आसमानों में उड़ने की आशा

दीपा कदम
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

‘ती’ची लढाई

ज्या ऑफिसात अगदी तळातल्या स्तरावर आपण काम करतो, त्याच ऑफिसात वरच्या पदापर्यंत पोचण्याची महत्त्वाकांक्षा तिने बाळगली आणि प्रचंड मेहनत घेऊन तिने ती पुरी केली. ही कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकानी निर्मात्याला ऐकवलेली ‘वन-लायनर’ नाहीये. राजस्थानातल्या जोधपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कण्डारा या चाळीस वर्षांच्या महिलेने लिहिलेली ही तिची स्वतःची यशकथा आहे.

समाजातल्या ‘नाही रे’ वर्गातल्या, अंगात हुषारी असूनही पुरेशी संधी मिळू न शकणाऱ्या पण तरीही साऱ्या अभावाचा सामना करताना आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी आशा कण्डाराची कथा प्रेरणादायी आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन स्वप्न पाहायलाच हवीत, कारण स्वप्नंच तुम्हाला ती सत्यात उतरविण्याचं बळ देतात, असाच संदेश आशा काण्डाराची ही कथा देते.

जोधपूरच्या रस्त्यांवर सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कण्डारा काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारची प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे उपजिल्हाधिकारी दर्जाचं. आज त्या जोधपूर महापालिकेतच अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. कपोलकल्पित वाटणाऱ्या या घटनेच्या मागे आहे, एक नाकारलेपण आणि स्वप्न पूर्ण करण्याची अफाट जिद्द. 

खडतर परिस्थितीतच जन्म झालेल्या आशाचे पदवीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी लग्न झालं होतं. दोन मुलं झाली पण नवऱ्यासोबत खटके उडत राहिले. तिला संसार सोडावा लागला. आठ वर्षांपूर्वी नवऱ्याचे घर सोडून बाहेर पडताना तिच्यावर दोन मुलांची जबाबदारी होती. आई-वडिलांचीही घरची परिस्थिती बेताचीच. दोन भावंडांची लग्नं व्हायची होती. आशाने माहेर जवळ केलं ते या अशा परिस्थितीत.  

‘वाईट म्हणता येतील अशा सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. यापुढे काही चांगले व्हावे अशी इच्छा बाळगण्यासाठी आणि ती पुरी करण्यासाठी मला शिक्षण पूर्ण करणं आवश्यक होतं,’ असं आशा प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगते. ‘अशा परिस्थितीत पदवीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचा विचार करणे हे कोणालाही वेडेपणाचं किंवा ती एक ‘लक्झरी’ वाटली असती. पण शिक्षण हेच मला माझ्या सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव सन्मानजनक मार्ग वाटत होता,’ ती पुढे सांगते. भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न तिने लहानपणापासूनच पाहिले होते. पण लग्न झालं आणि सगळं मागे पडलं. लग्नाच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतरही नव्याने उभं राहण्यासाठी आता तिच्याकडे फक्त तिची स्वप्न होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आशाच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘मला स्वप्न फक्त पाहायची नव्हती, तर पूर्णही करायची होती.’ 

घटस्फोटासारख्या प्रसंगात अनेकदा महिला खचतात, स्वतःला सावरणं त्यांना कठीण होतं. शिवाय दोन मुलांची जबाबदारी, बारावीपर्यंतचे शिक्षण आणि माहेरही आर्थिक विपन्नावस्थेतलं. आशासाठी खरंतर आशेचा कोणताही किरण नव्हता. मात्र तिने परिस्थितीला शरण जायला नकार दिला. आशासमोर आव्हान होते ते परिस्थितीचे आणि आशाला हीच सर्व परिस्थिती मुळापासून बदलायची होती. कुटुंबाचे दारिद्र्य कायमस्वरूपी संपवायचे असेल तर वाघिणीचे दूध असणारे शिक्षण, हाच एकमेव मार्ग तिला दिसत होता आणि त्यावरूनच मार्गक्रमण करण्याचा निर्णय तिने घेतला. 

शिक्षण सुरू ठेवताना पोट भरण्यासाठी काहीतरी तात्पुरता मार्ग शोधायला हवा होता. तिच्या समोर काम आले जोधपूर पालिकेत सफाई कामगाराचे. त्या वेळेची गरज म्हणून आशानी हा मार्ग स्वीकारला. चार वर्षांपूर्वी आशाने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, मात्र आयएएस परीक्षेसाठी असणारी वयाची मर्यादा तिने ओलांडल्याने तो मार्ग आता बंद होता. पण ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी केलेली तयारी वाया जाणार नव्हती. तिने राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. आशाने २०१८मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. उत्तीर्ण होऊन आशाची आता राजस्थान प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 

पदवीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा पास होणे असा आशाचा अजिबात सरळ प्रवास नाही. आशा सांगते, ‘शिक्षण पूर्ण करणे, स्पर्धा परीक्षा देणे हे तर मला करायचेच होते. पण चार पोटंही माझ्यावर अवलंबून होती. काम तर करणं आवश्यक होतं. जोधपूर नगरपालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम मिळत होतं. कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, फक्त परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचं असते. मी कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून रुजू व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे आवश्यक पैशाची गरज भागत होती. सफाईचे काम पण मी मन लावून करायचे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी झालेल्या आंदोलनातही मी सहभागी झाले होते. कामावर असताना काम लवकरात लवकर पूर्ण करून अभ्यास करायला बसायचे हा माझा नेहमीचा दिनक्रम होता. मी वेळ वाया घालवला नाही, त्याचे फळ मला मिळाले.’ 

‘वेळेचा पूर्ण वापर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी करा. प्रयत्न करत रहा,’ असं आशा आवर्जून सांगते. ज्या विभागात सफाई कर्मचारी म्हणून कायम करून घेण्यासाठी आशानी आंदोलन केलं होतं, त्याच विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आता तिच्यावर असणार आहे, हे सांगताना तिच्या शब्दांतला अभिमान लपत नाही.

सफाई कर्मचारी ते उपजिल्हाधिकारी हा आशाचा प्रवास केवळ प्रेरक असाच आहे. पण त्या पलीकडे जाऊन आशा ज्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून पुढे येत तिने तिच्यासमोरच्या संकटांना असा काही धक्का दिला की तिच्या प्रयत्नांना सलामच करावा लागेल.  ह्या सगळ्या प्रवासात तिला असंख्य अनुभव आले. एकटी आई म्हणून, रस्ता सफाई करणारी कामगार म्हणून तिच्या वाट्याला टोमणे आले, पण ही प्रतिकूलताच जणू तिच्यासाठी प्रेरणा बनली.

आशाच्या या यशाची देशभरातल्या माध्यमांनी दखल घेतली आहे. जोधपूर पालिकेत अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, ‘हा प्रवास खडतर होता, मला खूप काही सोसावं लागलं. पण आता मी समाजातल्या वंचित घटकांसाठी, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांसाठी काही करण्याच्या परिस्थितीत आहे.’

आशाच्या या यशकथेबरोबरच राजस्थातल्याच अन्शू, रितू आणि सुमन शरण या तिघी सख्ख्या बहिणी असलेल्या शेतकरीकन्यांनीही राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश मिळवून आणखी एक यशकथा लिहिली आहे. शरण कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता कारण शरण दांपत्याच्या पाचही मुली आता सरकारी अधिकारी आहेत. अन्शू, रितू आणि सुमनच्या बहिणी मंजू आणि रोमाही  राजस्थान प्रशासकीय सेवेत आहेत.

आशा कण्डारा किंवा अन्शू, रितू आणि सुमन या सगळ्या यशकथा खऱ्याच; न हरता मेहनत घेतली तर स्वप्नं पुरी करता येतात, असा विश्वास देणाऱ्या.

संबंधित बातम्या