‘आयशा’ वाचल्या पाहिजेत 

दीपा कदम
सोमवार, 15 मार्च 2021

‘ती’ची लढाई

वाईट काही घडत असेल, चित्त थाऱ्यावर नसेल तर देवाच्या वाटेवरच्या पायरीवर असा समुपदेशक भेटायला हवा जो जगण्याचं महत्त्व सांगेल आणि आधार देईल. नदीत आयुष्याचं निर्माल्य वाहवायचं असतं ..आयुष्य नव्हे, हे सांगणारा कान्हा समुपदेशकाच्यारूपात प्रत्येक सासुरवाशिणीसाठी असायलाच हवा. 

राजस्थातल्या अरवली पर्वत रांगांपासून ते खंबायतच्या आखातापर्यंत वाहणाऱ्या साबरमती नदीची ओळख मुख्यतः महात्मा गांधींच्या जन्मस्थानाशी जोडलेली आहे. नदी कोणतीही असो, छोटी असो की मोठी, आणि कुठेही असो; नदीच्या किनाऱ्यावर निवांत चार घटका बसा, तुमच्या चिंता, क्लेष सोबत घेऊन नदीचं पाणी पुढे निघून जात असते. माणसाच्या संस्कृतीचा आधार असणाऱ्या नद्यांचे हे एक न जाणवणारे वैशिष्ट्य. आजही ग्रामीण भागात घरातल्या कामांनी चेपलेल्या, सासूच्या कटकटीने वैतागलेल्या बाया नदीवर कपडे धुवायला मात्र उत्साहाने जात असतात. उन्हाचा चटका जरी असला तरी नदीचा गारवा तिच्या दुःखावर फुंकर घालतो. शेजारणी तिला दिलासा देतात आणि लढण्याची हिंमत पण देतात. कधी समवयस्क तर कधी चार पावसाळे अधिक पाहिलेल्या काकवा -मावशा नांदायच्या चार क्लृप्त्या देखील शिकवतात. डोक्यावर कपड्यावर ओझं आणि डोळ्यात आसवं घेऊन नदी किनारी आलेली ती कधी नदीच्या किनारी पसरलेल्या चिंचा बोरांच्या झाडावरच्या चिंचा, बोरं  तोडायला लागते हे तिचं तिलाही कधीकधी कळत नाही. तिच्या मनावरचं ओझं अलगद उतरवून घेऊन नदीचं पाणी खळखळत पुढे निघून गेलेलं असतं. कितीतरी प्रेमी युगुलांनी ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ असे म्हणत नदीच्याच साक्षीने आणाभाका दिल्याघेतलेल्या असतात... 

पण आयशा खान मात्र नदीच्या किनारी बसून तिच्यासोबत गुजगोष्टी करण्यासाठी थांबली नाही. साबरमतीच्या विस्तीर्ण पसरलेल्या पात्रात तिच्या वेदनांचं विसर्जन करून आयशा थांबली नाही. तिचं दुःख साबरमतीमध्येही सामावणार नाही इतकं मोठं असल्याची तिला बहुतेक खात्री होती. ‘ये नदी अपने में मुझे समा लेगी...’असं  हसत हसत म्हणत २३ वर्षांच्या आयशाने साबरमतीमध्ये स्वतःला विलीन करून घेतले. साबरमतीनेही तिला कवटाळलं. आयशाला वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच आयशाचा जीव गेला होता. आयशाने आत्महत्या केली होती. तिचा नवरा तिला नांदवायला तयार नव्हता. पैशांची हाव थांबत नव्हती. बॅंकेत नोकरी करणारी, उच्च शिक्षित आयशा सासरच्यांच्या दबावापुढे इतकी झुकली की हसत हसत नदीत उडी मारणे तिला जगण्यापेक्षा अधिक सोपं वाटलं...

जिवंत राहण्यासाठीचे कारणच संपलेय असं वाटून आत्महत्येचा मार्ग कवटाळण्यापर्यंत एखादी विवाहित तरुणी पोहोचते तेव्हा अनेक पातळ्यांवर समाज म्हणून आपल्या व्यवस्थेला आलेले अपयश सुरुवातीला मान्य केलंच पाहिजे. मुलगी शिकली म्हणजे तिच्यासमोरचे प्रश्न संपत नाहीत. आयशाही हुंड्याच्या परंपरेची बळी आहे. आजही आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली आहेत. त्या डॉक्टर आहेत, अभियंता आहेत, उच्चशिक्षित आहेत पण त्यांचेही लग्न हुंडा दिल्याशिवाय होत नाही. कारण मुलगी डॉक्टर, अभियंता असेल तर मुलगाही तितकाच शिकलेला असायला हवा. ‘तुमची मुलगी डॉक्टर जरी असली तरी आमच्या डॉक्टर मुलासोबत लग्न करण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. आम्ही त्याच्या शिक्षणावर इतके इतके लाख खर्च केलेत. आणि पुढे सर्व तुमच्या मुलीलाच मिळणार आहे...’ लग्नाची चर्चाच इथून सुरू होते. किमान मागणी असते मुलीच्या वडिलांनी लाखांनी रुपये, पसाभरून सोनं द्यावं आणि आलिशान लग्न करावं अशीच. ‘मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीसाठी द्यायचं होतं आम्ही काहीच मागितलं नाही,’ अशी मखलाशीही होते. हुंड्याचा उल्लेखही न होता मुलीच्या कुटुंबाला ओरबाडलं जातं. अनेकदा लग्नानंतरही पैशाची मागणी थांबत नाही. मग काहीवेळा पहिल्या दोन तीन वर्षातच  घटस्फोट होतो. पैसेही गेले, मुलगी पण परत आली आणि म्हणून माहेरचे धक्क्यातून सावरलेले नसतात. मुलगी खमकी असेल तर कायदेशीर लढाई लढते अन्यथा आयशाप्रमाणे नदीला, तळ्याला, विहिरीला आपलंसं करते. एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार भारतात सरासरी १ तास १३ मिनिटाला एक महिला हुंडाबळी ठरतेय. देशात गेल्या काही दशकांपासून मुलींच्या शालेय शिक्षणात सुधारणा आहे. असे असेल तर मग हुंडाबळी रोखण्यासाठी शिक्षण कमी पडतेय का? मुलीच नव्हे तर मुलींवर अत्याचार करणारे मुलगेही कोणत्यातरी शैक्षणिक मांडवाखालून जात असतील, मग तर शिक्षण यांना सुजाण करत नाही का? या सगळ्या परिस्थितीला हुंड्यासाठी स्वतःच्या मुलालाच डावावर लावणारे आईवडील, स्वतःला डावावर लावू देणारा मुलगा जेवढा जबाबदार तितकेच हुंडा घेणाऱ्या कुटुंबात लग्न लावून मुलीच्या जिवाशी खेळणारे किंवा लग्न लावून जबाबदारी झटकणारे मुलीचे आईवडीलही जबाबदार असायला हवेत. 

आणि मुलीला जबाबदार धरायला हवे का? इतक्या शिकलेल्या मुली निर्णय का घेत नाहीत? छळ करणाऱ्या नवऱ्याला त्या धडा का शिकवत नाहीत? निमूटपणे छळ सहन करणे हा देखील स्वतःवर केलेला अन्यायच नव्हे का? असे प्रश्न आपल्याला नक्कीच छळतात. या प्रश्नांची एक दुसरी देखील बाजू आहे. दोन वर्षांपूर्वींची गोष्ट. एका कुटुंबातल्या एकुलत्या एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलीचे लग्न झाले. मुलगी पुण्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला होती. मुलगा कॅनडात सॉफ्टवेअर इंजिनिअर. मुलीला तिच्या कंपनीतून ट्रान्स्फर मिळणार होती. वीस लाख हुंडा आणि वीस तोळे दागिन्यांसह मुलीचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या समारंभावरही काही लाख रुपये खर्च करण्यात आले. काही दिवसांनी मुलगी कॅनडाला गेली. त्यानंतर सासरच्या लोकांनी, आमच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न नीट झालं नाही म्हणून तिला बोल लावायला सुरुवात केली. नवरा आणि सासूच्या छळाला कंटाळून काही दिवसानंतर ही मुलगी भारतात परत आली. तेव्हापासून ती इथेच आहे. पोलिसात तक्रार करावी तर परतीचे सर्वच दोर कापले जातील म्हणून पोलिसांचा, न्यायालयाचा मार्ग तिने स्वीकारलेला नाही. आयशाच्या नवऱ्याने देखील पोलिसात तक्रार केली म्हणून तिला घराचे दरवाजे बंद केले होते. मुली तक्रार करत नाहीत, त्यामागे बऱ्याचदा संवादाचा मार्ग खुला राहावा अशी प्रामाणिक इच्छा असते, मात्र तीच तिची कमजोरी समजली जाते. 

आयशाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ मेसेज केला. आई वडिलांसोबत बोलली. पण अजून कोणीतरी तिच्यासोबत संवाद साधण्याची गरज होती. आयशाच्या आत्महत्येनंतर आता बरंच काही घडायला सुरूवात झाली आहे. मशिदींमध्ये नमाजा व्यतिरिक्तच्या वेळेत महिला, पुरुषांसाठी समुपदेशकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी एक चर्चा सुरू आहे. असे समुपदेशक खरंतर सगळ्याच ठिकाणी हवे आहेत. सगळ्याच प्रश्नांवर मोबाईलवर मार्ग शोधण्यापेक्षा प्रत्यक्षात संवाद साधण्यासाठी समुपदेशकांची गरज आहे. आपल्या समाजात काही बरंवाईट घडलं तर देवाचा धावा केला जातो. काही वाईट काही घडत असेल, चित्त थाऱ्यावर नसेल तर देवाच्या वाटेवरच्या पायरीवर असा समुपदेशक भेटायला हवा जो जगण्याचं महत्त्व सांगेल आणि आधार देईल. नदीत आयुष्याचं निर्माल्य वाहवायचं असतं ..आयुष्य नव्हे, हे सांगणारा कान्हा समुपदेशकाच्यारूपात प्रत्येक सासुरवाशिणीसाठी असायलाच हवा. भविष्यात ‘आयशा’च्या वाटेने आणखी कोणी चालू नये यासाठी..

संबंधित बातम्या