झुंबर  वेलीचं  सौंदर्य!

धीरज वाटेकर, चिपळूण
सोमवार, 24 जानेवारी 2022

दखल

पूर्ण वाढ झालेल्या झुंबर वेलीच्या फुलपाखराच्या आकाराच्या फुलांवर सूर्याची कोवळी किरणं पडल्यानंतर तिचं सौंदर्य अधिक खुललेलं दिसतं. हिरव्यागार पानांच्या सान्निध्यात या वेलीवरचा अनेक घड्यांनी युक्त झुंबरासारखा दिसणारा फुलोरा जमिनीच्या दिशेला झेपावत असताना, हलक्याशा वाऱ्याची मंद झुळूक मदतीला आली की परसदारी जणू नृत्य करीत असल्याचा आभास निर्माण होतो.

चिपळूण शहरातल्या खेंड भागात राहायला आल्याला आम्हाला एक तप पूर्ण होत आलंय. तेव्हाचं भकास वाटणारं इथलं पर्यावरण आता पूर्णतः बदललंय. निसर्गातल्या गुजगोष्टीत नि परसदारातल्या बाळंतपणात ते रममाण झालंय. याच वातावरणात गेल्या सात-आठ वर्षांपासून असलेलं एक जीवंत आश्चर्य आम्हाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ पाहतंय! पण याची आम्हाला फारशी कल्पना नव्हती. इतकी की एकदा तर ‘अनावश्यक वाढ’ म्हणून आम्ही त्यावर ‘ट्री कटर’ चालवून मोकळे झालो होतो. अर्थात पूर्ण उलगडा झाल्याशिवाय कोणतंही झाड समूळ तोडायचं नाही, हा विचार जपलेला होताच. गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात लॉकडाउन एकने परसदारी निरखून बघायला जो ‘डोळस’ वेळ दिला, त्यात सध्याच्या थंडीच्या दिवसांत, वर्षाखेरीस आणि नववर्षारंभ काळात फुललेल्या या दुर्मीळ ‘झुंबर वेली’नं आम्हाला आकर्षित केलं होतं. तसं तिचं या मोसमातलं बहरणं आम्हाला सवयीचं झालेलं होतं. पण का कुणास ठाऊक, अधिक बारकाईनं निरखल्यावर यंदाही बहरलेल्या झुंबर वेलीचं प्रभावशाली सौंदर्य अधिक लोभस वाटलं.

क्लेरोन्डेन्ड्रम स्मिथियनम (Clerondendrum smithianum) हे सहज उच्चारायलाही कठीण असं शास्त्रीय नाव असलेल्या या दुर्मीळ फुलझाडाचं डोळ्यांनी दिसणारं फुललेलं सौंदर्य मात्र अफलातून आहे. याच वेलवर्गीय झाडाला लाईट बल्ब (Light Bulb) किंवा चेन ऑफ ग्लोरी (Chains of Glory) असंही म्हणतात. मराठीत मात्र याला ‘झुंबर वेल’ असं छान साजेसं नाव असल्याचं आम्हाला सोशल मीडियावरून समजलं. सध्याच्या हिवाळ्याच्या मध्यापासून ते वसंतापर्यंत या झाडाच्या फुलांच्या बल्बच्या आकाराच्या कळ्या उमलल्यावर नजरेस जाणवणारे परागकणयुक्त लांबलचक पुंकेसर असलेल्या पांढऱ्या फुलांचं झुंबरासारखं सौंदर्य पाहणाऱ्याला जागीच खिळवून ठेवतं. पूर्ण वाढ झालेल्या झुंबर वेलीच्या फुलपाखराच्या आकाराच्या फुलांवर सूर्याची कोवळी किरणं पडल्यानंतर तिचं सौंदर्य अधिक खुललेलं दिसतं. हिरव्यागार पानांच्या सान्निध्यात या वेलीवरचा अनेक घड्यांनी युक्त झुंबरासारखा दिसणारा फुलोरा जमिनीच्या दिशेला झेपावत असताना, हलक्याशा वाऱ्याची मंद झुळूक मदतीला आली की परसदारी जणू नृत्य करीत असल्याचा आभास निर्माण होतो.

अन्यवेळी वेलीच्या खुललेल्या पांढऱ्या फुलांपेक्षाही तिच्या फिक्कट पांढऱ्या कळ्या अधिक मनमोहक वाटतात. जणू त्या मण्यांप्रमाणे भासाव्यात. टोकाला हलकासा लाल रंगाचा स्पर्श असलेल्या या फुलांचा देठ तांबूस रंगाचा असतो. चार फुटांची पूर्ण वाढ झालेलं फुलझाड सहज बहरत असलं, तरी ते सहा फुटापर्यंत सुलभतेनं वाढतं. कधीकधी याची वाढ दहा फूटही असू शकते. आपल्या जैवविविधतेतील घटक असलेल्या फुलपाखरांसह छोट्या पक्ष्यांनाही झुंबर वेल आकर्षित करते. मात्र इतक्या आकर्षक फुलाला अजिबात सुगंध नाही हे आश्चर्यकारक आहे. हे सदाहरित वेलवर्गीय फूलझाड मूळचं थायलंडचं असल्याचं आमच्या वाचनात आलं. आशिया आणि आफ्रिकेमध्ये क्लेरोन्डेन्ड्रमच्या सुमारे ४००हून अधिक प्रजाती असाव्यात. जगभरात मोजक्या भागात उपलब्ध असलेलं हे फूलझाड ई-कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीला असल्याचं पाहून तर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला.

आमच्यासोबत निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळात कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी मित्र विलास महाडिक यांच्या नजरेला काही दिवसांपूर्वी आम्ही हे पूर्ण फुललेलं फूलझाडं आणलं. यापूर्वी कुठंही पाहिलेलं नसल्यानं त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी या फूलझाडाचा व्हिडिओ, सोशल मीडियावरील दुर्मीळ फूलझाडांशी संबंधित एका ग्रुपवर पोस्ट केला. तेव्हा याच्या नावाचा आम्हाला उलगडा झाला. वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, हेमंत ओगले, रोहन कोरगावकर, दत्तात्रय मोरसे, प्रा. आदित्य तांबे, राहूल सोनवणे, संजय परांजपे, आकाश बाखडे आदींची या वेलीचं नाव शोधण्यात मदत झाली.  मिलिंद गडकरी  यांनी आपल्या फेसबुक वॉलवर १३ जानेवारी २०२२ रोजी फुलाचा एक फोटो पोस्ट केला होता, तो झुंबर वेलीचा होता. हे रोप त्यांना गणपतीपुळे मंदिराच्या समोर मिळालेलं होतं. नावानुसार आम्ही याची अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता फारसं काही हाती लागलं नाही. तेव्हा पुरेशा प्रकाशात फुलणाऱ्या आणि फारसे दस्तऐवजीकरण न झालेल्या झुंबर वेलीची दुर्मीळता ध्यानात आली. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या परसदारी बहरलेली जबरदस्त आकर्षक अशी ही ‘झुंबर वेल’ पाहणं हे खरोखरच सुंदरतेचं प्रतिक आहे, असं वाटल्यानं तिच्याविषयी लिहिलं.

संबंधित बातम्या