जगण्याचा चॉईस

दीपा कदम
रविवार, 31 जानेवारी 2021

ती ची लढाई

पॅशन असणं आणि पॅशनसकट जगण्यासाठी जगाला फाट्यावर मारण्याची धमक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जगरहाटीच्या चौकटीत राहून अमुकतमुक बाईनं काय करावं याचे भारतीय सांस्कृतिक व्यवहारात काही नियम आहेत. ती चौकट हलकेच हलवून थोडी थोडी मोठी करता येते, पण मोठा धक्का देऊन मोडून मात्र टाकणं इथं नामंजूर... कसं जगायचं याची निवड कुटुंबाकडे, समाजाकडे दुर्लक्ष करून केली की त्याची कंपनं आयुष्यभर जाणवतंच राहतात...  ‘त्रिबंध’ ही फिल्म ओटीटीवर नुकतीच प्रदर्शित झालीय. बाईचं व्यक्त होणं,  तिनं तिची आवड किंवा पॅशन जपण्याची जबर किंमत तिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मोजावी लागत असते याची कहाणी सांगणारी ही फिल्म आहे.

लेखिका असणारी आई, तिची अभिनेत्री असणारी मुलगी आणि डोक्यावर पदर घेऊन सुरक्षित कुटुंबात रमलेली लेखिकेची नात अशा तिघींची ही कथा. चित्रपटातल्या मुख्य पात्र असणाऱ्या नयनतारा आणि अनु अशा का वागतात? विशीमध्ये भरतनाट्यम शिकलेली तरुणी नृत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार कशी मिळवते? शास्त्रीय नृत्याची आराधना करणाऱ्या नृत्यांगनेच्या वागण्यात जगण्यात कुठेच ‘ठेहराव’ कसा काय नाही? पुरुषाविषयी राग व्यक्त करण्यासाठी दिवसरात्र शिव्यांची जपमाळ ओढल्याने तिटकारा कसा काय व्यक्त होणार? ... असे अनेक प्रश्न ही फिल्म पाहिल्यानंतर उपस्थित होतात. मात्र या फिल्मचा रिव्ह्यू हा काही आजचा विषय नाही. 

सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची बाई, मग ती लेखिका, संशोधक, अभिनेत्री, गायिका, खेळाडू अशा कुठल्याही क्षेत्रात चाकोरी सोडून काम करते किंवा व्यक्त होण्यास सुरुवात होते; त्यानंतर तिच्यासमोर आव्हानं उभी राहतात. आव्हानांचा सामना करण्यातूनच ती घडत असते. मात्र तिच्या घडण्याची फार मोठी किंमत बाईला मोजावी लागते. तिच्या त्या जगण्यापायी तिच्या कुटुंबाच्या होणाऱ्या ससेहोलपटीचा सामना बाईला करावा लागतो. ‘त्रिभंग’ची नायिका असणारी लेखिका नयनताराचं तिच्या लेखनाच्या पॅशन किंवा उर्मीमुळेही म्हणता येईल, रूढार्थानं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. लिखाणासाठीची स्पेस शोधण्यासाठी ती घर सोडते. त्यानंतर साहित्याच्या क्षेत्रात तिचं नाव होतं. विविध भाषांमध्ये तिचं साहित्य प्रसिद्ध होतं. दरम्यान तिच्या आयुष्यातल्या पोकळीचा फायदा काही संधीसाधू पुरुषही घेतात. आईवडिलांच्या वैवाहिक नात्यामागे मुलांची होरपळ होते. त्यांचं भावविश्व उद्‌ध्वस्त होतं आणि यातूनच या मुलांचीही अतरंगी व्यक्तिमत्त्वं घडतात. साधारण असं काहीसं या सिनेमाचं कथानक. संपूर्णपणे बाईच्या अंगाने जाणारं.  

कल्पना करूयात, अशा प्रकारची परिस्थिती एखाद्या पुरुषावर आली असती तर? लिखाणाची ऊर्मी पूर्ण करण्यासाठी त्याला घर सोडायला लागलं असतं का? दिवसभर लिहायला बसतो म्हणून घरातल्या कोणी टोमणे मारले असते का? लिखाणाला वेळ द्यावा लागतो म्हणून मुलांकडे दुर्लक्ष होतंय याची खंत वाटली असती का? ...असं काहीच घडलं नसतं. चित्रपटातही नाही आणि वास्तवातही नाही. आपल्याकडेना पुरुषाची पॅशन जपण्यासाठी एक पारंपरिक व्यवस्था तयार झालेली आहे. यशाची पायरी चढणाऱ्या नवऱ्याच्या मागे बायकोचा हात असतो असं आवर्जून सांगितलं जातं. पण महिलेच्या बाबतीत मात्र बहुतांश वेळा अशी परिस्थिती नसते. तिनं कुठवर उडी मारायची याचा निर्णय इतर कोणी तरी घेत असतं. तिनं आवडणारे काम कुठवर करायचे याचे अदृश्य नियम कुटुंब आणि समाजाने ठरवलेले आहेत. ही चौकट शाबूत असते तोपर्यंत सगळं ठाकठीक असतं. पण त्या चौकटीला धक्के बसू लागले, व्यवस्था बदलू लागली तर परिस्थिती बदलते. कसं जगायचं याची निवड तिची तिनं स्वतंत्र केली की मग तीच बाई बंडखोर वाटते. ती ‘फेमिनिस्ट’ असल्याचं कधी अभिमानाने, तर कधी टोमणे मारून तिला सुनावलं जातं.

खरंतर किती छोटीशी गोष्ट आहे. आवडणारं काम, छंद पूर्ण करण्यासाठी स्त्री पुरुष कोणालाच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर परवानगीची खरंतर गरज असायला नको. पण कधी बाई म्हणून, कधी कुटुंबाच्या नावाखाली, कधी सामाजिक मर्यादा म्हणून तिच्या जगण्याला मुरड घालण्यासाठी संपूर्ण व्यवस्था तयार असते. समूहाने राहणाऱ्या प्रत्येक समाजाची एक व्यवस्था तयार होत असतेच. पण ती व्यवस्था बाई आणि पुरुष दोघांसाठीही एकाचवेळी समान असेल तेव्हाच ती आनंददायी होईल ना?

संबंधित बातम्या