‘चाहूल’ टाळण्यासाठी...

दीपा कदम
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

‘ती’ची लढाई

एखादी महिला आरोग्य व्यवस्थेपर्यंत पोहोचणे किंवा तळागाळापर्यंतच्या महिलेला आरोग्यविषयक सुविधा सहज उपलब्ध होणे हे अजूनही आव्हान आहे. गर्भधारणा टाळण्यासाठीच्या आधुनिक साधनांचा वापर वाढला आहे, हे जेवढे स्वागतार्ह आहे तेवढेच अजूनही शंभर टक्के प्रसूती रुग्णालयांमध्ये न होणे चिंताजनक आहे.

भारतीय समाजामध्ये गर्भधारणा नको म्हणण्याचा अधिकार किती टक्के महिलांना आहे यावर खरंतर संशोधन होण्याची गरज आहे. कारण `विवाह’ या संकल्पनेमध्ये वंशवृध्दी हा मूळ गाभा आहे. मात्र मूल हवं की नको किंवा किती हवीत या प्रक्रियेत महिलेचा निर्णय महत्त्वाचा असायला हवा, परंतु तसे होताना दिसत नाही. मात्र या बाबतीत एक सुधारणा झाली आहे आणि ती निश्चितच स्वागतार्ह आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी (NFHS) अहवाल ५ आणि FP 2020 या दोन अहवालांकडे पहायला हवे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी अहवाल दर चार वर्षांनी तयार होतो. तर FP 2020 अहवाल दर आठ वर्षांनी येतो. या अहवालातून पुढे येणारे निष्कर्ष महत्त्वाचे ठरतात. या दोन्ही पाहणी अहवालांनुसार भारतात आधुनिक गर्भनिरोधक साधने वापरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. भारतात १३ कोटी महिला गर्भधारणा टाळण्यासाठी आधुनिक साधने वापरत असल्याचे या पाहणीतून आढळले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांपूर्वी याबाबतची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. तेरा कोटी महिला आधुनिक साधने वापरू लागल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समाधान व्यक्त केले आहे. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आधुनिक साधने वापरल्याने जवळपास पाच कोटी महिलांचे जीव वाचलेले आहेत. ते कसे? असुरक्षित गर्भपात यामुळे रोखण्यात आले आहेत. अनेकदा लहान वयात गर्भधारणा झालेली असते, सततचे होणारे गर्भपात, शरीरात रक्ताची कमी असणे या सारख्या प्रकारांमुळे प्रसूतीच्या काळात महिलांचे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. 

गर्भधारणा रोखण्यासाठी जवळपास ७४ टक्के आधुनिक साधने वापरली जात असल्याचे ही पाहणी सांगते. हा टक्का अनेक दृष्टीने समाधानकारक आहे. यामुळे नको असलेली गर्भधारणा अगोदरच टाळली जात असल्याने पुढचे सगळे ‘अघोरी’ प्रकार टाळले जातात.    नको असलेली गर्भधारणा लपविण्यासाठी मान्यताप्राप्त रुग्णालयांकडे न जाता इतर मार्गांचा अवलंब केला जातो. जडीबुटीचा जालिम उपाय केला जातो. तो अनेकदा मुलींच्या जिवावर बेततो. किंवा मान्यता नसलेल्या नर्सिंगहोममध्ये जाऊन गर्भपात केले जातात. याठिकाणच्या उपचारांमध्ये अर्धवट गर्भपात होणे, अतिरिक्त रक्तस्राव होणे, त्यानंतर आयुष्यभर गर्भधारणा न होण्यासारखे प्रकार तर घडतात. शिवाय असुरक्षित गर्भपातामध्ये मुलींना, महिलांना जीवही गमवावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये जडीबुटीने गर्भपात घडवून आणणे आणि शहरी भागामध्ये मान्यता नसणाऱ्या नर्सिंगहोममध्ये जाऊन महिलांचे जीव संकटात पडतात हे गर्भधारणा टाळण्यासाठीच्या आधुनिक साधनांच्या वापरामुळे टाळता आलेले आहे. आधुनिक गर्भनिरोधक वापरल्याने नको असलेली पाच कोटी गर्भधारणा टाळता आलेली आहे. अठरा लाख असुरक्षित गर्भपात टळले आहेत आणि गर्भातच होणारे २३ हजार बाळांचे मृत्यूही केवळ मागच्या एका वर्षात टळले आहेत. एकाच वेळी कोट्यवधी महिलांचे जीव यामुळे वाचले आहेत. 

गर्भधारणा ही अनेकजणींसाठी जितकी हवी हवीशी वाटणारी सुखद घटना आहे, तितकीच दुसऱ्या बाजूला असंख्य जणींसाठी अनेक कारणामुळे ती नकोशी असणारी बाब असते. बाईच्या थेट आरोग्याशी जोडलेली आणि अनेकदा तिच्या जीवन मरणाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या याबाबतीतला निर्णय समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये तिला उघडपणे घेण्याची मुभा दिली तर प्रसूती दरम्यान होणारे अनेक महिलांचे मृत्यू यापुढच्या काळातही टाळता येतील. गर्भधारणा टाळण्यासाठी आधुनिक साधने वापरण्याचे प्रमाण एका बाजूला समाधानकारक वाढलेले असताना महाराष्ट्रात अजूनही शंभर टक्के प्रसूती रूग्णालयात होताना दिसत नाहीत. राज्यात याचे प्रमाण ९४ टक्क्यांच्या घरात आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी ७४ टक्के आधुनिक साधनांचा वापर महिलांनी करणे ही जितकी स्वागतार्ह चाहूल आहे तितकीच अजूनही सहा टक्के महिलांचे प्रसूतीसाठी रुग्णालयापर्यंत न जाणे किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची प्रसूती न होणे चिंतेची बाब आहे.

संबंधित बातम्या