लाॅकडाऊनमधील मानसिकता

डॉ. धीरज कुलकर्णी 
सोमवार, 27 एप्रिल 2020

विशेष
एरवी एखाद्या वस्तूकडे  माणूस अजिबात लक्ष देत नाही, पण सध्याच्या काळात तीच वस्तू खरेदी करण्यासाठी  माणसांची प्रचंड गर्दी  उसळते  आहे.  माणसाच्या अशा वागण्यामागे काही  मानसिक कारणे आहेत. याच कारणांवर चर्चा  करणारा  हा लेख...

पहिला प्रसंग, एक लोकप्रिय सिनेमा सुरू  आहे. खेळाची सगळी तिकिटे विकली गेलीयेत. थिएटरबाहेर लोक जमा झालेत. लोकांना थिएटरमध्ये सोडायला सुरुवात होते आणि लोक झुंबड करतात. आपण आत गेल्याशिवाय खेळ सुरू होणार नाही हे सर्वांना माहित आहे, तरीही ते शांतपणे रांगेत न जाता झुंबड करतात.

दुसरा प्रसंग, विमान लँड झाले आहे. आता लगेच काही ते निघून जाणार नाहीये. तरीपण सगळे प्रवासी एक्झिट दरवाजाशी गर्दी करतात.  ही दोन उदाहरणे भारतात दररोज घडतात. मग परदेशात कसे सगळे शिस्तीत वागतात आणि आपण कसे बेशिस्त आहोत असे म्हणत लोक नाके मुरडतात (हेच लोक गर्दी करतात).  पण परदेशातही काय चित्र आहे हे आपल्याला  नुकतेच दिसून आले. कोरोनाच्या साथीत सॅनिटायझर आणि टिश्यू पेपरचा जो तुडवडा झाला, त्यावरून ते स्पष्ट झाले. अर्थात ही काही रोज होणारी बाब नव्हे.  मग हे आहे तरी काय?

आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होणार नाही हे सरकारने वारंवार सांगितले आहे. गर्दी करू नका हेही  सांगून झाले. पण तितकासा परिणाम दिसत नाही. कारण आपल्याला भोवती जास्त गर्दी दिसते.  मग काय होते? आपले संस्कार, आपले पूर्वानुभव, आपला अभ्यास आपण गुंडाळून कुठेतरी ठेवतो आणि पळत सुटतो. दिसेल त्या अनावश्यक वस्तूंची  खरेदी करत राहतो. न जाणो उद्या ही बघायलाच मिळाली नाही तर? जगभरात शेअर बाजार पडला. लोकांनी आपले सर्व पैसे जिथे असतील तिथून काढून घेतले. नव्या गाड्या, घरे यांची मागणी शून्यावर आली. आजचा भरवसा नाही. उद्याचे काय विचारता? लोकांच्या देहबोलीतून, नजरेतून, बोलण्यातून अदृश्य  काळजी दिसायला लागली.  हा आहे मानवी मेंदूचा प्रताप. या आणि अशा अनेक सामाजिक संकटात मानवी मेंदूने दिलेला विशिष्ट प्रकारचा रिस्पॉन्स.

कोरोनाच्या साथीत असलेली समाजाची सामूहिक वागणूक हा आता चेष्टेचा, विनोदाचा किंवा संतापाचा भाग न राहता, त्याकडे गांभीर्याने  एक मानसशास्त्रीय  प्रतिक्रिया म्हणून पाहण्यास बऱ्याच देशांनी सुरुवात केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जसे उपाय केले जात आहेत, तसेच त्यातून उद्भवणारा  मानसिक ताण व आजारांसाठी समुपदेशन केंद्रांचीही उभारणी करण्यात आली आहे. आता या सामाजिक संकटसमयी आपण कशी प्रतिक्रिया देतोय ते पाहू.

अभ्यासात असे  दिसून आलेय, की मेंदू दोन पातळ्यांवर, म्हणजे व्यक्तिगत व  सामाजिक आणि तीन टप्प्यांत म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवटानंतर अशा प्रकारे मुकाबला करण्याचा प्रयत्न करतो. जगभरात एकाच वेळी आलेली साथ म्हणजे पॅनडेमिक. आपल्याला अगोदर खबर लागली,  की अशी काहीतरी साथ चीनच्या एका भागात आली आहे.  पण आपण तिकडे अजिबात लक्ष दिले नाही. कारण कोरोनाचा प्रसार, लक्षणे या विषयीची  माहिती आपल्याला नव्हती. प्रचंड वेगाने साथ पसरू लागली आणि आपल्या दाराशी येऊन ठेपली. मग आपला रिस्पॉन्स सुरू झाला. माणूस अशावेळी सर्वात आधी  आपल्या प्रियजनांची काळजी घ्यायला लागतो आणि मग आपली.

परदेशात असलेली आपली माणसे कशी आहेत, इकडे येऊ शकतायेत का, तिकडे त्यांची काय व्यवस्था असेल, हे आपण बघू लागलो. सोबत राहणाऱ्या लोकांना वारंवार दवाखान्यात नेऊन तपासून आणणे, ढीगभर चाचण्या करून घेणे सुरू झाले. एकमेकांत चर्चा सुरू झाली. इंटरनेटवर माहिती घेणे सुरू झाले. अमेरिकेत  कसा सॅनिटायझर, मास्क, टिश्यू पेपरचा तुडवडा झालाय ते  आपल्याला कळलं आणि सोशल मीडियावर आपण त्याचे मीम्स, विनोद फिरवायला लागलो...  आणि खरेच हा विषाणू एक दिवस  अचानक आपल्या दारात आला. आपण तयारच नव्हतो. त्यामुळे सगळ्यांची  धावपळ झाली.

एकएक बातम्या यायला लागल्या आणि आपले धाबे दणाणले. आता आपला मेंदू वेगाने विचार करून याचा मुकाबला करण्यास सज्ज होऊ लागला.  मी, माझे कुटुंब, त्यांची सुरक्षितता, अन्नाचा साठा, पैशांची पुरेशी उपलब्धता  या आणि अशा अनेक बाबींचा आपला मेंदू विचार करू लागला. नेहमीच्या सर्वसामान्य काळात आपल्या मेंदूची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. युद्ध, साथीचे आजार, अशा संकटसमयी मेंदूचा  फ्रॉन्टल कॉर्टेक्स  हा अधिक वेगाने विचार करू लागतो. 

व्यक्तिगत संकटात मेंदूने दिलेले आदेश हे आणीबाणीचे असून तात्काळ आपल्याला रिऍक्ट होण्यास भाग पाडतात. मात्र संकटात जेव्हा संपूर्ण समाज सापडलेला आहे, तेव्हा मेंदूच्या या रिस्पॉन्सबरोबरच आपला  विवेक वाद  या ठिकाणी  जागृत ठेवणे आपल्यासाठी गरजेचे  आहे. या ठिकाणी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल रिस्पॉन्सिव्हनेस अशा दोन बाबी लक्षात घेऊ. 

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रोजच्या सामाजिक व्यवहारात आपण वागत असताना जबाबदारीची असलेली जाणीव, तत्कालीन सामाजिक नैतिक मूल्यांची आपण करत असलेली जपणूक. म्हणजेच  सिग्नल  पाळणे, आपले टॅक्सेस भरणे, याशिवाय सामाजिक कार्यात सहभागी होणे इत्यादी. सोशल रिस्पॉन्सिव्हनेसची व्याख्या त्या त्या काळात जे सामाजिक वर्तन अत्यावश्यक आहे ते करणे. उदा. कोरोनाच्या साथीत  सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे काटेकोर पालन करणे. या दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळी करणार आहोत.

आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतानाच सामाजिक वर्तन कसे आहे यावर ही साथ किती वेगात आटोक्यात येईल हे अवलंबून आहे. कारण आता मानसिक तणाव वाढू लागला आहे. आतापर्यंत तर आपल्या लक्षात आले  असेल,  की  लोकांना गर्दी  टाळायला सांगूनही ते  खरेदीसाठी का  गर्दी करत आहेत. माणसाची हीच सहज वृत्ती त्याला उपाशीपोटी शेकडो मैलाचे अंतर चालत जायला प्रवृत्त करत आहे. अस्तित्व आणि त्यासाठी झगडणारा मेंदू, शरीराला काय वाटेल ती साहसे करायला लावतोय. या फेजमध्ये आख्या  जगावर असणारी  मुख्य समस्या म्हणजे आर्थिक ताण.  जगातले बहुतेक उद्योग आता या घडीला बंद आहेत. रोजगार बंद आहेत. जवळ असलेली जमापुंजी किती दिवस चालणार याची विवंचना आहे. उत्पादन बंद असल्याने लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या साठा असेपर्यंत मिळतील. नंतर काय करायचे ही दुसरी चिंता.

जगभरात लॉकडाऊन किती काळ राहील याची निश्चित माहिती कोणालाच नाही. अशा परिस्थितीत  मानवी मेंदूवर अस्तित्वाचा तणाव येऊ लागतो. त्यात आसपास जर लागोपाठ मृत्यू व्हायला लागले,  तर लगेच धीर सुटतो. जर्मनीत हेस प्रांताच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्याची बातमी सर्वांना कळली असेलच. लक्षात घ्या, व्हायरस हा  सेल्फ लिमिटिंग  म्हणजे स्वतः नियंत्रण करून घेणारा असतो. त्यामुळे ही साथ आटोक्यात येणारच आहे. पण तो पर्यंत आपले मन खंबीर राहणे गरजेचे  आहे. त्यामुळे आता आपण तिसऱ्या फेजकडे बघू. करोना संपल्यावर असणारे जग  आणि आपला मेंदू. आता पावेतो आपल्यापैकी बहुतांश मंडळींची  लॉकडाऊन संपताच काय काय करायचे याची लिस्ट करून झाली असेल. म्हणजे घड्याळाचा पट्टा बदलून घेणे, नवी चप्पल घेणे इथपासून कुठे फिरायला जायचे इथपर्यंत सर्व. नाही का? आणि तेही खरेच म्हणा. तणाव ठेवायचा तरी किती काळ?  पण मंडळी जरा जपून. कारण लॉकडाऊन संपला म्हणजे साथ संपली असा अर्थ होत नाही,  तर ती थोडीफार आटोक्यात आलेली आहे. ती पुन्हा पसरू न देणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून पूर्ववत सर्व व्यवहार सुरू झाल्यावर आपली अत्यावश्यक  कामेच करून घ्या. आपल्याला व आपल्या संपूर्ण समाजाला आता एका नवीन आव्हानाला सामोरे जायचे  आहे.

पीटीएसडी (PTSD - Post Traumatic Stress Disorder) असे  कधी ऐकले  आहे का तुम्ही? व्यक्तिगत बाबतीत एखादी जबर धक्कादायक घटना.  उदा. प्रियजनांचा अचानक वियोग, मोठा अपघात अथवा आजारपण.  तसेच आर्थिक नुकसान, बलात्कार, युद्ध अशा घटना व्यक्तीवर, त्याच्या मनोव्यापारावर दूरगामी परिणाम करतात. याची मानसिक आणि शारीरिक  लक्षणे दिसू लागतात. डिप्रेशन, वारंवार वाईट स्वप्ने पडणे, शरीर निस्तेज होणे.  भूक, झोप, पोटाच्या सवयी यावर  मोठा परिणाम होणे ही लक्षणे दिसू लागतात. भारतात दरवर्षी एक कोटींपेक्षा जास्त 'पीटीएसडी'च्या केसेस येतात. 

डायबेटीस अचानक होणे, मोतीबिंदू अचानक होणे हे  'पीटीएसडी'चे काही सामान्यरित्या दिसून येणारे उपद्रव होत...  आणि आता तर संपूर्ण जग तणावात असल्यानंतर हा तणाव संपताच काय रिस्पॉन्स येईल याकडे जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. फाइट  ऑर  फ्लाइट  रिस्पॉन्स (Fight or Flight Response) असा एक  महत्त्वाचा  प्रकार इथे अभ्यासण्याजोगा आहे. युद्ध साथी अशा गंभीर प्रसंगी प्राणी अथवा माणूस त्यांच्या भोवताली असणाऱ्या परिस्थितीनुसार खंबीर उभे  राहून लढायचे  की पळून जायचे  हा निर्णय घेतात. हाच फाइट  ऑर  फ्लाइट  रिस्पॉन्स होय. गेल्या शतकात यावर बरेच संशोधन करण्यात आले. त्यातून असे  लक्षात आले,  की  शारीरिक  आणि मानसिक दृष्टीने सुदृढ व्यक्ती या अशा तणावांचा सामना अगदी सहज करू शकतात.
आता फ्लाइट  रिस्पॉन्स देणे  शक्यच नाही. कारण आपण पळून जाणार तरी कुठे आणि कसे? सगळ्या जगालाच विळखा बसला आहे  (तरीही काहीजण जीवावर उदार होऊन शेकडो मैलाचे  अंतर पायी उपाशीपोटी कापतायेत ते आठवा. मानवी मेंदूचा रिस्पॉन्स!).  आता आपल्या हाती आहे फक्त फाइट  रिस्पॉन्स. म्हणजे च लढायचे, दुसरा पर्यायच नाही.  सगळी काळजी घ्यायची आणि कसोटीच्या या  काळातून  बाहेर पडायचे. अशा वेळी आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपले मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा ठणठणीत  असणे गरजेचे आहे.   सध्या आपण सर्वच या ना त्या प्रकारे तणावातून जातोय. एकमेकांशी चांगले विचार शेअर करणे, घरातल्या घरात हलके व्यायाम करणे, ध्यानधारणा, प्राणायाम, विपश्यना यांचा अभ्यास करणे, पौष्टिक  आहार घेणे यामुळे मेंदूतील रसायनांचे नियमन नीट होते. मेंदू उत्तमप्रकारे निर्णय घेण्यास सक्षम होतो. मानवी चुकांची शक्यता कमी होते... आणि सध्या त्याची आवश्यकता अधिक आहे. होय ना?

संबंधित बातम्या