अमेरिका-चीनची निर्णायक बैठक: गोठलेली आगपाखड

डॉ. अनंत पां. लाभसेटवार
सोमवार, 19 एप्रिल 2021

विशेष

अमेरिका आणि चीन दरम्यानच्या अलास्का समिटकडे जगाचं लक्ष लागलं होतं, पण वास्तवात बैठकीत जे घडलं त्यामुळे सगळ्याच जगाला धक्का बसला.

मार्च १७ आणि १८ या दिवशी अँकरेज या अलास्कातील बर्फाच्छादित शहरात दोन बलशाली व जगात मोठी अर्थकारणं असलेल्या देशांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्माण झालेल्या आगीमुळे अलास्कातला बर्फही कदाचित वितळला असता. या बैठकीत अमेरिकेची आघाडी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांनी सांभाळली तर चीनची धुरा होती साम्यवादी, पक्षाचे ज्येष्ठ धोरणकर्ते याँग जिंची (Yang Liechi) आणि परराष्ट्र मंत्री वाँग यी (Wang Yi) यांच्या हातात. जो बायडन यांच्या कारकिर्दीतील ती पहिली बैठक. दोन्ही बाजू एकमेकांचे उद्देश व धोरण जाणण्यास उत्सुक होत्या. अमेरिकेच्या नवीन अध्यक्षांशी चीन कसा वागणार याचा अंदाज या बैठकीत झालेल्या संवादावरून बांधणं शक्य होतं. त्यामुळे जगाच्या आशा उंचावल्या होत्या. पण झालं मात्र उलटच.

प्रत्येक बाजू सुरुवातीला दोन मिनिटं बोलेल व आपली भूमिका मांडेल असं अगोदरच ठरलं होतं. पण यांग जिंची यांनी जो जिभेचा पट्टा सुरू केला तो वीस मिनिटं सुरू राहिला. त्यांनी राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारला. त्यांच्या भाषणातून उद्धटपणा, तुच्छता व उपेक्षा पाझरत होती. त्यामुळे अमेरिकन बाजू सुन्न झाली आणि बाहेरच्या थंडीपेक्षा आतलं वातावरण अधिक गोठलं. अमेरिका एकमेव महासत्ता आहे, या समजाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करताना जिंची यांनी जगात तेवढीच किंवा त्यापेक्षा मोठी शक्ती निर्माण झाली असं अप्रत्यक्षपणे सुचवलं. अमेरिकेचे अध्यक्ष जगाचे महासत्ताधिश म्हणून ओळखले जातात. त्या पदी आता दुसरं कुणी आलं आहे, असे विचार जिचींनी मांडले. या अनादरामुळे अमेरिकन बाजू सर्द झाली आणि जग गोंधळात पडलं.

त्या उच्चपदस्थ साम्यवादी पक्षाच्या अधिकाऱ्यानं कुठल्याही टिपणाचा आधार न घेता व न अडखळता अमेरिकेचे कान पिळल्याने बैठकीतलं वातावरण ढवळून निघालं. जिंचींच्या म्हणण्यानुसार, अमेरिका एक महासत्ता आहे, हा केवळ भ्रम आहे,  वास्तवात तिला कीड लागलेली असून ते ऱ्हासग्रस्त राष्ट्र आहे. अमेरिकेत गुणवत्ता (Meritocracy) वंशद्वेषी समजण्यात येते. तो देश समता-समानता सारख्या डाव्या मूल्यांवर अमाप वेळ खर्च करतो. चिनी भाषेत त्याला बावझाव (Baozuo) म्हणतात, पण त्याच वेळी चीन प्रगतीच्या मार्गावर अनिर्बंधपणे घोडदौड करीत आहे. अमेरिकेची लोकशाहीची संकल्पना जगाला मान्य नसून इतर देश पर्यायी मार्ग शोधत आहेत. खुद्द अमेरिकीन नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास नाही. कारण ३०-४० टक्के लोक आपण समाजवादी व कार्ल मार्क्सला पूजनीय समजणारे आहोत असं म्हणतात. अमेरिकेच्या अध्यक्षांपेक्षा चीनचे मुख्य कितीतरी जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळे अमेरिकेला जागतिक नेतृत्व करण्याचा अधिकार उरलेला नाही. जगाचे नियम ठरवणं आता आमच्या हाती आहे.

जिंचींचा दुसरा टोला अजूनच भेदक होता. अमेरिकेला इतर देशात मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं नेहमी दिसतं. त्या देशानं आरशात बघण्याची जरुरी आहे. अमेरिका स्थापन झाली तेव्हापासून त्या देशात वंशवाद (Racism) सुरू झाला व तो अद्याप कायम आहे. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ अजूनही रोज आंदोलनं करतात. या वस्तुस्थितीमुळे अमेरिका जगाला मानवी हक्कांविषयी धडे देऊ शकत नाही. देशात शांतता ठेवण्यासाठी चीननं वुईघूर मुस्लिम, हाँगकॉंग स्वातंत्र्यवादी व इतर अल्पसंख्याकांविरुद्ध जी पावलं उचललीत त्यावर टीका करण्याचा अमेरिकेला अधिकार नाही. शिवाय ती चीनची अंतर्गत बाब आहे, इतरांनी त्यात लुडबूड करू नये.

जिंची यांच्या या वक्तव्यावर अमेरिकी बाजूची त्रेधा उडाल्यासारखी झाली. ब्लिंकन यांचा स्वभाव आक्रमक नाही, स्वभावाने ते शांत आहेत. गळलेलं अवसान गवसण्यास त्यांना जरा वेळ लागला. राजनैतिक भाषा वापरत त्यांनी, अनेक क्षेत्रांत दोन देश दोन वेगवेगळ्या टोकांवर असले तरी तरी पर्यावरणाच्या बाबतीत एकत्र येऊ शकतात, असा मुद्दा मांडला. जिंचींनी अमेरिकेला केलं तसं त्यांनी चीनला लक्ष्य केलं नाही. यावरून त्यांची वैचारिक प्रगल्भता प्रकट झाली.

तंत्रज्ञान, लष्कर, अवकाशशास्त्र आदी क्षेत्रात चीन अमेरिकेशी बरोबरी करीत असून चीनला त्या महासत्ताक राष्ट्राची मुळीच भीती वाटत नाही, हे जिंचींच्या ताठर भूमिकेतून स्पष्ट झालं. लोकशाहीपेक्षा चिनी साम्यवाद श्रेष्ठ हे त्यांनी अधोरेखित करून आपला देश जागतिक नेतृत्व करण्यास सज्ज व समर्थ आहे याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला.

जिंचींच्या वक्तव्याची आम्ही राजधानीत परतल्यावर दखल घेऊ असं ब्लिंकन म्हणाले.

चीनच्या म्हणण्यात सत्यापेक्षा अर्धसत्य, यश व वर्चस्ववादाची झिंग व अरेरावी जास्त होती, असं कुणीही म्हणेल. त्यामुळे जे गैरसमज निर्माण झाले ते जागतिक शांततेला धोक्याचे ठरू शकतात. इतिहासातील अनेक युद्ध अशा गैरसमजातून सुरू झाली. ही जगाच्या दृष्टीनं एक मोठी चिंताजनक बाब आहे. बायडन चीनला चांगले परिचित आहेत. ते बुद्धिभ्रंशग्रस्त आहेत, हे चीनला ठाऊक आहे. योगायोग असा की ही बैठक सुरू होती तेव्हा ते विमानात चढताना शिडीवर तीनदा पडले. त्यामुळे जगाला त्यांचे शारीरिक दौर्बल्यही दिसले, म्हणून ते आपल्या पंक्तीला बसू शकत नाही व जागतिक नेतृत्वाचा झेंडा त्यांच्या हातातून चोरण्याची ही सुवर्णसंधी असल्याचं अनुमान चीनच्या नेत्यांनी काढलं.

इथे चीन घोडचूक करीत आहे कारण त्यांच्या अनुमानाप्रमाणे बायडन असमर्थ असले तरी त्यांचे सल्लागार अमेरिकेचं प्रभुत्व पुढे चालू ठेवतील यात शंका नाही. पण त्या अगोदर यांग जिंचींच्या विधानातील गैरअन्वयार्थाचा परामर्श घेणं आवश्यक आहे.

लोकशाहीची संकल्पना जग मान्य करीत नसून जग समाजवाद-साम्यवादाकडे वळत आहे, असं ते म्हणाले. हे खरं की लोकशाही राज्यप्रणालीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आंदोलनं होतात, विरोधी मतं व्यक्त होतात, योजना रखडतात, प्रगतीचा वेग काहीसा मंदावतो. पण आंदोलनामुळे खरा सामाजिक विकास होतो त्याचं काय? महात्मा गांधीनी मोर्चे काढले नसते तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसतं. खुद्द माओनी आंदोलन केलं नसतं तर आजचा चीन जन्माला आला नसता. आता त्या देशात तसं करणारे बेपत्ता होतात नाहीतर कारावासात कोंडले जातात. चीनमधल्या अल्पसंख्याकांना आज समाजोन्नती करण्यास मार्ग उरला नाही. आंदोलन, मोर्चे, टीका ही लोकशाहीची आभूषणं आहेत हे साम्यवाद्यांना कळणं शक्य नाही.

दुसरं असं की चीन साध्या लोकशाहीशी मुकाबला करीत नाही तर भांडवलशाहीवादी लोकशाहीशी टक्कर देत आहे. हा प्राणी फार वेगळा आहे. त्यात जेवढी गतिमानता, गतिशीलता (Dynamism) व बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती (Adaptation) सापडते ती साम्यवादात तर सोडाच, पण दुसऱ्या कुठल्याच राज्यप्रणालीत सापडत नाही. याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे अमेरिकेनं सर्वस्वी नवीन जैवतंत्रज्ञान वापरून जगाच्या बाजारात आणलेल्या तीन कोरोना प्रतिबंधक लशी. चीननं पारंपरिक ज्ञान वापरून विकसित केलेल्या लशीला जागतिक मान्यता मिळाली नाही. हिटलरचा व सोव्हिएत युनियनचा पराभव करून भांडवलशाहीवादी लोकशाहीनं आपलं वर्चस्व जगाला दाखवलं. यांग जिंचींनी अमेरिकेवर शाब्दिक प्रहार करून तिला आव्हान दिलं. त्यावरून आपण त्या देशाचे प्रतिस्पर्धी नसून शत्रू आहोत हे स्पष्ट केलं. याप्रमाणे त्यांनी नकळत खरं शीतयुद्ध सुरू केलं. या चुकीचा त्या देशाला पश्चात्ताप वाटेल. अशा चकमकीत सोव्हिएत युनियनच्या साम्यवादाचं काय झालं याची क्षी जिनपिंग यांना वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. त्यांच ही दुखरी नस अमेरिकेला ठाऊक आहे. जगाचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. त्यात अमेरिकी बँकांना महत्त्वाचं स्थान आहे. चीनला डॉलरपासून वंचित ठेवलं तर त्या निर्यातप्रधान देशाची निर्यात आक्रसून त्याचा आर्थिक डोलारा कोलमडून पडेल.

यांग जिंचींनी क्षी जिनपिंग अमेरिकेच्या अध्यक्षांपेक्षा जास्त लोकप्रिय व म्हणून चांगलं नेतृत्व असल्याचा अभिमान व्यक्त केला. पण ते एक मिथक आहे. ही लोकप्रियता आस्थेपोटी की भयापोटी हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांच्या विरुद्ध ब्र जरी काढला तरी त्याला देशद्रोही म्हणून शिक्षा ठोठावण्यात येते. अशा भयावह वातावरणात त्यांच्याविरुद्ध मत व्यक्त करण्यास कुणाचे धाडस होईल? माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तिवादी स्वातंत्र्य असेल तर ते किती लोकप्रिय ठरतील हा कळीचा मुद्दा आहे. क्षी जिनपिंगनी विरोधकांना चिरडून, माध्यमांना मुठीत ठेवून व जगातल्या सर्वात मोठ्या प्रचार यंत्रणेचा उपयोग करून प्रतिमा बांधणी केली. हे नाटक देशात ठीक आहे, पण देशाबाहेर चालत नाही. भारत, युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चीनची लोकप्रियता अत्यंत कमी आहे. 

जिंचींची दुसरी एक फुसकी म्हणजे, अमेरिकेपेक्षा चीनकडे जग आदरानं, कौतुकानं व अनुकरण करण्याच्या दृष्टीनं बघतं, हा त्यांचा दावा. असं जग या भूतलावर तरी सापडणार नाही. चीनची मूल्ये मानवतेच्या पारड्यात बसत 

नाहीत. त्या देशाला एकूण चौदा शेजारी आहेत. चीनचं त्या सर्वांशी भांडण आहे. पाकिस्तान पैसे चारल्यामुळे भाडोत्री जवळीक व्यक्त करतो. पण अातून त्या देशाचा निषेधच करतो. कारण चीननं वुईघूर मुस्लिमांना दिलेली वागणूक व धर्म उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुन्नी पाकिस्तानला आवडत नाहीत.

अलास्का समिटमध्ये चीननं जो उद्दामपणा व अरेरावी दाखवली, त्यातून आपण अमेरिकेच्या मागे नसून पुढे असल्याचा वर्चस्वगंडच व्यक्त होतो. लोकशाहीला तंत्रज्ञानाशी जोडून दिलं, स्वातंत्र्याच्या जागी संदिग्धपणा पेरला आणि आक्रमणाला व्यापाराची झालर लावली की जग आपलं पाप विसरेल, असं चीनने स्वतःला पटवून दिलं. पण जग तेवढं क्षमाशील नाही हे क्षी जिनपिंगला लवकरच आढळून येईल.

(लेखक अमेरिकेच्या फर्स्ट नॅशनल बँक व ट्रस्ट कंपनीचे चौदा वर्षे ‘चेअरमन ऑफ दि बोर्ड’ होते.)

संबंधित बातम्या