नियोजनाची दूरदृष्टी

दीपा कदम
मंगळवार, 27 एप्रिल 2021

‘ती’ची लढाई

कंपन्यांसाठी गुंतवणूक उभारणाऱ्या केट बिंग्हॅमने, कोरोनामुळे रया गेलेल्या लंडनवासीयांना मोकळा श्वास घेऊ देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

साधारण वर्षभरापूर्वीच कोरोनामुळे ब्रिटनची हाताबाहेर गेलेली परिस्थिती जगाने पाहिली. येत्या काळात आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात कोरोनामुळे एक प्रिय व्यक्ती गमवावी लागू शकते. हर्ड इम्युनिटि शिवाय कोरोनाला रोखता येणे अवघड असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. मात्र, जगातले जवळपास सर्वच देश कोरोनाची लाट थोपविण्यासाठी झुंजत असताना ब्रिटन मात्र अचानक कोरोना लढाईच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. बोरिस यांना सुरुवातीच्या काळात जरी परिस्थिती हाताळता आली नसली तरी ही परिस्थिती कोण नियंत्रणात आणू शकेल याचा त्यांनी अंदाज बांधला होता. हर्ड इम्युनिटी आणि लसीकरण हे कोरोनाला रोखण्याचे दोन मार्ग आहेत. एकूण लोकसंख्येच्या ६० ते ७० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला तर हर्ड इम्युनिटी निर्माण होते. ही संपूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या हातात नसते. पण आपल्या हातात लसीकरण आहे आणि त्यावर काम करण्यासाठी योग्य व्यक्ती शोधणे आवश्यक होते. बोरीस यांनी नेहमीच्या ठोकळेबाज पद्धतीने वैद्यकीय तज्ज्ञांच्या आणि नोकरशहांच्या हाती ही परिस्थिती दिली नाही. तर त्यासाठी त्यांनी निवडलेली व्यक्ती ही कोरोनावर ब्रिटनने मिळवलेल्या यशाची किल्ली असल्याचे बोरीस अभिमानाने सांगतात. पंचावन्न वर्षांच्या केट बिंग्हॅम या कंपन्यांसाठी गुंतवणूक उभारणाऱ्या महिलेने, कोरोनामुळे रया गेलेल्या लंडनवासीयांना मोकळा श्वास घेऊ देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

वैद्यकीय व्हेंचर कॅपिटॅलिस्टकडे कंपन्यांसाठी आर्थिक गुंतवणूक करणारी दलाल म्हणून साधारण भारतीय नजरेत हेटाळणीने पाहिले गेले असते. पण पुढील काळात कोरोनाच्या लशीचा बाजारच मांडला जाऊ शकतो आणि या बाजारात टिकण्यासाठी अशाच पद्धतीने काम करण्याची आवश्यकता भासणार आहे हे बोरिस यांनी ताडले होते. कोणत्या लसी बाजारातून उचलायच्या, कोणत्या लसी अधिक परिणामकारक आहेत याचा सातत्याने मागोवा घ्यायचा, लस निर्मितीसाठी कोणाला अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी सर्वप्रकारची मदत उभी करायची यासाठी विशाल वैज्ञानिक दृष्टिकोनासोबत लसीकरणाच्या बाजारात काय चाललंय याचे पुरेसे भान आवश्यक होते. बोरिस यांनी केट यांची नियुक्ती करताना ‘मला माणसं वाचवायची आहेत…’ एवढं एकच ध्येय दिले होते. कोरोनाच्या काळात अद्याप हे शिवधनुष्य पेलणं कोणालाही जमलेलं नसताना या बाईने आखलेली स्ट्रॅटेजी कामाला आली. 

कोरोनाला संपवण्यासाठी लॉकडाउन कामाला येत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर कोरोनासोबत लढण्यासाठी लशींची निर्मिती आणि लसीकरण यासाठी लागणारे सारे मार्ग वापरण्याची तयारी केटने केली. तिचे नियोजन इतके अचूक होते की ही ब्रिटनच्या लसीकरणाच्या नियोजनाचे दाखले दिले जाऊ लागले आहेत. ही किमया तिने कशी केली यावर ती म्हणते, यासाठी खूप पुढचा विचार करण्याची आवश्यकता होती आणि एकाचवेळी अनेक पर्यायही निर्माण करायला हवे होते. कोणती लस कधी बिनकामाची ठरू शकते हे काळच ठरवणार असल्याने प्रगतिपथावर असणाऱ्या आणि सर्वोत्तम कसोट्या पार केलेल्या लस संशोधन करणाऱ्यांना आम्ही पाठबळ दिले. नवीन फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून कंपन्या उभ्या करणं हेच काम मी आयुष्यभर केलंय. संशोधन काय सांगतं, त्याचे निष्कर्ष काय आहेत आणि त्यामध्ये धोके काय आहेत याचाच अभ्यास करून मी पुढे जात असते. संशोधनात गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळेल की नाही हे महत्त्वाचे नाही. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्याचा माझा दृष्टिकोन स्पष्ट होता. केटने तिच्या एका मुलाखतीत संशोधनात आवश्यक असणारी गुंतवणूक, निकड, आवश्यक पायाभूत सुविधा या सर्वांकडे ती मानवी आणि विशाल दृष्टिकोनातून पाहत असल्याचे स्पष्ट केले आहे.

संशोधनाच्या पातळीवर काटकसरीला आणि घासाघीस करायला वावच नसतो शिवाय तगादा लावूनही चालत नाही...अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांना आर्थिक गुंतवणूक मिळवून देताना केट संशोधनाच्या आवश्यकतेपासून संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर उभी असते. हाच अनुभव तिला कोरोनाचे लसीकरण सुरुवातीलाच करण्यासाठी फायद्याचा ठरला. केट सांगते, ‘आमच्या स्ट्रॅटेजीनुसार २०२० मध्येच दवाखान्यांमध्ये लस उपलब्ध करून देणे आवश्यक होते. महामारीच्या काळात ती वेळ टळली असती तर.. हा उशीर परवडणारा नव्हता. कोणती लस आम्हाला अधिक लवकर मिळेल आणि ती सर्वोत्तम देखील असेल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. शिवाय आम्हाला आवश्यक असणाऱ्या लशीचा पुरवठा सर्वात आधी कोण करू शकेल आणि कोणाची वितरण व्यवस्था अधिक चांगली आहे यावर आम्ही भर दिला. आम्हाला ज्या संख्येने लशींचे डोस हवे होते ते वेळेत कसे उपलब्ध होतील याकडे आम्ही लक्ष दिले. ‘बायोनटेक’ की ‘मॉडर्ना’? या दोघांचाही डेटा समाधानकारक होता. पण बायोनटेक प्राधान्याने आम्हाला लस देण्यास तयार होती, त्यांची वितरण साखळीही चांगली आहे म्हणून आम्ही त्यांना प्राधान्य दिले.’

केटच्या मुलाखतीत तिची शास्त्रीय पण व्यावहारिक भूमिका पदोपदी स्पष्ट होते. लस निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या ना नफा ना तोटा अशा स्वरूपात काम करत होत्या. त्यामुळे यासाठी किती खर्च येणार असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यावेळी काही अंदाज नव्हता. ‘जॉन्सन अँन्ड जॉन्सन’, ‘एझेड’, ‘जीएसके’, ‘सॅनोफी’ या सर्व कंपन्या कोरोना लशींचे संशोधन आणि उत्पादन ना नफा ना तोटा पद्धतीने करत होत्या आणि त्यांनी लशींची किंमतही ना नफा ना तोटा तत्त्वावरच वरच ठरवली होती. लशींची किंमत महत्त्वाची असली तरी तो काही फार महत्त्वाचा भाग नव्हता. लस तत्काळ उपलब्ध होणं सर्वाधिक आवश्यक होतं. त्यामुळे जवळपास प्रत्येक लसमागे १० पौंड अधिकची किंमत मोजण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. अमेरिका ज्या किमतीला लस खरेदी करत होती त्याच किमतीला ब्रिटनला ही लस पडली, त्यामुळे, ‘पैसे फेकून आम्ही लशींचा साठा करून ठेवला या टीकेला काही अर्थ नाही’, असं केट म्हणते. तिच्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी बाजारातला व्यवहार चोख राहील याची काळजी केटने घेतली, त्याचमुळे ब्रिटनच्या लोकसंख्येच्या कितीतरी पटींनी वेगवेगळ्या कंपन्यांची लस ब्रिटनच्या ताब्यात आहे. केट इथवरच थांबलेली नाही. कोरोनाचा विषाणू कसे रूप धारण करेल, लशींचे दोन डोस किती काळ संरक्षण देतील, कोरोनाची लस दरवर्षी घ्यायला लागेल की पाच वर्षांनी, लशीऐवजी नाकात मारण्याचा स्प्रे किती परिणामकारक यावरही संशोधन सुरू करण्यासाठी केटने लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या मागे पाठबळ उभं करण्यास सुरूवात केली आहे. केट म्हणते, ‘तुम्ही भंगारातलं सामान गोळा करून सहा तासात रेसिंगची कार तर बनवू शकणार नाही...’

मानवी हितासाठी वैद्यकीय संशोधनाची आवश्यकता आणि त्यासाठी सर्वप्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी दाखवण्याचा दृष्टिकोन यापुढील काळात सर्वच देशांनी दाखवण्याची गरज केटने दाखवून दिली आहे.

संबंधित बातम्या