N100 मास्क!

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 28 जून 2021

पेटन्टची गोष्ट 

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. राहुल आणि डॉ. पल्लवी यांनी कोरोनाचा प्रसार का वाढतो आहे, याचा अभ्यास सुरू केला. आजार का पसरतो आहे याचा शोध घेताना राहुल आणि पल्लवी हा आजार रोखता येईल का, यावरही विचार करत होते. याच सुमारास त्यांची अभियंता असलेल्या उत्कर्ष अंकलखोपे यांच्याशी गाठ पडली. उत्कर्ष आणि डॉ. गोरे दांपत्याने अनेक कल्पनांवर चर्चा केली. त्यातली एक  कल्पना होती श्वासाद्वारे विषाणूचा माणसाच्या शरीरात होणारा शिरकाव पूर्णपणे थांबवू शकणाऱ्या मास्कची. विशेष करून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आणि अन्य फ्रंटलाइन वर्करना या विशेष मास्कची खूप गरज आहे.

कोरोनाची साथ पसरायला लागल्यावर ह्या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातल्या संशोधकांनी कंबर कसली होती. कोराना विषाणूनी जगाभोवती फास आवळायला सुरुवात केली तशी अनेक वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी, अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधनाला सुरुवात झाली होती. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नव्याने होणाऱ्या संशोधनातून अनेकविध उपाय पुढे येत असतानाच या संशोधनांच्या पेटन्टचे महत्त्वही अधोरेखित होत गेले.

जगभरात सुरू असलेल्या संशोधनाच्या या प्रयत्नांमध्ये भारतीय संशोधकही मागे नव्हते. या सगळ्या प्रवासातला एक उल्लेखनीय भाग म्हणजे परदेशातल्या विविध संस्थांमध्ये संशोधन करणाऱ्या अनेक भारतीय संशोधकांनी भारतामधल्या परिस्थितीला अग्रक्रम देत आपल्या नव्या संशोधनाचे पेटन्ट घेताना भारतीय पेटन्ट कार्यालयाची निवड केली. अशाच काही संशोधकांच्या नव्या संशोधनासाठी आम्हाला काम करायला मिळालं. या संशोधकांनी आपले पेटन्ट भारतात दाखल केलेच, पण त्या वस्तूंचे उत्पादनही भारतातच होईल याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष पुरवले. काही महत्त्वाच्या पेटन्टेड प्रॉडक्टचे उत्पादन महाराष्ट्रात सुरू झाल्याने, कोविडमुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीतही काही रोजगार निर्मिती झाली, सरकारच्या गंगाजळीतही कररूपाने काही भर पडली. 

काहीतरी नवे करण्याच्या ध्येयाने भारलेल्या संशोधकांच्या याच फळीतले एक उदाहरण म्हणजे डॉ. राहुल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे.

डॉ. राहुल गोरे आणि उत्कर्ष अंकलखोपे हे दोघेही गेली अनेक वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहेत. बालरोगतज्ज्ञ असणारे डॉ. राहुल ब्रिटिश सरकारच्या नॅशनल हेल्थ स्कीम अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. ते मूळचे पुण्याचे. एका दशकाहून अधिक काळ इंग्लंडमध्ये वास्तव्य असले तरी त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही. त्यांच्या पत्नी पल्लवीही डॉक्टर आहेत. आपल्या देशातल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा गोरे दांपत्याच्या मनात बऱ्याच काळापासून होती. कोरोनाची साथ एका दृष्टीने त्यांच्यासाठी जणूकाही एक संधीच घेऊन आली. मुळातच वैद्यकीय पेशा स्वीकारलेल्या राहुल आणि पल्लवी यांनी कोरोनाचा प्रसार का वाढतो आहे, याचा अभ्यास सुरू केला. आजार का पसरतो आहे याचा शोध घेताना राहुल आणि पल्लवी हा आजार रोखता येईल का, यावरही विचार करत होते. याच सुमारास त्यांची अभियंता असलेल्या उत्कर्ष अंकलखोपे यांच्याशी गाठ पडली. उत्कर्ष आणि डॉ. गोरे दांपत्याने अनेक कल्पनांवर चर्चा केली. त्यातली एक  कल्पना होती श्वासाद्वारे विषाणूचा माणसाच्या शरीरात होणारा शिरकाव पूर्णपणे थांबवू शकणाऱ्या मास्कची. त्यासाठी उपलब्ध असलेल्या मास्कमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. त्यावेळी एन-९५ मास्कची मागणी शिगेला पोहोचली होती, विशेष करून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आणि अन्य फ्रंटलाइन वर्करना या विशेष मास्कची गरज होती. श्वासातून नाकावाटे शरीरात जाऊ शकणाऱ्या ९५ टक्के पार्टिकल्सना रोखणारे म्हणून एन-९५ मास्कची विश्वासर्हता अधिक होती. हाच धागा पकडून डॉ. राहुल, उत्कर्ष आणि टीमने १०० टक्के पार्टिकल्स रोखू शकणाऱ्या एन-१०० मास्कच्या योजनेला आकार देण्याच्या दिशेने काम करायला सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीतून एन-१०० मास्क आकाराला आला. या शोधाच्या पेटन्टसाठी आम्ही लगेचच अर्ज दाखल केला आणि विशेष म्हणजे एका वर्षात पेटन्ट ग्राह्य झाले. आता ह्या मंडळीनी एन-१०० मास्कच्या प्रत्यक्ष निर्मितीसाठी चाकण परिसराची निवड केली आहे. 

कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये विषाणूचा हा अवतार, त्याचा प्रसार, त्याचे परिणाम या साऱ्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रही चाचपडत होते. अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरू केले होते. विषाणूला थोपवून संसर्ग कसा रोखता येईल या एकाच प्रश्नाच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या या टप्प्यात कोविडच्या लाटेच्या तीव्रतेचा अंदाज वर्तविता येत नव्हता, मात्र अपुऱ्या वैद्यकीय साधनसामग्रीचा परिणाम सर्वांनाच जाणवत होता.

या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करताना श्वसन उपकरणाद्वारे किंवा मास्कद्वारे प्राणवायू प्रभावीपणे फिल्टर करणे हाच एकमेव आणि सोपा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे डॉ. राहुल यांच्या लक्षात आले. या विचाराला अनुसरून त्यांनी अनेक छोट्या मोठ्या घटकांचा विचार त्यांच्या नव्या मास्कची निर्मिती केली. 

डॉ. राहुल यांच्या टीमने विकसित केलेल्या मास्कमध्ये उच्छ्वासासाठी, सोडलेल्या श्वासासाठी, एक विशिष्ट अशी झडप बनवली आहे. ही झडप पुन्हा वापरण्यास योग्य असते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे अधिक सोईस्कर आणि अचूक फिटिंगसाठी डिझाइन केलेली आहे. तसेच या मास्कची बॉडीही पूर्णपणे निर्जंतुक करण्यायोग्य आहे आणि हे निर्जंतुकीकरण अगदी सहज होऊ शकते. ॲसिड वगळता अन्य कोणतेही सामान्य जंतुनाशक द्रव्य वापरून तसेच अतिनील किरणे किंवा क्लोरहेक्साईडिन, ग्लूटरल्डिहाइड, क्लोरोक्साइलनॉल, आयसोप्रोपानॉल अशा काही रासायनिक द्रव्यांचा वापर करून या मास्कची बॉडी निर्जंतूक केली जाऊ शकते. अगदी साबण आणि पाणी वापरूनसुद्धा त्याचे निर्जंतुकीकरण होऊ शकते. 

या मास्कची इतरही काही वैशिष्ट्ये आहेत. या मास्कचे डिझाइन इंजेक्शन मोल्डिंग सारख्या कमी किमतीच्या उत्पादन प्रक्रियेसह मोठ्या प्रमाणात अगदी सहज तयार करता येण्याजोगे आहे. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारा फिल्टर आपण बदलू शकतो. मास्क वापरणाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार किंवा विशिष्ट परिसरातील विषाणूच्या फैलावाच्या तीव्रतेनुसार हवा तो, म्हणजे इपीए / हेपा / यूएलपीए असे फिल्टर या मास्कमध्ये वापरता येतात. त्याचबरोबर फिल्टरच्या दहा ते पंधरा घड्या बसतील अशी सोय आहे. हे फिल्टर बदलता येत असल्याने मास्क वापरण्याची किंमतसुद्धा कमी होते. एकच मास्क फिल्टर बदलून वापरल्याने निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणही नियंत्रणात राहते, हे या मास्कचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या मास्कचा अनोख्या डिझाइनमुळे मास्कच्या आतील जागा कमी आहे, त्यामुळे हा मास्क दीर्घकाळापर्यंत वापरता येतो. या वैशिष्ट्यामुळे आरोग्य सेवेतल्या ज्या ज्या लोकांना जास्तवेळ मास्क वापरण्याची गरज भासते अशा सर्वांसाठी हा मास्क वापरणे अत्यंत आरामदायक ठरते.

या मास्कमध्ये जी झडप आहे ती एका विशिष्ट कोनात बसविली आहे. ती विशेष करून एकदिशा पद्धतीने काम करते. त्याचबरोबर या झडपेद्वारे मास्कच्या आत सोडल्या गेलेल्या उच्छ्वासातील हवा आणि आर्द्रतासुद्धा बाहेर काढली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मास्क वापरणाऱ्या व्यक्तीचे बोलणे समोरच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने ऐकू येऊ शकेल. मास्क वापरणाऱ्या अनेकांच्या दृष्टीने, विशेषतः औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या दृष्टीने, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण मास्कमुळे जर संभाषण व्यवस्थित झाले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. या मास्कमध्ये जबड्याची हालचाल योग्यरीत्या करता येईल याची खबरदारी घेतली गेली आहे, त्यामुळे मास्क वापरल्यामुळे बोलणं व्यवस्थित ऐकू न येण्याची शक्यता कमी राहते.

या मास्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्व-निर्जंतुकीकरणाची सोय. मास्क वापरून झाल्यानंतर अतिनील किरणे असणाऱ्या एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवला जातो. विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा वापर करताना हा मास्क निर्जंतुक झालेला असतो.

डॉ. गोरे, उत्कर्ष आणि त्याच्या सहकाऱ्यांचे एन-१०० मास्कचे पेटन्ट हा वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठा बदल आहे, एक मोठे बौद्धिक योगदान आहे.

संबंधित बातम्या