थिंक ग्लोबली ॲक्ट इंडिव्हिज्युअली

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

पेटन्टची गोष्ट 

पेटन्ट मिळवण्यासाठी तुम्ही फार मोठे शास्त्रज्ञ असायला हवे असे नाही. फक्त तुमच्याजवळ एखाद्या अडचणीवर मात करण्याची किंवा त्या अडचणीच्या प्रश्नांवर पर्याय शोधाण्याची इच्छाशक्ती हवी. बऱ्याच वेळेला हा शोधलेला पर्यायच तुम्हाला पेटन्ट हा एकस्व अधिकार मिळवून देत असतो, अशा प्रकारच्या पेटन्टची उदाहरणे जगभरात शेकडो आढळतात आणि आता त्याचा प्रत्यय भारतातही दिसू लागला आहे. पुण्यातील एका सहकारी बँकेमध्ये क्लेरिकल जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सिद्धार्थ कदम यांना नुकतीच दोन पेटन्ट मिळाली. कदम यांना मिळालेल्या पेटन्टची गोष्ट अतिशय रंजक तर आहेच आणि अनेक सामाजिक प्रश्नांना उत्तरे देणारीही आहे.

सिद्धार्थ कदम हे उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी-चिंचवडचे रहिवासी. वास्तवात लहानपणापासूनच कदम यांचा ओढा काही ना काही उद्योग करण्याकडेच होता. ते जिथे राहातात त्याच भागामध्ये गरजेनुसार त्यांनी काही छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. त्यातून त्यांच्या काही गरजा पूर्ण व्हायच्या. पण शिक्षण पूर्ण होत असताना त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी बँकेच्या नोकरीचा स्वीकार केला, पण वेगवेगळ्या प्रश्नांवर कायम विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना पेटन्टधारक बनवून गेली !

आपल्या देशात सिद्धार्थ यांच्यासारखी अनेक मंडळी सापडतील. परिस्थितीमुळे त्यांना नोकरी-व्यवसायाशी जुळवून घेत त्यांच्या आतल्या संशोधकाला दडपून ठेवावे लागले. पण अशा मंडळींमधला संशोधक काही स्वस्थ बसत नसतो. हेच नेमके सिद्धार्थ यांच्याही बाबतीत घडले.

रोज सकाळी बँकेत जायला निघताना एक दृश्य त्यांना हमखास दिसत असे. त्यांच्या समोरच्या एका बंगल्याचे मालक घाईघाईत आपली चार चाकी घराबाहेर काढत असत. त्यांनाही निघण्याची घाई असल्याने बऱ्याचदा ते त्यांची कार झटकून साफ करत असत आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मात्र कार पुसण्याचे किंवा त्यावर कव्हर टाकण्याचे राहून जात असे. ही बाब सर्वसाधारणपणे आपल्याही आजूबाजूला दिसते. सकाळी घरातून निघताना कामाच्या जागी वेळेत पोचण्याचा प्रयत्न करायचा आणि संध्याकाळी थकून भागून आल्यावर काही छोटी-मोठी पण आवश्यक कामे मात्र नजरेआड करायची. हीच गोष्ट सिद्धार्थ यांच्या पाहण्यात आली. त्यांच्यातल्या संशोधकाने काही गोष्टींची नोंद घेतली आणि त्यांच्या शोधयात्रेला दिशा मिळाली. सिद्धार्थ यांनी या मुद्द्यांवर विचार करायला सुरुवात केली. काही प्रश्न त्यांना अस्वस्थ करून गेले. सकाळी घराबाहेर पडताना आपली कार स्वच्छ असावी असे आपल्याला वाटत असेल तर काय करायला पाहिजे, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न होता, जेव्हा आपण बाहेरची आपली कामे उरकून घरी परत येऊ आणि आपली कार पार्क केल्यानंतर जास्त मेहनत न करता कारला कव्हर घालायचे झाले, तर काय करायला पाहिजे?

प्रश्न निश्चित झाल्यानंतर मग उत्तरांचा शोध सुरू झाला. सिद्धार्थ यांच्या संशोधक मनाने एक गोष्ट हेरली, जर आपण रिमोटच्या साहाय्याने कारची दारे अनलॉक करू शकतो आणि पुन्हा लॉकही करू शकतो तर अशाच प्रकारे रिमोट वापरून कारवर कव्हर घालता येईल का? आणि ते कार-कव्हर रिमोटच्या साहाय्याने पुन्हा काढता येईल का, कव्हर काढताना कार स्वच्छही करून घेता येईल का? आणि त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर होते ऑटोमॅटिक कार कव्हर! ‘इच्छा असते तिथे मार्गही असतो’ या उक्तीप्रमाणे सिद्धार्थ यांनी ऑटोमॅटिक कार कव्हर बनवण्याचा आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने काम करायला सुरुवात केली बऱ्याच प्रयत्नांनंतर, प्रयोगांनंतर अंतिमतः त्यांना मार्ग सापडला आणि त्यांच्या कल्पनेतले ऑटोमॅटिक कार कव्हर आकाराला आले! 

हे संशोधन नावीन्यपूर्ण तर होतेच, शिवाय अभिनव आणि कल्पक होते, ओरिजनल होते. त्याच वेळेला पेटन्टच्या सेमिनारची एक बातमी त्यांच्या पाहण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागून असलेल्या वैकुंठ मेहता संस्थेमध्ये आमचा सेमिनार होता. सिद्धार्थ यांनी तो सेमिनार अटेंड केला आणि एक महत्त्वाची बाब त्यांच्या लक्षात आली. एखाद्या संशोधनाचे पेटन्ट मिळवण्यासाठी फार मोठा शास्त्रज्ञच असावे लागते असे नाही तर एखादी सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या बुद्धीतून निर्माण झालेल्या संशोधनासाठी पेटन्ट घेऊ शकते.

सिद्धार्थ यांच्यावतीने आम्ही पेटन्टसाठी अर्ज केला आणि त्यांना त्यांच्या या अभिनव कार कव्हरच्या संशोधनासाठी पेटन्ट मिळाले! पण पेटन्ट मिळण्याआधी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र त्या अडचणींचा अडसर न मानता सिद्धार्थ यांनी त्यातही संधी शोधली आणि त्यातून त्यांनी आपले दुसरे पेटन्ट मिळवले. रोज घरून बँकेत जाताना रस्त्यावरच्या धूळ आणि धुराच्या प्रदूषणामुळे सिद्धार्थ यांना एका दुर्धर व्याधीने ग्रासले. रोगाचे निदान झाल्यानंतर अवघड असे उपचार सुरू झाले. उपचारांदरम्यानही त्यांच्यातला संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. व्याधीशी सामना सुरू होताच. पण सिद्धार्थ यांच्यासाठी व्याधीशी लढण्याइतकेच स्वतःच्या आतल्या संशोधकाकडेही लक्ष देणेही महत्त्वाचे होते. या दोन्ही आघाड्यांवर ताळमेळ साधताना, सिद्धार्थ यांनी हवेतील प्रदूषित वायू प्रक्रिया करून कसे शुद्ध करता येतील यावर विचार सुरू केला. त्यांना उत्तर मिळाले ‘रोड साइड पोल्युशन कंट्रोल सिस्टीम’च्या रूपाने!

योग्यवेळी आम्ही या सिस्टिमच्या पेटन्टसाठीही अर्ज केला. जानेवारी २०२१मध्ये, अवघ्या सात महिन्यांमध्ये, त्यांच्या या नवीन संशोधनाला पेटन्ट मिळाले. भारतात सर्वात कमी वेळात मिळालेले हे पेटन्ट आहे. आणि आता काही बड्या उद्योगांमध्ये विशेष करून जिथे प्रदूषण रोखणाऱ्या यंत्रणा असणे अनिवार्य असते अशा ठिकाणी, त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गांवर तसेच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्ता दुभाजकांवर प्रदूषण नियंत्रित करणारी ही प्रणाली बसवता येईल का, यावर आता विचार सुरू आहे. थोडक्यात सिद्धार्थ कदम यांच्या पेटन्टने सामाजिक प्रश्नांवर उत्तरे तर शोधलीच, पण त्याचबरोबर रूढ अर्थाने संशोधक नसणारी व्यक्तीही पेटन्टसारखी बौद्धिक संपत्ती निर्माण करू शकते याचा एक वेगळाच पायंडा त्यांनी निर्माण केला! सिद्धार्थ यांच्या कामाचे महत्त्व आणखी एका दृष्टीने मोलाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकतेच दोन अहवाल सादर झाले आहेत. एक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आणि दुसरा आहे जागतिक बौद्धिक संपदा अहवाल. या दोन्ही अहवालानुसार जगात पेटन्ट दाखल करण्यामध्ये अव्वलस्थानी आहे चीन. दक्षिण कोरिया व सिंगापूर हे देशदेखील पहिल्या दहा राष्ट्रांमध्ये आपले स्थान मिळवून आहेत. पण अगदी गेल्या वर्षापर्यंत भारताला पेटन्टच्या या यादीत पहिल्या पन्नास राष्ट्रांमध्येही स्थान नव्हते. एका इंग्रजी वृत्तपत्राने नुकतीच गेल्या पंधरा वर्षात भारतात दाखल होणाऱ्या पेटन्टची पाहणी केली. त्यांच्या निष्कर्षांनुसार भारतात दाखल होणाऱ्या एकूण पेटन्टपैकी ७२ टक्के पेटन्ट परदेशी आहेत, आणि भारतीयांकडून दाखल होणाऱ्या उर्वरित २८ टक्के पेटन्टमध्ये वैयक्तिक पेटन्ट दाखल करणाऱ्यांची संख्या जेमतेम दोन ते तीन टक्के आहे. याउलट अमेरिका, चीन, जपान या देशात वैयक्तिक पेटन्ट दाखल करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ यांच्या पेटन्टची ही गोष्ट भारताची पेटन्ट मधली आंतरराष्ट्रीय पत वाढविण्यासाठी टाकलेले एक पाऊल नक्की ठरू शकेल.

एक पेटन्ट एक नवा उद्योग निर्माण करू शकतो, हे आपण याआधीही पाहिले आहे. याच मुद्द्याच्या आधारे विचार करायचा तर प्रकाशित आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतात परकीय कंपन्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त नव्या उद्योगांची तयारी करीत आहेत, अशा वेळेला ‘थिंक ग्लोबली ॲक्ट इंडिव्हिज्युअली’ या सूत्रानुसार आपण वैयक्तिक स्तरावर देशपातळीवर महत्त्वाच्या ठरणारी राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकलो तर ते एक मोठे योगदान ठरू शकेल!

संबंधित बातम्या