तांदळाचे पेटन्ट

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 5 एप्रिल 2021

पेटन्टची गोष्ट 

लेखाचे शीर्षक वाचून आपल्यापैकी काहींच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल. नवीन काहीतरी शोध लावला, लागला तर पेटन्ट मिळते, असे आपण ऐकले, वाचलेले असते, आणि इथे तर शतकानुशतके, पिढ्यानपिढ्या वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा उल्लेख आहे. भारतीय आहारपद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून ओळख असणाऱ्या या तांदळाच्या पेटन्टची कथा असे शीर्षकातून ध्वनित होते आहे. असे काय आहे या आगळ्या वेगळ्या पेटन्ट कथेमध्ये?

तांदळाच्या पेटन्टची सुरुवात जिथून झाली त्या बासमतीच्या पेटन्टची कथा वास्तवात खूप रोमांचकारी आहे. बासमती या नावातच त्या तांदळाचे वैशिष्ट लपलेले आहे. ‘सुवासिक तांदूळ’ असे बासमतीबाबत अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. मुळात हिमालयाच्या पायथ्याशी पिकणारा बासमती तांदूळ हा भारताची कृषी परंपरा दर्शविणारा. एक सुवासिक तांदूळ अशी याची ख्याती जगभर आहे. मग या तांदळाच्या बाबतीत पेटन्टचा विषय कुठून आला? आणि का आला? असा प्रश्न निर्माण होतो.

अगदी गेल्या वर्षापर्यंत अमेरिका हा जगातला सर्वात जास्त पेटन्ट घेणारा देश होता. आता या स्पर्धेत चीन अमेरिकेला मागे टाकून पेटन्टच्या जगामध्ये क्रमांक एक वर आला आहे. ही स्पर्धा जरी काही काळ बाजूला ठेवली तरी वास्तवात या दोन्ही देशांचा पेटन्ट घेण्यामागचा अप्रत्यक्ष हेतू जगावर आपले एकछत्री अधिकार असायला हवेत या वृत्तीशी जोडला गेलेला आहे. पेटन्ट मिळवण्याच्या अमेरिकी वृत्तीबाबतीत तर एका ज्येष्ठ पत्रकाराने वैतागून, ‘Anything under the Sun can be patented in America’, असे उद््गार काढल्याचे सांगितले जाते. त्यांना फक्त बौद्धिक संपदा निर्माण करायची, जगामध्ये पाठवायची आणि जगभरातून त्या बौद्धिक संपत्तीद्वारे अमेरिकेकडे पैशाचा ओघ सुरू ठेवायचा एवढेच ठाऊक आहे, असेही या क्षेत्रातल्या काही ज्येष्ठ मंडळींचे अमेरिकेच्या पेटन्ट बाबतीतल्या भूमिकेबद्दलचे मत आहे. कुठलीच वस्तू सोडायची नाही, मग ती औद्योगिकीकरणासाठी असो किंवा शेतीसाठी, विशेष करून जगात लागणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करून त्यावर प्रक्रिया दाखवून पेटन्ट घ्यायचे आणि आपली मक्तेदारी निर्माण करायची हे धोरण अमेरिकेने ठेवले. त्यातच त्यांच्या नजरेत भारतीय उपखंडातील बासमती तांदूळ आला! या तांदळाला जगभरातून प्रचंड मागणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर या तांदळाचा आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याकडे वळवता येईल या विचाराने अमेरिकेतल्या टेक्सासस्थित ‘राईस टेक’ नावाच्या कंपनीने १९९७ साली बासमती तांदळाला संकरित (हायब्रीड) किंवा नवजात असे वाण दर्शवून पेटन्ट घेतले. हे पेटन्ट घेण्यामागचा हेतू कोणालाही समजण्यासारखा होता. ‘राईस टेक’ला जगभरातील बासमतीची बाजारपेठ काबीज करायची होती. हे पेटन्ट मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि भारतीय उपखंडात विशेष करून भारत व पाकिस्तानात या पेटन्टच्या विरोधात मोठी आंदोलने झाली. अमेरिकेत त्यांच्या दूतावासाच्या समोर त्याकाळी भारतीय उपखंडातील जवळपास पन्नास हजारांच्यावर लोकांनी या पेटन्टच्या विरुद्ध निदर्शने केली. मग या लढाईत भारत सरकारही उतरले.  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत सर्व आवश्यक ती शास्त्रशुद्ध माहिती पुरविण्यात आली आणि सरतेशेवटी अमेरिकी कार्यालयाने एकूण वीस क्लेम, म्हणजे पेटन्टसाठी ज्याला चौकट असे म्हटले जाते, त्यापैकी पंधरा क्लेम या पेटन्ट अर्जामधून काढून घेतले. त्यामध्ये बासमतीच्या नावाचा उल्लेख असलेल्या पेटन्टचाही समावेश होता.

बासमतीच्या पेटन्टची लढाई इथे सुरू झाली आणि संपली असे नाही, तर या लढाईने अनेक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पदार्थांना आणि त्याच्या महत्त्वाच्या घटकांना प्रकाशझोतात आणले. बासमतीची लढाई सुरू असताच द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हळदीच्या पेटन्टची, पुढच्या काळात पूर्णपणे यशस्वी झालेली, लढाई लढत होतो. त्यानंतरच्या काळात लगेचच आपल्याला कडुलिंबाचे पेटन्ट परत मिळवण्यासाठी आणखी एक लढाई लढावी लागली. आताही आपण आणखी एक लढाई लढतो आहोत. ती लढाई आहे एका चायनीज कंपनीने युरोपमध्ये घेतलेले भारतीय कलिंगडाच्या एक्स्ट्रॅक्टचे पेटन्ट परत मिळविण्यासाठी!

आपल्या पूर्वजांपासून आपल्या वापरात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचे पेटन्ट कोणी चोरू नये म्हणून एक चांगली मोहीम मात्र बासमतीच्या पेटन्टच्या लढाईनंतर सुरू झाली. यात विशेष करून पूर्वजांची पेटन्ट नोंद करणारा ‘जीआय’ कायदा उपयोगात आणला गेला. भारतातील पाच राज्ये एकत्र करून ‘अपेडा’ या वाणिज्य मंत्रालया अंतर्गत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून बासमतीची ‘जीआय’ नोंद करण्यात आली. यामुळे बासमतीला बौद्धिक संपदेचा दर्जा मिळाला पण बासमती व्यतिरिक्त अनेक सुगंधी तांदूळ भारताच्या जमिनीमध्ये पिकतात ही वस्तुस्थितीही ठळकपणे पुढे आली. आणि जे बासमतीचे झाले ते इतर तांदळाच्या इतर वाणांचे होऊ नये म्हणून त्यांच्याही ‘जीआय’ नोंदणी सुरू झाल्या. आम्ही याच धर्तीवर महाराष्ट्रातून चार सुवासिक तांदळाच्या ‘जीआय’वर काम करू शकलो. यात पुण्याचा आंबेमोहोर, कोल्हापूरचा आजरा घनसाळ, पालघरचा वाडा कोलम आणि भंडाऱ्याचा चिनोर तांदूळ यांचा समावेश आहे.

या आपल्या ‘पूर्वजांच्या पेटन्ट’वर काम करताना अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. उदाहरणार्थ आंबेमोहोर तांदूळ. आंबेमोहोर म्हणण्यामागे आपल्या पूर्वजांची बौद्धिक क्षमता समजून येते. आंबेमोहोर तांदुळाबद्दल एका इंग्रजी दस्तावेजात ‘aroma of blossom of mango’ -आंब्यासारखा सुगंध देणारा तांदूळ - असा उल्लेख सापडतो. तर घनसाळ तांदुळाच्या बाबतीत घन म्हणजे सुवास आणि साल म्हणजे तांदूळ किंवा दांडी अशा अर्थाची नोंद घनसाळ तांदळाविषयी सापडते. या व अशा अनेक बौद्धिक संपत्तीचे पैलू बासमतीच्या पेटन्ट कथेनंतर समोर आल्या. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात बासमतीसारखे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले सुवासिक तांदूळ आहेत. उदाहरणार्थ काळभात, लालभात. कालांतराने यांच्याही नोंदी ‘जीआय’ म्हणून होतील आणि आपल्या देशातील पेटन्ट आपल्या देशातच राहतील! बासमतीच्या पेटन्ट कथेमध्ये अजून एक महत्त्वाचा बौद्धिक संपदेचा पैलू लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे पेटन्टच्या माध्यमातून होणारे नियोजित व्यापारीकरण! अमेरिकी कंपनीने केवळ संधीसाधूपणाने बासमतीचे पेटन्ट घेतले नाही तर त्याच्या तांदळाच्या वाणांना ‘टेक्सासमती’, ‘कासमती’ अशी नावे दिली आणि हे तांदूळ भारतीय बासमती प्रमाणेच प्रसिद्धीस आणले, थोडक्यात पेटन्ट हा बौद्धिक संपदा अधिकार जरी असला तरी तो इंडस्ट्रिअल प्रॉपर्टी आहे हा धडा आपल्याला त्यातून घ्यावा लागेल.

भारत हे जैवविविधतेचे भांडार आहे. बासमती व्यतिरिक्त कारले, जांभूळ, कडुलिंबाची पाने, चिंच, आले, अश्वगंधा इत्यादी देशी पिकांनाही विकसित राष्ट्रांकडून अशाच पेटन्ट दाव्यांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. इतर विकसित राष्ट्रांकडून जैवविविधतेची चोरी करण्याच्या अशा घटनांना पुढील काळात प्रतिबंधित करण्यासाठी भारताने ‘ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ (टीकेडीएल) हा डाटाबेस तयार केला. जगभरातील इतर कोणत्याही पेटन्ट कार्यालयाकडे जर कोणी भारतीय पारंपरिक ज्ञानावर आधारित पेटन्ट अर्ज केला असेल तर ‘टीकेडीएल’कडून पडताळणी होऊन त्या अर्जावर त्यांच्या ‘ना हरकती’ची मोहोर उमटल्याशिवाय ते पेटन्ट आता घेता येणार नाही. त्याच बरोबर अशा प्रकारचे पेटन्ट दिले जाऊ नये म्हणून भारतात ‘जीआय’ कायदा रुजविला जातो आहे. पण याच बरोबर कायदेशीर जागृतीसाठी आणि शैक्षणिकदृष्ट्याही ‘टीकेडीएल’ आणि ‘जीआय’कडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या