मारिया रेसा

दीपा कदम
सोमवार, 21 जून 2021

‘ती’ची लढाई

फिलिपाईन्ससारख्या छोट्याशा देशात पत्रकारिता करणाऱ्या मारिया रेसा गेली जवळपास सात वर्षे तेथील सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार उघडा पाडण्यासाठी रान उठवीत आहेत. मारिया फिलिपाइन्समध्ये रस्त्यावरची लढाई तर त्या लढल्याच, पण वेगवेगळ्या जागतिक व्यासपीठांवर त्यांना या लढ्याचा आवाज बुलंद केला आहे. सत्तावन्न वर्षांच्या मारिया यांना युनेस्कोने नुकतेच ‘युनेस्को गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम’ या पुरस्काराने सन्मानित केले. जगभरात अनेक ठिकाणी माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली असताना पत्रकाराचे स्वातंत्र्य आणि वास्तव लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी लढणाऱ्या मारिया यांचा संघर्ष जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 

सध्याचे युग हे डिजिटल आहे, माहितीच्या मुक्त संचाराचे आहे. मुक्त माध्यमांच्या या युगात तुम्ही काय वाचायचं, पाहायचं आणि समाज माध्यमांवर कशाप्रकारे वर्तन करायचे यावर अनेक देशांमध्ये सत्ताधाऱ्यांमार्फत अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. सोशल मीडियावर आपल्याही कळत नकळत अल्गोरिदमच्या माध्यमातून एका विशिष्ट अजेड्यांनुसार आपल्यासमोर जाणीवपूर्वक माहिती सरकवली जाते. अशा माहिती ‘सरकवण्यातून’ खोटी माहिती प्रसृत केली जात असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा माहितीमुळे जे जनमानस तयार होते ते घातकच असते. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत सत्य पोहोचावे यासाठी फिलिपिनो- अमेरिकी पत्रकार मारिया रेसा गेली पंचवीस वर्षे संघर्ष करत आहेत. नऊ वर्षांपूर्वी, २०१२मध्ये तीन सहकाऱ्यांच्या मदतीने मारियाने ‘रॅपलर’ ही वेबसाइट सुरू केली. आज या वेबसाइटसाठी शंभराहून अधिक पत्रकार काम करतात. मात्र एका वेबसाइटची सहसंस्थापक केवळ एवढीच मारिया रेसांची ओळख नाही, तर वेबसाइटच्या माध्यमातून फेक न्यूजच्या विरोधातही त्यांचा लढा सुरू आहे. माध्यमांची गळचेपी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून दिशाभूल करण्याच्या सुरू असण्याच्या प्रपोगंडाच्या विरोधातही त्यांनी जागतिक पातळीवर मोहीम उघडली आहे. 

रेसा यांची पत्रकारितेतील कारकीर्द ‘पीटीव्ही फोर’ या सरकारी संस्थेतून सुरू झाली. त्यानंतर १९८७मध्ये त्यांनी ‘प्रोब’ नावाची एक स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्याचवेळी त्या ‘सीएनएन’च्या मनिला ब्युरोच्या प्रमुख म्हणूनही काम करीत होत्या. दहशतवादी संघटनांचा अभ्यास असणाऱ्या ‘सीएनएन’च्या आशियातल्या एक प्रमुख शोधपत्रकार म्हणून रेसा यांनी आपली विशेष ओळख त्या काळात निर्माण केली होती.

‘सीएनएन’ नंतर त्यांनी ‘एबीएस-सीबीएन’ आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ बरोबरही काम केले. 

मादकपदार्थ सेवन विरोधी मोहिमेच्या नावाखाली होत असलेल्या निरपराध नागरिकांच्या हत्याकांडाच्या विरोधात मारिया यांचा लढा सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगानेदेखील फिलिपाईन्समधल्या या हत्याकांडावर टीकेची झोड उठवली आहे. फिलिपाइन्समध्ये अमली पदार्थविरोधी मोहिमेत मारल्या गेलेल्यांची अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली संख्या किमान तीनपटीने जास्त असण्याची भीती आयोगाने व्यक्त केली आहे. फिलिपाइन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते दावोस शहराचे महापौर असतानाच हा प्रकार सुरू झाला. सर्वप्रथम ‘पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी’ रॉड्रिगो यांनी तीन नागरिकांची हत्या कशी घडवून आणली हे मारिया यांनी जगासमोर उघडकीस आणले होते. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांचा ससेमिरा त्यांच्यामागे सुरू झाला. परकीय शक्तींच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेकडून पैसे घेऊन फिलिपिनो सरकारच्या विरोधात मारिया काम करत असल्याचाही आरोप करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मारिया यांच्या विरोधात खोटा प्रचार करण्यात राष्ट्रपती आणि त्यांचे समर्थक यशस्वी झाले, रॅपलर आणि मारिया यांच्यावर कथित कर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. मारिया यांच्या मोहिमेचा परिणाम म्हणून  ‘रॅपलर’च्या पत्रकारांना सरकारी आणि राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांना प्रवेश नाकारला जातो. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘रॅपलर’ जनतेपर्यंत वास्तव पोहोचवण्याच्या प्रयत्नात असते. 

‘टाइम मॅगझिन’ने २०१८मध्ये जगभरातील चौदा पत्रकारांचा गौरव केला होता. त्यात मारिया रेसा यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियाद्वारे कसे दूषित वातावरण तयार केले जात आहे यावर टीका केली होती. मारिया म्हणतात, ‘सोशल मीडिया वापरण्यासाठी इंटरनेटची गरज असते. परंतु फिलिपाइन्समध्ये इंटरनेटचा वापर हा अत्यावश्यक सेवेत होत होता. त्याचवेळी फिलिपाइन्समध्ये फेसबुकने सोशल मीडिया लोकांना मोफत उपलब्ध करून दिला. पण त्यामध्ये ‘सर्च’ हा पर्यायच ठेवला नव्हता. इंटरनेट वापरण्यासाठी ‘सर्च’ हा पर्यायच जर नसेल आणि सरकार दाखवणार तेच जनतेने पाहायचे आणि वापरायचे असेल तर अशी मोफतची सेवादेखील घातकच असते. अशा मोफत इंटरनेटमध्ये तुम्हाला हव्या त्या बातम्या, माहिती देणारी संकेतस्थळे तुम्हाला पाहता येत नाहीत. अशा मोफत इंटरनेटमधून पोचते ती फिल्टर केलेली माहिती, हे लोकांना कळत नाही. इंटरनेटचे जग विशाल आहे. जे मोफत देतात ते तुम्ही काय पाहायचे हे ठरवून ते देत असतात.

गुगल आणि फेसबुकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी एका मुलाखतीत थेट प्रश्न विचारला, हे जग तुम्ही इतकं बिघडवून ठेवलंय की ते तुम्ही कसं सुधारणार आहात? सोशल मीडिया कंपन्यांसाठीही हा कठीण काळ होता. घातक शक्तींच्या वर्तनासमोर नैसर्गिक किंवा सर्वसामान्य प्रतिक्रिया कशी असेल याबाबतचा त्यांचाही अंदाज चुकल्याचे त्या अधिकाऱ्याने मान्य केल्याचे मारिया सांगतात. ज्यावेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असतो, त्यावेळी नैतिकता बाजूलाच सारली जाते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात आलेली भाषणं, मजकूर काढली जावीत यासाठी युरोपीय महासंघाने  नियमावली तयार करून त्यावेळी दबाव आणला होता, याची मदत मारिया यांना झाली होती. 

दिशाभूल करणाऱ्या खोट्या माहितीच्या आधारे कृत्रिम एकमत तयार केले जाते. वास्तव आणि प्रोपगंडा यातील भेद काय आहे याविषयी सर्वसामान्य लोक विचार करत नाहीत, त्याचमुळे जबाबदार माध्यमांची गरज कायम असणार आहे. स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्क हे एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात यावर मारिया यांचा विश्वास आहे आणि यासाठी त्यांचा संघर्षही सुरू आहे.

संबंधित बातम्या