फिनिअस गेजची गोष्ट...

डॉ. जयदेव पंचवाघ
सोमवार, 10 जानेवारी 2022

मेंदूचा शोध

मानवी मेंदू हा विचार, तर्क, कला, भावना इत्यादी प्रगल्भ मानवी क्षमतांचा ठेवा आहे. मेंदूविषयीची माहिती गेल्या काही वर्षांत हळूहळू आपल्याला समजू लागली आहे. एकूणच संपूर्ण चेतासंस्थेचे कार्य आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. या चेतासंस्थेवरील संशोधनात गेल्या अनेक शतकांमध्ये विस्मयकारी घटना कशा घडत गेल्या आणि अत्यंत रोमहर्षक असे शोध कसे लागले, याचा मागोवा घेणारी ही लेखमाला.

ता. १३ सप्टेंबर १८४८ ची सकाळ... फिनिअस गेज हा २५ वर्षांचा फोरमन रेल्वेच्या रूळांसाठी जमिनीतल्या एका खोबणीत स्फोटके भरत होता. स्थळ होते अमेरिकेतील कॅव्हेंडिश प्रांत. रूळ टाकण्याचे काम जोरात चालू होते. त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून जमीन खोदण्याचे काम सुरू होते.

फिनिअस गेज हा त्याच्या कामगार सहकाऱ्यांमध्ये एक मनमिळाऊ आणि उद्योगशील फोरमन म्हणून ओळखला जायचा. १३ सप्टेंबरला सकाळी फिनिअसने जमीन फोडायच्या भागात स्फोटके भरली. ही स्फोटके अगदी ठासून भरावी लागत. त्यामुळे लोखंडाच्या एका लांबसर व निमुळत्या दांड्याने तो ती ठासून भरत होता. हे करताना अर्थातच भरपूर जोर द्यावा लागतो हे त्याला माहीत होते. शिवाय जमिनीतल्या छोट्या खोबणीत जितकी स्फोटके ठासून बसतील तितकी स्फोटाची तीव्रता अधिक. स्फोटके-दारू भरण्याचे काम जवळजवळ संपत आले होते. एकदा शेवटचा जोर लावावा म्हणून फिनिअसने लोखंडी दांडा त्यावर दाबला आणि अचानक प्रचंड स्फोटाने आसमंत हादरला. फिनिअसने भरलेल्या त्या दारुगोळ्याचा अचानक आणि अनपेक्षितरीत्या स्फोट झाला होता.

या स्फोटाने फिनिअसच्या हातातला निमुळता लोखंडी दांडा एखाद्या क्षेपणास्त्रासारखा उडाला, त्याच्या डाव्या गालात घुसून, डोळ्याची खोबण छेदून तो डाव्या बाजूच्या कवटीमध्ये घुसला. आश्चर्य म्हणजे कवटीच्या पुढच्या भागातून हे लोखंडी सळईचे ‘मिसाईल’ बाहेर आले आणि कित्येक फुटांवर जाऊन पडले. या अतर्क्य घटनेवर कडी म्हणजे, काही सेकंदातच फिनिअस उठून बसला... उभा राहिला... आणि चालत चालत सहकाऱ्यांपर्यंत पोचला. एखाद्या भुताला बघावे तसे इतर कामगार त्याच्याकडे बघत होते. फिनिअसचा डावा गाल, डोळा आणि कवटीचा वरचा भाग रक्ताने माखला होता. जवळच राहणाऱ्या डॉ. विल्यम्सना तातडीने पाचारण करण्यात आले. डॉ. विल्यम्सने त्या दिवशी जे पहिले, त्याने त्यांच्याही आश्चर्याला पारावार राहिला नाही. डॉ. विल्यम्सने लिहिले आहे... ‘मी माझ्या बग्गीतून खाली उतरताना फिनिअस मला दिसला. त्याच्या कवटीच्या मध्यावरची जखम स्पष्ट दिसत होती. त्या जखमेतून त्याच्या मेंदूचा काही भाग बाहेर येत होता. फिनिअस त्याच्या आजूबाजूला जमलेल्यांना घडलेली घटना सांगत होता. हा सर्वच प्रकार मला धक्कादायक व अतर्क्य वाटत होता. फिनिअसला काहीतरी भास झाल्यामुळे तो भ्रमिष्टासारखा बोलत असावा असंच मला वाटलं... ‘लोखंडाचा दांडा माझ्या कवटीतून आरपार गेला...’ तो वारंवार सांगत होता. आजूबाजूचे लोक डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होते. इतक्यात फिनिअस बोलताना अचानक उठला. त्याला उलटी झाली. त्या उमास्याने त्याच्या कवटीच्या भोकातून मेंदूचा थोडासा भाग बाहेर आला...’ या घटनेचे डॉ. विल्यम्स यांनी तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. ड्रॅक्युला किंवा रामसे बंधूंच्या सिनेमातल्या प्रमाणे उलगडणारी ही गोष्ट! पण ही गोष्ट मेंदूच्या संशोधन क्षेत्रात अजरामर झाली. ती इतकी, की अगदी २०१२ साली, म्हणजे घटनेनंतर तब्बल १६० वर्षांनंतरसुद्धा त्यावर संशोधन चालू होते आणि आणि या घटनेशी संबंधित वस्तू म्हणजे अगदी लोखंडाची सळईसुद्धा अमेरिकेत संग्रहित करून ठेवण्यात आली आहे. म्हणूनच या प्रत्यक्षात घडलेल्या भयकथेचा उत्तरार्ध आपण जाणून घेणे अगत्याचे आहे.

तर, डॉ. विल्यम्सने फिनिअस गेजचे ड्रेसिंग केले व त्याला डॉ. जॉन हॉरलो या त्या काळच्या नावाजलेल्या डॉक्टरकडे पाठवले. डॉक्टर हॉरलोंच्या टिपणीप्रमाणे, अगदी त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा फिनिअस गेज पूर्ण शुद्धीवर होता. त्याच्या सहकाऱ्यांची नावेसुद्धा त्याला व्यवस्थित आठवत होती.

शास्त्रीय निरीक्षणाधारित वैद्यकीय काळातली ही घटना त्यावेळेला सर्वांना अचंबित करणारी ठरावी यात काहीच आश्चर्य नव्हते. ज्या व्यक्तीच्या डोळ्यातून लोखंडाची सळई घुसून दुसऱ्या बाजूने कवटी फोडून बाहेर आली आहे आणि त्या छिद्रातून मेंदू बाहेर येतो आहे, अशी व्यक्ती  जवळजवळ काहीच फरक न पडल्याप्रमाणे चालत बोलत असेल, तर अर्थातच ही फक्त त्या काळीच नव्हे तर अगदी आजही सामान्य लोकांसाठी अचंबित करणारी घटना ठरेल.

फिनिअसची जखम कालांतराने हळूहळू भरून आली. १८४९ साली डॉक्टर हॉरलो यांना जखम दाखवायला फिनिअस गेज पुन्हा कॅव्हेंडिशला आला. आता अपघातानंतर जवळजवळ दहा महिने उलटून गेले होते. त्यावेळी डॉक्टर हॉरलो यांनी लिहिलं आहे... ‘त्याच्या कवटीच्या पुढच्या भागातला हाडाचा तुकडा अजूनही वर उचललेला होता. त्यावरची त्वचा मात्र पूर्ण भरून आली होती. त्या तुकड्याच्या मागे पाच सेंटिमीटरचा एक भाग मऊ लागत होता आणि त्यातून मेंदूची स्पंदने स्पष्ट दिसत होती. मात्र त्याच्या मित्रांच्या सांगण्याप्रमाणे फिनिअसच्या व्यक्तिमत्त्वात बराच बदल झालेला होता.’

जसे आठवडे, महिने, वर्षे गेली, तसा फिनिअस गेजच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल अधिक स्पष्ट होत गेला. जो गेज मनमिळाऊ, उद्योगशील आणि सभ्य म्हणून प्रचलित होता; तो शीघ्रसंतापी झाला, त्याने छोट्या कारणांवरून शिव्या देणे, मारहाण करणे नित्याचे झाले. हा आमचा ‘पूर्वीचा मित्र फिनिअस गेज’ नाहीच असे त्याचे सहकारी म्हणू लागले. खरेतर मेंदूच्या ‘फ्रॉँटल लोब’ या भागाला इजा झाल्याने गेजचे आचार-विचार व व्यक्तिमत्त्व बदलले होते. यावरूनच विशिष्ट मानसिक क्षमतांची निश्चित केंद्रे ही मेंदूत असणार व मानवाच्या विचार क्षमता, व्यक्तिमत्त्व निश्चित करणारी वैशिष्ठ्ये ही मेंदूतील विशिष्ट भागात असणार, या विचाराचा पुरावाच मिळाला.

फिनिअस गेज हा मेंदूतील विशिष्ट भाग नष्ट झालेला, पण चालता-फिरता-बोलता असा एक मनुष्य झाला. महत्त्वाचा भाग म्हणजे विज्ञाननिष्ठ व तर्कसंगत विचारांच्या उदयाच्या काळात ही घटना घडल्याने तिचा शास्त्रीय निकषांवर अन्वयार्थ लावण्यात आला.

यातला दुसरा आणि मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे, कवटीतून आरपार मोठे भगदाड पाडून हा लोखंडी रॉड बाहेर आला होता. एवढेच नाही तर मेंदूचा काही भागसुद्धा बाहेर पडून गेलेला होता. हे सर्व होऊनसुद्धा फिनिअस गेज हा तुलनेने सर्वसामान्य आयुष्य जगत होता. यातून असा स्पष्ट निष्कर्ष निघाला, की मेंदूची शस्त्रक्रिया करूनसुद्धा एखादी व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य आहे.

फिनिअस गेजची केस इतकी प्रसिद्ध झाली की आजही जवळजवळ १७५ वर्षांनंतर फिनिअस गेजच्या स्मृती हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या ‘वॉरेन’ संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्याला इजा करणारा रॉड, त्याची स्वतःची छायाचित्रे, एवढेच नव्हे तर मरणोत्तर शवविच्छेदन करून काढलेली गेजची कवटी या गोष्टी आजतागायत संग्रहित आहेत. चेता विज्ञान शास्त्र आणि मेंदू शस्त्रक्रिया शास्त्र (न्यूरो सर्जरी) या शास्त्राच्या दृष्टीने या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(लेखक तज्ज्ञ न्यूरोसर्जन आहेत.)

संबंधित बातम्या