सोशल ‘भिंती’

दीपा कदम
सोमवार, 29 मार्च 2021

‘ती’ची लढाई

महिलांनी नेहमीच्या जगण्याशी संबंधित असलेल्या दुःखाच्या, आनंदाच्या गप्पा मारल्या तर हरकत काय? त्याविषयी तर महिला बोलतातच आहेत, पण या पलीकडेही त्यांच्या गप्पा मारण्याचा पैस आता वाढलाय. एवढेच नव्हे तर या गप्पांच्या विषयांनाच त्यांनी एक उद्योगापर्यंत नेत नवीन आयाम प्राप्त करून दिले आहेत. फेसबुकवर थोडी भटकंती केली तर गप्पिष्ट असणाऱ्या महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभं केलेलं जग थक्क करणारं आहे.

‘संपर्क’ या सामाजिक संस्थेने राज्यातील महिला आमदार सोशल मीडियाचा वापर कसा करतात, याविषयी नुकतेच एक सर्वेक्षण केले. समाज माध्यमांद्वारे आपला विषय प्रचंड वेगाने जगभरात व्हायरल करून त्या विषयाला आभासी का असेना प्रचंड पाठिंबा मिळवण्याच्या किंवा सोशल मीडियावर ॲक्टीव्ह राहून ‘सोशल इन्फ्ल्यूएन्सर’ होण्यापर्यंत मजल मारण्याच्या आजच्या जगात ‘संपर्क'च्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष विचार करण्यासारखे आहेत. लोकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया या माध्यमाचा वापर पुरुष आमदार, मंत्री ते अगदी प्रभाग आणि गाव पातळीवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी करताना दिसतात, मात्र अपवाद वगळले तर महिला आमदार अजूनही या माध्यमापासून फटकूनच आहेत, हा ह्या पाहणीचा एक ठळक निष्कर्ष. या सर्वेक्षणानुसार जयंत्या मयंत्याशिवाय महिला आमदार सोशल मीडियावर क्वचितच दिसतात. 

महिला आमदार काळानुसार बदलायला तयार नसल्याचे चित्र एका बाजूला असले तरी राजकारणाबाहेरच्या असंख्य महिलांनी एकत्र येण्याचं व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाला जवळ केलं आहे. महिला सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर, काय करतायत? खरंच सोशल मीडियाही कनेक्ट व्हायला बायकांना जमत नाही का? हे फेसबुकच्या भिंतींची धावती सफर केली तरी आपल्या लक्षात येईल.

तिहेरी तलाकपासून वातावरणात होणाऱ्या बदलापर्यंतच्या विषयांवर त्या करत असणारी मांडणी आणि साड्यांपासून ते पुरणपोळ्या विकण्याचे त्यांचे कसब अधिक स्वच्छ शब्दात सांगायचं तर ‘प्रेझेंटेशन’ करण्याच्या त्यांच्या तऱ्हा तुम्हाला खिळवून ठेवतात. त्या करत असणारे प्रयोग इंटरेस्टिंग आहेत. कुणाची उणीदुणी काढण्याच्या भानगडीत न पडता आवडीच्या विषयावर सखोल, चिंतनशील लिहिणाऱ्या महिला जशी स्वतःची वेगळी जागा इथे तयार करतात; त्याचप्रमाणे नव्याने सुरू केलेल्या उद्योगांच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना महिला दिसतील. कोणत्याही उद्योगाचा मुख्य हेतू हा पैसा कमावणं हाच असतो, किंबहुना तोच असायलाही हवा. पण एखादी महिला ज्या वेळी कोणत्या उद्योगाचा विचार करते तेव्हा त्यामागे ‘पॅशन’ हे प्रमुख कारण दिसतं. आपल्या कामात सुख शोधण्याचा आनंद काय असतो हे फेसबुकवर या उद्योगी महिलांचे सुरू असलेले प्रयत्न आणि धम्माल पाहिल्यावर लक्षात येईल. फेसबुकचा वापर महिला विविध प्रकारे करतात. बहुतेक जणींची सुरुवात ही आधी स्वतःचे फोटो टाकणे आणि इतरांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणे,नंतर स्वतः व्यक्त होत विविध विषयांवर लिखाण आणि त्यातून एखाद्या विषयात हुकमी लेखन  असा बऱ्याच जणींचा प्रवास आहे. त्यापैकी काहींचा धावता आढावा.

श्रीमोही पियू कुंडू. बंगालमधील स्त्रीवादी लेखिका, मुख्यतः फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत महिलांशी संबंधित लेखन करतात. विशेषतः या माध्यमातून हजारो एकल महिलांशी संपर्क करून स्टेटस सिंगल नावाचे भारतातील सर्व प्रकारच्या एकल महिलांचे प्रश्न मांडले जातात. पर्यावरणाच्या अभ्यासक परिणिता दांडेकर यांचे नद्या आणि त्यांचे संवर्धन याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवर काम सुरू असले तरी फेसबुकवर त्याविषयी सोप्या आणि सामान्यांना जिव्हाळा वाटेल असं लिखाण करतात. विनया जंगले यांचे वन्यजीव क्षेत्रातले काम आता सगळ्यांना माहीत असले तरी त्यांनी फेसबुकवर लिहिल्यानंतर त्यांचे काम अधिक लोकांपर्यत पोहोचले.

‘मी टू’ चळवळ सुरू झाल्यानंतर रेणुका खोत आणि काही पत्रकार मुलींनी ‘ब्लॅक रोझ’ हा हॅशटॅग चालवून अनेक जणींना त्यांचे लैंगिक शोषणाचे अनुभव शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

हिमाली कोकाटे आणि तेजश्री राऊत या दोघींनी नुकताच #माझं काम माझा अभिमान# या हॅशटॅगचा वापर करून सामान्य स्त्रियांना त्या करत असलेले काम, तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता याविषयी लिहिते केले आहे.

प्राजक्ता कानेगावकर फिटनेस चॅलेंज उपक्रमात दर दिवशी केलेला व्यायाम सांगते आणि इतरांनीही त्यांच्या व्यायामाविषयी सांगावे यासाठी प्रोत्साहन देते.

साडी हा विषय तर महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा. सोशल मीडियाचा वापर करत महिलांनी साडी या विषयावर सुरू असलेले मंथन तर थक्क करणारे आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रादेशिक वैशिष्ट्य असणारी साडी विकली जाते. साड्यांच्या बाबतीत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक ओळख आहे. प्रत्येक बाईची साडीची स्वतंत्र आवड आणि पारख आहे. तर अशा साड्यांची दुकाने गल्लोगल्ली आहेत. वर्षानुवर्षे या दुकानांतून मुक्याने, फारशा चर्चांविना साड्या विकल्या जातात. त्यातल्या त्यात क्वचित एखादा विक्रेता केव्हातरी जामदनी...कलकत्ता साडी असल्याची माहिती कोरड्याने देतो. आपणही तिचा इतिहास, वैशिष्ट्य माहिती करून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. मुळात त्याची गरजही कधी भासलेली नाही. पण फेसबुकवरच्या साडी पुराणापुढे महाभारताचे पुराणही थिटे पडेल. वस्त्रोद्योगाच्या कथेच्या माध्यमातून साडीच्या वैशिष्ट्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते ते अनुभवण्यासारखं आहे. ‘द विव्हिंग नॅरेटिव्ह’, ‘अन्वय -द विव्हिंग नॅरेटिव्ह’ मधून साडीच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाचे पदर आपल्यासमोर उलगडत जातात. महिलांना देशातील विविध वस्त्र विणण्याच्या परंपरा यांची माहिती देण्याबरोबर विणकरांशी जोडण्याचे, डिझाइन चोऱ्या उघड करणे आदी कामेही होत असतात. कारागिरांसाठी विक्रीचे व्यासपीठ खुलं करून देतात. ‘देवी’ नावाच्या एका ग्रुपवर तर साडीने गच्च भरलेल्या अगदीच दोन जणं उभी राहू शकतील अशा दुकानातून साडीचा लाइव्ह फॅशन शो सुरू असतो. 

महिलांना एकत्र येऊन लोणची, पापड घालणं, फुगड्या खेळणं, हळदीकुंकू घालणं अजूनही आवडतंच. पण आता त्याचं स्वरूप आणि व्यासपीठ बदललंय. राजकीय हळदीकुंकवाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या महिला आमदारांनी महिला मतदारांना गाठण्यासाठी सोशल मीडियावर उपस्थिती ठेवली तरच महिलांच्या आयुष्यात या माध्यमाने केलेले बदल त्यांना समजू शकतील.

संबंधित बातम्या