीही लिहिलेली आहे. सतत सांकेतिक खुणांच्या राज्यात राहून तिच्या ओठांवरही शब्द मोठ्या कष्टाने येतात. तिला सर्वसाधारण व्यक्तीचे आयुष्य जगण्याची संधी खूप कमी मिळते. त्यातून निर्माण होणारा न्यूनगंड आणि आपल्याकडे असलेल्या कौशल्याची जाणीव होऊनही त्याला व्यासपीठ मिळण्याची धूसर शक्यता, ही तिची घालमेल हा या चित्रपटातला एक अतिशय हळवा कोपरा आहे. सतत दुभाष्याची भूमिका करावी लागलेली ही मुलगी ऑडिशनच्यावेळी बाल्कनीत बसलेल्या आपल्या आई वडिलांना समजावे म्हणून गाताना खुणांची भाषा वापरते आणि तिचे गाणे सर्वांग सुंदर होते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन जगांसाठी जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा ते कमालीचे उदात्त होते याचा हा उत्तम दाखला आहे. एकदा मायलेकी बसलेल्या असताना मुलगी आईला विचारते मला ऐकता येते, बोलता येते हे पाहून तुझी प्रतिक्रिया काय झाली? आपली मुलगी आपल्या सारखी बहिरी-मुकी नाही हे समजल्यावर खरे म्हणजे आईला आनंद व्हायला हवा, पण तसे होत नाही. मानवी मनोव्यापाराचे हे विचित्र वास्तव दाखवून दुःख व्यक्तीसापेक्ष असते हे त्रिकालाबाधित सत्य हा चित्रपट वेगळ्या पद्धतीने इथे अधोरेखित करतो. 

अभिनयाच्या बाबतीत कुणीही यात आपल्याला निराश करत नाही. त्यामुळे सागरतीरावरील ही कहाणी त्याच्या सारखीच खळाळती झाली आहे. आपले निरागस स्वप्न पापण्यांच्या पंखाखाली ठेवून त्यांचा पाठलाग करणारी, आपल्या घरात आपण इतर सदस्यांपेक्षा वेगळे आहोत म्हणून एकटेपणा वाटणारी, पण तरीही आपण कुटुंबाचा आधारस्तंभ आहोत ही जबाबदारीची जाणीव असलेली शहाणी मुलगी आणि गाण्यातील साथीदार मित्राबद्दल वाटणारी प्रेम भावना जपणारी रुबी, एमिलीया जोन्स या अभिनेत्रीने छान रंगवली आहे. तिच्या आईनेही (मार्ली मॅटलिन) आपल्या प्रेमाचे प्रदर्शन न करताही छोट्या छोट्या गोष्टीतून आपले आईपण, आपली वात्सल्य भावना व्यक्त केली आहे. संगीत शिक्षक झालेले युजेनिओ डर्बेझ यांनी गुरू कसा असतो, कसा असावा, तो शिष्यासाठी काय काय करू शकतो हे दाखवत ललित कलांमधील गुरूच्या आगळ्या वेगळ्या स्थानाचा सन्मान केला आहे.    

आपण मुके, बहिरे आहोत याचा कोणताही विषाद, केविलवाणा भाव रुबीचा बाप झालेल्या अभिनेता ट्रॉय कोत्सूर याच्या चेहऱ्यावर एकदाही दिसत नाही. बेदरकार, रांगडा कुटुंब प्रमुख, समुद्राशी सलगी असल्याने त्याच्यासारख्या मोकळ्या ढाकळ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन याच्यातही घडते. मुलगी नवे काही करते आहे याचा आनंद आणि त्याचवेळी आपल्या मासेमारीच्या व्यवसायात तिच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होऊ घातलेली अस्थिरता याची छाया त्यांच्या रापलेल्या जाळीदार चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. बापाचे हृदय कसे असते याचे अपूर्व दर्शन तमाम प्रेक्षकांना देऊन त्यांनी सहाय्यक अभिनेता गटातील ऑस्करची बाहुली सहज खिशात घातली आहे. बोलता न येणाऱ्या, ऐकू न येणाऱ्यांच्या भावविश्वातही एक संगीत असते, सिंफनी असते याचा स्पष्ट ऐकू येणारा अतिशय हृदयस्पर्शी असा झंकार म्हणजे ‘कोडा’ हा चित्रपट आहे.

संबंधित बातम्या