नाच रे मोरा...

शेखर ओढेकर, नाशिक
सोमवार, 4 एप्रिल 2022

विशेष

मोर... अत्यंत सुंदर, देखणा पक्षी. आपणा सर्वांना आकर्षण असते ते मोराच्या पिसाऱ्याचे. पिसारा फुललेला मोर बघणे म्हणजे एक आत्यंतिक आनंदाचा क्षण... आणि जर त्याचे नृत्यच बघायला मिळाले तर? सोन्याहून पिवळे! हा एक प्रकारचा सोहळाच म्हणू या! मी तो प्रत्यक्ष अनुभवला आहे.

मोर या पक्ष्याशी आपली मैत्री तशी लहानपणापासूनच म्हटली पाहिजे. याचे कारणच तसे आहे. तुम्ही आम्ही आपल्या शाळेच्या दिवसांपासून मोराचे पीस आपल्या वह्या-पुस्तकांत सांभाळत आलो आहोत. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचे, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात,’ हे अजरामर गाणे ऐकताना आजही आपण नकळत मान डोलवत असतो, अगदी वय विसरून! मोराचे पीस सगळ्यांनाच लहानपणीपासून भुरळ घालते. असा हा आपला लाडका, आवडता, ओळखीचा, सुंदर पक्षी! तसा खूप ओळखीचा असूनही त्याच्या काही सवयी, लकबी, वैशिष्ट्ये आपल्याला माहीत नसतात. 

मोरांची वस्ती प्रामुख्याने रानमाळ, जंगले, तीही विशेषतः पानझडी वृक्षांची, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी असते. ही मंडळी समूहानेच राहतात. वाघ, बिबट्या, कोल्हे अशा श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी रात्री झाडांवर उंच ठिकाणी जाऊन झोपतात. सकाळीच अन्न शोधार्थ यांची भटकंती सुरू होते आणि त्यांचे केकारवदेखील. धान्याचे दाणे, कंदमुळे, झाडाचे कोवळे कोंब, त्याचबरोबर जमिनीवरील किडे, पाली, सरडे, बेडूक, छोटे साप हे त्यांचे खाद्य. खाद्याबरोबर मोरांना पिण्यासाठी पाणी खूप जास्त प्रमाणात लागते. परंतु, ही मंडळी पाण्यात खेळणारी किंवा अंघोळ करणारी नाहीत. मोर चुकून ओला झाला, तर पंख वाळविण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाऊन शांतपणे उभा राहतो. हा पक्षी जमिनीवरील मातीचा उपयोग स्वतःचे अंग स्वच्छ करण्यासाठी करतो. आपण त्याला मृदा स्नान म्हणू या. शरीरावरील बारीकसारीक जंतू, कीटक, किडे यांपासून संरक्षण करण्यासाठी मोर सतत जमिनीवरील माती वापरून शरीर स्वच्छ ठेवत असतो. 

आपणा सर्वांना आकर्षण असते ते मोराच्या पिसाऱ्याचे. पिसारा फुललेला मोर बघणे म्हणजे एक आत्यंतिक आनंदाचा क्षण... आणि जर त्याचे नृत्यच बघायला मिळाले तर? सोन्याहून पिवळे! हा एक प्रकारचा सोहळाच म्हणू या! मी तो प्रत्यक्ष अनुभवला आहे.

नाशिकला मेरी (महाराष्ट्र इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेचा त्यांच्या मुख्य इमारतीशिवाय तीन-चार एकराचा सुंदर परिसर आहे. त्या ठिकाणी मेरी कार्यालयाचे काही विभाग कार्यान्वित होते, सध्या ते नाहीत. त्यामुळे परिसर एकदम शांत आहे. परिसरात भरपूर झाडेझुडपे आणि मोठमोठे वृक्ष असल्याने या परिसराला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा परिसर मोरांची वसाहत म्हणूनच जास्त ओळखला जातो. आम्ही तेथे फोटोशूटसाठी गेलो होतो, तेव्हा इतर माणसांचीदेखील तिथे गर्दी होती. काही वेळानंतर इतर माणसे निघून गेली आणि फक्त आम्हीच राहिलो. काही वेळ कॅमेऱ्यात मोराच्या बऱ्याच छबी टिपल्या. नंतर आमचे लक्ष अचानकपणे एका लांबलचक निर्मनुष्य, मोकळ्या पायवाटेकडे गेले. त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक राजबिंडा मोर आपला पूर्ण पिसारा फुलवून केकारव करत होता. आम्ही ताबडतोब त्या दिशेने कूच केले. मोराने आता जणू नृत्याला सुरुवात केली होती. पिसारा फुलवून आता तो वेगवेगळ्या अंगांनी, दिशांनी फिरून सौंदर्याचे जणू सादरीकरण करत होता. रस्ता निर्मनुष्य, शांत असल्याने मोर जणू बेहोष होऊन आपल्या सौंदर्याचा आविष्कार पेश करत होता. त्याच्या त्या अदा बघून फॅशन शोची आठवण झाली. रॅम्पवर मॉडेल ज्या पद्धतीने फिरतात, त्याच पद्धतीने मोराच्या हालचाली सुरू होत्या. हे सगळे क्षण डोळ्यांबरोबर कॅमेऱ्यातदेखील साठवले. नृत्य बराच वेळ सुरू होते...

यानिमित्ताने मोराबद्दल आणखी जाणून घेत असताना त्याच्या पिसाऱ्याबद्दल रंजक माहिती मिळाली. मोराच्या पिसाऱ्यावर जे डोळे म्हणजे आय स्पॉट असतात, त्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी लांडोर अशा मोराकडे जास्त आकृष्ट होते. लांडोर पिसाऱ्यावर जास्त डोळे असणे, हे एक मोराच्या सुदृढतेचे लक्षण मानते. दुसरे म्हणजे,पिसारा फुलवल्यावर मोर शरीराचे कमी अधिक कंपन करतो व त्या प्रमाणात पिसारादेखील कंप पावतो. लांडोर लांब असेल तर कंपन मोठ्या प्रमाणावर होते व ते आपल्याला दिसू शकते, पण लांडोर जवळ असेल तर शरीराचा विशिष्ट भाग हलवून कंपन केले जाते, ते आपल्या लक्षात येणार नाही. ही कंपने लांडोरीला वश करण्यासाठी असतात आणि गंमत म्हणजे ही कंपने लांडोरीपर्यंत पोहोचतातदेखील! पिसाऱ्यावर जास्त डोळे असलेल्या मोराशी लांडोरीचे मिलन झाले, तर तिने घातलेली अंडी आकाराने मोठी असतात व पिल्लांची वाढही जास्त चांगली, लवकर होते, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलेले आहे. विणीच्या पूर्ण हंगामात मोराचे पाच ते सहा लांडोरींबरोबर मिलन होते. विणीचा हंगाम संपल्यानंतर मोराचा पिसारा झडून जातो आणि पुढच्या विणीच्या हंगामापर्यंत नवीन पिसारा आलेला असतो. मोराची अशी झडलेली पिसे जंगलात बऱ्याच प्रमाणात सापडतात. 

मोराच्या पिसाऱ्याचा मोराला स्वसंरक्षणासाठीदेखील उपयोग होतो. मोरावर कधी हल्ला झाला, तर तो इतर श्वापदांना पिसारा मोठा करून आपण आहोत त्यापेक्षा मोठ्या आकाराचे आहोत हे भासवतो, जेणेकरून ते श्वापद घाबरून पळून जावे. मोराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे डोळे आणि कान अतिशय तीक्ष्ण असतात. धोक्याची चाहूल लागताच मोर आपल्या इतर बांधवांनादेखील विशिष्ट पद्धतीने आवाज करून सावध करतो व क्षणार्धात त्यांचा थवा झाडाझुडुपांमध्ये नाहीसा होतो. त्यावेळची त्यांची चपळता थक्क करणारी असते.

संबंधित बातम्या