‘तेरे पास रहूँगी मैं भी...’

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

कव्हरस्टोरी

मला कधी लताची एखादी लकब किंवा एखादं खास वैशिष्ट्य कधी वेगळं काढून सांगता येत नाही. स्वच्छ, परिपूर्ण आणि अचूक स्वर हेच तिच्या गाण्याचं वैशिष्ट्य, परफेक्शन हीच तिची लकब. स्वर अचूक लागला की भाव उमटणारच!

आपण लहानाचं मोठं होत असताना कुणी आपल्याला आपल्या आई-वडील-भावंडं यांची ओळख करून देतं का? तर नाही, ते असतातच आपल्यासाठी आपल्याबरोबर. लताच्या बाबतीतही तसंच; कुणी कधी मुद्दाम सांगावं लागलं नाही, की ही जी गातेय ना, ही लता आहे! समजायला लागल्यापासून सतत एखाद्या जवळच्या आप्तासारखा हा ‘लतास्वर’ माझ्याबरोबर आहे! 

आई सांगते, माझ्या बारशाच्या वेळी; आमच्याकडे स्पूलचा टेपरेकॉर्डर होता, त्यावर लताचं ‘नीज वो श्रीहरी’ हे गाणं वाजवलं होतं. तेव्हापासूनच माझं तिच्याशी नातं आहे म्हणजे! पुढे माझ्या मुलीला जोजवताना मी ‘धीरेसे आजा री अखियन में’ किंवा ‘नीज माझ्या नंदलाला’ म्हणत हा सिलसिला चालू ठेवला. घरात सर्वांनाच गाण्यांचं वेड होतं. त्यामुळे ‘मंगल प्रभात’ ते ‘बेलाके फूल’पर्यंत दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी लताची सोबत असेच. 

एकदा बाबा ‘अभंग तुकयाचे’ ही रेकॉर्ड घेऊन आले. वर उषा मंगेशकर यांनी काढलेलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं चित्र होतं. मागे लता मंगेशकर आणि श्रीनिवास खळे यांचा तुकारामांची गाथा हातात घेतलेला फोटो होता. आमच्या घरी तीच गाथा होती, बाबा रोज वाचायचे. ती सगळी गाणी ऐकताना मनाला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श लख्ख आठवतोय. ‘भेटी लागे जीवा..’ ऐकताना त्या नकळत्या वयातसुद्धा आत काहीतरी हललं होतं नक्कीच!

लताच्या बरोबरीनं इतरही अनेक गायक ऐकले, भावले. शाळा कॉलेजच्या त्या वर्षांमध्ये तर मला वाटतं अभ्यासापेक्षा जास्त वेळ गाणी ऐकण्यात गेला असणार. प्रत्येक गायकाच्या लकबी पण पाठ झाल्या होत्या. पण मला कधी लताची एखादी लकब किंवा एखादं खास वैशिष्ट्य कधी वेगळं काढून सांगता येत नाही. स्वच्छ, परिपूर्ण आणि अचूक स्वर हेच तिच्या गाण्याचं वैशिष्ट्य, परफेक्शन हीच तिची लकब. स्वर अचूक लागला की भाव उमटणारच!

सुरेश वाडकर म्हणाले होते, ‘संगीतकार-गीतकार यांच्या कामाला कुठंही धक्का न लावता लता त्या गाण्यावर कुठंतरी आपली स्वाक्षरी करून जाते.’ त्यानंतर ही लताची सही शोधायचा नाद लागला आणि ऐकताना गंमत येत गेली. ‘ये कहाँ आ गए हम’मधला ‘मुलायम’चा मुलायम उच्चार, ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’मधला साजनचा अधिकार सांगणार ‘अधिकार’चा उच्चार, किंवा ‘दिलसे भुला दो तुम हमे’मधले ‘कैसे मनाएगा कोई रूठे हुए नसीब को’ म्हणताना ‘मनाएगा’वरचे मनविणे, किंवा ‘अनुराधा’मधल्या ‘सांवरे सांवरे’ मधले वाद्यमेळाबरोबरचे अद्वैत (त्यात मधेच ‘जाओ’ म्हणून दिलेला हलकासा धक्का), किंवा ‘न तुम बेवफा हो न हम बेवफा है’मधल्या प्रत्येक ‘बेवफा’ शब्दावर, किंवा ‘कळा ज्या लागल्या जीवा’मध्ये ‘पुढे जाऊ? वळू मागे? करू मी काय रे देवा? खडे मारी कुणी, कोणी हंसे, कोणी करी हेवा’ यातले प्रत्येक प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम लतानं गाण्यातून ‘लिहिलेलं’ बघून... ही स्वाक्षरी सापडते आणि माझं थक्क होणं काही थांबत नाही, थांबणार नाहीच!

‘मेघा छाये आधी रात’मध्येही ‘बता दे मैं क्या करू’वर, ‘जो हमने दास्ताँ अपनी सुनायी’मध्ये ‘आप क्यों रोये’वर, ‘दुनिया करे सवाल’मध्ये ‘क्या जवाब दें’वर असंच प्रश्नचिन्ह ‘लिहिलेलं’ ऐकू येतं. लतानं तिच्या स्वरातून गाणी वाचायला शिकवलं.

‘केहेनेको बहोत कुछ था अगर केहेनेपे आते’ किंवा ‘मौत भी आती नहीं आंस भी जाती नहीं’ अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या ओळी ऐकताना या बाईंच्या स्वरापुढे नतमस्तक होऊन ‘गाणे आहे उदास तरी गमते मनोहर’ अशी अनुभूती येते.

हिमालयात ट्रेकिंग करताना छाया-प्रकाशाचा खेळ बघून ‘लिपटते ये पेडोंसे बादल घने रे, ये पलपल उजाले ये पलपल अंधेरे’ ही ओळ आठवतेच हमखास. गंगेच्या पात्राकडे बघताना आपसूकच ‘नदिया धीरे बहो’ येतं ओठावर. आडवाटेवरच्या जुन्या शिवमंदिरात गेल्यावर ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हेच मागणं येतं मनात!

 आवडत्या कलाकाराची अनवट, वेगळी गाणी ऐकणं ही गीत रसिकांना पर्वणी असते. पण अगदी गाजून वाजून गुळगुळीत झालेल्या गाण्यातसुद्धा लता मधेच लख्खकन चमकून जाते. कितीही वेळा ऐकलं तरी ‘मुझे मिल गया बहाना’मधलं ते ‘आहाहा हा’ ऐकायला किंवा ‘मेघा छाये’मधला ‘रूठ गए रे सपने सारे’च्या आधीचा हलकासा आलाप ऐकायला प्राण कानात आणून मी आतूर असते. ‘ऐ मेरे वतन के लोगो’, ‘प्रेम स्वरूप आई’ आणि ‘सरणार कधी रण प्रभु तरी’ ही गाणी ऐकताना प्रत्येक वेळी डोळे पाणावतात.

बाबा लताहून एक वर्षानं लहान. बाबा आता गात नाहीत. आपणहोऊन काही ऐकतही नाहीत फारसे. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो की त्यांच्या आवडीची गाणी लावतो. ‘तुज स्वप्नी पाहिले गोपाला’ किंवा ‘छुन छुन बाजे पायल मोरी’ ऐकलं की त्यांचे डोळे चमकतात, चेहऱ्यावर ओळखीचं हास्य उमटतं, बोटं टेबलावर ताल धरतात. त्यांच्या मनातले जुने धागे परत विणले जातात.

गेल्या रविवारी लता गेली. म्हणजे नक्की काय झालं कळत नाहीय. मनात दाटून आलं, अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिये... तिचा अमर स्वर असलेल्या जगात देह रूपानं मी आहे पण ती नाही. पण खरंतर तिचा माझा बंध, फक्त स्वरांचा; तो घट्ट आहेच की!

कुणी जवळचं गेलं की सांत्वन करताना लताचाच स्वर मला सांगतो, ‘...आणि जागा हो मोकळी तळाशी, पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी!’ 

तीच म्हणून गेलीये, ‘बहारें हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे?’

तिनंच तर बजावलंय, ‘बहारें फिरभी आयेगी, मगर हमतुम जुदा होंगे’

पण तिनं वचनही दिलं आहे, ‘जीवनसीमा के आगे भी आऊंगी मैं साथ तुम्हारे’

ती म्हणतेय, देहरूपानं नसले तरी काय झालं, ‘मेरी आवाज़ ही पेहचान है!’

मला ती सांगून गेली आहे, ‘नजर आऊँ या ना आऊँ, तेरे पास रहूँगी मैं भी!’

मग मीही मलाच आठवण करून देते, ‘उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!’

मी असेन तोवर लता असेलच!

संबंधित बातम्या