पर्यावरण संरक्षणाचे पेटन्ट

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
गुरुवार, 25 मार्च 2021

पेटन्टची गोष्ट 

परसबागेच्या पारंपरिक कल्पनेच्या आधाराने राजेंद्र सराफ ह्यांनी परसबाग पद्धतीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन कसे होत होते याचा अभ्यास करून, कोणती झाडे लावली तर सांडपाण्यातील अनावश्यक घटक काढून टाकले जातील आणि ते पाणी पुनर्वापरासाठी पुरेशा शुद्ध स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल यावरील संशोधनातून पर्यावरण संरक्षणाचे एक पेटन्ट जन्माला आले.

पेटन्ट ही जशी उद्योगांना उभारणी देणारी संपत्ती आहे, तशीच ती महिला सबलीकरणापासून ते तळागाळातील अनेक संशोधनाला नोंदीत करून अनेक सामाजिक प्रश्नांना उत्तर देणारी एक विशेष शोध प्रणाली देखील आहे. सर्वसामान्यांच्या भाषेत ‘गरज ही शोधाची जननी असते’ असे जरी म्हटले जात असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या पेटन्टची कल्पना फार सुंदर आणि अतिशय सोप्या भाषेत मांडली गेली आहे. ‘तांत्रिक प्रश्नांना शोधलेले तांत्रिक उत्तर म्हणजे पेटन्ट!’ उदाहरणच द्यायचे झाल्यास आज जगभरातल्या बहुतेक सगळ्या महामार्गांवर स्पीड लिमिट झोन निश्चित केलेले असतात. म्हणजे पुण्याहून मुंबईला जाताना लोणावळ्याच्या अलीकडे -पलीकडे आपल्याला ‘वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर’ असे लिहिलेला बोर्ड दिसतो. अशाच प्रकारचे स्पीड लिमिट झोन अमेरिकेमधील महामार्गांवर देखील आहेत. पण तिथे ह्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेसमोर एक वेगळाच प्रश्न होता. आव्हानच म्हणाना. अशा झोनमधून जर एखादी गाडी नियम तोडून जास्त गतीने निघून जात असेल, कायदा मोडत असेल, तर त्या वाहनचालकाला पकडण्यासाठी काहीवेळा पोलिसांनासुद्धा ठरवून दिलेली वेगाची मर्यादा ओलांडावी लागत असे. कारण वेगाने जाणाऱ्या वाहनाला अडवायचे असेल तर पोलिसांनाही थोड्या जास्तच वेगाने आपले वाहन चालवावे लागणार. म्हणजे वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या एकाला पकडण्यासाठी कायद्याच्या रक्षकांकडूनही कायद्याचा भंग होणार आणि असा कायदेभंग करून पोलिसांनी वेगाचे नियम मोडणाऱ्या त्या चालकाला पकडलेच तरीही तो अधिक वेगाने गाडी चालवत असल्याचा पुरावा शास्त्रशुद्ध नसल्याकारणाने, बऱ्याच वेळा त्याला सोडून देण्यावाचून गत्यंतर नसायचे. अमेरिकी पोलिस यंत्रणेला हा तांत्रिक प्रश्न भेडसावत होता. या तांत्रिक प्रश्नावर त्यांनी एक तांत्रिक उत्तर शोधले ते म्हणजे सॅटलाईट सिस्टीम! जर कोणी कार चालक स्पीड लिमिट झोन मधून ठरवून दिलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवत असेल तर त्या झोनमध्ये असलेली सॅटलाईट सिस्टीम त्याची माहिती लागलीच कॅच करेल, तो स्पीड नोंद करेल आणि त्या ठिकाणाच्या पुढच्या पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची लागलीच माहिती देईल, जेणेकरून पुढच्या एखाद्या पॉइंटवर पोलिस वेगमर्यादा तोडणाऱ्या त्या चालकाच्या स्वागताला उभे असतील. मुद्दा असा आहे की अमेरिकी पोलिसांचा स्पीड लिमिट तोडणाऱ्या चालकांच्या संदर्भातल्या तांत्रिक प्रश्नाला सॅटलाईट सिस्टीम या तंत्राद्वारे उत्तर शोधले गेले. नंतर या सॅटलाईट सिस्टीमचे पेटन्ट घेण्यात आले होते.. 

पेटन्टमधली गंमत इथे दिसून येईल. जगातली जवळजवळ ९७ टक्के पेटन्ट ही इम्प्रूव्हड म्हणजे सुधारित पेटन्ट असतात. म्हणजे केवळ तीन टक्के पेटन्ट ओरिजनल असतात. वाफेच्या इंजिनाचा शोध हे ओरिजनल पेटन्ट होते, परंतु बुलेट ट्रेन किंवा मेट्रो ट्रेन हे इम्प्रूव्हड पेटन्ट म्हणून गणले जाईल. थोडक्यात एका पेटन्ट मधून दुसऱ्या सुधारित पेटन्टची निर्मिती होत राहत असते. आपण सॅटेलाईट सिस्टीमच्या शोधाबद्दल बोलत होतो. या सिस्टीममध्येही नंतरच्या काळात अनेक सुधारणा कराव्या लागल्या. अमेरिकी यंत्रणेने भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना पकडण्यासाठी सॅटेलाईट सिस्टीम शोधली खरी, पण त्याच सिस्टीममुळे अनेकांसाठी दुसऱ्या तांत्रिक अडचणी किंवा प्रश्न निर्माण झाले. अनेक वाहनचालकांना स्पीड लिमिट झोन कुठून सुरू होतो हे माहीत नसायचे. अशावेळी एखादा वाहनचालक वेगाने वाहन चालवत स्पीड लिमिटला स्पर्श करत असेल तर त्याला विनाकारणच दंड भरावा लागेल. या तांत्रिक अडचणीवर अमेरिकेतील काही खासगी संशोधन संस्थांनी सॅटेलाईट डिटेक्टर सिस्टीम हे तांत्रिक उत्तर शोधले आणि त्याचेही पेटन्ट घेतले. ही सॅटेलाइट डिटेक्टर सिस्टीम कार मध्ये लावली जाईल आणि वाहन जसजसे स्पीड लिमिट झोनच्या जवळ येईल तशी ही सॅटेलाइट डिटेक्टर सिस्टिम कारच्या चालकाला कल्पना देईल की आता कारचा वेग कमी करा, कारण लवकरच स्पीड लिमिट झोन सुरू होतो आहे.

सध्या प्रदूषण हा जागतिक पातळीवर सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. प्रदूषण हवेचे असो अथवा पाण्याचे, या प्रश्नाची पाळेमुळे अनेक तांत्रिक प्रश्नांमध्ये सापडतात. सिमेंटची जंगले वाढत असताना, भौतिक विकास आणि पर्यावरणाचा समतोल कसा साधायचा हा तर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. अशा प्रश्नांना काही संशोधकांनी उत्तरे शोधली आहेत, आणि त्यांच्या संशोधनाचे स्वामित्व हक्क, म्हणजे पेटन्टही मिळवले आहेत. त्यातले एक महत्त्वाचे नाव आहे राजेंद्र सराफ! पर्यावरण संरक्षण प्रणालींसाठी राजेंद्र सराफ यांना दोन पेटन्ट मिळवून देण्यात आम्हाला यश आले. 

पूर्वीच्या प्रत्येक घराच्यामागे एक परसबाग असायची. घरातले सांडपाणी, अंघोळ, भांडी घासायला किंवा अन्य कामांसाठी घरात वापरलेले पाणी परसबागेत जायचे. परसबागेत पाणी वाहून जात असले तरी डासांचा किंवा अन्य किड्यामकोड्यांचा उपद्रव फारसा नसायचा, कारण परसबागेत वेगवेगळी झाडे लावलेली असायची. त्या झाडांमुळे सांडपाण्याचा त्रास होत नसे. हीच पारंपरिक कल्पना आधाराला घेऊन पुणेकर राजेंद्र सराफ ह्यांनी परसबाग पद्धतीत सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे होत होते, ही पद्धत कशी पर्यावरणपूरक होती, याचा अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर कोणती झाडे लावली तर सांडपाण्यातील अनावश्यक घटक काढून टाकले जातील आणि ते पाणी पुनर्वापरासाठी पुरेशा शुद्ध स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल यावर त्यांनी संशोधन केले. सराफ यांनी त्यांच्या या संपूर्ण संशोधनाचे पेटन्ट घेतले. हे पेटन्ट सांडपाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून सध्या नावारूपाला येत आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी  उपलब्ध असणाऱ्या यंत्रणांमध्ये वेगवेगळी यंत्रसामग्री वापरली जाते, किंवा वेगवेगळे फिल्टर बसवावे लागतात. त्यासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा एक स्वतंत्र सेटअप उभारावा लागतो. पण राजेंद्र सराफ ह्यांनी जे संशोधन केले आहे त्यासाठी कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल ऊर्जास्रोत लागत नाहीत; फक्त झाडांकडून नैसर्गिकरीत्या होणाऱ्या पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतून अपेक्षित रिझल्ट मिळतात. म्हणून त्यांनी आपल्या पेटन्टला नैसर्गिक वेस्टवॉटर मॅनेजमेंट अथवा झीरो एनर्जी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असं नाव दिलं आहे! त्यांनी शोधलेल्या प्रक्रियेसाठी ते फ्रॅग्मॅटिस ऑस्ट्रालिस (Phragmites australis) ह्या वनस्पतीचा वापर करतात. आपल्याकडच्या वेळूच्या जवळ जाणारी ही वनस्पती वेटलँड स्पिशीज् म्हणूनच प्रसिद्ध आहे. या प्रक्रियेचे दोन -तीन टप्पे आहेत. सांडपाणी या टप्प्यांमधून गेल्यानंतर त्यातले काही घटक बाजूला काढल्यानंतर उरलेले पाणी पुन्हा बागेसाठी आणि भांडी धुण्यासाठी वापरता येईल.

फिल्टर लावल्यानंतरही जेवढे शुद्ध पाणी मिळेल त्यापेक्षा अधिक शुद्ध पाणी ह्या प्रक्रियेतून मिळते. वेस्टवॉटर मॅनेजमेंट हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. नदीत किंवा ओढ्यानाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नद्या, ओढे, नाले मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असतात. 

आपल्याकडे  वेस्टवॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आहेत पण त्यासाठी इलेक्ट्रॉनिक सेटअप लावावा लागतो. त्या ऐवजी काही विशिष्ट वनस्पती वापरून त्यांच्या साहाय्याने पाणी शुद्ध करण्याची पद्धत त्यांनी वापरली आहे. थोडक्यात राजेंद्र सराफ यांची पेटन्ट प्रदूषण करणाऱ्या घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्यासाठी चांगले तांत्रिक उत्तर आहे. त्यातून पर्यावरण रक्षणाचा एक वेगळा पेटन्ट मार्ग समोर येतो.

संबंधित बातम्या