भारतीय आंब्याच्या ‘जीआय’ची यशोगाथा..!
--
जीआय नोंदणी म्हणजे एक प्रकारे भारतातील आंब्याचा इतिहास, त्याचबरोबर त्या वाणाचे वेगळेपण सांगणारे शास्त्र याची कायमस्वरूपी सरकार दप्तरी नोंदणी, असे म्हटले तर वावगे होणार नाही आणि या नोंदणीचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना आणि हे वैशिष्टपूर्ण आंबे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होतो आहे.
भौगोलिक उपदर्शन म्हणजे ‘जीआय’ म्हणून प्रसिद्ध असणारे जिऑग्राफिकल इंडिकेशन. ‘जीआय’ला ‘आपल्या पूर्वजांचे पेटंट’ असेही म्हटले जाते कारण एखाद्या विशिष्ट भूभागात आपल्या पूर्वजांनी त्या भागातील माती, पाणी आणि वातावरणाचा योग्य उपयोग करून वैशिष्ट्यपूर्ण शेतमालाची निर्मिती केली; म्हणजेच त्यांनी आपल्या बुद्धीतून आगळे वेगळे पदार्थ निर्माण केले आणि म्हणून त्या पदार्थांना ‘जीआय’रूपी बौद्धिक संपदा मिळते.
जागतिक व्यापार संघटनेमुळे भारतात जीआय नोंदणी कायदा स्वीकारला गेला. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या या कायद्याप्रमाणे एकदा एखाद्या पदार्थाची, वस्तूची जीआय म्हणून नोंद झाली की त्या पदार्थाला, वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग खुला होतो. महाराष्ट्रातील मराठवाडा केसर आंब्याला आम्ही जीआय मिळवून देऊ शकलो आणि हा आंबा ब्रिटन आणि इतर राष्ट्रांमध्ये जीआय मार्कसह विकला गेला. कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यांनाही भौगोलिक मानांकन मिळाले आहे, आणि आता नुकतेच जुन्नरमधील आंब्याला जीआय मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमधील आंब्यांचीही जीआय नोंदणी करण्यात आली आहे. अशी जीआय नोंदणी म्हणजे एक प्रकारे भारतातील आंब्याचा इतिहास, त्याचबरोबर त्या वाणाचे वेगळेपण सांगणारे शास्त्र याची कायमस्वरूपी सरकार दप्तरी नोंदणी, असे म्हटले तर वावगे होणार नाही आणि या नोंदणीचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना आणि हे वैशिष्टपूर्ण आंबे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होतो आहे. कारण जीआय नोंदणी म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा मानला जातो. जीआय मानांकनामुळे उत्पादकाला त्याच्या उत्पादनासाठी जसा योग्य मोबदला मिळतो तशीच कमअस्सल वस्तूंमुळे होणारी ग्राहकाची फसवणूकही टळते.
सीझन संपल्यावर बाजारात दाखल होऊन हापूस नावाने विक्री होणाऱ्या ‘डुप्लिकेट’ हापूस आंब्यांवर मधल्या काळात झालेली कारवाई वाचकांना आठवत असेलच.
पश्चिम बंगालचे नोंदणीकृत जीआय आंबे !
आंब्याच्या जीआय नोंदणीमध्ये अग्रगण्य ठरलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल! जीआय कायदा भारतात आल्यापासून पहिल्या दहा वर्षातच ह्या राज्याने तीन प्रकारच्या आंब्याची जीआय नोंदणी केली. या नोंदींचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या तिन्ही जीआय नोंदी मालदा या एकाच जिल्ह्यातून करण्यात आल्या होत्या. मालदा जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या आंब्यांना वेगवेगळे जीआय मिळाले आहेत आणि तेसुद्धा २००८मध्ये.
ऐतिहासिकदृष्ट्या पश्चिम बंगालमधला मालदा जिल्हा ताग आणि तुती लागवडीबरोबरच आंब्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रसिद्ध आहे. ‘लक्ष्मण भोग’सारखे भारतातील काही स्वादिष्ट आंबे महानंदा आणि कालिंदी नद्यांच्या काठच्या भूभागात पिकतात.
या भागातील जमिनीतील वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे आंब्याच्या लागवडीसाठी अयोग्य असलेली जमीन वगळता मालदा जिल्ह्याचा प्रत्येक भाग आंब्याच्या लागवडीखाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आंब्यांच्या हंगामाची सुरुवात ‘गोपाल भोग’ आणि ‘वृंदाबन’ने होते, त्यानंतर ‘लंगरा’, ‘खिरसापती (हिमसागर)’, ‘किशन भोग’, ‘कालापहार’, ‘बॉम्बई’ आणि इतर लहान स्थानिक जाती आणि शेवटी मोठ्या ‘फजली’. सीझनचा शेवटचा आंबा आहे ‘अश्विनी’. या आंब्याची किंमत अधिक असते कारण हा आंबा येतो त्यावेळेस आंबाप्रेमींसाठी हा एकमेव आंबा उपलब्ध असतो.
मालदा लक्ष्मण भोग आंबा
निःसंशयपणे स्वादिष्ट असणाऱ्या लक्ष्मण भोग आंब्याला मालदाच्या आम्रमुकुटातील रत्न म्हटले जाते. प्रसिद्ध अल्फान्सो, हापूस, आंब्यांचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा रसाळ लक्ष्मण भोग जिभेवरच विरघळतो, असे याचे वर्णन केले जाते! कालिंदी नदीच्या काठावर आंब्याच्या अनेक बागा आढळतात. नद्यांलगतच्या मैदानी प्रदेशातली सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध गाळयुक्त चिकणमाती आंबा लागवडीसाठी आदर्श मानली गेली आहे. या प्रदेशातील उष्णकटिबंधीय हवामान आंब्यांच्या अनेक प्रकारच्या देशी वाणांच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. आंब्यांच्या या वाणांमध्ये कीड आणि रोगांविरुद्ध प्रचंड प्रतिकारही विकसित केला आहे. मालदा भागातील अनेक आंबराया हवामानाच्या लहरींचा सामना करीत शतकानुशतके टिकून आहेत. मालदा लक्ष्मण भोग आंब्याला २००८मध्ये जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅग (GI) देण्यात आला.
मालदा खिरसापती (हिमसागर) आंबा
मालदातील सर्वात गोड आणि चविष्ट आंब्यांपैकी एक म्हणजे हिमसागर. स्थानिक भाषेत तो खिरसापती म्हणूनही ओळखला जातो. मालदा जिल्ह्याच्या परिसरातील जमीनदारांनी अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून लागवडीखाली आणलेल्या अनेक बागा आहेत. शेकडो एकर जमिनीवर पसरलेल्या या बागा आजही उत्कृष्ट दर्जाच्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत. परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या देशी वाणांच्या वाढीसाठी या पट्ट्यातील जुन्या गाळाची लाल माती आणि उष्णकटिबंधीय हवामान अनुकूल आहे. हिमसागरचे वैशिष्ट्य म्हणजे या फळामध्ये फायबर क्वचितच असते. फळ अंडाकृती आकाराचे, जाड सालीचे, आकाराने मध्यम ते मोठे आणि चवदार गोड असते. या आंब्यात साखर/आम्ल मिश्रण उत्कृष्ट असते. कच्च्या हिमसागर आंब्याचे तुकडे उन्हात वाळवून भारतभर विकले जातात. आम सोट्टो आणि इतर अनेक बंगाली खाद्यपदार्थांमध्ये वाळवलेल्या हिमसागर आंब्याचा वापर होतो. हिमसागर आंबे वापरून बनवलेले मसाले, जाम आणि लोणचेदेखील बाजारात खूप लोकप्रिय आहेत. बंगालच्या या आंब्याला २००८मध्ये भौगोलिक मानांकन (GI) प्रदान करण्यात आले.
फजली आंबा
आंब्यांच्या इतर वाणांचा हंगाम संपता संपता बाजारात येणाऱ्या या फळाला आरापूर गावातील फजल बीबीवरून ‘फजली’ हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. महानंदा आणि कालिंदी नद्यांच्या किनारी पट्ट्यात आढळणारी सेंद्रिय गाळयुक्त माती आंब्याच्या लागवडीसाठी पोषक आहे. या गाळयुक्त मातीमुळे फजली आंबे रसदार होतात. आकार आणि वजनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या फजली आंब्याची फळे एक-दोन फळे झाडावरच पिकून खाली पडली की आंबा काढणीयोग्य झाल्याचे समजले जाते. त्यानंतर आंबे एका विशिष्ट पद्धतीने उतरवले जातात. फळे उतरवत असताना जमिनीवर पडून फळांचे नुकसान होऊ नये म्हणून आंबे पाण्याने भरलेल्या भांड्यांमध्येच उतरवले जातात. या जातीच्या आंब्यात फायबरचे प्रमाण कमी असते. हा आंबा आकाराने बऱ्यापैकी मोठा आणि वजनदार आहे. एकाएका फळाचे वजन सुमारे ७०० ग्रॅमपासून ते अगदी दीड किलोपर्यंत असू शकते. फजलीला २००८मध्ये जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅग (GI) प्राप्त झाला.
उत्तर प्रदेशातील जीआय मिळालेला आंबा!
उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील प्रसिद्ध मलिहाबाद हे आंब्याचे खास ठिकाण मानले गेले आहे, काही मंडळींच्या मते भारताची आंब्याची ‘राजधानी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात आंब्याच्या सातशेपेक्षा जास्त जाती आढळतात. आणि या आंब्यांची एकूण उलाढाल सरासरी दीडशे कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
गेली काही शतके नवाब आणि जमीनदारांच्या बागांची शान असणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंब्यांच्या वाणांपैकी खरोखरच सर्वोत्तम आंबा कोणता हे निश्चित करणे खरोखरच कठीण काम आहे. देशातल्या अन्य भागांप्रमाणेच उत्तर प्रदेशातल्याही आंब्याच्या जातींची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, बलस्थाने आहेत. उदाहरणार्थ, मलिहाबादपासून सुमारे सहा मैल अंतरावरचे दसेरी नावाचे छोटेसे ठिकाण. दशेरी किंवा दशहरी हा भारतभरातल्या प्रसिद्ध आंब्यांमध्ये गणला जातो. आंब्यावर काम करणाऱ्या लखनौच्या संस्थेच्या म्हणण्यानुसार दशेरी आंब्यांची काही झाडे दोनतीनशे वर्षे जुनी आहेत. या झाडांचा इतिहास लखनौच्या नवाबांच्या इतिहासाशी जोडलेला आहे. काकोरी परिसरातील दसेरी किंवा दशहेरी गावातील आंब्याची झाडे दशेरी आंब्यांचे मातृवृक्ष असल्याचे मानले जाते. हंगामातील पहिले फळ नवाबांकडे पोचविल्याशिवाय आंब्यांचे व्यवहार सुरू होत नसत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दशेरी आंब्याचे मूळ झाड ही एक दैवी देणगी होती, त्यामुळेच त्याला एक अविट गोडी आणि सुगंध लाभला आहे. आणखी एका ऐतिहासिक दस्तावेजानुसार लखनौचा दशहरिचा पट्टा पठाणांनी वाढवला. हे पठाण नंतर याच बागात स्थायिक झाले. दशेरीची चव चाखण्यासाठी मुघल राजवटीत मिर्झा गालिब कर गोळा करण्यासाठी मुद्दाम कलकत्त्याहून खास लखनौमार्गे प्रवास करण्याचा आग्रह धरत असे. आंब्याच्या दावत-ए-आममधील त्यांच्या अनेक आठवणीत, ‘रुत आम की आये और ना हो यार; जी अपना है किसी रुत से बेजार' अशी एक खास म्हण प्रचलीत आहे. या गोड रसाळ दशहरी आंब्याला २००९मध्ये जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅग (GI) मिळाला.
कर्नाटकचा अप्पेमिडी आंबा
कर्नाटक राज्य समृद्ध आंब्याच्या विविधतेसाठी ओळखले जाते येथील शिमोगा जिल्ह्यातील सागर, रिप्पोनपेट आणि होसानगरा तालुक्यात, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील अघनाशिनी, काली, बेदथी, शरावती आणि वरदा या नदीच्या खोऱ्यांमध्ये पिकणाऱ्या आंब्यांच्या सर्वात अनोख्या प्रकारांपैकी एक आहे अप्पेमिडी आंबा! स्थानिकांचे म्हणण्याप्रमाणे आंब्याची ही जात पश्चिम घाटातील जंगलातील मूळ जात आहे, उत्तर कन्नडा आणि शिमोगा जिल्ह्यातील अघनाशिनी, कुमुदवती, काली, वरदा, बेदथी आणि शरावती नदीच्या खोऱ्यात शेकडो वर्षे जुनी आंब्याची झाडे आढळतात. त्यांच्या पूर्वजांच्या काळात अप्पेमिडीचे हजारो वाण होते, असे या भागातले शेतकरी सांगतात. पण आज मात्र काहीशे जातीच आढळतात. नामशेष होणाऱ्या या खास आंब्याला जीआय मिळाल्यामुळे पुनर्जीवन प्राप्त झाले आहे.
जीआय टॅग मिळालेल्या भारतीय आंब्यांच्या या काही जाती. आपल्याकडील या आणि आंब्यांच्या इतरही अनेक जातींना मिळालेला जीआय मिळाला ही शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने, खऱ्या अर्थाने चांगली बाजू आहे. जीआय टॅगमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर या सर्व आंब्याची निर्यात होऊ लागल्याने आपल्याला परकीय गंगाजळी प्राप्त होत आहे, एकंदरीतच भारतीय आंब्याचे जीआय राष्ट्रीय अर्थकरणात मोठे योगदान देत आहेत.