तिचं मोल.. तिचं आकाश

दीपा कदम
सोमवार, 12 एप्रिल 2021

‘ती’ची लढाई

स्त्री-पुरुषांचे सहजीवन काही गृहीतकांवर आधारलेले असल्याने, कमावता नवरा जर बायकोची सर्वप्रकारे काळजी घेत असेल, तिला भावनिक, आर्थिक स्थैर्य देत असेल तर तिने त्याचे घर सांभाळण्यासाठी स्वतंत्रपणे मोबदला मागावा का? आणि असाच विचार करायचा झाला तर लग्न नावाच्या ‘कॉन्ट्रॅक्ट’मध्ये नोकर-मालक असा भाव झिरपणार नाही का?.... असे प्रश्न वरिष्ठ सहकाऱ्यांनी अशाच गप्पांमध्ये  उपस्थित केले. निमित्त होते शारजातील ‘एरिज’ या कंपनीने घेतलेला एक निर्णय. शारजामधील ‘एरिज’ या कंपनाने त्यांच्या ‘एरिज’च्या ज्या कर्मचाऱ्यांच्या सहचारिणी गृहिणी आहेत; त्या गृहिणींच्या बँकखात्यात त्यांच्या पतीच्या एकूण वेतनातील २५ टक्के वेतन जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या सहचारिणींनाही कंपनीचे सदस्य समजणं आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या यशामध्ये त्यांच्या बायकोचा हातभार असणं  हे मान्य करणे याचे स्वागतच करायला पाहिजे.

पतीने काम करायचे आणि एकूण वेतनापैकी पत्नीच्या खात्यावर  २५ टक्के वेतन जमा केल्याने काय साध्य होणार? पैसे तर एकाच घरात येणार ना? पती येणारं वेतन तसंही पत्नीच्या हाती देत असल्याने यातून काय निष्पन्न होणार. मुळात कुटुंबाची जबाबदारी पत्नी स्वीकारत असेल तर तिने आर्थिक स्वरूपात स्वतंत्र मोबदला मागितल्याने नात्यातला ओलावा संपतो आणि व्यवहार उरतो असे काही प्रश्न ‘एरिज’च्या निर्णयावर झडणाऱ्या चर्चांमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना एकाच वेळी ती गृहिणी किती जबाबदाऱ्या पेलत असते याची जाणीव नसल्याने हे प्रश्न उपस्थित होतायत. ती घरात थांबून अनेक भूमिका पार पाडते, त्यावेळी ती तिच्या कितीतरी आशाआकांक्षाना मुरड घालत असते. तिची स्वतःची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करण्याचा विचारही तिच्या मनाला शिवत नाही. पुरुष घराच्या बाहेर पडून काम करतो त्याचे पैसे मिळवतो. बाई घरात थांबून घर सांभाळते तिच्या वेळेचे मूल्य...? 

ओळखीच्या एका काकूंची दोन्ही मुलं डॉक्टर झाली. काकू आता सत्तरीत आहेत. बाईने अगदी निगुतीने घर सांभाळलं. नवऱ्याने घरखर्चाला दिलेल्या पैशातली बचत हे माझे सेव्हिंग असं त्या हातावर टाळी देत म्हणत. मुलांच्या मागे लागून अभ्यास करून घेत त्यांना घडवलं. त्यांच्या सत्तरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गप्पा मारताना म्हणाल्या मुलांची करिअर झाली, पण माझं काय? कथ्थक शिकायचं होतं पण घरातल्याच तांडवाला वेळ पुरत नव्हता. आता तर दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशन झालीत. संसार म्हणजे थॅंकलेस जॉब. आपण कितीही राबलं तरी नवरा, मुलं यांना त्याचं काहीही सोयरसुतक नसतं... घर सांभाळणारी आणि करिअर करून, घर सांभाळणारी अशा दोन प्रकारच्या बाया.  

करिअर करून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या म्हणजे कारमध्ये डबल पॉवर ऑइल टाकलं जातं तशाच मला अनेकदा त्या वाटतात.  

राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी मागच्याच महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची घोषणा केली. सुभाषितांमध्ये ‘घर दोघांचे’ म्हटले जाते, पण ‘तिच्या’ नावावर स्थावर मालमत्ता खरेदी होण्याचे प्रमाण एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेही नाही. गृहलक्ष्मी आणि गृहस्वामिनी अशा बिरूदांनी तिचा सन्मान केला जातो, मात्र तिच्या नावावर घर खरेदी करणं यात पुरूषांच्या मनात काहीशी भीती असते. यातला पहिला अडथळा म्हणजे बायकोच्या नावावर असलेल्या घरात आपण राह्यचं? हा विचार. बायकोच्या नावावर असलेल्या घरात राहत असल्याचे टोमणे मारले जातील. तिने आपल्याला घरातून बाहेर काढलं तर अशा प्रकारचे प्रश्न पुरुषांना सतावत असावेत, त्यामुळे बायकोच्या नावावर घर करण्यात किंवा तिच्या नावावरच्या घरात राहण्यात त्यांच्या इगोला धक्का लागतो, पुरुषप्रधान मानसिकतेच्या हे पचनी पडणं कठीण जातं. दुसऱ्या बाजूला काडीचाही मालकी हक्क नसणाऱ्या कुटुंबात मुलगी लग्न करून येते आणि आनंदाने सगळ्यांना आपलसं करत जगते. मालमत्तेच्या स्तरावर ती पूर्णपणे असुरक्षित असते. कितीतरी मुलींना रात्री बेरात्री, गरोदरपणाच्या काळात घरातून बाहेर काढण्यात आल्याच्या घटना नवीन नाहीत. कोणतीही मत्ता नसताना ‘गृहस्वामिनी’चा मान ती भूषवीत असते. पण ह्या पक्ष्याला कोणतेच अधिकार नाहीत, हे तिलाही माहीत असतेच की. पण नवऱ्याच्या नावावर असलेल्या घरात राहण्यास कुठल्याच पत्नीला त्रास होत नाही, उलट त्यांच्यासाठी ते अभिमानाचे, आनंदाचे आणि सुरक्षित स्थान असते.

दरम्यान, ओटीटीवर ‘द ग्रेट इंडियन किचन’ नावाची ही छोटी फिल्म आलीय, ती आवर्जून पाहावीच अशी आहे. नवरा बायकोला भावनिक, आर्थिक स्थैर्य देतोच किंवा लग्न नावाच्या‘कॉन्ट्रॅक्ट’मध्ये नोकर-मालक असा भाव झिरपणार नाही का? अशा प्रश्नांना समर्पक उत्तर यामध्ये देण्यात आलंय. पुरुषप्रधान संस्कृतीला पोषक असलेल्या ‘कुटुंब’ या चौकटीत बाईच्या बाजूने कुठेच समानतेचे आणि सन्मानाचे भान राखलेले नाही. बाई कुटुंबाची जबाबदारी सांभाळते म्हणजे काय काय करते? ती सकाळी उठते, नवरा आणि सासऱ्याला गरमागरम नाश्ता देते. त्यांना हवा असेल तसा स्वयंपाक, दोन्ही वेळा, करते. घर आवरते. तिची सासू देखील हेच करते. तिची मासिक पाळी आल्यावर शेजारची बाई येऊन देखील हेच करते. कुठली बाई आपल्यासाठी राबतेय ह्याच्याशी त्या घरातल्या पुरुषांना देणंघेणंही नाही. त्यांच्या रुटीन आयुष्यात काहीच अडथळे येणार नाहीत, अशी व्यवस्था तयार झालेली आहे. स्वयंपाक बनवण्याच्या काही सोप्या पद्धती, सोशल मीडियावरील मासिक पाळीविषयी व्यक्त केलेले मत यापासून शारीरिक संबंधांविषयी तिने व्यक्त केलेली अपेक्षा यामुळे झालेली उलथापालथ याविषयीही फिल्म काही सांगते. भारतातल्या असंख्य घरांमधून दिसणारे आणि बायकांच्या कितीतरी पिढ्या तेच करत खपल्या, याचे अंगावर येणारे हे चित्रण आहे. 

आखीवरेखीव पंख छाटलेला पिंजऱ्यातला पक्षी मालकाला लुभावतो. तो त्याचे बोल बोलतो तेव्हा तर त्याला अभिमानही वाटतो. पण पक्ष्याला एकूण व्यवस्थेविषयी, मालकाच्या वर्तणुकीविषयी प्रश्न पडतात तेव्हा खरी पंचाईत होते. स्वत्व आणि स्वातंत्र्य गमावलेल्या पक्ष्याचे रुदन फक्त त्यालाच ऐकू येते. यातली अभिनेत्री बंड करून घराबाहेर पडून आईच्या घरी येते आणि तिचा भाऊ घराबाहेरून येऊन आईकडे पाणी मागतो. आई बहिणीला सांगते त्याला पाणी दे. त्यावेळी ती, ‘त्याचं पाणी त्यानेच घ्यावं’, हे त्याला का सांगितलं जात नाही’ असं खवळून विचारते. मूळ वर्मावरच एका छोट्या प्रसंगातून केवढं मोठं भाष्य केलं गेलंय.  पुरुषप्रधान संस्कृतीत कुटुंबामध्ये पुरुषांची होणारी वाढ यावर सणसणीत चपराक ओढणारी ही फिल्म. आणि बाईचं कुटुंबातलं मोलही दाखवणारी. केवळ पैशाने सगळं भरूनही येणार नाही. पण त्यापेक्षा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने नवऱ्यानं आणि कुटुंबाने बाईसोबत उभं राहण्याची गरज म्हणूनच असते. तिला स्वतःसोबत स्वतंत्रपणे फुलण्यासाठीची मोकळीक मिळेल असं वातावरणही तयार करण्याची म्हणूनच गरज भासते

संबंधित बातम्या