गांधीलमाशी

भूषण तळवलकर
सोमवार, 13 डिसेंबर 2021

विशेष

१९७१मध्ये लढल्या गेलेल्या भारत-पाक युद्धातील निर्विवाद विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. चालू पंधरवडा हा त्या युद्धाचा प्रत्यक्ष कालखंड आहे. या युद्धात सहभागी असलेल्या ‘ओसा’ श्रेणीच्या रशियन क्षेपणास्त्रनौकांमधली ‘चपल (के ९४)’ ही नौका कारवारच्या रवींद्रनाथ टागोर किनाऱ्यावर जतन करून ठेवली आहे. ‘ओसा’ या रशियन शब्दाचा अर्थ गांधीलमाशी. पण गांधीलमाशी केवळ आपल्या स्थानाचेच रक्षण करेल का? आपल्या प्रदेशात येणाऱ्या घुसखोरांना ती दूरवर त्यांच्या प्रदेशात जाऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही.

सन१९६२ आणि १९६५च्या युद्धांत थेट सहभागाची फारशी संधी न मिळालेल्या भारतीय नौदलाने १९७१च्या युद्धात मात्र बेजोड कामगिरी करत युद्धाच्या पहिल्याच दिवसापासून अखंडित विजयमालिका सुरू केली. आपली ‘विक्रांत’ ही विमानवाहू नौका बुडवण्याच्या इराद्याने आलेल्या पाक नौदलाच्या ‘गाझी’ या पाणबुडीला ३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री बंगालच्या उपसागरात जलसमाधी मिळाली आणि नौदलाच्या पूर्व निदेशालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल नीलकांता कृष्णन यांनी विजयमोहिमेचा शुभारंभ केला. लगोलग ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडंट’ मोहिमेत पश्चिम निदेशालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल सुरेंद्रनाथ कोहली यांनी कराची बंदरावर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले घडवून आणले. शत्रूला त्यातून सावरायला अवसर न देता पुन्हा एकदा ७ आणि ८ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन पायथन’ अंतर्गत हल्ल्याची पुनरावृत्ती करत भारतीय नौदलाने पाक नौदलाचे अपरिमित सामरिक आणि आर्थिक नुकसान केले. कराची बंदरावरील हल्ल्यात वापरल्या गेलेल्या ‘ओसा’ श्रेणीच्या क्षेपणास्त्र बोटीचा आणि या विजयगाथेचा कारवारच्या किनाऱ्यावर आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. 

भारतातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर ब्रिटनने स्वतंत्र भारताच्या नौदल उभारणीस हातभार लावला असला तरी पुढे साम्राज्यवादी आणि साम्यवादी राष्ट्रांच्या झालेल्या गटविभागणीत ब्रिटनने सहकार्याचा हात आखडता घेतला. भारतीय नौदलातील तेव्हाचे कमांडर नीलकांता कृष्णन १९५३ साली पोर्टस्मथ येथे झालेल्या राणी एलिझाबेथच्या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होते. ते त्यावेळी ‘भानौपो तीर’चे नेतृत्व करत होते. त्या सोहळ्यासाठी तेथे आलेल्या रशियन युद्धनौकांचे सामर्थ्य पाहून कृष्णन हरखून गेले. पुढे १९६४-६५ साली लंडनच्या इम्पिरिअल डिफेन्स कॉलेजमधील अभ्यासक्रमादरम्यान त्यांनी रशियाने बनवलेल्या ‘ओसा’ श्रेणीच्या छोट्या क्षेपणास्त्र नौकांचा विशेष अभ्यास केला. १९६५चे युद्ध भडकल्यानंतर सोव्हिएत रशियाने केलेल्या आवाहनानुसार ताश्कंद येथे झालेल्या करारान्वये युद्धबंदी झाली असली, तरी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपल्यामुळे पाक पुन्हा अशीच आगळीक करणार याची खात्रीच तेव्हाचे अॅडमिरल अधरकुमार चतर्जी, रिअर अॅडमिरल कृष्णन, रिअर अॅडमिरल कर्सेटजी यांना होती. राष्ट्रनेत्यांकडे मागणी लावून धरत त्यांनी १९६७मध्ये रशियन नौदलप्रमुख ग्रँड अॅडमिरल सर्जी गोर्शकोव्ह यांना दिल्लीला आमंत्रित करून त्यांच्याबरोबर ‘ओसा’ श्रेणीच्या नौका संपादित करण्याबाबत चर्चा केली. अॅडमिरल कृष्णन यांनी लगोलग रशियातील बाकूच्या नौदलतळाला भेट देत या नौकांचा अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार भारताने १९७० साली ओसा श्रेणीच्या आठ क्षेपणास्त्र नौका रशियाकडून मिळविल्या. तेव्हा पश्चिम निदेशालयाचे प्रमुख असलेल्या अॅडमिरल कृष्णन यांनी या नौकांसाठी मुंबई बंदरात कॅप्टन मुधोळकर यांच्या सहकार्याने ‘त्राता-२’ या नावाने एक खास तळही उभारला. पी १५ टर्मिट किंवा स्टाईक्स नावाने परिचित असलेली सुमारे सव्वादोन टन वजनाची, ७४ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर नौकेतून नौकेवर मारा करणारी क्षेपणास्त्रे हे २४५ टन वजनाच्या या नौकांचे प्रमुख बलस्थान होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शत्रूच्या युद्धनौकांच्या टप्प्यात मुंबई येण्याआधीच भर समुद्रात क्षेपणास्त्रे डागून त्या उद्ध्वस्त करणे हा ‘ओसा’ नौकांचा मुख्य हेतू असला तरी त्यांचा वेगळा उपयोग करण्याची योजना अॅडमिरल नंदा आणि व्हाइस अॅडमिरल कोहली गुप्तपणे आखत होते. त्यामुळे ‘पाकने पुन्हा आगळीक केल्यास पाकिस्तानी नौदल आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले कराची हे आमचे प्रथम लक्ष्य असेल, कारण माझी नौदल कारकीर्द तिथेच सुरू झाल्यामुळे मला कराची बंदराची खडानखडा माहिती आहे!’ असा सज्जड इशाराच अॅडमिरल नंदा यांनी दिला होता. 

या मोहिमांबद्दलच्या उपलब्ध नोंदींनुसार, डिसेंबर १९७१च्या ३ तारखेला युद्धाला तोंड फुटताच आधीच नियोजन केलेल्या ‘ट्रायडंट’ योजनेनुसार निःपात (के ८६), निर्घात (के ८९) आणि वीर (के ८२) या तीन किलर (के) श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौका किलतान आणि कच्छाल या पाणबुडीविरोधी कोर्व्हेट नौका आणि पोषक या इंधनपुरवठा नौकांबरोबर कराचीच्या रोखाने निघाल्या. या हल्ल्यात वाचलेल्या काही नाविकांकडून पाक नौदलाला भारतीय नौदलाने ओसा श्रेणीच्या संरक्षक नौका वापरून हा हल्ला केल्याचे समजले. पाक नौदलाने या हल्ल्याचा इतका मोठा धसका घेतला होता की ६ डिसेंबरला पाकिस्तानच्या एका भेदरलेल्या टेहळणी विमानाने त्यांच्याच ‘झुल्फिकार’ या फ्रिगेटला चुकून भारतीय क्षेपणास्त्र नौका समजून धोक्याचा संदेश दिला. लगोलग पाकिस्तानी लढाऊ विमानांनी ‘झुल्फिकार’ वर हल्ला चढवत तिला चांगलेच जायबंदी केले!  

‘ट्रायडंट’ पाठोपाठ ८ आणि ९ डिसेंबरच्या रात्री भारतीय नौदलाने पायथन मोहिमेने या हल्ल्याची पुनरावृत्ती केली. या दोन्ही मोहिमांमध्ये पाकिस्तानी नौदलाला सपाटून मार बसला. कराची बंदराजवळचे तेलसाठेही भारतीय नौदलाने उद्ध्वस्त केले. खिळखिळ्या झालेल्या कराची बंदरावर पुढच्या काही दिवसांत भारतीय हवाईदलाने एवढे प्रखर हल्ले केले, की पाकिस्तानने अरबी समुद्रावरच्या आपल्या सर्व युद्धनौका इंधन आणि दारुगोळ्याअभावी परत बोलावल्या! या दोन्ही मोहिमांत भारतीय नौदलाची जराही हानी झाली नाही. उलट संपूर्ण अरब सागरक्षेत्रावर भारताचा वरचष्मा प्रस्थापित होऊन जगभरात भारताची प्रतिमान ‘शक्तिपती राष्ट्र’ अशी बदलली! 

‘ओसा’ या रशियन शब्दाचा अर्थ गांधीलमाशी असा होतो. पण गांधीलमाशी केवळ आपल्या स्थानाचेच रक्षण करेल का? आपल्या प्रदेशात येणाऱ्या घुसखोरांना ती दूरवर त्यांच्या प्रदेशात जाऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. ‘ट्रायडंट’ आणि ‘पायथन’ मोहिमांद्वारा ‘ओसा’ या नावाचा खरा अर्थ लावत तिच्या संरक्षणात्मक प्रहारक्षमतेला कल्पक भारतीय नौदलाने एवढे भेदक आणि आगळेवेगळे परिमाण दिले की खुद्द रशियन नौदलनेत्यांनी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची दिलखुलास प्रशंसा केली. या दोन्ही मोहिमा नौदल अभ्यासात एक अध्याय बनून राहिल्या आहेत. ‘ट्रायडंट’ मोहिमेचा ४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतीय नौदलदिन म्हणून साजरा होतो.   

ओसा श्रेणीच्या आठ नौकांमधलीच एक ‘चपल (के ९४)’ ही क्षेपणास्त्रनौका कारवारच्या रवींद्रनाथ टागोर किनाऱ्यावर संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करून ठेवली आहे. यात नौसैनिकांचे पुतळे त्यांच्या विशिष्ट जागी काम करत असल्याच्या स्थितीत ठेवले आहेत. स्टाईक्स क्षेपणास्त्राच्या नमुन्याबरोबरच इतरही अनेक क्षेपणास्त्रे तिथे पाहता येतात. इंजिन कक्ष, नियंत्रण कक्ष, क्षेपणास्त्र नळ्या, नौसैनिकांचे राहण्याचे कक्ष इत्यादी पाहता येतात. सर्वात थरारक अनुभव म्हणजे या मोहिमांवर आधारित २० मिनिटांची फिल्म पाहताना आपण त्या मोहिमांचा भाग बनून जातो. 

याच परिसरात कारवारच्याच पुढे दक्षिणेला सुमारे ३० किलोमीटरवर अंकोला येथील महामाया देवीचे विशाल आणि सुंदर मंदिर  आणखी सुमारे २५ किलोमीटर दक्षिणेला प्रसिद्ध गोकर्ण क्षेत्रही आहे. 

गोकर्णच्या दक्षिणेला सुमारे २५ किलोमीटर अंतरावर मीरजानचा भुईकोट किल्ला आहे. सोळाव्या शतकातील राणी चन्नभैरादेवीने 

दहा एकर जागेवर बांधलेला हा किल्ला आता काहीसा भग्नावस्थेत असला तरी बुरूज, तटबंद्या, टेहळणी मनोरे इत्यादी वैशिष्ट्ये दाखवतो. 

मीरजानपासून ईशान्येला सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर याना या जागी भैरवेश्वर आणि जगन्मोहिनी या नावाची दोन अद्‌भुत, सुळकेदार पर्वतशिखरे आहेत. भगवान शंकराच्या वरामुळे गर्वोन्नत झालेल्या भस्मासुराचा अंत याठिकाणी झाला, अशा अर्थाची एक पुराणकथा आहे. त्यामुळेच या पर्वताच्या परिसरात काळी माती आहे, असे ही कथा सांगते. काहीशा दमट वातावरणात सुमारे पाऊण तासाची चढाई करून यांतील तीनशे फूट उंचीच्या एका शिखरावर जाता येते. 

आपण अनेकदा गोव्याला जात असतो. गोव्याच्या दक्षिण सीमेलगत असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पाहण्यास केवळ एक ते दीड दिवस लागतो. त्यामुळे आपल्या पुढच्या गोवा सफरीत गोवा मुक्काम समाप्त करताना तेवढा वेळ हाताशी ठेवून या ठिकाणांना भेट दिल्यास आपली यात्रा निश्चितपणे वैविध्यपूर्ण होईल आणि ‘ओसा’ने अर्ध्या शतकापूर्वी शत्रूला लगावलेला सणसणीत ठोसाही समजून 
घेता येईल!

संबंधित बातम्या