दहशतीच्या छायेत

दीपा कदम
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

‘ती’ची लढाई

गेल्या वीस वर्षात मिळालेली मोकळा श्वास घेण्याची संधी गमवावी लागण्याची भीती अफगाणी महिलांना वाटते आहे.

वकिलीचे शिक्षण घेतलेली झारिफा गफारी वयाच्या २६व्या वर्षी अफगाणिस्तानातील मैदान शहरची महापौर झाली, ही अफगाणिस्तानातल्या अलीकडच्या इतिहासातली महत्त्वाची घटना होती. अफगाणिस्तानातील पुरुषी मानसिकतेला हा एवढा मोठा धक्का होता की झारिफाला सुरुवातीचे नऊ महिने महापौरपदाचा पदभार स्वीकारताच आला नाही. आदल्या वर्षी जुलैमध्ये तिची नेमणूक जाहीर झाल्यानंतर २०१९च्या नोव्हेंबर महिन्यात झारिफाने मैदान शहरच्या महापौर कार्यालयात पहिल्यांदा पाऊल ठेवले. पहिल्याच दिवशी तिने राजीनामा द्यावा म्हणून तिला तालिबान्यांकडून धमक्या मिळाल्या. पण झारिफा डगमगली नाही. ती तिचे काम करत राहिली.

कार्यकर्ती आणि उद्योजिकाही असणाऱ्या झारिफाचं मुख्य काम आहे महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात. झारिफा गफारीचे वडील अफगाण सैन्यात मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली होती. त्यांची हत्या होण्याच्या वीसच दिवस आधी झारिफाची हत्या करण्याचा तिसरा प्रयत्न झाला होता.

अफगाणिस्तानात आता पुन्हा तालिबानी सत्ता आल्यानंतर झारिफासारख्यांचं काय असा प्रश्न साहजिकच विचारला जातो आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झारिफा म्हणते, ‘मी इथेच त्यांची वाट पाहत बसले आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना मदत करू शकेल असे इथे कोणीच नाही. माझे पती आणि माझ्या कुटुंबीयांसह मी त्यांची वाट पाहते आहे.  ते माझ्यासारख्यांना शोधून काढतील, आणि मारून टाकतील.’

कुब्रा बेहरोजची परिस्थितीही झारिफासारखीच आहे. दहा वर्षांपूर्वी कुब्रा अफगाणिस्तानच्या लष्करात दाखल झाली. तिचं लष्करात दाखल होणं त्यावेळीही अनेकांना रुचलं नव्हतं. आता कुब्रा आणि लष्करातल्या तिच्या इतर सहकारी महिला भीतीच्या छायेत वावरत आहेत. लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार कुब्रालाही धमक्यांचे फोन येत आहेत. “तुला कसं शोधायचं हे आम्हाला माहिती आहे, असं त्यांनी मला सांगितलंय. मला आणि माझ्या घरच्यांना ते जिवंत सोडणार नाहीत,” असं तिनं सांगितल्याचं ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटेनिया गुटरेस यांनी अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी सत्ता आल्यानंतर महिला आणि बालकांबाबत व्यक्त केलेली चिंता म्हणूनच अवाजवी नाही.  ‘अफगाणिस्तानात सुरू असलेला संघर्ष हजारो लोकांना तिथून पळून जाण्यास भाग पाडत आहे. सर्व प्रकारचा छळ थांबला पाहिजे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि मानवी हक्क, विशेषतः महिला आणि मुलींच्या बाबतीत अनेक प्रयत्नांनंतर जे मिळवता आले ते कायम राखता आले पाहिजेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वीस वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना महिला व बालकांवरील अत्याचारांनी छळवणुकीच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्यामुळेच आताही महिलांना तालिबान्यांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल जगाला चिंता वाटते आहे. अफगाणी महिला पुन्हा मध्ययुगीन काळात लोटल्या जातील अशी भीती व्यक्त होते आहे. त्याचमुळे, महिलांना काम करण्यापासून रोखले जाणार नाही; आता आम्ही बदललो आहोत, असे जरी तालिबानी प्रवक्त्याने पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी निम्म्यापेक्षा जास्त जग त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. 

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी यापूर्वी केलेल्या अत्याचारांचे दाखले अजूनही दिले जातात. महिलाच तालिबान्यांच्या अमानुषतेचे पहिले लक्ष्य ठरत आल्या आहेत. अफगाणिस्तानात महिलांचे प्रमाण २४ पुरुषांमागे सात महिला असं आहे. बाई जन्माला येऊ नये, आली तर आयुष्यभर तिला शिक्षेलाच कसे सामोरे जावे लागेल याची तजवीज तालिबान्यानी केलेली आहे, असंच चित्र आहे. तालिबान्यांच्या हुकुमानुसार महिला संपूर्ण बुरख्याशिवाय आणि घरातल्या कोणातरी पुरुषाच्या सोबतीशिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही. जगात अन्यत्र मिळणारे अनेक अधिकार तालिबानी राजवटीमध्ये तिला नाकारले गेले होते. त्याची आता पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त होते आहे. गेल्या वीस वर्षांत मिळालेली मोकळा श्वास घेण्याची संधी गमवावी लागण्याची भीती अफगाणी महिलांना वाटते आहे.

अफगाणिस्तानात झारिफा आणि कुब्रासारख्या शेकडो महिला आणि त्यांची कुटुंबं आहेत, ज्यांना तालिबान्यांसमोर जावे लागणार आहे. तालिबानी त्यांच्या घरात कधीही पोहोचतील आणि तालिबान्यांच्या विरोधात आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे ‘फळ’ त्यांना याच पद्धतीने मिळणार याची त्यांना खात्री आहे. पण याही परिस्थितीत हार न मानता त्या टिकून उभ्या आहेत. झारिफा सारख्या अनेक ठिणग्या अफगाणिस्तानात धुमसत आहेत, मात्र त्यांच्यासाठी संघर्ष अटळ आहे हे निश्चित.

संबंधित बातम्या