शोध पत्रकारितेमधला तरुण चेहरा
‘ती’ची लढाई
पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणारा पुलित्झर पुरस्कर यंदा मेघा राजगोपालन या भारतीय वंशाच्या तरुणीला जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारिता श्रेणीतील हा पुरस्कार आहे.
डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेसमोरची आव्हाने जशी वाढवली आहेत, तशीच नवीन आयुधेदेखील उपलब्ध करून दिली आहेत. विविध अहवाल, सर्वेक्षणे उपलब्ध झाल्याने माहिती विश्लेषणाच्या माध्यमातून एखाद्या विषयाची व्यापक मांडणी करणे सोपे झाले आहे. जागतिक स्तरावर या आयुधांचा वापर शोध पत्रकारितेसाठी केला जातो आहे. याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात महिला पत्रकारही आघाडीवर आहेत. मेघा राजगोपाल त्यातल्याच एक पत्रकार. त्यांना नुकताच पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
इतक्या मोठ्या बातमीपर्यंतच्या आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारपर्यंतच्या प्रवासामागे चिकाटी, चिकित्सक वृत्ती, जिज्ञासा आणि कठोर मेहनतीचे पाठबळही असतेच. मेघा राजगोपालन ‘बझफिड’ या अमेरिकी न्यूज पोर्टलसाठी काम करणाऱ्या पत्रकार आहेत. चीन, थायलंड, इस्राईल आणि पॅलेस्टाईनचा सीमावाद या विषयांचे वार्तांकन त्या करतात. त्यापूर्वी ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीसाठी त्यांनी चीनमध्ये राजकीय पत्रकार म्हणून काम केलेले आहे. मध्य आशियातील घडामोडी, उत्तर कोरियातील अणुबॉम्ब संकट ते अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रिया यांचे वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन त्यांनी केलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक आणि राजकीय बातमीदारीसाठी मानवी हक्काचे काटेकोर भान असावे लागते. मेघाच्या बातमीदारीमध्ये ते कायम दिसते.
चीनने ‘रिएज्यूकेशन कॅम्प’ म्हणजेच छावण्यांमध्ये उइगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक गटांना कैदेत ठेवल्याचे पुराव्यांसह सिद्ध करून चीनचा खरा चेहरा जगासमोर उघडकीस आणल्याबद्दल मेघा राजगोपालन यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. उइगर मुस्लिमांना चीनकडून दिली जाणारी वागणूक हा अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला तणावाचा एक मुद्दा आहे. केवळ ‘रिएज्युकेशन कॅम्प’चे वास्तव उघड करणे, इथे ही बातमी संपत नाही तर इथूनच ती सुरू होते. कारण मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप इतर कोणावर नव्हे, तर चीनसारख्या बलाढ्य देशावर केला जाणार होता. दुसरे म्हणजे चीनमध्ये वापरले जाणारे सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर हे फक्त चीनमध्येच वापरले जाते. गुगल आणि व्हॉट्सॲपचे लाड चीनमध्ये चालवलेच जात नाहीत. चीनच्या गोपनियतेला उकरणे हे किती कठीण आव्हान आहे याची कल्पना करणेही अवघड आहे. पण मेघा राजगोपालनने हे आव्हान स्वीकारले.
चीनने अनेकदा शिनजियांगमध्ये राहत असलेल्या उइगर मुस्लिमांवर दहशतवाद पसरवल्याचा आरोप करत बंदी आणली होती. शिनजियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी उइगर मुस्लिमांना प्रार्थनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व धार्मिक गोष्टी सरकारकडे सोपवल्या नाहीत तर शिक्षेचे फर्मान सोडले होते. उइगर मुस्लिमांच्या ‘रिएज्युकेशन’च्या नावाखाली प्रचंड छळवणुकीच्या छावण्या उभारण्यात आल्याची माहिती मेघा राजगोपालनला मिळाली. या छावण्यांना भेट देता यावी यासाठी त्यांनी रीतसर परवानगी मागितली. अर्थातच त्यांना ती मिळाली नाही. मात्र या छळ छावण्यांमधून पळून जाऊन शेजारच्या कझाकिस्तानमध्ये आसरा घेतलेल्यांच्या मुलाखती त्यांनी मिळवल्या. अशा प्रकारच्या छळ छावण्यांमधून पळून जाऊन दुसऱ्या देशात आसरा घेतलेल्यांना बोलते करणे इथे पत्रकाराची खरी कसोटी ठरते. तब्बल २४ जणांच्या मुलाखती त्यांना मिळाल्या. हा चालता बोलता पुरावा सापडणे खरे तर खूपच मोठी गोष्ट होती. अनेक पत्रकारांचा शोध इथेच संपला असता. पण जगासमोर चीनला उघडे पाडण्यासाठी या मुलाखती मेघाला पुरेशा वाटल्या नाहीत. या छावण्यांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचणे केवळ अशक्य होते. पण मुलाखतींच्या आधारे खातरजमा करण्यासाठी मेघा आणि तिच्या सहकाऱ्यांनी उपग्रहातून काढलेले फोटो आणि थ्रीडी सिम्युलेशनचा वापर केला. एक हजारपेक्षा अधिक स्लाइड्स पाहिल्यानंतर त्यांना छावण्यांची नेमकी जागा निश्चित करता आले. याआधारे मेघा आणि तिचे सहकारी एलिसन किलिंग व क्रिस्टो बुशेक यांनी मिळून अशा २६० छावण्यांचा अभ्यास केला. छावणीतून पळून आलेल्यांच्या मुलाखती आणि ही छायाचित्रे यांचे विश्लेषण करून मेघाने या छळ छावण्यांचे वास्तव जगासमोर आणले.
शिनजियांगच्या पश्चिम प्रांतात उइगर मुस्लिमांसाठी कायमस्वरूपी नजरकैद करता येईल अशा तुरुंगाची वसाहतच उभी केली जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक आणि वांशिक द्वेषातून कारावास बांधले जात आहेत. उइगर मुस्लिम अल्पसंख्याकांवर पाळत ठेवणे, त्यांचे मोबाइल ट्रॅक करण्यापासून त्यांच्यावर नसबंदीसाठी सक्ती करण्यासारखे अत्याचार तर सुरूच आहेत. पण चीनमधील मुस्लिम अल्पसंख्याकांना कायमस्वरूपी नजरकैदेत ठेवण्यासाठी गुप्तपणे तुरुंग उभारले जात असल्याचे मेघाने सप्रमाण सिद्ध केले आहे.
जेमतेम तिशीत असणाऱ्या मेघाने खूप कमी वयात शोध पत्रकारितेची एक नवीन वाट चोखाळली आहे. अमेरिकेच्या फुल ब्राईट स्कॉलरशिपपासून वेगवेगळ्या स्कॉलरशिप आणि पुरस्कारही तिला मिळाले आहेत. मेघा राजगोपालने एका मुलाखतीत म्हटले आहे, माझ्या कुटुंबातील मीच पहिली माध्यमांमध्ये काम करतेय. त्यांच्यासाठी पत्रकारितेचे क्षेत्र अगदीच नवखे आहे. तरीही ते कायम तिच्या पाठिशी उभे राहिल्याचे ती आवर्जून सांगते. पुलित्झर पुरस्कार पत्रकारितेतील जगातला सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. मात्र हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मेघाच्या वडिलांची प्रतिक्रिया होती, ‘अभिनंदन मेघा, तुला पुलित्झर मिळाल्याचा मेसेज तुझ्या आईने फॉरवर्ड केला...’ एवढंच. तिच्या वडिलांची आलेली ही कोरडी प्रतिक्रिया. भारतीय वडिलांची हातचे राखून आलेली प्रतिक्रिया, असे म्हणत स्वतः मेघानेच या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. मेघाच्या पाठीमागे तिचे कुटुंब ठामपणे उभे असले, तरी त्यांनी पाठिशी उभे राहावे यासाठी तिला करावा लागलेला संघर्ष या ट्विटमधून डोकवण्याचा प्रयत्न करत असेल का?