एका टेबलाचे पेटन्ट

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 3 मे 2021

पेटन्टची गोष्ट 

वडिलांचा व्यवसाय पाहात असतानाच त्यांनी आपल्या मनातल्या डिझाइनवर काम चालू केले. अक्षरशः चोवीस तास फक्त या टेबलाचा विचार चालू असायचा. त्यांच्या कल्पनातल्या टेबलाचे बेसिक डिझाइन करायला त्यांना तीन महिने लागले. नंतर वेळ मिळेल तसे त्यांनी कामगार घेऊन, ‘चुका व शिका’ पद्धतीने, टेबल तयार करण्याचे काम चालू केले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही सोसला.

कायद्याची निर्मिती अनेक प्रकाराने होत असते. काही कायदे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचे फलस्वरूप म्हणून तयार होतात आणि त्या कराराचा भाग म्हणून आपण ते स्वीकारतो. बौद्धिक संपदेसंदर्भातील सर्व कायदे म्हणजे पेटन्टचा कायदा, कॉपीराइटचा कायदा आणि आपल्या पूर्वजांच्या पेटन्ट नोंद करणारा ‘जीआय’चा कायदा हे आपण असेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून स्वीकारलेले आहेत. भारत अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद आहे. त्यामुळे या संघटनांमध्ये जे करार स्वीकारले जातात त्याला अनुसरून सभासद राष्ट्रांना कायदे करावे लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास भारत जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) सभासद आहे. या संघटनेमधील गॅट सारखे किंवा बौद्धिक संपदेविषयीचे अनेक करार भारताने स्वीकारले आहेत. हे करार स्वीकारल्यामुळे भारताला वेगवेगळे कायदे तयार करावे लागले आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे हे विशेष बंधन भारतावर आहे. बौद्धिक संपदा विषयक आंतरराष्ट्रीय करारामुळे भारताला पेटन्ट कायदा तसेच ट्रेडमार्क कायदा हे कायदे तयार करावे लागले. वास्तवात बौद्धिक संपदा विषयक कायद्यांसाठी भारताला दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांमधील बौद्धिक संपदा विषयक करारांची दखल घेत कायदे बनवायला लागले आहेत. ‘डब्ल्यूटीओ’ बरोबर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बौद्धिक संपदा विषयक विशेष संघटनेनेसुद्धा भारताशी अनेक करार केले आहे. या करारांचा विशेष परिणाम म्हणजे या संघटनांच्या देशांमध्ये भारतातील पेटन्ट व्यावसायिकदृष्ट्या घेऊन जाता येईल तसेच त्या देशांतील पेटन्टनासुद्धा भारतामध्ये एक संपत्ती या नात्याने व्यवसाय करता येईल. अशा प्रकारचे करार आणि त्यातून निर्माण झालेल्या कायद्यांमुळे पेटन्टच्या बाबतीत अनेक संधी आणि आव्हाने निर्माण झाली. यामुळे प्रगत राष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या किंवा औषध शास्त्रातील पेटन्टना भारतातील बाजारपेठ उपलब्ध झाली. कारण प्रगत राष्ट्रांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते, त्यामुळे तिथल्या पेटन्टची संख्याही जास्त असते. त्यामानाने भारतीय औषध संशोधन आणि निर्मिती क्षेत्रांतून परदेशात जाणाऱ्या पेटन्टचे प्रमाण अत्यल्प आहे. अशी बोटांवर मोजता येणारी भारतीय पेटन्ट परदेशातील बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्यांपैकी एक आहेत शैलेश आडके! ज्या पारंपरिक ज्ञानशाखांमुळे भारताची जगभरात एक वेगळी ओळख आहे, अशा क्षेत्राशी आडकेंचे पेटन्ट निगडित आहे आणि ते क्षेत्र म्हणजे आयुर्वेद!

आयुर्वेद ही जगातील अत्यंत प्राचीन चिकित्सा प्रणालींपैकी एक आहे. साधारणतः तीन हजार वर्षांपूर्वी आयुर्वेद भारतात विकसित झाला. आयुर्वेदाचा मुख्य गाभा हा आरोग्य आणि निरोगी मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील नाजूक समतोल यावर अवलंबून आहे. फक्त रोगाशी लढा न देता चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देणे हे आयुर्वेदाचे मुख्य लक्ष्य आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये मुळात आपल्या शरीरातील तीन जैविक ऊर्जांचा समतोल राखण्यावर भर दिला जातो, असे आयुर्वेदाचा अभ्यास करताना लक्षात येते. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा मुख्यतः या तीन जैविक ऊर्जांमध्ये असमतोल झाल्यामुळेच तो आजार उद्‌भवलेला असतो. 

आयुर्वेदामध्ये पंचकर्म उपचार पद्धतीला फार महत्त्व आहे. पंचकर्म म्हणजे पाच घड्यांमार्फत शरीराचे केलेले ‘डिटॉक्सिफिकेशन’. विविध तेले किंवा औषधी द्रव्याने केलले मालिश, विशिष्ट प्रकारच्या धारा यांचा शरीरामधील अशुद्ध घटकांचा निचरा करून शरीरामधील जैविक ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी पंचकर्माचा अवलंब केला जातो. या सर्व बाबी वैद्यकीय शास्त्राशी निगडित आहेत परंतु आडकेंसारखी एखादी तंत्रशिक्षण घेतलेली व्यक्ती देखील हे आयुर्वेदिक उपचार अजून किती चांगल्या प्रकारे देता येतील; आयुर्वेदातील मूळ संकल्पनांना धक्का न लावता नवीन तंत्रज्ञानाचा आयुर्वेदामध्ये कसा वापर करता येईल यावर विचार करते, हे वेगळेपण आहे.

शैलेश आडके हे मूळचे सिव्हिल इंजिनिअर. परंतु इनोव्हेशन आणि इन्व्हेंशन याकडे त्यांचा लहानपणापासूनच ओढा होता. घरी बसल्या बसल्या अनेक जुन्या, टाकाऊ वस्तूंपासून काही नवीन वस्तू तयार करून पाहणे, हा त्यांचा फावल्या वेळचा उद्योग असायचा. यातूनच त्यांनी ‘क्रिएटिव्ह मेटल’ आणि ‘क्रिएटिव्ह किचन’ या नावाने त्यांचा व्यवसायही सुरू केला होता. परंतु वडिलांचे अकस्मात निधन झाल्याने त्यांना काही काळ वडिलोपार्जित व्यवसायात लक्ष घालावे लागले. त्याच सुमारास लाइफस्टाइल आणि कामाच्या स्वरूपामुळे त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्याविषयी काही समस्या निर्माण झाल्या. अनेकांच्या सल्ल्यानुसार ॲलोपॅथी, होमिओपॅथी, फ्लॉवर रेमेडी अशा अनेक उपचार पद्धतींचा त्यांनी वापर केला. ही गोष्ट साधारण २०१४च्या आसपासची. अनेक उपचारांचे अपेक्षेप्रमाणे गुण न आल्याने ते पंचकर्म उपचारांकडे वळले आणि या उपचारानंतर त्यांना स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल जाणवले. स्वास्थ्याविषयीच्या त्यांच्या तक्रारी मुळापासून संपुष्टात आल्या. त्या दिवसापासून ते खरोखरच आयुर्वेदाचे भक्त झाले असं म्हणण्यास हरकत नाही. स्वतःच्या अनुभवाबद्दल आपल्या मित्रमंडळीबरोबर संवाद साधताना त्यांना असं जाणवलं की लोकांना आयुर्वेदाविषयी नीटशी माहितीच नाही. लोकांच्या मनात आयुर्वेद म्हणजे जुने काहीतरी, तेलकट, कडवट काढे, चुर्णांच्या पुड्या अशा विचित्र कल्पना आहेत. उपचार देण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या साधनांसाठी होणारा खर्च किंवा गुंतवणूक आणि त्यासाठी लागणारी जागा हे न परवडल्यामुळे अनेक आयुर्वेदिक डॉक्टरही पंचकर्म क्लिनिकपेक्षा जनरल ओपीडीला जास्त प्राधान्य देतात, असेही त्यांच्या लक्षात आले.

यातून आडके यांच्या मनात आयुर्वेदासाठी, त्यातील उपचारांसाठी  काही इनोव्हेशन करता येईल का हा विचार चालू झाला. या संदर्भात त्यांनी अनेक डॉक्टरांशी चर्चाही केली. सध्या वेगवेगळ्या उपचारांसाठी वापरात असलेल्या वेगवेगळ्या लाकडी टेबलांपेक्षा सर्व उपचार एकाच टेबलवर करता येतील का, असा एक विचार या चर्चांमधून पुढे आला, आणि त्यावर त्यांनी काम चालू केले. या प्रयत्नांत त्यांच्या पत्नीचा, स्वाती यांचाही, मोलाचा वाटा होता. वडिलांचा व्यवसाय पाहात असतानाच त्यांनी आपल्या मनातल्या डिझाइनवर काम चालू केले. अक्षरशः चोवीस तास फक्त या टेबलाचा विचार चालू असायचा. त्यांच्या कल्पनेतल्या टेबलाचे बेसिक डिझाइन करायला त्यांना तीन महिने लागले. नंतर वेळ मिळेल तसे त्यांनी कामगार घेऊन, ‘चुका व शिका’ पद्धतीने, टेबल बनवण्याचे काम चालू केले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही सोसला. पहिल्या दोन- तीन प्रयत्नांमध्ये त्यांना सपशेल अपयश आले. काही काळाकरता खरेच हे सगळे सोडून द्यावे, अशा विचारापर्यंत ते आले होते. पण आयुर्वेदावरची श्रद्धा आणि नव्याने काहीतरी निर्माण करण्याची मूळची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांचे मन या विषयावरून सहजपणे हलायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. आणि अंतिमतः त्यांच्या कल्पनेत होते तसेच ‘ऑल इन वन पंचकर्म ॲण्ड स्वेदन ट्रीटमेंट टेबल’ त्यांनी वास्तवात उतरवले. टेबल पूर्ण झाले त्यावेळी एक इन्व्हेंटर म्हणून झालेल्या आनंदाची तुलना कशाशीच करू शकत नाही, असे ते नेहमी म्हणतात. पण त्यांची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. त्या टेबलाची उपयुक्तता तपासून पाहण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी ते काही डॉक्टरांना वापरण्यासाठी दिले. कॉम्पॅक्टनेस, लाइट वेट, मल्टिफंक्शनल, डिटॅचेबल, सहज स्वच्छ करता येण्याजोगे, मेन्टेनन्स फ्री, परवडण्याजोगे, झुरळे आणि ढेकूण यांच्यापासून मुक्त असणारे ही त्या टेबलाची वैशिष्ट्ये आहेत. टेबल वापरून पाहिलेल्या डॉक्टरांकडून काही दिवसांतच त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणि इथून आडके यांच्या नवीन व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. ‘वेदाश्रम इक्विपमेंट’ सुरू झाल्यावर दुसऱ्याच वर्षी, २०१७मध्ये, त्यांना ‘न्यू प्रॉडक्ट डिझाइन’साठी पुण्याच्या मराठा चेंबरचा अतिशय नामांकित असा ‘हरी मालिनी जोशी’ पुरस्कारही मिळाला.

याच काळामध्ये माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या ‘ऑल इन वन पंचकर्म ॲण्ड स्वेदन ट्रीटमेंट टेबल’ साठी त्यांनी पेटन्ट घेणे का आवश्यक आहे, याबद्दल त्यांच्याशी दीर्घ चर्चा झाल्यानंतर माझ्या पत्नीच्या, रश्मीच्या, मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या इन्व्हेन्शनचे भारतात पेटन्ट फाइल केले. आता आम्ही या शोधाचे आंतरराष्ट्रीय पेटन्टसुद्धा फाइल केले आहे. आपल्या प्राचीन आयुर्वेद उपचार पद्धतीचा फायदा संपूर्ण मानवजातीचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी होईल व यासाठी आमचा हा खारीचा वाटा नक्कीच ठरेल ही आशा बाळगतो, असे आडके त्यांच्या पेटन्टविषयी सांगतात.

आडकेंच्या पेटन्टचा देशपातळीवरसुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. सध्या भारतात साडेसात लाखांच्या आसपास आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहेत. तसेच साधारण चार हजार आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत. आयुष मंत्रालयाच्यावतीने चार हजार आयुष रुग्णालये, तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक आयुष ओपीडी याप्रमाणे भारतात एकूण ५६०० आयुष ओपीडी लवकरच निर्माण येणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये ३२० आयुर्वेद महाविद्यालये आहेत. ही सर्व आकडेवारी अभ्यासली तर या पेटन्टेड ‘ऑल इन वन पंचकर्म ॲण्ड स्वेदन ट्रीटमेंट टेबल’साठी आणि इतर विशेष उपकरणांसाठी काही हजार कोटी रुपयांची बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यातून सरकारला काही कोटींचा महसूल मिळू शकतो आणि काही हजार लोकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बरोबरच हेल्थकेअर, फार्मा, फॅब्रिकेशन, स्टील, टिंबर,  मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पॉलिमर, मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रांच्या उलाढालीतही यामुळे भर पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ या संकल्पनेसाठी आडके यांचे हे पेटन्ट व्यावसायिकांसाठी  मोलाचे योगदान ठरेल याबद्दल खात्री आणि अभिमानसुद्धा वाटतो.

संबंधित बातम्या