विषाणू रोखण्यासाठी...
पेटन्टची गोष्ट
तंत्रज्ञान आधुनिक जरी असले तरी ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असावे, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री ही बाजारपेठेमध्ये सहजरीत्या उपलब्ध असली पाहिजे. त्याचबरोबर ती प्रभावी आणि आपल्या समोरच्या समस्येला साजेसे उत्तर देणारी हवी हाच सगळा विचार मनात ठेवून हा तांत्रिक तोडगा काढला...
पेटन्टचा मुख्य उद्देश उद्योगनिर्मिती असा जरी असला तरी सामाजिक प्रगती साधणे हाच पेटन्ट प्रक्रियेचा मूळ गाभा होय. तांत्रिक प्रश्नांना तांत्रिक उत्तर अशी पेटन्ट व्याख्या काही तज्ज्ञांनी केली आहे. ती सामाजिक स्तरावरील तांत्रिक प्रश्नावरसुद्धा लागू पडते. सध्या जगभरात कोविडच्या विषाणूने थैमान घातले आहे. कोविड हा प्रश्न जागतिक स्तरावरील सर्वात मोठा सामाजिक प्रश्न झाला आहे, तर या आजारावर कोणते उपलब्ध औषध गुणकारी ठरेल? हा एक तांत्रिक प्रश्न झाला होता. आणि तांत्रिक दृष्ट्या त्याला, नवीन लस उपलब्ध केली, हे तांत्रिक उत्तर शोधले गेले मग इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून तयार केलेली, भारतात उत्पादित होत असलेली कोविशील्ड असो, भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सीन असो, रशियाची स्पुटनिक असो की अमेरिकेच्या मॉडर्ना आणि फायझर या लशी असोत. या सर्व लशींचे पेटन्ट अथवा इतर बौद्धिक संपदा घेण्यात आली आहे. त्या त्या लशींवर त्या त्या कंपनीचेच एकस्व अधिकार आहेत. तुम्हा आम्हाला यापैकी कोणतीही लस त्या कंपनीच्या परवानगी शिवाय बनविता येणार नाही, किंवा त्या लशीला दिलेले नावही आपल्या लशीसाठी वापरता येणार नाही. मग बौद्धिक संपदा तर समाजासाठी उपयोगी कशी? ती तर एकाच्याच मालकीची! पेटन्ट घेणाऱ्या कंपन्याच त्या लशीची किंमत ठरवतात, हा एक दृष्टिकोन बहुतांश जनतेच्या दृष्टीस पडतो आणि तो रास्तही म्हणता येईल. पण नाण्याची दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे. एखादी लस किंवा औषध बाजारात आणण्यापूर्वी मान्यतेच्या अनेक स्तरातून जाते. त्यामध्ये ह्यूमन ट्रायलचा समावेश असतो. कोणत्याही उद्योगाला संशोधनासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि तरीसुद्धा अंतिमतः योग्य पदार्थ सापडेल किंवा तयार होईल याची शाश्वती शंभर टक्के असतेच असे नाही. असे असताना त्यावर अमाप खर्च करणे हे एक मोठे आव्हान असते आणि काही कंपन्याच ते स्वीकारतात आणि यश मिळवतात आणि त्याच्या आव्हानांचे संधीत रूपांतर होते.
कोविडच्या विशेषतः दुसऱ्या लाटेचा तडाखा फार मोठा होता. दुर्दैवाने या काळात औषधे, प्राणवायू, खाटांचा तुटवडा पहावा लागला. याच दरम्यान लशींवरच्या एकस्व अधिकाराची चर्चा सुरू झाली. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय संस्थांना बौद्धिक संपदेची बंधने शिथिल करण्यासाठी विनंती अर्ज केले. पेटन्टचे नियम कोविडच्या औषधे आणि उपचार प्रणाली बाबतीत शिथिल झाले तर लस कमी किमतीत उपलब्ध होईल आणि पेटन्ट धारक आणि पेशंट यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल.
या पार्श्वभूमीवर काही भारतीय बुद्धिजीवी व्यक्तींनी इतर महत्त्वाच्या घटकांना आणि प्रक्रियेलासुद्धा पेटन्ट प्रणालीमध्ये घेतले आणि कमी वेळेत त्याचे पेटन्ट घेतलेसुद्धा. सदरची पेटन्ट विशेषकरून कोविड होऊ नये या मूलमंत्रावर अवलंबून आहेत. यामध्ये विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले कोकण विभागातील सर्वात मोठे असलेल्या वालावलकर रुग्णालयाचे विषाणू प्रसार प्रतिबंधात्मक प्रक्रियेचे पेटन्ट मधील योगदान मोठे आहे. या रुग्णालयात सुरू असणाऱ्या संशोधनांमध्ये अनेक डॉक्टर प्रत्यक्ष सहभागी असतात. अत्यंत अनुभवी आणि जगभरातून ज्ञान आत्मसात केलेली ही डॉक्टरमंडळी सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून वालावलकर रुग्णालयाला त्यांचे योगदान देत असतात. वालावलकर रुग्णालयाच्या डॉ. सुधीर नाडकर्णी, डॉ. सुवर्णा पाटील व विकास वालावलकर यांच्या टीमला नुकतेच विषाणू प्रसार प्रतिबंधात्मक प्रक्रियेचे हे पेटन्ट मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे.
कोरोना बरोबर दोन हात करण्यासाठी तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आता आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत. कोविड बरोबर रहायला शिकत असताना मास्कचा वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी इतर लोकांशी अंतर ठेवून राहणे असे सर्व निकष पाळून आपण आपले दैनंदिन जीवनातील कामकाज पार पाडत आहोत. मात्र अशा परिस्थितीच कोविडची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणेही तितकेच गरजेचे आहे.
लोकांचा मोठ्या संख्येने वावर असणारी सार्वजनिक ठिकाणे साथरोगांचा प्रसार वाढण्यास पोषक ठरतात. मग लोकांची वर्दळ जास्त असणारे परिसर डिसइन्फेक्ट किंवा निर्जंतुक करणे गरजेचे असते. काही वेळा निर्जंतुकीकरणासाठी काही हानिकारक रसायनांचा बेसुमार वापर केला जातो. परिणामी परिसर निर्जंतुक झाला, तरी काही काळाने त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्वचाविकार, श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. परंतु रुग्णालये, वैद्यकीय सेवांशी निगडित असलेल्या अन्य जागा वारंवार निर्जंतुक करणे फार गरजेचे असते. रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या मंडळींनाही फार काळजी घेण्याची गरज असते. त्याचबरोबर नेहमीच्या वापरातल्या वस्तू, अगदी घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूही वारंवार निर्जंतुक करण्याची आवश्यकता भासत असते. अनेक शास्त्रज्ञ अशा समस्यांवर प्रभावी उपाय शोधत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारे निर्जंतुकीकरण केले जाते. यात थर्मल किंवा नॉन-थर्मल प्रोसेसिंग, अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर्स, मायक्रोवेव्ह बेस्ड सॅनिटायझर, व्हॅक्यूम किंवा रासायनिक प्रक्रिया करून धुऊन काढणे अशी आधुनिक तंत्र वापरली जातात. परंतु असे तंत्रज्ञान साहजिकच खूप खर्चीक असते. औद्योगिक क्षेत्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यामागचा नेमका खर्च फारसा कळून येत नाही. तंत्रज्ञान आधुनिक जरी असले तरी ते सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे असावे त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री ही बाजारपेठेमध्ये सहजरीत्या उपलब्ध असली पाहिजे. त्याचबरोबर ती प्रभावी आणि आपल्या समोरच्या समस्येला साजेसे उत्तर देणारी हवी हाच सगळा विचार मनात ठेऊन डॉ. नाडकर्णी, डॉ. पाटील आणि वालावलकर यांनी तांत्रिक तोडगा काढला आणि त्याचे पेटन्ट आम्ही त्यांना घेऊन देऊ शकलो.
निर्जंतुकीकरणासाठी पाण्याच्या वाफेचा उपयोग होतो याची आपल्या सर्वांना कल्पना असतेच. पाण्याची वाफ निर्जंतुकीकरणासाठी सुरक्षित असा घटक आहे कारण इतर अनेक रासायनिक द्रव्यांप्रमाणे वाफेचे कोणतेच दुष्परिणाम आढळून येत नाहीत. याच धर्तीवर काही प्रमाणात रासायनिक परंतु सुरक्षित असे उपकरण प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी बनविले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल आणि आपल्या भेडसावत असणाऱ्या प्रश्नाला उत्तर पण मिळेल असा विचार या डॉक्टरांनी केला. त्यांनी ओझोन आणि हायड्रोजन पेरॉक्साईड याचा वापर करून निर्जंतुकीकरणासाठी एक उपकरण बनविले.
हे उपकरण विजेवर चालते. या उपकरणाचे मुख्य असे चार विभाग पडतात. पहिल्या विभागामध्ये सॅनिटायझेशन चेंबरचा समावेश होतो. ज्या वस्तू निर्जंतुक करायच्या आहेत त्या ठेवण्यासाठी यामध्ये विशिष्ट संरचना केली आहे जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये वस्तूच्या सर्व बाजू योग्यरीत्या निर्जंतुक केल्या जातील. त्याचप्रमाणे हे चेंबर पारदर्शक आहे त्यामुळे निर्जंतुकीकरण करताना वस्तूंमध्ये काही बदल होत असेल तर लगेच निदर्शनास येते. दुसऱ्या विभागामध्ये ओझोन जनरेटर असेंब्लीच समावेश होतो. या मध्ये ओझोन वायू सॅनिटायझेशन चेंबरमध्ये सोडला जातो. तिसऱ्या विभागामध्ये हायड्रोजन पेरॉक्ससाईड मिस्ट जनरेटर असेंब्लीच समावेश होतो. यामध्ये हायड्रोजन पेरॉक्ससाईड एक विशिष्ट पद्धतीने फवारा केला जातो. हा फवारा आणि ओझोन वायूच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जाते. चौथ्या विभागामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटचा समावेश होतो यामध्ये सर्व सेन्सर आणि कंट्रोल युनिट आहेत. जे सर्व उपकरण चालविण्यासाठीची प्रक्रिया पार पाडत असतात.
थोडक्यात या प्रक्रियेच्या पेटन्टमध्ये अतिशय कमी साधनांमध्ये, सुरक्षित रसायनांचा वापर करून कमी खर्चामध्ये वस्तू उत्तमरीत्या निर्जंतुक केल्या जातात, तेही सर्वसामान्य जनतेला परवडेल असे आधुनिक तंत्रज्ञान वापरूनच. यासाठी अत्यल्प खर्च येतो परंतु वस्तू हमीपूर्वक निर्जंतुक झालेल्या असतात. वालावलकर रुग्णालयातील मातब्बर डॉक्टरांच्या या टीमने विषाणूंचा प्रसार रोखण्याच्या प्रक्रियेच्या पेटन्टच्या माध्यमातून एका मोठ्या सामाजिक प्रश्नावर तोडगा काढला आहे.