हळदीचे पेटन्ट 

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पेटन्टची गोष्ट 

हळदीच्या पेटन्टची गोष्ट म्हटल्यावर काहीजणांना आश्चर्य वाटेल, तर काहीजणांना वीस वर्षांपूर्वी भारताने हळदीच्या पेटन्टसाठी दिलेला लढा आठवेल. हळदीचे पेटन्ट म्हटल्यावर ज्यांना आश्चर्य वाटले असेल त्या मंडळींच्या मनात एक प्रश्न लगेच आला असेल, ‘हळदीसारख्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूलाही पेटन्ट मिळू शकते?’ या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे आणि हळदीचे पेटन्ट घेतले होते अमेरिकेने! मात्र अमेरिकेला ते पेटन्ट मिळवून देणारे भारतीयच होते. हळदीच्या पेटन्टची ही लढाई खूप गाजली. ती लढाई आपण अमेरिकेमध्ये लढली आणि जिंकलीसुद्धा. त्याचा आनंदोत्सव केला गेला, तो भावनिकदृष्ट्या समाधानकारक होताच, पण आर्थिकदृष्ट्या त्याचा विचार फार केला गेला नाही आणि तो करणे हे त्यावेळीही जास्त महत्त्वाचे होते आणि आजही आहे.

हळदीच्या पेटन्टची कहाणी वास्तव्यात वीस वर्षांपूर्वीची आहे. दोन भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठात संशोधनासाठी प्रवेश घेतला होता. तिथे त्यांची पेटन्ट या विषयाशी ओळख झाली. एखाद्या नवीन वस्तूला किंवा वस्तू बनविण्याच्या नवीन पद्धतीला पेटन्ट मिळते, तो कसे मिळते याबद्दल माहिती मिळाली. ‘नवीन वस्तू’ या संकल्पनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतात, त्यात एखाद्या वस्तूपासून तयार झालेले उपपदार्थ, बायप्रॉडक्टही, असू शकतात. याच माहितीचा वापर (?) या दोन संशोधकांनी केला आणि हळदीचा, विशेष करून हळकुंडांचा, औषधी वापर करण्याच्या पारंपरिक भारतीय प्रक्रियेला त्यांनी नवीन प्रक्रिया म्हणून अमेरिकी पेटन्ट कार्यालयात दाखल केले. विशेष म्हणजे अमेरिकी पेटन्ट कार्यालयाने त्यांचे हे पेटन्ट मान्यही केले. भारतात या विषयी माहिती मिळाल्यावर एका मोठ्या कायदेशीर लढाईला तोंड फुटले. अमेरिकेच्या पेटन्ट कार्यालयाने मंजूर केलेल्या हळदीच्या पेटन्टच्या विरोधात भारताने भूमिका घेतली. आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी भारताला अनेक पुरावे सादर करावे लागले. अखेर हळदीचे पेटन्ट अमेरिकेतून काढून घेण्यात भारत यशस्वी झाला. 

बऱ्याच मंडळींना भारताची अमेरिकेतील ही पेटन्टची लढाई माहीत असेल. परंतु त्यासाठी आपल्याला किती मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला याची आपल्यापैकी अनेकांना कल्पनाही करता येणार नाही. ही गोष्ट इथेच संपत नाही. भारतातून नीमचे, बासमतीच्या वाणाचे, एवढेच नव्हे तर भारतीय कलिंगडातील एका विशिष्ट एक्सट्रॅक्टचे पेटन्ट चीनमधील एका कंपनीने युरोपमध्ये घेतले होते. आपल्याकडे त्या संदर्भात लोकसभेतही चर्चा झाली. पुढच्या काळात चिनी कंपनीचे भारतीय कलिंगडाबद्दलचे युरोपमध्ये मिळवलेले पेटन्ट परत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. थोडक्यात आपल्याकडच्या काही पदार्थांमधल्या काही वैशिष्ट्यांना वेगळे काढून आपण त्याचे पेटन्ट घेऊ शकतो याकडे याआधी विद्यापीठांच्या म्हणा किंवा संशोधनाच्या अन्य स्तरांवर म्हणा फारसे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे कदाचित आपल्या देशातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे मिळू शकणाऱ्या हक्कांचा मोबदला घेण्यापासून वंचित राहिले.

आणखी एक उदाहरण देतो, ऐकून आश्चर्य वाटेल, दुःखही होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोकम फळांचे म्हणजेच रातांब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सरबतासाठी किंवा तेलासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या कोकमांमध्ये नैसर्गिकरीत्या वजन कमी करणारा एक घटक असतो. शास्त्रीय भाषेत त्याला हायड्रोक्सी-सायट्रिक ॲसिड असे म्हटले जाते. या विषयी आपल्याकडे संशोधन झालेले आहे. त्यावर काही शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधनाच्या आधारे काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रातील काही मंडळींनी कोकमाच्या या गुणधर्मावर आणखी संशोधन सुरू केले. नंतर अमेरिकेतल्या काही जणांनी कोकमातून हायड्रोक्सी-सायट्रिक ॲसिड काढण्याच्या प्रक्रियेचे पेटन्ट घेतले आणि भारतातच एक कंपनी थाटली. ही कंपनी कोकणातून रातांबे बंगळूरूत घेऊन जाऊ लागली; तिथे त्यातून हायड्रोक्सी-सायट्रिक ॲसिड वेगळे करून त्या एक्स्ट्रॅक्टच्या गोळ्या बनायच्या. कोकणातल्या रातांब्यांमध्ये मिळणाऱ्या एका रासायनिक घटकापासून बंगळूरूत तयार होणाऱ्या या गोळ्यांपैकी जवळपास ९९ टक्के निर्यात होत होत्या. 

या सर्व कहाणीचा मतीतार्थ एकच, आणि खरेतर तो खूपच महत्त्वाचा आहे. भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या अनेक गोष्टींचे उत्पादन घेतले जाते. परंतु त्या समृद्धीचे विविध पेटन्टच्या रूपाने बौद्धिक संपदेत रूपांतर करण्यात आपण कमी पडलो. अशा संधी हेरणाऱ्या परदेशी कंपन्यांनी, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संशोधकांनी या शर्यतीत आपल्याला मागे टाकले. पेटन्टच्या आघाडीवर, पेटन्टच्या प्रक्रियेत या कंपन्या आपल्या पुढे गेल्या; त्यांनी संशोधनाचा व्यवस्थित फायदा करून घेतला आणि घेतही आहेत. याचे आर्थिक परिणाम तर आहेतच. एखाद्या उत्पादनाचे किंवा एखाद्या उत्पादनातल्या एखाद्याच नैसर्गिक घटकाचे केवळ पेटन्ट घेतल्याने मूल्यवृद्धी होऊन मिळणाऱ्या फायद्यांपासून मूळ उत्पादक लांबच राहात होता. आपल्या भूमीत पिकणारे पेटन्टयोग्य पदार्थ बाहेरची मंडळी आपल्या नावावर करीत आहेत, ही जाणीव कदाचित जास्त त्रासदायक ठरत असते!

अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशा प्रकारे पेटन्टच्या नोंदी होऊ नये, म्हणून काय करता येईल असा विचार या उदाहरणांमधून  पुढे येत गेला. आणि त्यातून ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे आपल्या इथल्या इतर कुठल्या महत्त्वाच्या वैशिष्टपूर्ण पदार्थांमधून इतर मंडळी पेटन्ट घेणार नाहीत, याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज लक्षात आली. मग असे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असणाऱ्या पदार्थांची जीआय कायद्याद्वारे जर नोंद केली तर ती त्या भागाची बौद्धिक संपदा होते, हे लक्षात घेऊन अशा पदार्थांच्या नोंदी जर आपल्याच देशात झाल्या तर त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थांना पेटन्ट मिळणारच नाही, यावर काम सुरू झाले. आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हे आपल्या पूर्वजांचे पेटन्ट आहे. महाराष्ट्रातही या धर्तीवर अनेक पदार्थांच्या जीआय नोंदणीसाठी आपण प्रयत्न सुरू केले.

त्यातूनच दोन जिल्ह्यांमधल्या हळदीच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदी केल्या गेल्या. त्यातली एक आहे वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद. या हळदीची जशी नोंद केली गेली तशीच पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सांगलीच्या हळदीचाही जीआय नोंद केली गेली.

मसाल्यांच्या आणि औषधी वनस्पतींच्या पिकांमधले हळद हे आपल्याकडचे महत्त्वाचे पीक आहे. शक्तिवर्धक आणि रक्तशुद्धिकारक असलेल्या हळदीचे औषधी गुणधर्म आयुर्वेदासारख्या पारंपरिक शास्त्रांमध्ये विशद केलेले आहेत.  

महाराष्ट्रातल्या या दोन्ही हळदींना वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे भौगोलिक मानांकने मिळाली आहेत. वायगाव परिसरातील हळद औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वायगावच्या हळदीत कर्क्युमिन (Curcumin) नावाचा एक औषधी घटक जास्त प्रमाणात मिळतो. हा कर्क्युमिन कर्करोगाला प्रतिबंध करणारा घटक असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्याशिवाय अन्य काही विकारांवरील औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही त्याचा उपयोग होतो. गेली कित्येक शतके, अगदी मुघल काळापासून, वायगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते, मात्र वायगावच्या हळदीतले गुणवैशिष्ट्य समोर आले आणि त्या हळदीची भौगोलिक मानांकनासाठी, जीआय, नोंद होऊ शकली. या एका नोंदीने वायगावच्या हळदीला सातसमुद्रापार ओळख दिली एवढेच नव्हे तर आधीच्या तुलनेत उत्तम भाव मिळवून दिला. या हळदीच्या भोवती आता काही उद्योगही उभे राहात आहेत.

सांगलीच्या हळदीच्या बाबतीत तिथल्याच जमिनीमध्ये आणि विशेष करून हरिपूर परिसरातील ‘पेवे’ ही पारंपारिक साठवणूक पद्धत नोंदीसाठी उपयोगी पडली. या साठवणुकीच्या पद्धतीमध्ये जमिनीच्या खाली हळकुंड किंवा हळद साठवून ठेवली जाते. अनेक वर्षे ती ठेवता येते. या पेवे साठवणूक पद्धतीमध्ये जमिनीच्या खाली तीन जमिनीचे स्तर असतात. त्यामुळे ती हवाबंद हळद रंगाने अधिक फुलते आणि त्यातील कर्क्युमिनचे प्रमाणही उत्तम राहते. दक्षिण भारतातील सेलम तसेच ईशान्य भारतातील आसाम मधल्या एका हळदीलासुद्धा भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

अमेरिकेत लढलेल्या हळदीच्या पेटन्टच्या लढाईनंतर भारतात त्या विषयी जागृती झाली आणि अनेक ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण हळदीची आता आपल्या पूर्वजांच्या पेटन्टच्या रूपाने नोंद होऊ लागली आहे

संबंधित बातम्या