असेही रियालिटी शो

अदिती पटवर्धन
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

विशेष

भारतामध्ये रियालिटी शोज्‌ची कमतरता नाही. गाणी, नृत्य, विनोद, पाककला, प्रेम या व इतर काही विषयांवरील रियालिटी शो तयार होत आहेत. पण भारतात हा प्रकार एव्हाना चांगलाच रुजला असला तरी आशयाच्या बाबतीत अजून हा जॉनर बराच अप्रगल्भ आहे, असंच म्हणावं लागेल. 

एका मोठ्या शेडमध्ये गरम तापलेल्या भट्ट्या धगधगतायत. घामानी अंग न्हाऊन निघेल इतकी उष्णता आहे. पण या ‘हॉट शॉप’मध्ये असलेल्या कलाकारांना मात्र त्या उष्णतेची अजिबात तमा नाही. त्यांना त्या शेडचा एक रिकामा कोपरा खुणावतोय. त्यांना दिलेलं ‘टास्क’, म्हणजे त्या दिवशीच्या संकल्पनेवर आधारित असलेली काचेची कलाकृती त्यांनी पूर्ण केली, की त्यांची कलाकृती याच रिकाम्या कोपऱ्‍यात सजणार आहे आणि तिचं परीक्षण केलं जाणार आहे.

हे सगळे काचकारागीर सज्ज होतात आणि भराभर त्यांच्या कामाला लागतात. काचेची कलाकृती तयार करणं हे काही सोप्पं काम नव्हे. कलाकृतीचं संरेखन, त्यासाठी आवश्यक आणि योग्य रंगाचे सिलिकाचे तुकडे निवडणं, ते भट्टीमध्ये तापवून त्याला हवा तसा आकार देणं, यासाठी काचकामातली वेगवेगळी तंत्रं, कौशल्यं वापरणं, कलाकृतीमधले वेगवेगळे आकार तयार झाल्यावर ते एकमेकांना जोडणं आणि शेवटी पूर्ण झालेली कलाकृती ‘अनीलर’ नावाच्या शेवटच्या भट्टीमध्ये हळूहळू थंड होऊन सेट होण्यासाठी ठेवणं... आणि शिवाय हे काम काही साच्यातून काचेच्या वस्तू काढण्यासारखं नाही, त्यांनी साकारायचं आहे एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित एक अद्वितीय काचशिल्प.. आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे हे शिल्प दिलेल्या वेळात पूर्ण करणं!

नेटफिक्सवर उपलब्ध असलेल्या ‘ब्लोन अवे’ या मूळच्या कॅनेडियन रियालिटी शोमध्ये केवळ नेत्रसुख आहे! लालपिवळ्या ज्वाळांमध्ये हळूहळू मऊसूत होत जाणारे काचांचे तुकडे... त्या तापलेल्या काचेला हळुवार हातानं आकार देणारे कलाकार... तापून लालेलाल झालेल्या काचेला आकार देत देत तयार झालेली कलाकृती आणि ती तापलेली काच थंड झाल्यावर समोर येणारे तिचे खरे आकर्षक आणि देखणे रंग... सगळंच इतकं देखणं आहे! या कलाकारांची प्रतिभा आणि कौशल्यं बघून आपण थक्क होऊन जातो.. आणि कोण म्हणेल या नाजूक कामाच्या स्पर्धेत थरारक क्षण नसतात? वेळ संपायला अर्धा तास असताना काचेची तयार केलेली सुंदर कलाकृती हातातून निसटते आणि आपल्याही काळजाचा ठोका चुकतो!

अन्नू कपूरनं निवेदन केलेला ‘अंताक्षरी’ हा शो पहिल्यांदा १९९३मध्ये दूरदर्शनवर सुरू झाला आणि आपल्याला पहिल्यांदाच ‘रियालिटी शो’ या कार्यक्रमप्रकाराची अर्थात ‘जॉनर’ची ओळख झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत या प्रकारातले असंख्य शो आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवर पाहिले आहेत. कधी हा रियालिटी शो नृत्याचा असतो, तर कधी तो ‘कौन बनेगा करोडपती’सारखा प्रश्नोत्तरांचा असतो, कधी गाण्याचा, विनोदाचा वा पाककौशल्याचा कार्यक्रम असतो, वा कधी अगदी ‘बिग बॉस’सारखा तद्दन बिनडोक कॅटॅगरीतला पण लोकप्रिय शोसुद्धा असतो! रियालिटी शो म्हटलं की टीआरपी हमखास, असं सध्या एक समीकरणच होऊन गेलंय.

भारतात हा प्रकार एव्हाना चांगलाच रुजला असला तरी आशयाच्या बाबतीत अजून हा जॉनर बराच अप्रगल्भ आहे, असंच म्हणावं लागेल. फक्त नेटफ्लिक्स या एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध देशांमधल्या रियालिटी शोवर एक नजर फिरवली, तरी या गोष्टीची खात्री पटते! या माध्यमप्रकाराची खरी ताकद लक्षात घेऊन जगभरात यात विविध प्रयोग केले जातात आणि ते यशस्वीही होतात! वर उल्लेख केलेला ‘ब्लोन अवे’ किंवा सुरुवातीच्या एका लेखात ज्याबद्दल मी लिहिलं होतं, तो ‘लव्ह ऑन द स्पेक्ट्रम’ हा शो, ही अशा वेगळ्या प्रकारच्या रियालिटी शोंची प्रातिनिधिक उदाहरणं म्हणता येतील.
असाच आणखी एक आगळा वेगळा रियालिटी शो म्हणजे ‘शेफ्स टेबल’. मूळची अमेरिकी निर्मिती असलेल्या या शोमध्ये आपण थेट जगभरातल्या वेगवेगळ्या नामांकित शेफ्सच्या स्वयंपाकघरात पोहोचतो आणि त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या देशातले काही पारंपरिक, आणि काही अनवट असे पदार्थ तयार करताना त्यांना बघतानाच एकीकडे त्यांच्याशी गप्पा मारत हा प्रवास पुढे जातो.

 या शोचा सर्वात विलक्षण एपिसोड कोणता असेल, तर तो आहे ज्वांग क्वान या कोरियन भिक्षूविषयीचा... ज्वांग क्वान ही काही कोणत्या पंचतारांकित हॉटेलमधली शेफ नाही, तिनं या क्षेत्रातलं कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही. ती फक्त दक्षिण कोरियामधल्या तिच्या मठातल्या भिक्षूंसाठी आणि तिथं आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण तयार करते. एरिक रिपर्ट नावाच्या एका अमेरिकी शेफनं कोरियाची सफर करताना तिच्या हातचं जेवण चाखलं आणि तो तिच्या जेवणाचा चाहता झाला. ज्वांग क्वानचं जेवण हे थेट अध्यात्माशी नातं जोडणारं आहे. तिच्या बागेत ती सगळ्या भाज्या, फळं पिकवते, पण त्यात मालकी हक्काची भावना नाही. कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर ती करत नाही, कारण हे अन्न सगळ्यांचं आहे.

‘जगात इतरत्र सगळीकडे अन्नाकडे ऊर्जा निर्माण करणारं साधन म्हणून पाहिलं जातं, पण मठात तयार होणारं अन्न मात्र मनाला शांतता आणि स्थैर्य देतं. हे जेवण थेट निसर्गातून येतं आणि त्यामुळंच ते इथल्या भिक्षूंना निसर्गाच्या आणखी जवळ नेतं,’ ज्वांग क्वान सांगते. तिची साधी राहणी, अतिशय नेटक्या पद्धतीनं स्वयंपाक करायची पद्धत, एकतान होऊन बागेतून भाज्या खुडून आणणं, आणि तिचं अन्नाविषयीचं विलक्षण तत्त्वज्ञान... सगळंच आपल्याला अचंबित करणारं आहे! 

याशिवायही अनेक वेगळ्या विषयांवर आधारित असलेले, वेगवेगळे फॉरमॅट वापरणारे शो आहेत. पुष्परचना, स्थापत्यशास्त्र, मेकअप, गृह सजावट अशा अनेक क्षेत्रातील रियालिटी शो तर आहेतच, पण त्याशिवाय अगदी घर कसं आवरायचं, याविषयीचा मारी कोंडो हिचा ‘टायडींग अप’ हा शोसुद्धा मधल्या काळात लोकांच्या पसंतीस उतरलाय!

प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि सुदैवानं आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी जुळणारे चांगला आशय असलेले पर्याय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहज मिळून जातात. त्यामुळे ‘इंडियन मॅचमेकिंग’ किंवा ‘फॅब्युलस लाइव्हज् ऑफ बॉलिवूड वाईव्हज्’सारख्या ‘ट्रेंडिंग’ शोच्या पलीकडे जाऊनसुद्धा अनेक शो आहेत आणि तेही आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध आहेत, हे एकदा माहीत झालं की चांगल्या कार्यक्रमांचा एक मोठा खजिनाच आपल्यासमोर खुला होतो!

 

संबंधित बातम्या