प्रेरणास्रोत

दीपा कदम
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

‘ती’ची लढाई

टोकियो ऑलिंपिकच्या निमित्ताने पुढे आलेल्या या काही कथा... एका पातळीवर कदाचित अविश्वसनीय वाटणाऱ्या... या कथा म्हणजे भारतीय महिलांच्या जिद्दीची आणखी एक सुरुवात आहे. या कथाच कितीतरी जणांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहेत.

तुम से भिडने से पहले वो भिडी थी
मेरे देश की पितृसत्तात्मक परंपराओं से 
लडी थी छोटी स्कर्ट पहनने के लिए
घर से बाहर निकलने के लिए
बाल कटवाने के लिए...

महिला हॉकी संघाने केलेल्या कामगिरीनंतर सरस्वती रमेश यांनी लिहिलेली ही कविता. भारतीय तरुणींना खेळामध्ये करिअर करायचे असेल तर खेळाव्यतिरिक्तदेखील अनेक बाबींसोबत झगडावे लागते. भारतीय महिलांनी टोकियो ऑलिंपिक २०२०मध्ये हॉकीच्या उपान्त्यपूर्वफेरीपर्यंत धडक मारली. त्यांना पदक मिळाले नाही, पण शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाला जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावरून चवथ्या क्रमांकावर पोहोचवले. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या संघाना त्यांनी पराभूत केले. कांस्य पदकासाठी ब्रिटनसोबतच्या अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्कारावा लागला पण पदक न मिळवतादेखील भारतीय महिला हॉकी संघाची दखल जगभरात घेतली गेली. भारतात तर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. विजयाचे महत्त्व असतेच ते नाकारून चालणार नाही. मात्र संघ सर्वात खालच्या स्थानावर असणे, शिवाय सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सणकून झालेल्या पराभवानंतर उच्च पातळीवर खेळ उंचावत नेऊन पदकाच्या शर्यतीत वरच्या क्रमांकावर संघ पोहोचल्यानंतर पदकापेक्षाही भारतीय महिला हॉकी संघाने दाखवलेल्या क्रिडा नैपुण्याने प्रत्येक भारतीयाला आनंद मिळवून दिला.

ऑलिंपिकमध्ये पदकांच्या क्रमवारीत भारत ४८व्या स्थानावर आहे. भालाफेकीत नीरज चोप्राला मिळालेले एकमेव सुवर्णपदक, मीराबाई चानू आणि रवीकुमार दहिया यांनी मिळवलेली रौप्य तर पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना आणि पुरुष हॉकी संघाला मिळून चार कांस्य पदके भारताच्या खात्यात आहेत. ऑलिंपिकच्या एकशे वीस वर्षांच्या इतिहासात भारताला प्रथमच सर्वाधिक सात पदके मिळाली आहेत. त्यामधील तीन महिला खेळाडूंची आहेत. या साऱ्यांबरोबर अदिती अशोकनी जागतिक क्रमवारीतले आपले आणि भारतीय गोल्फचे स्थान उंचावताना नोंदवलेली कामगिरीही संस्मरणीय ठरली. 

खेळाच्या विश्वात पुरुष आणि महिला असा भेद करून पाहिले जावे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या संदर्भात कदाचित अशीदेखील आवश्यकता आहे. जिथे मुलीचा गर्भ आईच्या पोटातच मारला जातो, प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे शिक्षण घेण्यासाठी जिथे मुलींनी झगडावे लागते, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये  बालविवाहाचे प्रमाण अजूनही दखल घेण्याइतपत आहे... अशा कितीतरी अडथळ्यांची शर्यत पार करत मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळते. खेळाच्या मैदानावरदेखील महिला खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, भत्ते यामध्ये पुरुष खेळाडूंच्या तुलनेत दुय्यम स्थान असते. परंतु खेळाची झिंग एकदा का चढली तर सगळ्या गोष्टी झुगारून दिल्या जातात हे या महिला खेळाडूंनी दाखवून दिले आहे.

भारतीय महिला हॉकी संघाचं विशेष कौतुक वाटते कारण संपूर्ण महिला हॉकी संघ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत या वळणापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय कुस्तीचे आखाडे गाजवणाऱ्या फोगट भगिनी, बॉक्सिंगचे रिंगण मारणारी मेरी कोम यांच्यावर बायोपिक आलेले आहेत. टोकियो ऑलिंपिकच्या या नव्या रणरागिणींपैकी प्रत्येकीचे आयुष्य म्हणजे संघर्ष आणि चिकाटीची अशी कथा आहे की या प्रत्येकीवर एक स्वतंत्र बायोपिक होऊ शकेल. 

महिला हॉकीची कर्णधार राणी रामपाल ही तर या सर्व कथांची नायिका होऊ शकेल. राणीचा जन्म अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात झाला. पण अशाच परिस्थितीत कायम राहायचे नाही, दारिद्र्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढायचे असा निर्धार राणीने केला होता. राणीच्या चंद्रमौळी घराच्या बाहेरच हरियाणा हॉकी स्टेडियम होते. हे हॉकीचं मैदान राणीला वयाच्या सातव्या वर्षापासून खुणावत होते. मजुरी करणाऱ्या राणीच्या वडिलांना मुलीने हॉकी खेळणे परवडणारे नव्हतेच शिवाय मुलीने स्कर्ट घालून खेळणे तर अजिबातच मान्य नव्हते. त्यांनी परवानगी नाकारल्यानंतरदेखील राणीचे हॉकीचे आकर्षण कमी झाले नाही. ती प्रशिक्षकांना जाऊन भेटली. पण त्यांनी तर एवढी अशक्त मुलगी हॉकी खेळूच शकणार नाही, असे सांगत तिला जवळपास पिटाळूनच लावले होते. त्याच स्टेडियमच्या बाहेर राणीला तुटलेली हॉकी स्टीक मिळाली, ज्याने ती दिवसभर खेळत रहायची. तिच्या चिकाटीमुळे अखेरीस शालेय हॉकीच्या संघापासून राणीला संधी मिळाली. मात्र सरावाला जाण्यापूर्वी अर्धा लिटर दूध घरून पिऊन येणे खेळाडूंना सक्तीचे होते. कसंतरी करून राणीचे वडील पाव लिटर दूध आणून देत होते, त्याच दूधात अजून पाव लिटर पाणी मिसळून पोट भरून उत्साहात राणी मैदानात उतरत असे. ही राणीच्या भारतीय संघातील वयाने सर्वात लहान खेळाडू ते भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार या प्रवासाची सुरुवात आहे. 

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असला तरी हॉकीला ग्लॅमर नसल्याने हॉकी दुर्लक्षितच राहिलेली आहे. अशात महिला हॉकीकडे कोणाचे लक्ष जाणार. काही तरी वेगळे करून दाखविण्याची उमेद असणाऱ्या मुलीच या खेळाकडे आकर्षित होताना दिसतात. याच संघातील वंदना कटारियावर मुलगी असल्यामुळे तिने हॉकी खेळू नये यासाठी घरून कायम दबाव असे. नेहा गोयलचे वडील दारूच्या आहारी गेले होते. वडिलांच्या वर्तणुकीचा नेहावर परिणाम होवू नये यासाठी नेहाची आई नेहाला हॉकी शिकायला पाठवत असे आणि स्वतः सायकलच्या फॅक्टरीत काम करत असे. निशा वारसीच्या वडिलांना २०१५ मध्ये पक्षाघात झाला, तेव्हापासून तिची आई घरकाम करते आणि साबणाच्या फॅक्टरीमध्येदेखील काम करते. झारखंडची निक्की प्रधानची हॉकीची सुरुवात मोकळ्या शेतातच झाली. ऑलिंपिकची मॅच पाहण्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी तिच्या घरी टीव्ही पाठवला तेव्हा तिच्या घरी आणि पाड्यावर मॅच पाहता आली.       

मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवले, तर लवलिना बार्गोेहेनने कांस्य मिळवलेले आहे. मीराबाई आणि लवलिना या दोघीही जेमतेम आर्थिक परिस्थितीतून आलेल्या आहेत. मणीपूरच्या खेड्यात वाढलेली मीराबाई हायवेवरून जाणाऱ्या ट्रकची लिफ्ट घेऊन सरावाच्या ठिकाणी पोहोचत असे. दोन दिवसांपूर्वी मीराबाईने तिला मदत करणाऱ्या ट्रक चालकांचाही विशष सन्मान केला. 

टोकियो ऑलिंपिकच्या निमित्ताने पुढे आलेल्या या काही कथा आहेत. एका पातळीवर अविश्वसनीय वाटणाऱ्या या कथा म्हणजे भारतीय महिलांच्या जिद्दीची आणखी एक सुरुवात आहे. या ऑलिंपिकमध्ये आपण आपल्या ऑलिंपिक इतिहासातली सर्वाधिक पदके आणली हे खरेच, पण त्या प्रत्येक पदकाइतक्याच या कथाही कितीतरी जणांसाठी प्रेरणास्तोत्र ठरणार आहेत.

सरस्वती रमेश यांनी त्यांच्या या कवितेच्या शेवटी म्हटलेय,  तुमको हराने से पहले उन्होंने हराया लडकियों के लिए बनाये गए लक्षणों को...

संबंधित बातम्या