गरज ही शोधाची जननी असते! 

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 11 जानेवारी 2021

‘संपत्ती’ या सर्वपरिचित घटकाला धरूनच एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या राष्ट्राची आर्थिक स्थिती ठरते. ज्याच्याकडे संपत्ती जास्त तो श्रीमंत आणि ज्याच्याकडे संपत्ती कमी तो गरीब, हे विभाजनही जगन्मान्य आहे. ‘संपत्ती’ या घटकाचेही दोन प्रकार पडतात एक‘दिसणारी’ संपत्ती आणि दुसरी ‘न दिसणारी’ संपत्ती. ‘दिसणारी’ संपत्ती म्हणजे सर्वसाधारण भाषेत स्थावर किंवा जंगम मालमत्ता. परंतु ‘न दिसणारी’ संपत्ती, म्हणजे बौद्धिक संपदा, आपल्याला माहीत असून नसल्यासारखीच असते आणि वास्तवात व्यक्तीच्या आणि देशाच्या एकंदरीत प्रगतीतच मोलाचे कार्य करीत असते. बौद्धिक संपदेच्या माध्यमातून विश्वनिर्मिती करण्यात ज्या सर्वसामान्य व्यक्तींना यश मिळाले त्या यशकथांची ही मालिका..

‘गरज ही शोधाची जननी असते!’ खरोखरच या उक्तीप्रमाणे गरजेतूनच अनेक शोध लागत गेले आहेत. आणि अशा शोधांमधून बऱ्याच वेळेला एक वेगळेच विश्व सामोर आले आहे. पुण्यामध्ये अगदी अलीकडे, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, शुभांगी पाटील यांना त्यांच्या एका शोधासाठी पेटंट मिळाले आणि त्या ‘पेटंट’ने लॉकडाउनच्या काळात स्वतःचा व्यवसाय गमावलेल्या दुसऱ्या एका महिलेला एका नव्या मोठ्या व्यवसायासाठी संधी मिळवून दिली. त्या पेटंटची कथा नुसतीच रंजक नाही तर खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे! 

शुभांगी पाटील ह्या एक पुणेस्थित गृहिणी. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा अपघात झाला होता. उपचारांचा भाग म्हणून त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना काही थोडा मांसाहार घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु ते पूर्ण शाकाहारी असल्याकारणाने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला स्वीकारण्यास नकार दिला. मग सुरू झाला एक शोध. पतीला बरे करण्यासाठी मांसाहारातील जे घटक आवश्यक आहेत ते कोणत्या शाकाहारी पदार्थांमधून मिळू शकतील याचा. त्यांनी आपल्या घरातील गॅलरीलाच लॅब बनवले आणि पहाटे तीन वाजता उठून सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांचे प्रयोग सुरू झाले. वेगवेगळे शाकाहारी पदार्थ एकत्र करून त्यातून मांसाहारातून मिळणाऱ्या घटकांना पर्याय ठरू शकेल असे योग्य पदार्थ शोधण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. घराच्या गॅलरीतल्या ‘लॅब’मध्येच अशी वेगवेगळी कॉम्बीनेशन करायला सुरुवात झाली. प्रत्येक मिश्रण शुभांगीताई अन्नपदार्थांचा दर्जा तपासणाऱ्या पुण्यातल्याच एका नामवंत प्रयोगशाळेमधून तपासून घ्यायच्या. एनर्जी व्हॅल्यू, प्रथिनांचं प्रमाण, कार्बोहायड्रेटस्, फॅटस्, झिंक, कॅल्शिअम, सोडियम अशा  घटकांचे प्रमाण अशा वेगवेगळ्या निकषांवर ही मिश्रणं तपासली जायची. मांसाहार करा असे सुचविताना त्या पदार्थांमध्ये जे पोषक अन्नघटक असणे डॉक्टरांना अपेक्षित होते, तेच पोषक घटक शोधायचे होते. 
अनेक पदार्थ, त्यांची मिश्रणे, त्यांच्या तपासण्या या चक्रात त्यांना पर्याय सापडला तो अक्रोड आणि नाचणी या दोन पदार्थांमध्ये. हे दोन पदार्थ एका विशिष्ट प्रकारे एकत्र केल्यावर तो मांसाहाराला पर्याय ठरू शकतो, हे या सगळ्या तपासण्यांमधून स्पष्ट झाले. 

मग शुभांगीताईंनी लक्ष केंद्रित केले अक्रोड आणि नाचणीची सांगड घालण्यावर. त्यांनी ह्या दोन पदार्थांचे विशेष प्रकारे. अक्रोड आणि नाचणीचे हे सूप पाटील काका घेत असलेल्या उपचारांना पूरक ठरले. आता या सगळ्या खटाटोपाचे पुढे काय करायचे, या वर विचार करताना ह्या इतक्या चवदार आणि पौष्टिक सूपाचा इतरांना, विशेष करून देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांना, उपयोग होईल असे त्यांना जाणवले. याच दरम्यान ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेला पेटंट वरचा माझा एक लेख त्यांच्या वाचण्यात आला. परदेशातल्या अशा संशोधकांची पेटंट मधील मक्तेदारी, आपले संशोधन जर आपणच संरक्षित नाही केले नाही तर परदेशात त्याचे पेटंट घेतले जाते आणि त्यासाठी आपल्यालाच पुनः रॉयल्टी देऊन विकत घ्यावे लागते, याची जाणीव झाल्यानंतर शुभांगीताईंनी ‘पेटंट’ या बौद्धिक संपदेकडे जाण्याचे ठरविले. यावर बऱ्यापैकी चर्चा झाल्यावर रश्मी हिंगमिरे यांच्या सहकार्याने त्यांनी या सूपसाठी पेटंट दाखल केले.

गेली काही वर्षे पेटंटच्या क्षेत्रात काम करत असूनही रश्मी यांच्यासाठीही हे वेगळे पेटंट होते. पूर्णपणे नव्याने तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे पेटंट घेण्याची कल्पना भारतात अजूनही फारशी रुजली नसल्याने त्यात बऱ्याच अडचणी होत्या. पेटंटची बहुतांश प्रक्रिया लॉकडाउनच्या काळात पूर्ण झाली. भारतीय पेटंट कार्यालयाने पेटंट हिअरिंग ऑनलाइन घेतले आणि शुभांगीताई पेटंट मिळवण्यात  यशस्वी झाल्या. पेटंटची ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्पना जाधव या त्यांच्या जुन्या मैत्रिणी बरोबर त्यांची भेट झाली. कल्पनाताई पुण्यातल्याच एका महाविद्यालयात जेवणाची मेस चालवत होत्या. लॉकडाउनच्या काळात महाविद्यालये बंद झाली, मुलं आपापल्या गावी निघून गेली आणि परिणामी मेस बंद झाली. शुभांगीताईंकडून अक्रोड-नाचणी सूपची कथा ऐकल्यावर त्यांच्या मनात हे सूप मोठ्या प्रमाणात बनविण्याची कल्पना आली. चर्चा करता करता आणखी एक महिला उद्योजक त्यांचा माल मोठ्या प्रमाणात आणि कायम स्वरूपी विकत घेण्यास तयार झाल्या. मग एक त्रिपक्षीय करार झाला. एकीकडे पेटंट मिळत असताना दुसरीकडे त्यासाठी मागणीही निर्माण होत होती. आज अक्रोड-नाचणीच्या या सूपसाठी महिन्याला जवळपास दोन टन एवढी मागणी आहे. सूपसाठी लागणाऱ्या अक्रोडांमुळे काश्मीरशी आणखी एका वेगळ्या पद्धतीने नाते जोडणे शक्य झाले आहे. 

पेटंट हा एकस्व अधिकार असल्याने इतरांना पेटंट मिळालेल्या पदार्थाची निर्मिती मूळ पेटंट धारकाच्या परवानगी शिवाय करता येत नाही, असे केल्यास पेटंट कायद्याचा भंग होतो आणि त्या साठी करोडो रुपयाची नुकसान भरपाई द्यावी लागते. तुमच्या बुद्धीमधुन निर्माण झालेली पेटंट रुपी बौद्धिक संपदा ही राष्ट्रासाठी सुद्धा एक संपत्ती बनते. त्या मधून एक व्यवसाय निर्माण होतो, त्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो आणि राष्ट्राला कर रूपातून उत्पन्न मिळते.

शुभांगी पाटील यांनी त्यांच्या समोरची अडचण शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून अशा प्रकारे एक राष्ट्रीय संपत्ती तयार झाली. या प्रयत्नांना त्यांची वैयक्तिक अडचण तर सुटलीच, पण सोबत आणखी चार जणींच्या सबलीकरणाचा पाया घातला. एक महिला पेटंट घेणारी, दुसरी मिळवून देणारी, तिसरी पेटंटचा पदार्थ बनवायला घेणारी आणि चौथी पेटंट घेतलेला पदार्थ विकणारी. त्याहूनही महत्त्वाचे यश म्हणजे सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या जवानांना आणि मांसाहार न करताही आवश्यक ती पोषणमूल्ये मिळवू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी, केवळ गरम पाण्यात मिसळून आस्वाद घेण्याजोगा हा नवा पदार्थ सहजपणे उपलब्ध होईल.

बौद्धिक संपदेची ही एक कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होणारी आणि अनेक उत्तरं मिळवून देणारीही.

आजच्या जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धेच्या युगात बौद्धिक संपदा अर्थकारणाचा आणि प्रगतीचा महत्त्व महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. परंतु हा विषय आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भागच नसल्याकारणाने भारतात तो घरोघरी पोहोचू शकला नाही. पण जिथे जिथे हा विषय पोहोचला तिथून यशाची अनेक उदाहरणे समोर आली आणि त्या उदाहरणांमधून आर्थिक सामाजिक आणि अंततः बौद्धिक प्रगतीच्या यशोगाथा समोर आल्या. 

संबंधित बातम्या