‘रिमोट’ अाई-बाबा

दीपा कदम
सोमवार, 5 जुलै 2021

‘ती’ची लढाई

त्सुनामी, भूकंपासारख्या महाप्रलयाची व्याप्ती ठरावीक भौगोलिक प्रदेशापुरती सीमित राहते. कोरोनाचा संसर्ग मात्र असा मर्यादित राहिलेला नाही. जगातल्या सर्व मानवी अस्तित्वाला त्याने घेरून टाकले आहे, आणि व्याप्ती इतकेच त्याचे परिणामही सर्वव्यापी आहेत.

कोरोना विषाणूला भारतात येऊन जवळपास दीड वर्षांचा काळ लोटला आहे. प्रगत राष्ट्रांत तो त्यापूर्वीच तीन चार महिने दबक्या पावलाने हातपाय पसरत होता. या विषाणूने माणसाच्या जगण्याची रीत इतकी बदललीय की आपण काळाबरोबर पुढे जातो आहोत की सारं काही थबकलंय, हेदेखील कळण्याचा मार्ग नाही. एका बाजूला अनावश्यक वाढवलेल्या गरजा या काळात कमी झाल्यासारख्या दिसताहेत. काही क्षेत्रातील ऑफिसची कामे घरी बसून करता येऊ लागलीयेत. वस्तू, हव्या त्या रेस्टॉरंटमधून हवा तो पदार्थ घरपोच मागवता येण्याच्या सोयी वाढल्यात. नातेवाईक, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारता येतात. हे सगळं ‘घरबसल्या’ होतंय. पण हे जगणं आहे की कृत्रिम सोय आहे? याचे परिणाम मानवी जीवनावर काय होतील? हा आता अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. 

‘मॅकेन्झी’चा ‘वुमेन ऑन द वर्कप्लेस २०२०’ हा ताजा अभ्यास या परिस्थितीच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलतो. घरून काम करण्याचे परिणाम आयांवर आणि बाबांवरही कसे झालेत याबाबतचा हा अभ्यास आहे. महिला आणि पुरुष असा विचार न करता हा अभ्यास कुटुंबाचा विचार करतो. मुलं असणाऱ्या कुटुंबावरच्या जबाबदाऱ्या, मुलांना द्यावा लागणार वेळ, रिमोट शाळा, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि ऑफिसचे काम याला दिला जाणारा वेळ या सगळ्याचा स्वतंत्र विचार करता येत नाही. एखाद्या साखळीसारखे हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले असतात.

गेल्या दीड -पावणेदोन वर्षांचा लेखाजोखा या अभ्यासात मांडण्यात आला आहे, कारण या बदललेल्या परिस्थितीचे परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत. 

कामाच्या रिमोट पध्दतीचा खूप मोठा फटका ‘रिमोट’ काम करणाऱ्या आईच्या करिअरला  झालेला आहे. तिच्याच बरोबरीने घरूनच काम करणाऱ्या बाबाची मात्र त्याच्या करिअरमध्ये प्रगती झालेली दिसते. त्याला बढती देखील मिळते आहे. कोरोनापूर्व काळात कामाच्या ठिकाणी बढती मिळवताना जिचा प्राधान्याने विचार केला जायचा तिला आता डावलले जाते आहे. करिअरविषयी अधिक सजग असणाऱ्या तिनं तिचं काम आणि तिचं आईपण याची कधी सरमिसळ होणार नाही याची कायम खबरदारी घेतली होती. आता मात्र तीच तिचं लाडकं करिअर थांबवण्याचा विचार करते आहे... ही या अभ्यासातील महत्त्वाची निरिक्षणं आहेत. अमेरिकेतील रिमोट काम करणाऱ्या कुटुंबांसोबत बोलून करण्यात आलेला हा अभ्यास आहे. रिमोट काम करणे याचा अर्थ अर्थातच दुहेरी ड्यूटी. कुटुंबाची काळजी, जबाबदारी, स्वतःची भावनिक आणि मानसिक आव्हाने त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम, अशा अनेक पातळ्यांवर घरातील बाई काम करत आहे. जर ती एकल पालक असेल तर यामध्ये भरच पडते. एकाचवेळी ती गृहकर्तव्यदक्ष गृहिणी असणे, मुलांची आई असल्याने त्यांचे प्रेमाने सांभाळ करणे, कुटुंबामध्ये सासू सासरे असतील तर त्यांच्याशी मायेने वागणे आणि बायको म्हणून नवऱ्याकडे लक्ष पुरवण्याचे कर्तव्यही तिला पार पाडावे लागते. जणू काही ही सर्व नाती एकाचवेळी निभावणे ही तिची एकटीची जबाबदारी असते. 

इथे असाही प्रश्न पडू शकतो कोरोना पूर्व काळातदेखील ही नाती होतीच ना? तेव्हा ही नाती होती, पण तेव्हा ‘ती’च्या प्रत्येक भूमिकेला एक स्वतंत्र स्पेस होती. ठरावीक जबाबदाऱ्या एका वेळेत पूर्ण करून ती तिच्या मार्गी लागायची. तिचं करिअर - तिचं काम ही तिची ओळख असायची. ज्याच्या मागे धावायला, घाम गाळायला तिला आवडायचं. तिचं ते स्वतंत्र अवकाश होतं. ‘रिमोट’ काम करताना मात्र तिचं करिअर हळूहळू दुय्यम भूमिकेत जाऊ लागलं आहे, ही धोक्याची घंटा आहे. वर्षभरानंतर अधिक काळ सातत्याने हे घडू लागल्याने तिच्या कामावर, कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्यांवरदेखील त्याचा परिणाम होऊ लागला आहे. परिणामी अमेरिकेत ‘रिमोट’ काम करणाऱ्या महिलांपैकी ३३ टक्के महिलांनी नोकरी करण्याचे थांबवले किंवा पूर्वीपेक्षा निम्न जबाबदारीचे काम स्वीकारले आहे, असं हा अभ्यास सांगतो. घर सांभाळण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागत असल्याने जवळपास २५ टक्के महिलांनी याचा कामावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली आहे. तर या तुलनेत फक्त ११ टक्के ‘रिमोट’ बाबांनाच घरातल्या कामात सहभागी झाल्याने कामावर परिणाम होईल अशी भीती वाटत आहे.  

रिमोट काम करणाऱ्या आई आणि वडिलांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहे. एरवी मानसिक आरोग्याच्या पाहणीत महिलांचे मानसिक आरोग्य हे पुरूषांच्या तुलनेत संतुलित किंवा कणखर असल्याचे दिसते. त्यामुळेच आत्महत्यांसारख्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र प्रगत आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमध्ये केलेल्या  कोरोना-१९ नंतरच्या या पाहणीत रिमोट काम करणाऱ्या बाबांपेक्षा (६९ टक्के) आयांना (७५ टक्के) मानसिक आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. 

एखादी संस्था किंवा उद्योग उभा राहण्यासाठी पुरुषांसोबत स्त्रियांच्या सहभागाची किती गरज असते हे विसाव्या शतकाने सिद्ध करून दाखवले. याच शतकाने महिलांना पुरुषांसोबत शिक्षण घेण्याची, काम करण्याची, संशोधन करण्याची आणि खांद्याला खांदा लावून जिंकण्याची संधी दिली. मात्र कोरोनाचे निमित्त होऊन २१व्या शतकात महिलांना कामाच्या ठिकाणाहून वगळण्याचा हा पर्याय आपल्याला मागे घेऊन जाऊ शकतो.

याच अभ्यासात महिलांना कामाच्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. कारण रिमोट काम करणाऱ्या अनेक आयांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडून कामाचे वेळापत्रक उत्तम प्रकारे सांभाळले आहे. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता येत असल्याने रिमोट आई काही प्रमाणात समाधानीदेखील दिसते आहे. अशा परिस्थितीत महिलांसाठी कामाच्या वेळा लवचिक ठेवाव्यात, त्यांच्या मुलांसाठी शिकवणी वर्ग किंवा वेगवेगळे कोर्स सुरू करावेत, त्यांना कामामधून मोठा ब्रेक घ्यावासा वाटत असेल तर त्यांना सन्मानाने कामावर परत येण्यासाठीची मुभा असावी, असे पर्यायही सुचविण्यात आले आहेत.  

हा अभ्यास आपल्यासाठीदेखील महत्त्वाचा आहे. कारण कुटुंबव्यवस्था पाश्चिमात्य देशापेक्षा भारतात जितकी घट्ट, तितकीच ती पुरुषप्रधान अधिक आहे. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेत ‘रिमोट’ काम करणाऱ्या आईची काय ‘स्थिती’ असावी याचा विचारही भयंकर आहे. वर्क फ्रॉम होममधील आई बोलू लागली तर कदाचित कुटुंब व्यवस्थेला धक्के बसतील, कारण घरातून बाहेर पडून कामावर जाण्यापर्यंतचा तिचा संघर्ष फार मोठा आहे. कामावर जाण्याचा तिचा अधिकार हा शिक्षणाचा हक्क मिळवण्यापासून सुरू होतो. नोकरी करण्याचा तिचा हक्क हा स्वातंत्र्य आणि आनंद असा चढत्या क्रमाने बहरतो आणि आत्ता तर कुठे त्याला कोंब फुटू लागले होते ...

संबंधित बातम्या