माझा ‘स्व’पर्यटनवाद 

भूषण तळवलकर
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

विशेष

दौऱ्यांच्या निमित्ताने वेळात वेळ काढून जमेल तितके वैयक्तिक पर्यटन साधण्याची वृत्ती माझ्यात नकळत उमलत गेली. गेल्या पस्तीस छत्तीस वर्षांत भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक वेळा एकट्याने प्रवास करूनदेखील कधीही अडचणीत आलो तर नाहीच, पण प्रत्येक पर्यटन आनंददायी आणि किफायतशीर झाले. मला गवसलेल्या ‘स्व’पर्यटनशैलीचा हा मागोवा! 

मी १९८३ साली किर्लोस्कर उद्योगसमूहात कनिष्ठ प्रकल्प अभियंता म्हणून रुजू झालो. सुरुवातीच्या पुण्यातीलच प्रकल्पांनंतर माझी नेमणूक मुंबईतील एका प्रकल्पावर झाली. उभारणीचे संपूर्ण काम एक ठेकेदार करणार असल्याने तिथे काही महिने कंपनीतर्फे मी एकटाच होतो. मुंबईतील काही कारखानदार आणि नागदेवी-लोहारचाळ येथील तांत्रिक वस्तूंच्या बाजारांमध्ये  मला जावे लागत असे. मुंबईत कामानिमित्त फिरताना हळूहळू मला बहुरंगी, बहुढंगी मुंबईची ओळख झाली. एका अर्थाने भारताचा चेहरा असणाऱ्या मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळांबरोबरच  सर्वप्रांतीय लोक, त्यांच्या स्वभावाचे अनेक नमुने, जनरीती, व्यवहार, विविध प्रांतांमधले खाद्यपदार्थ, अनेक चित्रविचित्र व्यवसाय पाहायला मिळाले आणि या सर्वांमधून आपल्या देशातील विविधतेने नटलेल्या अनेक भल्याबुऱ्या परंपराही अनुभवता आल्या! या सर्वांमधून बाहेरगावी कामानिमित्त गेलो असताना वेळात वेळ काढून जमेल तितके वैयक्तिक पर्यटन साधण्याची वृत्ती नकळत उमलत गेली आणि पुढे देशभरात, परदेशांत कामानिमित्त आणि वैयक्तिक पातळीवर केलेल्या प्रवासांमधून मी ती जाणीवपूर्वक विकसित केली.  अर्थात यासाठी स्वतःहून शोधलेल्या किंवा सापडलेल्या काही मार्गांबरोबरच खबरदारीचेही काही उपाय शोधून तेही अनुसरत गेलो. गेल्या पस्तीस छत्तीस वर्षांत भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक वेळा एकट्याने प्रवास करूनदेखील कधीही अडचणीत आलो तर नाहीच, पण प्रत्येक पर्यटन आनंददायी आणि किफायतशीर झाले. मला गवसलेल्या ‘स्व’पर्यटनशैलीचा हा थोडासा मागोवा! 

आजकाल सर्वांसाठीच दुर्मीळ झालेल्या थोड्याशा फावल्या  वेळाला  थोडेसे पिळून काढत  आपण परगावी असताना कामाबरोबरच काही स्थळे, बाजार, अगदी तिथली खाद्यसंस्कृतीही अनुभवू शकतो. यामुळे कामाचा ताण तर हलका होतोच, पण ऐतिहासिक, वारसा ठिकाणे, जनजीवन जवळून पाहायला मिळते आणि आपल्या वैयक्तिक जीवनाचा दृष्टिकोनही विकसित होतो. फक्त भारताविषयी बोलायचे झाले तर देशाच्या श्रेष्ठतेविषयी जागरूकता येते, मानवतेवरची श्रद्धा वाढते, संतांच्या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेचा प्रत्यय येतो. यासाठी सर्वात आवश्यक म्हणजे आपल्याला ती आस हवी, आळस नको आणि थोडा पूर्वाभ्यास करण्याची तयारी हवी. एवढे असेल तर मिळालेल्या आनंदापुढे खर्च होणारा वेळ आणि पैसे नगण्य ठरतात! 

इंटरनेट नव्हते तेव्हा एखाद्या कार्यालयीन दौऱ्याआधी मी पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात चक्कर टाकून त्या त्या राज्यातील पर्यटनस्थळांचा नकाशा आणि माहिती असलेले छोटे पुस्तक विकत घेत असे आणि प्रवासात ते वाचून काढत कच्चा कार्यक्रम ठरवत असे. आता मोबाईलच्या माध्यमातून आभासी जग आपल्या मुठीत आल्यामुळे गूगल मॅपवर  विशिष्ट शहरातील ‘पर्यटनस्थळे, बाजार’ असा उल्लेख केल्यास रस्त्यांच्या  नकाशासह स्थळांचे नक्की स्थान, अंतर याची थेट कल्पना येते. व्यावसायिक दौऱ्यांमध्ये आपले मुक्कामाचे ठिकाण बऱ्याचदा आधीच ठरलेले असते. मग त्या स्थानानुसार उपलब्ध वेळेचा अंदाज घेत आपण कोणती स्थळे काय क्रमाने केव्हा केव्हा, किती वेळात  पाहायची हे ठरवू शकतो. याबरोबरच त्या त्या राज्याच्या अधिकृत किंवा खासगी संस्थांच्या संकेतस्थळांवर असलेल्या पर्यटनस्थळांच्या माहितीच्या आधारे आपल्या आवडीची ठिकाणे, त्यांची पर्यटकांसाठीची वेळ वगैरेंचाही अंदाज घेऊ शकतो. काही पर्यटनस्थळे, संग्रहालये यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, स्थानिक बाजार, विशिष्ट रेस्टॉरंट्स यांचीही माहिती मिळते. मी तर प्रथम हे सर्व कच्चे लिहून काढतो, मग एखाद्या पानात पुन्हा पक्के लिहून काढतो. आणि हे सर्व कामानिमित्त प्रवासाला निघण्याआधी तासादीड तासात किंवा प्रवासादरम्यान. काही दिवसांच्या वैयक्तिक कौटुंबिक सफरीवर जाताना हे करायला सहा-सात तास पुरतात. पण अशा वेळी मात्र हे नियोजन आधी तीनचार आठवडे तरी करावे लागते.

प्रथम जाण्यायेण्याच्या तारखा पक्क्या करून जायचे यायचे विमानाचे किंवा रेल्वेचे तिकिटाचे आरक्षण मी करतो, पण बऱ्याचदा देशांतर्गत ठिकाणांसाठी हॉटेलांचे आरक्षण न करता फक्त आढावा घेऊन ठेवतो. बरोबर कमी मंडळी असतील तर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अर्धा-पाऊण तास घालवून काही चांगल्या संकेतस्थळांचा संदर्भ घेऊन, हॉटेले प्रत्यक्ष पाहून योग्य वाटेल तिथे घासाघीस करून हव्या त्या किमतीत हॉटेल निवडता येते, असा माझा अनुभव आहे. अर्थात हे छोटी-मोठी शहरे किंवा अन्य गावांबाबत. थंड हवेची ठिकाणे, जंगले, समुद्रकिनारे अशांसारख्या ठिकाणी आगाऊ आरक्षण केलेले उत्तम. त्यासाठीही तीनचार  आठवडे आधीपासून मेलद्वारे संपर्क साधून हळूहळू थोडी घासाघीस केल्यास काही  सवलत मिळू शकते. हॉटेलाबाबत अगदी खात्री वाटली तरच मी एखाददुसऱ्या  दिवसाची आगाऊ रक्कम भरतो. बऱ्याचदा अगदी दुबई, सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन शहरातही कुटुंबीयांसहित  जाताना, गेल्यागेल्या पडण्यापुरते  एखाददुसऱ्या दिवसांसाठी हॉटेल आरक्षित करून तिथे फिरताना आणखी चांगले हॉटेल पाहून आम्ही मुक्कामही हलवला आहे. यात सोयीच्या  जागेबरोबरच पैशांचीही बचत झाली आहे. 

काही वर्षांपूर्वी मी कुटुंबाबरोबर आम्हाला हवा तसा कार्यक्रम ठरवत केनिया सफारी केली. तेव्हाही केनियातील तीनचार अधिकृत वनपर्यटन  कंपन्यांशी काहीही ओळख किंवा संदर्भ नसताना थेट संपर्क करत एकाशी सौदा पक्का केला आणि ते संपूर्ण रक्कम आगाऊ मागत असताना तिथे पोचल्यावर त्यांच्या ऑफिसात जाऊन सुमारे २५ टक्के रक्कमच आगाऊ दिली. एखाद्याशी  बरेच संभाषण केल्यावर जसा त्याचा सच्चेपणा अथवा लुच्चेपणा लक्षात येतो, तसा ईमेल वार्तालापातूनही येतो. ग्राहक म्हणून वेगवेगळे प्रश्न विचारून इंटरनेटवरील माहितीच्या आधारे आपण त्याची परीक्षा घेऊ शकतो. अनुभवातून हळूहळू हे जमते! थोडेथोडे पैसे आगाऊ देत आम्ही दहा दिवसांची सेल्फ डिझाईन्ड केनिया सफारी आनंदात पार पाडली. तिथे जाण्याआधी इथल्या ट्रॅव्हल एजंटाकडून फक्त जाण्यायेण्याचे विमान तिकीट आणि व्हिसा करून घेतला होता. कधीकधी तारखा अगदी नक्की नसतील तर मी जाण्यायेण्याची  दोनदोन दिवसांची रेल्वे तिकिटे बुक करतो. नको ते तिकीट दोनतीन दिवस आधी रद्द करताना थोडासाच भुर्दंड पडतो, पण ऐनवेळी नवीन मिळत नाही. अर्थात सहप्रवाशांची संख्या जितकी मोठी, तितके हे अवघड होत जाते.  

परगावी करायच्या स्थानिक पर्यटनासाठी मला गावोगावचे रस्त्यावरचे रिक्षावाले आणि स्टॅंडवर उभे असलेले अपरिचित टॅक्सीवाले अत्यंत सच्चे वाटले आहेत. किर्लोस्कर कंपनीत असताना १९८४च्या सुमारास एकदा उदयपूरला एक टेंडर देऊन झाल्यावर त्याच्या ओपनिंगच्या आधी हाताशी असलेल्या सहा तासांत एका रिक्षावाल्याला बांधून घेत मी पूर्ण उदयपूर कमी खर्चात पाहून घेतले. त्याने मला सूरजपोलच्या पादत्राण बाजारात नेत उत्तम मोजडी (चढाव) घेण्यासही मदत केली. त्यालाही बऱ्याच तासांचे भाडे एकदम मिळून गेले. तेव्हा मला रिक्षावाले या संस्थेच्या पर्यटनातील महतीचा साक्षात्कार झाला! बोलता बोलता आपलाही  थोडासा अभ्यास, मुक्कामाच्या हॉटेलमधून मिळालेली माहिती आणि अनुभव दाखवत थेट त्यांच्याशी सौदा ठरवल्याने पैशांची बचत होतेच, पण भरपूर गप्पा मारत त्या गावाविषयी, तिथल्या खासियतींविषयी, खाद्यसंस्कृतीविषयी अनमोल माहिती मिळते आणि जणू त्या गावाशी दोस्ती होती. आपल्याला माहीत नसलेली काही खास स्थळे ते स्वतःहून दाखवतात. आपण विश्वास दाखवला तर ते मित्र, नातेवाइकांप्रमाणे  आपल्याशी व्यवहार करतात. प्रयागराजला  संगमावर नेणाऱ्या बोटवाल्याशी दोस्ती साधत आम्ही वल्हवायची बोट काही काळ चालवली आहे. वाराणसीला इलेक्ट्रिक रिक्षा काही किलोमीटर चालवली आहे. राजगृहला राजेश नावाच्या एका टांगेवाल्याशी  झालेल्या ओळखीतून सतीश नावाच्या एका इलेक्ट्रिक रिक्षावाल्याबरोबर नालंदा-पावापुरीचा प्रवास करून परत येताना १०-१२ किलोमीटर इलेक्ट्रिक रिक्षा नुकतीच चालवली आहे! भूजच्या  व्यावसायिक दौऱ्यात केलेल्या पर्यटनादरम्यान सत्तार नावाच्या एका रिक्षावाल्याबरोबर  फिरताना तिथल्या प्रसिद्ध मडआर्ट चित्रांचे नमुने मी एका दुकानात बघत, दर विचारत असताना, तो हळूच मला बाहेर घेऊन गेला आणि, त्याचे भाचे हे तयार करतात आणि तिथे स्वस्तात मिळतील, असे म्हणाला. हॉटेलवर परतण्याआधी त्याच्याबरोबर विश्वासाने त्याच्या साध्याशा वसाहतीत गेलो आणि इरफान व इक्बाल या त्याच्या भाच्यांनी केलेली श्रीगणेशाची आणि इतर नक्षी असलेली मडआर्टमधील उठावदार चित्रे पाहून हरखून गेलो. दुकानातल्यापेक्षा  कितीतरी कमी किमतीत ८-१० चित्रे खरेदी केली. आज ती माझ्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत! 

केरळच्या कौटुंबिक दौऱ्यातील सहा-सात दिवसांच्या टॅक्सी प्रवासात कोचीच्या अँथनी नावाच्या टॅक्सीवाल्याने अलेप्पुझा येथे वेम्बानाडू सरोवरातील चोवीस तासांच्या हाऊसबोट सफरीसाठी त्याच्या एका बोटमालक मित्राशी थेट गाठ घालून दिली. इतर बोटवाले सात हजार रुपये घेत असताना त्या मित्राने फक्त ५,२०० रुपयांत आमची उत्कृष्ट सफर घडवून आणली. दौऱ्याच्या शेवटी अँथनीला हजार रुपये बक्षीस दिले तर त्याने ५००-५००च्या त्या दोन नोटा मला दाखवत, ‘एवढे चुकून नाही ना दिलेत सर,’ असे विचारले. मी ‘नाही’ असे म्हणताच त्याचे डोळे डबडबले आणि मग माझेही! सोमनाथला  फिरताना माझा तेव्हा  लहान असलेला मुलगा खेळण्यातल्या विमानाचा हट्ट करत होता. घरात खूप आहेत असे सांगत मी ते टाळत होतो. तेव्हा हरून रशीद नावाचा आमचा रिक्षावाला मला म्हणाला, ‘सर, आप बुरा न माने तो मैं वो खिलौना आपके बच्चेको लेके देता हूँ! आप इतना खर्चा करके इतने दूर आये, बच्चेको मत रुलाईये! उसकीभी खुशी देखिये!’ निघालेली रिक्षा मी परत फिरवण्यास सांगितले आणि मुलाला ते खेळणे घेऊन दिले! असे आणखी अनेक अनुभव आहेत. त्यामुळे त्या त्या गावांच्या  रिक्षा-टॅक्सीवाल्यांचे  फोन नंबर  मी  पुनर्भेटीसाठी जपून ठेवले आहेत. अर्थात ते सेव्ह करताना आधी गावाचे नाव आणि मग व्यक्तीचे नाव असे सेव्ह केल्याने व्यक्तीचे नाव विसरले तरी गावाच्या नावाने ते सापडतेच! 

मोजक्या वेळात पर्यटन करताना काही वेळा प्रार्थनास्थळे अथवा खासगी पर्यटनस्थळे विशिष्ट वेळी बंद सापडतात. परंतु आपण दुरून हे बघण्यासाठी आलो आहोत आणि बघायला खूप उत्सुक आहोत असे सच्च्या दिलाने सांगितल्यास व्यवस्थापक ते जरूर उघडतात असाही माझा अनुभव आहे. दुबईच्या प्रसिद्ध जुमेरा मशिदीच्या अंतर्भागात उत्कृष्ट कलाकुसर आणि प्रकाशयोजना आहे. आम्ही तिथे आत शिरत असतानाच मध्यान्हीनंतरच्या नमाजची वेळ संपली आणि सेवकाने दिवे बंद केले. चौकशी केल्यावर त्याने ‘आता असर (दुपारच्या)  नमाजच्या वेळी लावू, तेव्हा या,’ असे सांगितले. मग मी प्रमुख मौलवींना भेटून कलाकुसर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दिवे लावण्याची विनंती करताच त्यांनी सेवकाला पुन्हा सगळे दिवे लावण्यास सांगितले. मी मशिदीच्या अंतर्भागातील उत्तम कलाकुसरीचे फोटो काढेपर्यंत दहा-पंधरा मिनिटे मौलवी आणि सेवक थांबून राहिले! एकदा बेळूर-हळेबीड पाहताना तिथला टॅक्सीवाला स्वतःहून जवळच्या दोड्डगडवल्ली आणि बेलवडीच्या  अत्यंत सुंदर मंदिरांत घेऊन गेला. बेलवडीच्या त्रिकूट मंदिरातील पुजारी दुपार झाल्याने गाभारे बंद करून जेवण आणि वामकुक्षीसाठी घरी गेले होते. त्यांचे घर शोधून त्यांना झोपेतून उठवत मंदिर दाखवण्याची विनंती केल्यावर ते आनंदाने आले आणि मंदिर, मूर्त्या यांची माहिती देत तिन्ही गर्भगृहे उघडून खास दिवे लावून छान फोटो काढू दिले. नुकत्याच केलेल्या गोव्याच्या एका दौऱ्यात सासष्टी तालुक्यातील ऐतिहासिक राशोल चर्च आणि धर्मपाठशाला  पाहण्यास गेलो तर दारातच ‘अभ्यागतांस प्रवेश बंद’ अशी इंग्रजीतील पाटी दिसली. चिकाटीने आत शिरत रिसेप्शनवर असलेल्या एका तरुणाला ‘मला हे चर्च पाहण्याची फार इच्छा आहे’, असे मनापासून सांगितल्यावर त्याने माझी विनंती मान्य केली. फक्त धर्मगुरूंच्या निवासाच्या जागेत जाऊ नका एवढे सांगितले. मग त्या भव्य आणि अतिसुंदर चर्चचा अंतर्भाग, तिथली अनेक ऐतिहासिक शिल्पे, भलीमोठी चित्रे मनसोक्त पाहता आली, फोटो काढता आले! आपला इरादा नेक असेल तर समोरच्याच्या अंतर्मनाला ते बरोब्बर समजते. याबाबत पुण्याची  देशभर सुकीर्ती असून पुण्याच्या नागरिकाला  सुजाण आणि सुसंस्कृत समजले जाते असाही माझा अनुभव आहे!  

परगावी असताना राहत असलेल्या हॉटेला व्यतिरिक्त  अनेक रेस्टॉरंटमधील खाद्यविविधतेचा  लाभ घेणेही माझ्यासाठी आनंदमय असते. पटण्याचा लिट्टीचोखा, श्रीनगरचा गुश्ताबा, दिल्लीची चाट, अमृतसरचे छोलेभटूरे  आणि लस्सी, इंदूरचे  पोहा-जलेबी, भोपाळची जलेबी-रबडी, बंगळूरचा चौचौ भात (हा चायनीज पदार्थ नाही!), बिसिबेळे भात, चेन्नईची पोडी इडली, टोमॅटो राइस, कोलकत्याचा माछेर झोल, विशाखापट्टणमचा पेसरट्टु, गोव्याची शाकुती, किसमूर, बडोद्याचा उंधियो असे पदार्थ मुक्कामाच्या हॉटेलपेक्षा विशिष्ट रेस्टॉरंट्समध्ये किंवा अगदी ठेल्यांवर  लाजवाब मिळतील, हे निःसंशय! ते चाखण्यासाठीही  मी आवर्जून वेळ ठेवतो. पदार्थांमध्ये वापरलेले इन्ग्रेडिएन्ट समजावून घेतल्यावर, उदरापेक्षा मन मोकळे असेल तर खाद्ययज्ञ अधिक सुफळसंपूर्ण होतो असा माझा अनुभव!     

बाहेरगावी, विशेषकरून एकट्याने फिरताना खबरदारी मात्र घ्यावी लागतेच. हल्ली तर फारच. मुक्कामाच्या हॉटेलात  कमीतकमी माहितीशिवाय मी कोणतीही जास्तीची माहिती देत नाही. क्रेडिट कार्डचे व्यवहार समोरासमोर करतो. बँकेचे डिटेल्स देत नाहीच, पण गूगल पे वगैरेंचाही वापर मर्यादित करतो. माझ्या मते सर्वात सुरक्षित व्यवहार म्हणजे एटीएममधून खात्यातली कॅश गरजेप्रमाणे थोडीथोडी काढणे व वापरणे. फार काय, व्हॉट्सॲप अकाउंटला मी कुटुंबीयांचा नाहीच, पण स्वतःचा फोटोदेखील लावलेला नाही. खाण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर आमच्या फॅमिली डॉक्टरांनी खूप पूर्वी सांगितलेले एक चवहीन लिक्विड औषध दौऱ्यापूर्वी आणि अधूनमधून पाण्यात मिसळून घेतो. तसेच साध्यासुध्या विकारांवरच्या औषधाचे एक किट नेहमी बरोबर बाळगतो. 

‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही फ्रेंच राज्यक्रांतीची मूलतत्त्वे होती असे शालेय इतिहासात वाचले होते. माझ्या ‘स्व’पर्यटनात  विचारांचे, भटकंतीचे स्वातंत्र्य, भेटणाऱ्या लहानथोर व्यक्तींबाबत समता आणि आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तींबाबत बंधुता ही मूलतत्त्वे जोपासल्याने माझा प्रवास उत्तरोत्तर समृद्ध झाला आहे!

संबंधित बातम्या