२०२२ मधली इस्रोची पहिली यशस्वी मोहीम

अरविंद परांजपे
सोमवार, 7 मार्च 2022

खगोलशास्त्राच्या सीमेवर

ता.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांनी इस्रोच्या पीएसएलव्ही उपग्रह प्रक्षेपकाने अंतराळात  झेप घेतली. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि अभियंत्यांनी आखलेल्या मार्गानेच या उपग्रह प्रक्षेपकाने प्रवास करून भारतीय अंतराळ संस्थेची (इस्रो) या वर्षातली पहिली मोहीम यशस्वी केली. हे पीएसएलव्हीचे ५४ वे उड्डाण होते. 

एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातल्या दुसऱ्या वर्षात भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) आखलेल्या पहिल्या मोहिमेचा मुख्य प्रवासी होता ईओएस -०४ (EOS-04) हा उपग्रह. उड्डाणानंतर सुमारे १७ मिनिटांनी उपग्रहाला त्याच्या कक्षात सोडण्यात आले. पुढच्या मििनटभरातच पीएसएलव्ही उपग्रह प्रक्षेपकाने उरलेल्या दोन -आयएनएस -२ टीडी (INS-2TD ) आणि इन्स्पायरसॅट -१ (Inspiresat-1) -प्रवाशांनाही त्यांच्या कक्षेत सोडले.

त्यानंतर सुमारे चार मिनिटांनी या उपग्रह प्रक्षेपकाला निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही जवळपास १० मिनिटे चालू होती. ही प्रक्रिया महत्त्वाची असते, अन्यथा प्रक्षेपक भरकटून नुकसान करण्याची शक्यता असू शकते. 

सहा महिन्यांपूर्वी (ऑगस्ट २०२१)  जीएसएलव्हीएफ १०/ ईओएस -०३च्या असफल मोहिमेनंतरची आणि या वर्षातील इस्रोची ही पहिली आणि यशस्वी मोहीम होती, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य. इस्रोच्या पीएसएलव्हीच्या सफल मोहिमांचा विक्रम जवळ जवळ १०० टक्के आहे. आणि ज्या मोहिमा यशस्वी झाल्या नव्हत्या त्या अगदी सुरूवातीच्या काळातील होत्या.

इस्रोच्या या यशस्वी मोहिमेद्वारे अंतराळात प्रक्षेपित केले गेलेले ‘प्रवासी’ होते तरी कोण? 

अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट -ईओएस -०४ (EOS-04 ) हा कृत्रिम उपग्रह पृथ्वीचे निरिक्षण घेण्याच्या कृत्रिम उपग्रहांच्या मालिकेतला चौथा उपग्रह.  याचे एकूण वजन १७१० किलोग्रॅम आहे आणि याचा कार्यकाळ १० वर्षाचा आखण्यात आला आहे. रडार यंत्रणेचा वापर करून हा उपग्रह  आपल्याला पृथ्वीची खूप सुस्पष्ट छायाचित्रे पाठवेल.

रडार निरीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला ढगांच्या आरपार असलेल्या वस्तूंचे अचूक निरीक्षण करता येते.  ‘रडार’ म्हणजे रेडिओ डिटेक्शन ॲण्ड रेंजिंग अर्थात रेडिओ लहरींचा वापर करून एखाद्या वस्तूचा शोध घेणे आणि त्या वस्तूचे अंतर निश्चित करणे. यात काही ठरावीक तरंग लांबीच्या रेडिओ लहरी प्रसारित करण्यात येतात. आणि जर एखाद्या वस्तूने त्या परावर्तित केल्या तर त्याच्या निरीक्षणातून ती वस्तू किती अंतरावर आहे आणि तिची गती किती आहे हे कळू शकते. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या विमानांचा शोध घेण्यासाठी या तंत्राचा वापर सुरू झाला होता. आज या तंत्रज्ञानाचा उपयोग महामार्गांवर गाड्यांची गती मोजण्यापासून अनेक ठिकाणी होतो.  ईओएस आपल्याला पृथ्वीवरच्याही अनेक गोष्टींची माहिती देणार आहे. उदाहरणार्थ शेती व वनसंपदा. इतकेच नव्हे तर या उपग्रहाद्वारे होणाऱ्या निरीक्षणांतून  मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबंधी खूपच अचूक माहिती मिळणार आहे.  ही माहिती या पूर्वी अशाच निरीक्षणांसाठी सोडण्यात आलेल्या रिसोर्ससॅट आणि कार्टोसॅट उपग्रहांनी पाठवलेल्या निरीक्षणांना पूरक ठरणार आहे.  येत्या काळात इस्रो अशा प्रकारचे आणखी पाच उपग्रह पाठवण्याची तयारी करत आहे. 

या मोहिमेतील दुसरा प्रवासी होता  आयएनएस -२ टीडी (INS-2TD ) हा एक नॅनो सॅटेलाईट आहे. इस्रोने विकसित केलेला हा कृत्रिम उपग्रह तंत्रज्ञान निदर्शक (Technology Demonstrator) उपग्रह आहे.  यात एक थर्मल इमेजिंग कॅमेरा आहे. हा कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरील विविध जागांवरील तापमानाचे मूल्यांकन करेल. आयएनएस -२ टीडीच्या पुढच्या आवृत्या या भारत आणि भूतानच्या संयुक्त प्रकल्पाची नांदी आहे. 

नॅनोसॅटेलाईट म्हणजे एक किलो ते १० किलो दरम्यान वजन असणारे कृत्रिम उपग्रह. असे कृत्रिम उपग्रह प्रायोगिक असतात. एक मोठा उपग्रह पाठवण्याअगोदर असा नॅनोउपग्रह पाठवून तो कशा प्रकारे काम  करतो हे जाणून घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे गटही असे उपग्रह पाठवण्या3चा प्रकल्प करतात, त्यातून त्यांना खूप शिकायला मिळते.  या श्रेणीतील एक उपग्रह आहे, ‘क्यूब सॅट’. याचा आकार  १० बाय १० बाय १० सेंटीमीटर असतो.  

तिसरा प्रवासी होता इन्स्पायरसॅट -१ (INSPIREsat-1) एखाद्याला इन्स्पायर करणे म्हणजे त्याला प्रेरणा देणे. मात्र उपग्रहाच्या नावातला INSPIRE हा शब्द International Space Program in Research and Education या कार्यक्रमाच्या अद्याक्षरांपासून बनवण्यात आला आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी कोलोरॅडो विद्यापीठाच्या अॅटमॉस्फेरिक आणि स्पेस फिजिक्सच्या प्रयोगशाळेच्या सहकार्याने इन्स्पायरसॅट -१ विकसित केला आहे.  यात सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Nanyang Technological University -NTU) आणि तैवानमधील नॅशनल सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या (National Central University -NCU) विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

इन्स्पायरसॅट -१मध्ये दोन उपकरणे आहेत. ती पृथ्वीच्या आयनोस्फियरचा आणि सूर्याच्या कोरोनाचा किंवा किरीटाचा अगर प्रभावलयाचा अभ्यास करतील. 

आयनोस्फियरची म्हणजे पृथ्वीच्या वरच्या वातावरणाची सुरुवात भूपृष्ठावरून सुमारे ४८ किलोमीटर वरून होते आणि हे वातावरण  ९६५ किलोमीटर उंची पर्यंत असते. इथे वातावरण सूर्याच्या विकिरणांमुळे आयनीकृत झालेले असते.  

कोरोना म्हणजे सूर्याच्या भोवतीचे वातावरण. सध्याच्या काळात दचकायला लावणारा कोरोना हा मूळचा लॅटीन शब्द आहे, त्याच्या अर्थ मुकुट किंवा डोक्यावर बांधलेला पुष्पहार. सूर्याच्या कोरोनाचे तापमान काही लाख  अंशापर्यंत असते पण या कोरोनाची घनता खूप कमी असल्यामुळे हा आपल्याला फक्त खग्रास ग्रहणाच्यावेळीच दिसतो. याचे तापमान इतके जास्त का या प्रश्नाचे अचूक उत्तर शास्त्रज्ञांना अजून सापडले नाही. आणि त्याचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येत आहे. याची चर्चा आपण या लेख मालेतील पहिल्या लेखात पार्कर सोलार प्रोबच्या संदर्भात केली होती.

भारताने आतापर्यंत ज्या ५३ यशस्वी अवकाश मोहिमा राबवल्या आहेत त्यातील २१ मोहिमा भूपृष्ठाचा अभ्यास करण्यासाठी आहेत. आणखी २१ मोहिमा दळणवळणासाठीच्या आहेत. आठ मोहिमांतील कृत्रिम उपग्रह प्रामुख्याने सागरी वाहतुकीसाठी उपयोगी आहेत, तर उर्वरित तीन मोहिमा फक्त विज्ञानाच्या विविध शाखांच्या अभ्यासासाठी आहेत.

आपण इस्रोच्या मोहिमांच्या नावांमध्ये काही अक्षरे नेहमी बघतो. त्यातील काही अक्षरांचे अर्थ असे आहेत. 

  •  PSLV नंतर जेव्हा  ‘D’ अक्षर येते तेव्हा त्याचा अर्थ Developmental किंवा विकासात्मक असा आहे, म्हणजे ही मोहीम इस्रोची स्वतःची मोहीम आहे आणि त्याच्या विकासाच्या परीक्षणासाठी आहे.
  •  
  •  PSLV नंतर जेव्हा ‘C’ अक्षर येते तेव्हा त्याचा अर्थ Continuous किंवा अविरत असा आहे. म्हणजे त्याचा विकास पूर्ण झाला आहे. काहींना  C अक्षर हे Commercial किंवा व्यावसायिक मोहिमा आहेत असे वाटते, पण ते बरोबर नाही. 
  •  
  •  PSLV म्हणजे Polar Satellite Launch Vehicle किंवा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन - हे प्रक्षेपक उपग्रहांना ध्रुवीय कक्षेत स्थापन करतात. उपग्रहाची ही कक्षा पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरून किंवा त्यांच्या खूप जवळून जाते. हे उपग्रह सुमारे ६०० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीची परिक्रमा करतात.  जेव्हा एखाद्या उपग्रहाच्या नावामध्ये ‘सॅट’ हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ सॅटेलाईट म्हणजे कृत्रिम उपग्रह असा आहे.

संबंधित बातम्या